' लाल सिंह चड्ढा ज्याचा रिमेक आहे त्या ‘फॉरेस्ट गंप’मधून प्रत्येकाने शिकाव्यात अशा १० गोष्टी – InMarathi

लाल सिंह चड्ढा ज्याचा रिमेक आहे त्या ‘फॉरेस्ट गंप’मधून प्रत्येकाने शिकाव्यात अशा १० गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमीर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत होता. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. पण रिमेक असला तरी हा चित्रपट कसा असेल याची प्रेक्षकांना उत्कंठा आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून मूळ चित्रपटातल्या टॉम हँक्सच्या भूमिकेशी आमीरची तुलना करून आमीरला सध्या बरंच ट्रोल केलं जातंय. पण दुसऱ्या बाजूला ट्रेलरला भरघोस व्ह्यूजही मिळताहेत.

१९९४ साली ‘फॉरेस्ट गंप’ हा चित्रपट आला तेव्हा त्याची चांगलीच हवा झाली होती. चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. एका सामान्य माणसाची असामान्य कथा या चित्रपटातून आपल्या समोर आली. फॉरेस्ट गंप हे पात्रं लोकांचं लाडकं झालं.

 

lal singh chaddha forrest gump IM

 

वरकरणी अगदी तुमच्याआमच्यासारखा असलेला, सर्वसामान्यांपेक्षा कमी बुद्धिमता असलेला फॉरेस्ट गंप वेगळा ठरतो तो त्याच्या गुणांमुळे. त्याचे गुण कुणीही आत्मसात करावेत असेच आहेत.

‘फॉरेस्ट गंप’ चित्रपटातून आपण प्रत्येकानेच शिकाव्यात अशा १५ गोष्टींना उजाळा देऊ.

१. सकारात्मकता :

 

Positivity

 

आयुष्यात कठीण काळ सुरू असताना एक प्रकारची माणसं हसत हसत त्याला सामोरी जातात तर दुसऱ्या प्रकारची माणसं देवाला, नशिबाला दोष देतात. पहिल्या प्रकारची माणसं वेगळी ठरतात ती अखेरीस सगळं काही व्यवस्थित होईल या त्यांच्या दृढ विश्वासामुळे.

हा विश्वास ठेवणं हे अंधारात एक अदृश्य दिवा घेऊन चालण्यासारखं असतं. कुणीही तो दिवा आहे हे तुम्हाला सांगणार नसतं. तो दिसत नसतानाही तो आहे असं समजून तुम्हाला पुढे चालायचं असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फॉरेस्टच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येऊनही त्याने त्याचा हा विश्वास कायम ठेवला. आजूबाजूच्या माणसांमध्ये नकारात्मकता असतानाही फॉरेस्ट नेहमीच चांगल्याच बाजूकडे बघत राहीला.

त्याच्या सकारात्मकतेचा प्रभाव इतरांवरही पडायचा. फॉरेस्टची ही सकारात्मकता आपण कुणीही शिकावी अशीच आहे.

२. दुःखातून काहीतरी प्रॉडक्टिव्ह करता येऊ शकतं :

 

forrest gump IM

 

फॉरेस्टची प्रेयसी जेनी त्याला सोडून जाते तेव्हा त्याला प्रचंड दुःख होतं. मात्र, तो त्या दुःखातच स्वतःला कुढत ठेवत नाही. तो पळायला सुरुवात करतो. दुःखातून काहीतरी प्रॉडक्टिव्ह करता येऊ शकतं हे गंप आपल्याला शिकवतो.

आपल्या दुःखातून बाहेर पडायला फॉरेस्टने पळायला सुरुवात केली तेव्हा असं पळून जग बदलण्याचा प्रयत्न तो करत नव्हता, प्रसिद्ध होण्यासाठी हे करत नव्हता.

कधीकधी काही काही गोष्टी प्लॅन न करताही,  विशेषत: दुःखी असताना आपण त्या करतो तेव्हा त्याचे खूप चांगले परिणाम पुढे जाऊन दिसू शकतात हे आपल्याला फॉरेस्टच्या उदाहरणावरून लक्षात येतं.

