' मशिन नव्हे, “समाज” तयार करणारा अवलिया इंजिनिअर: गौर गोपाल दास – InMarathi

मशिन नव्हे, “समाज” तयार करणारा अवलिया इंजिनिअर: गौर गोपाल दास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधी कधी आपल्या मित्राने आपल्या अकाउंट वर एखादा मिश्किलपणे बोलणारा चष्मेवाला साधू, त्याचे प्रवचन लावलेले पहिले असेल. कधी कधी तुम्ही ते नीट लक्ष देऊन ऐकलेही असेल आणि त्यातील कित्येक गोष्टी तुम्हाला पटल्या असतील ही. अशा रसाळ गोष्टी सांगणारे ते साधू आहेत गौर गोपाल दास … कोण आहेत हे गौर गोपाल दास?

आपल्या मिश्कील शैलीत वेगवेगळे दाखले देत रसाळ भक्तिपूर्ण विवेचन करत समस्या सोडवायला मदत करणारे गौर गोपाल दास हे आजकालचे अगदी सुप्रसिद्ध वक्ते आहेत. संन्यासी असले तरी त्यांनी जी प्रेरणादायी भाषणे दिली आहेत ती इतकी लोकप्रिय झाली आहेत की कितीतरी जणांच्या स्टेट्सला, सोशल मिडिया पोस्टवर त्यांच्या भाषणांचे छोटे छोटे भाग असतात.

यू ट्यूबवर त्यांचे करोडो फॉलोअर्स आहेत. त्यांची विविध प्रेरणादायी भाषणे लोकांना प्रचंड आवडतात. लोकांनी अगदी डोक्यावर घेतली आहेत ती भाषणे.

 

 

आपल्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्या त्यावरील छोटी छोटी उत्तरे खूपदा आपल्याकडेच असतात. पण आपण इतके त्या अडचणींनी गांजून गेलेलो असतो की त्या समस्याच आपल्याला खूप मोठ्या वाटत असतात.

त्यामुळे त्या समस्यांना कसे सकारात्मक दृष्टीने बघावं हे गौर गोपाल दास सांगतात. आणि हीच गोष्ट लोकांना खूप आवडते हे त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येवरून समजते.

कोण आहेत हे गौर गोपाल दास?

तुम्ही विश्वास ठेवाल का की हा संन्यासी अभियांत्रिकी पदवीधारक आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअर असलेले गौर गोपाल दास हे पुण्यात एका मध्यमवर्गीय घरात २४ डिसेंबर १९७४ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. Hp या नामांकित कंपनीमध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.

एक वर्षभर काम केल्यानंतर त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,पैसा कमावणं खूप सोपं आहे. पण अवघड आहे ते प्रभावशाली आयुष्य जगणं. असं आयुष्य जे लोकांवर प्रभाव टाकू शकेल. कारण, जगण्यापुरता पैसा तर सगळेच मिळवतात.

अगदी भिकारी सुद्धा लक्षाधीश असू शकतो नव्हे, असतोच. पण तो त्याने चार लोकांना काय आदर्श घालून देतो? भिक मागायचा? आणि किती लोक तो घेतील? नोकरीत असताना सगळे काही मिळत होते पण त्यात आत्मिक आनंद, समाधान नव्हते.

मग वाटलं असा रस्ता हवा जो लोकांना उजेड दाखवेल आणि मनाला आनंद देईल. मग त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणा संताच्या विभूती या ओळीचे पालन करायचे पक्के केले.

 

 

वास्तविक साधू म्हणजे केवळ आश्रमात किंवा मठात राहतात. पण गोपाल दास यांची साधू असण्याची व्याख्या वेगळी आहे. अभियंता कशाची ना कशाची बांधणी करत असतो.

गौर गोपाल दासनी समाजाची बांधणी करणारा अभियंता होणे पसंत केले. एकंदरीत जगात इतकी नकारात्मकता आहे. पण म्हणून चांगल्या गोष्टी नाहीतच का? मग ती सुरुवात आपण आपल्यापासूनच करूया हा साधा सोपा पण तरीही खूप कठीण उद्देश त्यांनी ठरवला.

जगात अवघड काय आहे? तर साधे सोपे असणे हेच कठीण आहे. मग हेच कठीण काम त्यांनी करायचे ठरवले. लोकांना आयुष्यातील सकारात्मकता वाढवून त्यांना आध्यात्मिक उन्नतीसाठी जागे करणे हा त्यांचा उद्देश ठरला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मग त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर काही काल मनात सतत द्वंद्व सुरु होते, आपण घेतलेला हा निर्णय बरोबर आहे ना? कारण इतकी उत्तम पगाराची नोकरी, उत्तम कंपनी हे सारे सोडून बाहेर पडणे इतके सोपे नव्हते.

