' पाकिस्तानी टिकटॉकर्स नीच थराला! प्रसिद्धीसाठी सर्व मर्यादा ओलांडल्यात! – InMarathi

पाकिस्तानी टिकटॉकर्स नीच थराला! प्रसिद्धीसाठी सर्व मर्यादा ओलांडल्यात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर असा की सामान्य व्यक्ती आज सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी मिळवणं अनेकांसाठी सहज शक्य झालं आहे. आज वेगवेगळे रिल्स करून लोकांना चटकन फॉलोवर्स मिळवता येतात.

 

tiktok influencers

 

आपली प्रत्यक्षातल्या आयुष्यातली ओळख आणि सोशल मीडियावरची ओळख यात हल्ली बऱ्याच जणांच्या बाबतीत कमालीचा फरक दिसून येतो. नृत्याचे, गायनाचे, मजामस्करी, नकलांचे रिल्स, व्हिडियोज करून आपले फॉलोवर्स, व्ह्यूअर्स कसे वाढतील हा अनेकांचा प्रयत्न असतो. पण हे करत असताना कॉमन सेन्स वापरणं आणि काळ, वेळ, प्रसंगाचं भान राखणं गरजेचं असतं.

झटपट लोकप्रियता मिळवण्याच्या आजच्या घाईच्या युगात कित्येकजण अविचाराने सोशल मीडियाचा वापर करतात तेव्हा एकतर त्याच हसं तरी होतं किंवा ते लोकांच्या नाराजीचं कारण होऊन बसतात. एका पाकिस्तानी टिक टॉकरच्या बाबतीतलं असंच एक वृत्त इतक्यात समोर आलंय.

 

Humaira 1 im

 

भारतात तर आता टिक टॉकवर बंदी आहे. पण पाकिस्तानी अभिनेत्री आणि टिक टॉकर असलेल्या हुमैरा असघर हिने आपल्या फॉलोवर्स आणि इतरांचं लक्ष आपल्या व्हिडियोकडे वेधून घेण्यासाठी चक्क जंगलात मागे आग लागलेली आहे आणि पुढून ती चालत येतेय असा टिकटॉक व्हिडियो पोस्ट केला आहे.

प्रसंगावधान न राखता तिने पोस्ट केलेल्या या व्हिडियोमुळे तिने अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. काय आहे हे सगळं वृत्त? जाणून घेऊ.

देशात आणि देशाबाहेर सध्या उन्हाच्या तडाख्यामुळे सगळेच त्रस्त झालेत. इतक्या भयानक उष्म्यामुळे आपल्या शेजारच्या राष्ट्रांमधल्या वेगवेगळ्या भागांमधल्या जंगलांमध्ये आगी लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानातल्या काही भागांमधलं तापमान ५१ डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचलं आहे. वाढत्या तापमानामुळे अर्धा एप्रिल झाल्यापासून जुलै पर्यंत तिथल्या जंगलांना आग लागणं तिथे नवं नाही.

अशात, हुमैरा असघर या पाकिस्तानी अभिनेत्री- टिकटॉकरने मागे आग लागलेली असताना सिल्व्हर ड्रेस घालून पुढून चालून येतानाचा आपला टिक टॉक व्हिडियो टाकला आहे. आपल्या व्हिडियोसाठी ही चांगली बॅकग्राउंड होईल असा तिने विचार केला.

 

Humaira 2 im

 

या व्हिडियोत बॅकग्राऊंडला ‘पसुरी’ या गाण्याचे बोल ऐकू येत आहेत. हे कमी होतं म्हणून “जिथे मी जाते तिथे आग लागते” अशी कॅप्शन आपल्या व्हिडियोला देऊन तिने कहर केला आहे.

आपल्या सौंदर्याची लोकांना भुरळ पडावी या हेतूने हुसैनने हे केलं असेल. मात्र व्हिडियोतल्या मागच्या आगीमुळे ११ मिलियन फॉलोवर्स असलेल्या हुमैराविषयी सगळीकडूनच संतापाची प्रतिक्रिया उमटते आहे.

हे केवळ टिक टॉक पुरतंच मर्यादित राहिलेलं नसून या अस्वस्थ करणाऱ्या व्हिडियोची दखल वन्यजीव अधिकाऱ्यांनीही घेतली आहे. देशातल्या जंगलांचं संरक्षण व्हावं यादृष्टीने सरकारने कायदे करावेत अशी मागणी वन्यजीव अधिकाऱ्यांनी केली आहे.

पर्यावरणवादी कार्यकर्त्या आणि ‘इस्लामाबाद वन्यजीव व्यवस्थापन’ बोर्डाच्या अध्यक्षा असलेल्या रिना सईद खान सत्ती यांनी ट्विटरवर हुमैराविषयीचा आपला राग व्यक्त केला आहे.

humaira 3 im

 

“हा ट्विटरवरचा अस्वस्थ करणारा आणि घातक ट्रेंड आहे. या इतक्या कडक उन्हाळ्याच्या आणि कोरड्या ऋतूत फॉलोवर्स मिळवण्यासाठी अधीर झालेले तरुण जंगलांना आग लावत आहेत! ऑस्ट्रेलियात जे लोक जंगलात आग लावतात त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा होते. आमच्याकडेही अशाच प्रकारचा कायदा येण्याची गरज आहे.” त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.