३. हुशारी म्हणजेच सगळं नाही :

 

intelligence-inmarathi
sciencedaily.com

 

फॉरेस्ट गंपचा आयक्यू सर्वसामान्यांपेक्षा कमी आहे. पण तरीसुद्धा गंप आपल्या मनात घर करतो ते त्याच्या गुणांमुळे. फॉरेस्ट गंप अगदी मनापासून चांगला वागतो. त्याची वागणूक आदर्श आणि तरीही सहज आहे. त्यात कशाचाही आविर्भाव, खोटेपणा नाही.

आपल्या मित्रांसाठी तो अगदी निर्व्याजपणे गोष्टी करतो. त्याच्या दयाळूपणा, निष्ठा, धैर्य आणि कामाच्या ठिकाणचे एथिक्स या गुणांमुळे तो आपला खूप लाडका होतो. हुशारी म्हणजेच सगळं नाही ही गोष्ट गंप आपल्याला शिकवतो.

४. जे करायला आवडतंय ते करा :

 

 

फॉरेस्टचं उदाहरण पाहिल्यावर त्याने ज्या ज्या गोष्टी केल्या त्यात त्याचा काही स्वार्थ असो किंवा नसो त्याने त्या मनापासून केल्या हे आपल्या लक्षात येतं. ज्या गोष्टीत आपलं मन नाही त्या गोष्टी आपल्याकडून व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे आपल्या मनाचं ऐका आणि जे तुम्हाला मनापसून करावंसं वाटतंय ते करा हीच शिकवण हे पात्र देतं.

फॉरेस्टप्रमाणे आपला काही फायदा नसतानाही दुसऱ्यासाठी काहीतरी करूनही आपल्याला आनंद मिळू शकतो. प्रत्येक वेळी स्वतःसाठीच काहीतरी करून आनंद मिळेल असं नाही.

५. खऱ्या प्रेमाचा गर्भितार्थ :

 

forrest gump 4 IM

 

एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं तेव्हा ती व्यक्ती आपल्याचसोबत असावी असं वाटणं सहाजिक आहे. पण जेव्हा आपलं एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम असतं तेव्हा त्या व्यक्तीने आनंदी असणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. मग ती व्यक्ती आपल्यासोबत असो किंवा नसो.

समोरच्याची इच्छा नसतानाही त्याला बळजबरीने स्वतःबरोबर अडकवून ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आपल्यासोबत राहायचं नसेल तर तिला जाऊ देणं म्हणजेच खरं प्रेम आहे याची फॉरेस्ट आपल्याला नव्याने जाणीव करून देतो.

जेनीसोबतचं त्याचं नातं खूप अस्थिर आहे. पण तिच्यावर प्रेम करणं तो कधीच थांबवत नाही. तो तिला प्राधान्य देतो मात्र आपल्याशी कमिट होण्यासाठी तिच्यावर दबाव आणत नाही. तिला तिचा आत्मशोध घेता यावा यासाठी आणि तिच्या तिच्या चुकाही तिला करता येऊन त्यातून शिकता यावं यासाठी तो तिला जाऊ देतो.

६. स्वतःला फार गांभीर्याने घेऊ नका :

 

happy IM

 

स्वतःवर हसता येणं हे आपण मानसिकदृष्ट्या कणखर असल्याचं एक लक्षण मानलं जातं. आपल्यातल्या अनेकांना लोक आपल्याला जज करतील या भीतीपायी आपण जसे खरे नाही तसं वागायची सवय असते. आपण जसे खरे आहोत तसं वागायला फॉरेस्ट घाबरत नाही.

लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याचा तो स्वतःवर परिणाम करून घेत नाही. फॉरेस्ट अगदी सहजपणे आपल्या आयुष्याबद्दल एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलू शकतो. आपण कुणीच पर्फेक्ट नसतो.

आपण सगळेचजण कधी ना कधी चुकतो त्यामुळे फॉरेस्टप्रमाणे आपणही स्वतःला फार गांभीर्याने न घेता जितकं विनम्र राहता येईल तितकं राहावं.

