' वेश्यांमधील माणूसपण दाखवणारे हे १० भारतीय चित्रपट अनेकार्थी डोळे उघडणारे आहेत – InMarathi

वेश्यांमधील माणूसपण दाखवणारे हे १० भारतीय चित्रपट अनेकार्थी डोळे उघडणारे आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही काळापूर्वी वादांच्या भोवऱ्यात अडकूनही त्यातून सहीसलामत सुटत ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. कामाठीपुरातल्या वेश्यांचं विदारक वास्तव दाखवणारा हा चित्रपट. गंगुबाई काठियावाडी या खऱ्याखुऱ्या व्यक्तीवरचा हा बायोपिक.

गंगा या भाबड्या मुलीचं गंगू या वेश्येत होणारं रूपांतर आणि यथावकाश कामाठीपुऱ्यावर राज्य करणारी, राजकारणात उतरलेली गंगूबाई असा प्रवास या चित्रपटातून उलगडला गेला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मात्र चित्रपटभर दिसत राहिली ती गंगुबाईच्या डोळ्यातली माणूस म्हणून स्वीकारलं न जाण्याची असाहाय्य्यता. समाज कितीही प्रगत झाला असं म्हटलं तरी आजही वेश्येकडे माणूस म्हणून पाहीलं जात नाही.

कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्रात वेश्येलाही सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी असं म्हटलं होतं. पण आज इतका काळ लोटल्यानंतरही हे घडताना दिसत नाही. तथाकथित पांढरपेशा समाजातले अनेक पुरुष आजही वेश्यावस्तीत जातात. पण वेश्या या विषयाविषयी आजही चारचौघात मौन पाळलं जातं.

 

aalia in gangubai IM

 

नुकतंच सुप्रीम कोर्टाने वेश्याव्यसायाला कायदेशीर परवानगी दिली आहे. मात्र आपल्याला आत्मसन्मान नाही या भावनेने या बायकांना किती त्रास होत असेल याचा गांभीर्याने विचार केला जात नाही. वेश्यांचं हेच माणूसपण यापूर्वीही काही भारतीय चित्रपटांमधून दाखवलं गेलं आहे. आपले डोळे अनेकार्थी उघडणारे असे १० चित्रपट पाहू.

१. अमर प्रेम :

वेश्यांमधलं माणूसपण दाखवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अमर प्रेम या चित्रपटाला पहिलाच मान द्यावा लागेल. खरंतर या चित्रपटात राजेश खन्ना होता. पण शर्मिला टागोर यांनी साकारलेलं पुष्पा हे पात्रं या चित्रपटातलं सगळ्यात महत्त्वाचं पात्रं होतं. आनंद, पुष्पा आणि नंदू या तीन पात्रांभोवती हे कथानक फिरतं. नंदू या लहान मुलाचा त्याची सावत्र आई छळ करत असते. पण पुष्पा त्याला जीव लावते.

पुष्पाचा नवरा दुसरं लग्न करतो आणि पुष्पाला सोडतो. त्यामुळे निराश झालेली पुष्पा घरी परतते तेव्हा घराचे दरवाजेही तिला बंद होतात. तिचे काका तिला कलकत्त्यातील वेश्यागृहात विकतात. या चित्रपटातलं राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या पात्रांमधलं नातं खूप भावस्पर्शी आहे. चित्रपटातल्या गाण्यांचं संगीत, सूर जितके श्रवणीय होते तितकाच त्या गाण्यांचा आशय अर्थगर्भ होता.

 

amar prem im

 

२. देवदास :

देवदास मधल्या माधुरी दीक्षितच्या चंद्रमुखी या पात्राच्या नृत्याने जितकं आपल्या डोळ्यांचं पारणं फिटलं तितकीच लक्षात राहिली त्या सगळ्या भरजरी पोषाखामागची बाईपणाला वेश्येचा कलंक लागलेली, देवदास आपला कधीच नव्हता हे जाणूनही त्याला चराचरात पाहणारी प्रेमिका चंद्रमुखी. श्रीमंत, दारुड्या माणसांनी रात्री आपल्याकडे यायचं आणि ऐयाशी करायची, आपल्यावर पैसे, दागिने, किंमती वस्तू उधळायच्या आणि आपला अपमान करायचा हेच दुर्दैव चंद्रमुखीच्या वाट्याला आलेलं.

 

shahrukh in devdas inmarathi
indiatvnews.com

 

ऐश्वर्या रायने भूमिका साकारलेली देवदासची घरंदाज पत्नी पारो आणि माधुरी दीक्षितने साकारलेली वेश्या असलेली चंद्रमुखी यांच्यातला संवाद आजही लोकांच्या लक्षात आहे. पारो चंद्रमुखीला भेटते तेव्हा चंद्रमुखीचा अपमान करते आणि तिला म्हणते, “तवाईफोंकी तकदीर मै शोहर नहीं होते” त्यावरचं चंद्रमुखीचं म्हणणं काळजाला भिडणारं आहे. ती म्हणते, “ठकूरैन, तवाईफोंकी तो तकदीर ही नहीं होती!”