‘एएफपी’शी बोलताना त्या म्हणाल्या, “अशा प्रकारे दिखावा करण्याऐवजी तिने आग विझवण्यासाठी हातात पाण्याची बादली घ्यायला हवी होती. या व्हिडियोमधून जाणारा संदेश धोक्याचा आहे आणि त्याच्यावर प्रतिबंध घालणं आवश्यक आहे.” “या मूर्ख तरुणांना पकडलं गेलं पाहीजे आणि तातडीने तुरुंगात टाकलं पाहीजे!

जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर कृपया वाईल्ड लाईफ बोर्डशी संपर्क साधा.”, असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय.

हुमैराने स्वतःहून ती आग लावल्याचा आरोप तिच्यावर केला गेला आहे. पण तिने हा आरोप फेटाळून लावला आहेत. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, लोकांच्या तीव्र टीकेनंतर तिने हा व्हिडियो मागे घेतला आहे. तिच्या सहकाऱ्याने तिचं एक निवेदन सादर केलंय ज्यात तिने आपण ती आग लावली असल्याचं आणि “व्हिडियोज बनवण्यात काही हानी नसल्याचं म्हटलंय.

“लोकांनी पोलिसांना सोशल मीडियावर टॅग केलं आहे आणि अशा प्रकारच्या मुर्खासारख्या प्रकारांना समर्थन देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहीजे अशी तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात व्हिडियोच्या बॅकग्राउंडसाठी जंगलाला हेतूपुरस्सर आग लावल्याबद्दल अब्बोटाबाद येथे एका माणसाला अटक केली गेली होती.

 

Humaira 4 im

 

एका व्हिडियोत आणखी दोन माणसं आग लावताना आणि बॅकग्राउंडला संगीत सुरू झाल्यावर पळून जाताना दिसली. ‘वाईस’च्या वृत्तानुसार, अशा प्रकारचे स्टंट्स केल्याचे आरोप बऱ्याच जणांवर करण्यात आले आहेत. आणखी एका टिकटॉकरने आपल्या व्हिडियोला नाट्यमय इफेक्ट मिळावा यासाठी चक्क डझनभर झाडं जाळली होती.

हुमैराचा व्हिडियो येण्याआधी काही दिवसांपूर्वी जमीन वापरायची म्हणून जंगलाला आग लावल्याबद्दल एका पाकिस्तानी माणसाला अटक करण्यात आली.

हुमैरा असघरचा हा व्हिडियो ट्विटरवरही चांगलाच व्हायरल होत असून @PakistanNature ने देखील तो शेअर केला आहे. हा व्हिडियो शेअर करत @PakistanNature ने सरकारला आवाहन केलंय की या व्हिडियोमधील पाकीस्तानी टिकटॉकवर बंदी घालण्यात यावी. या ब्रॅण्डसोबत हुमैरालाही शिक्षा व्हायला हवी जेणेकरून अशा लहान लहान व्हिडियोसाठी निसर्गाशी खेळणं थांबेल अशीही मागणी या ट्विटमध्ये करण्यात आली आहे.

 

forest fires im

 

टिकटॉकने यासंदर्भात एक अधिकृत निवेदन जाहीर केलं आहे. त्यात असं म्हटलंय, “धोकादायक आणि बेकायदेशीर वागणूकीचं समर्थन करणारा कुठलाही कन्टेन्ट आमच्या कम्युनिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणारा असेल आणि आमच्या प्लॅटफॉमवर त्यासाठी परवानगी नाही.

जो कन्टेन्ट धोकादायक किंवा बेकायदेशीर कृत्य समोर आणतो तो काढून टाकण्यासाठी, त्यावर मर्यादा आणण्यासाठी किंवा त्यावर लेबल लावण्यासाठी आम्ही काम करतो.

युजरच्या संरक्षणासाठीच्या आमच्या वचनबद्धतेबाबत आम्ही दक्ष असतो आणि युजर्सनी खबरदारीने आणि जबाबदारीने ऑनलाईन आणि ऑफलाईन वागावं यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहन देतो.”

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आपण सगळेच काही प्रमाणात आत्मकेंद्री झालो आहोत. पण हे करत असताना आपल्याला आजूबाजूच्या भवतालाचं जराही भान राहीलं नाही आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपण कुठल्याही थराला जात असू तर ते चालणार नाही.

हुमैरा आणि तिच्यासारख्या वागणाऱ्या बाकीच्यांप्रमाणे उगीचच चर्चेत येणं टाळायचं असेल तर वेळीच ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा:इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल:https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?