७. आपल्यात किती क्षमता आहे हे आपल्याला आधीपासूनच माहीत नसतं :

 

forrest IQ IM

 

फॉरेस्ट हा बिलो ऍव्हरेज आयक्यू असलेला एक सामान्य मनुष्य आहे. पण अनेकजण जी स्वप्न पाहतात त्यातली कितीतरी स्वप्न तो प्रत्यक्षात साध्य करतो.

दूरवर पळण्यासाठी तू प्रसिद्ध होशील असं फॉरेस्टला कोणी सांगितलं असतं तर त्यावर त्याचा विश्वास बसला नसता. लेग ब्रेसेस घालण्यापासून प्रोफेशनल ऍथलेट होण्यापर्यंतचा पल्ला तो गाठतो.

८. पैसा म्हणजेच सर्वस्व नाही :

 

currency notes inmarathi
hindustan times

 

कष्टांच्या आणि नशिबाच्या जोरावर गंप खूप पैसे कमावतो. पण पैशांच्या मागे धावणाऱ्या आणि श्रीमंत झाल्यावर श्रीमंतीचा तोरा मिरवणाऱ्यांपैकी तो नाही.

खूप पैसे असले तरी तो त्याच्या आईला आणि त्याच्या आयुष्यात त्याचं जिच्यावर प्रेम असतं तिला गमावतो आणि या घटना घडण्यापूर्वीही आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपण समस्यामुक्त झालो आहोत असं त्याला वाटत नाही.

यावरून पैसा हेच सर्वस्व नाही, पैसा तुम्हाला आनंदी करत नाही तेच तो अधोरेखित करतो.

९. लहानपणी झालेले आघात आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात :

 

forrest gump child IM

 

जेनी हे या चित्रपटातलं ट्रॅजिक पात्रं आहे. लहान असताना तिचं तिच्या वडिलांकडून लैंगिक शोषण होतं. वडिलांचं घर सोडण्याइतपत ती सक्षम होते आणि घर सोडते त्यानंतर स्वतःचं असायला हवं तितकं महत्त्व नसल्यामुळे ती चुकीचे निर्णय घेते आणि तिचा आदर न करणाऱ्या जोडीदारांना आयुष्याचा भाग होऊ देते.

लहानपणी झालेले आघात आयुष्यभर आपल्यासोबत राहतात आणि नॉर्मल नातेसंबंध प्रस्थापित करणं अशा व्यक्तींना कठीण जाऊ शकतं हेच आपल्याला जेनीच्या उदाहरणावरून लक्षात येतं.

फॉरेस्टबरोबर अखेरीस आनंदी होईपर्यंत तिला बराच वेळ लागतो. त्यांचं लग्न झाल्यावर जेमतेम एकच वर्ष त्यांचा संसार होतो आणि एका असाध्य रोगाने दुर्दैवाने जेनीचा मृत्यू होतो.

१०. हॅप्पी एंडिंग्ज सहजपणे घडत नाहीत :

 

happy ending 2 IM

 

फॉरेस्टला जेनी आपल्या आयुष्यात मनापासून हवी असते पण तिच्याशी लग्न होण्यापूर्वी त्याला त्याच्या आयुष्यात कशाकशातून जावं लागतं हे चित्रपटातून आपल्या समोर येतं. त्यामुळे हॅपी एंडिंग्ज प्रत्येकवेळी सहजासहजी घडत नाहीत हेच आपल्याला गंपच्या आयुष्याकडे बघून लक्षात येतं.

काही काही चित्रपट हे पात्रांच्या माध्यमातून समकालीन समस्या समोर आणणारे असतात त्यामुळे ते त्या त्या पिढीलाच रिलेट होणारे असतात. मात्र काही काही चित्रपट कुठल्याही काळातल्या कुणाहीसाठी महत्त्वाची ठरेल अशी शिकवण देतात. या अर्थी, ‘द फॉरेस्ट गंप’ हा चित्रपट शहाणपणाचं कम्प्लिट पॅकेज म्हणावा लागेल.

आमीराचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट ‘द फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा रिमेक असला तरी आपल्या खास ढंगात तो लोकांचं मनोरंजन करणारा आणि त्यांच्या आयुष्यावर मूलगामी प्रभाव पाडणारा ठरो हीच आशा करूया.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?