३. जुली :

२००६ साली आलेला हा चित्रपट. आपल्या प्रियकराने आपल्याला सोडल्यावर जुली अस्वस्थ होते. आयुष्याला नवी सुरुवात करावी या हेतूने मुंबईला येते. पण तिच्या बॉसकडून तिचं लैंगिक शोषण होतं. त्यामुळे ती भावनाहीन होते आणि कॉल गर्ल बनायचं ठरवते.

 

julie im

 

तिची एका श्रीमंत माणसाशी गाठ पडते आणि तो माणूस तिच्या प्रेमात पडतो. तो तिला मागणी घालतो पण ती वेश्या आहे याची त्याच्या कुटुंबियांना कल्पना नसते. ती आपल्यासाठी खास असल्याचं मिहीर जेव्हा टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात सांगतो तेव्हा काय करावं असा संभ्रम तिच्या मनात निर्माण होतो.

४. चांदनी बार :

तब्बूने आजवर साकारलेल्या उत्कृष्ट भूमिकांपैकी ही एक भूमिका. तब्बूने यात मुमताज या मुलीची भूमिका साकारली आहे जिच्या कुटूंबियांची जातीय दंगलीत कत्तल होते. तिच्या कुटूंबातले तिचे केवळ काकाच वाचतात. काकांबरोबर ती मुंबईत राहायला येते.

 

tabbu feature inmarathi

 

त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची असते त्यामुळे तिचे काका मुमताजला ‘चांदनी बार’ मध्ये ‘बारमेड’ म्हणून काम करण्यासाठी राजी करतात. तिथे तिला असभ्य पुरुषांसमोर नृत्य करावं लागतं. तिचे काकाच तिच्यावर बलात्कार करतात तेव्हा तिची भुरळ पडलेला एक गुंड तिचा आधार बनतो. तो तिच्याशी लग्न करतो. त्यांना मुलं होतात. पण नंतर तो त्या सगळ्यांनाच सोडून निघून जातो.

५. प्यासा :

१९५७ साली आलेला हा अतिशय गाजलेला चित्रपट. गुरु दत्त यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. एका अयशस्वी कवीच्या आयुष्यावर चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. लोक कवितेकडे गांभीर्याने पाहत नाहीत या विचाराने निराश होऊन तो घर सोडतो आणि रस्त्यावर भटकत राहतो.

गुलाबो नावाच्या एका वेश्येशी त्याची गाठ पडते. तो तिच्या प्रेमात पडतो. त्याची कविता प्रकाशित करायला ती त्याला मदत करते. चित्रपटाच्या शेवटी तो समाजातल्या ढोंगीपणाला कंटाळून सर्वांना सोडून गुलाबोसोबत निघून जातो.

 

gurudutt inmarathi
hindustantimes.com

६. देव डी :

समीक्षकांच्या कौतुकाची पोचपावती मिळालेला देव डी हा रोमँटिक ब्लॅक कॉमेडी जॉनरचा चित्रपट. पारो, देव आणि चंदा अशी तीन पात्र या चित्रपटातली मुख्य पात्रं आहेत. ही नावं ऐकून पटकन ‘देवदास’ हा चित्रपट आठवतो. पारो आणि देव हे लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी असतात.

तो परदेशात शिकायला जातो पण जेव्हा तो परततो तेव्हा पारोविषयी कानांवर पडलेल्या अफवा ऐकून तिला सोडून जातो. ती दुसऱ्या मुलाशी लग्न करते. पण नेमकं तिच्या लग्नाच्या दिवशी तिच्याविषयीच्या अफवा खोट्या होत्या हे त्याच्या लक्षात येतं पण त्याचा अहंकार आडवा आल्यामुळे तो तिला दुसऱ्या मुलाशी लग्न करू देतो.

 

devd im

 

या सगळ्यामुळे तो प्रचंड निराश आणि अस्वस्थ होतो. यातली कल्की केकला ने साकारलेला लेनी या मुलीची भूमिका देवदासमधल्या चंद्रमुखीचं मॉडर्न व्हर्जन आहे. लेनी माधुरी दीक्षितची चाहती असते. तिला तिची गाणी ऐकायला आवडतात. ती एका एमएमएस कॉंट्रोव्हर्सीत अडकते आणि त्यानंतर गुप्तपणे वेश्येचं आयुष्य जगते. जेव्हा ती वेश्येच्या व्यवसायाचा भाग व्हायचं ठरवते तेव्हा ती चंद्रमुखी किंवा चंदा अशी स्वतःची नवी ओळख स्वीकारते.