त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अजून काही वर्षांनी ते उच्च पदस्थ अधिकारी होऊ शकले असते.पण हळूहळू त्या शंका ही मिटल्या.

काही लढाया केवळ स्वत:पुरत्या रहात नाहीत. त्यांच्या घरच्या लोकांना त्यांनी असं नोकरी सोडून बाहेर पडणं अजिबात मान्य झालं नाही. त्यांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला.

एवढी चांगली नोकरी सोडून आपला मुलगा साधू संन्याशी व्हायचं ठरवतो तेव्हा घरचे लोक गप्प बसणं शक्य असतं का? पण त्यांनी घरच्यांचे मन वळवले आणि त्याक्षणी त्यांना जाणीव झाली की आपण लोकाच्या विचारात सकारात्मक बदल करू शकतो.

आणि १९९६ मध्ये इस्कॉन अर्थात international society for Krishna consciousness मध्ये प्रवेश केला.तिथे मुंबई मधील राधास्वामींचे ते शिष्य झाले. त्यांच्यावर भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.. आणि लोकांना सकारात्मकतेकडे वळवण्याचे कौशल्य आपण वापरू शकतो याचाही अंदाज आला.

 

 

गौर गोपाल दास इतर साधू महंत लोकांसारखे नव्हते. ते उत्तम तंत्रज्ञान वापरू शकणारे आधुनिक विचारांचे साधू होते. खूप लोकांपर्यंत आपले विचार प्रभावीपणे पोचवण्यासाठी समाज माध्यमे अर्थात फेसबुक, यू ट्यूब,इन्स्टाग्राम या सर्व प्रकारांना ते हाताळू शकत होते.

सौम्य शब्दात पण चिमटे काढत लोकांना त्यांच्या चुका दाखवून देण्याची, उत्तम संभाषण कलेची हातोटी त्यांना लाभली होती.आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी वेगवेगळे सेमिनार्स म्हणजे परिसंवाद आयोजित केले. आणि बघता बघता लोकांना ते आवडू लागले.

कारण लोकांना आपल्या आयुष्यातील कटकटी नकोशा झालेल्या असतात. त्यामुळे अजून गंभीरपणे कुणी काही सांगत असेल तर लोक खरोखर वैतागून जातात पण तीच गोष्ट हलक्याफुलक्या स्वरुपात कुणी सांगितली तर ते लोकांना पटतं, आवडतं आणि रुचतंही. गौर गोपाल दास यांनी हेच केलं.

ते नंतर नंतर इतके लोकप्रिय झाले की कितीतरी सेलिब्रिटी,कार्पोरेट लीडर्स यानाही त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या या हलक्या फुलक्या परिसंवादानी जगभर लोकप्रियता मिळवली. अगदी फोर्ड, बँक ऑफ अमेरिका,इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट अशा मल्टीनॅशनल कंपन्यानीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.

ब्रिटीश पार्लमेंटनेही गौर गोपाल दास यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. कितीतरी सामाजिक कार्यक्रमात त्यांना भाषण देण्यासाठी बोलावले गेले.

अध्यात्माचा वापर करून समाजाभिमुख आणि प्रेरणादायी काम केले म्हणून २०१६ मध्ये त्यांना रोटरी इंटरनॅशनल कडून सुपर अचिव्हर या सन्मानाने गौरविण्यात आले.

 

 

एकंदरीत समाजात असलेले स्पर्धा ताण तणाव यावर गौर गोपाल दास यांची भाषणे ऐकून मन शांत होते. त्यांचे हलकेफुलके भाषण ऐकताना नकळत माणूस अंतर्मुख होऊन विचार करू लागतो. आणि कितीतरी प्रश्नांची उत्तरे जी आपल्याजवळच असतात ती सापडतात.

गौर गोपाल दास सांगतात कुणीही येऊन आपली मदत करत नसतो. आपली मदत आपल्यालाच करावी लागते. अशी रोजच्या व्यवहारातील अगणित उदाहरणे देऊन गौर गोपाल दास लोकांना विचार करायला प्रवृत्त करतात.

यश म्हणजे काय आहे? आयुष्यत समतोल कसा राखावा? अशा बऱ्याच गोष्टी ते खूप सोप्या रीतीने सांगतात. त्यांचे हे यश, लोकप्रियता या साऱ्याचे श्रेय ते देवाला, आपल्या गुरुना, आणि आपले मठातील सहाध्यायी साधू यांना देतात.

इतकी लोकप्रियता ,सन्मान मिळूनही गौर गोपाल दास स्वत: अत्यंत नम्र आणि विनयशील आहेत. ते जितके उत्तम वक्ते आहेत तितकेच उत्तम श्रोता सुद्धा आहेत. एका इंजिनिअरने आपले नेहमीचे इंजिनीअरिंग सोडून हे सामाजिक इंजिनीअरिंग केले आणि ते यशस्वी करून दाखवले.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?