७. चमेली :

२००४ साली आलेला हा चित्रपट. करीना कपूरने यात चमेली नावाच्या वेश्येची भूमिका केली होती. करीना कपूरने आजवर साकारलेल्या उत्तम भूमिकांपैकी ही एक भूमिका. चौथ्याच चित्रपटात अशा प्रकारची भूमिका स्वीकारण्याचं धारिष्ट्य करीना कपूरने दाखवल्यामुळे लोकांना आश्चर्य वाटलं होतं. या चित्रपटात आपली गर्भवती बायको वारल्यानंतर नैराश्यामध्ये गेलेला एक माणूस चमेली नावाच्या एका वेश्येच्या संपर्कात येतो.

 

chameli im

 

अतिरिक्त खर्चासाठी शिवणकाम करणारी चमेली एक कठोर आणि थेट स्वभावाची वेश्या असते. पण तिच्या व्यक्तिमत्त्वाची ही एक बाजू असते. आयुष्यात आपल्याला खरं प्रेम मिळावं अशी आशा करणारी ती एक हळवी स्त्रीदेखील असते. तो माणूस चमेलीच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक घटना घडतात. त्यानंतर तो जेव्हा घरी परततो तेव्हा तो चमेलीमुळे बदलून गेलेला असतो. आधीसारखा राहीलेला नसतो.

८. तलाश :

या चित्रपटातली वेश्येची भूमिका ही करीना कपूरने साकारलेली आणखी एक वेश्येची भूमिका. एका अभिनेत्याच्या मृत्यूभोवती हे कथानक फिरतं. त्यासंदर्भातल्या तपासासंबंधीचा हा चित्रपट असला तरी यातून वेश्यांचं आयुष्य समोर येतं.

 

talash im 1हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल हॉरर आहे. करीना कपूरने ही भूमिकाही उत्तमरित्या वठवली होती. तपास घेणाऱ्याच्या भूमिकेत अमीर खान आहे आणि तो करीना कपूरने भूमिका साकारलेल्या रोझी या वेश्येच्या संपर्कात येतो. एका अपघातात ती मरते. जिथे तिचा अपघात होतो तिथे लोक तिला तसेच सोडून जातात. शेवटी जे जे लोक त्या अपघाताचा भाग होते त्यांना करीना कपूरच्या पात्राचं भूत वारंवार दिसत राहतं.

९. बेगम जान :

वेश्यांच्या जीवनाचं चित्रण करणारा ‘बेगम जान’ हा आणखी एक भारतीय चित्रपट. विद्या बालनने बेगम जान या वेश्येची भूमिका साकारली आहे. बेगम जान ही एका वेश्यागृहाची मालकीण असते. वेश्यागृहात काम करायला येण्यापूर्वी ज्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सोडलेलं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं अशा बऱ्याच वेश्यांना ती स्वतः वाढवते. विद्या बालनने बेगम जानचा राग उत्तमरीत्या अभिव्यक्त केला आहे.

 

begum im

 

गौहर खानची या चित्रपटातली भूमिकाही प्रभावी आहे. “स्त्रीने कसं वागायचं हे तिच्या वडिलांनी, भावाने, नवऱ्याने किंवा मुलाने का ठरवायचं?” हा महत्त्वाचा प्रश्न बेगम जानचं पात्रं उपस्थित करतं. त्यामुळेच आपली मालमत्ता असो किंवा आपलं शरीर, कुणालाही ती आपली जागा घेऊ देत नाही.

१०. चोरी चोरी चुपके चुपके :

या चित्रपटात आपली बायको प्रिया हिला वंध्यत्व आल्यामुळे पैशांच्या मोबदल्यात राज आणि प्रिया हे जोडपं सरोगेट मातेकडून मूल घ्यायचं ठरवतात. मधूबाला म्हणजेच मधू असं नाव असलेली ही सरोगेट माता वेश्या असते. प्रीती झिंटाने मधुची भूमिका साकारली आहे.

 

chori im

१० बॉलीवूड कलाकार ज्यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी एक रुपयाही घेतलेला नाही!

त्या ‘एका’ अटीमुळे अमृता सिंग आणि रवी शास्त्रीचं फिस्कटलं आणि सैफुची एंट्री झाली

प्रियाला ती वेश्या आहे हे नंतर कळतं. मधुचा जोडीदार मधुचा लैंगिक छळ करत असताना राज तिला वाचवतो आणि त्यानंतर मधू त्याच्या प्रेमात पडते. चित्रपटात पुढे ती ते मूल प्रियाला देते आणि त्या जोडप्याला सोडून जाते. मी हा व्यवसाय सोडेन आणि नव्याने सुरुवात करेन असं वचनही ती राजला देते.

वेश्यांना त्यांच्या व्यवसायामुळे तुच्छ लेखलं जातं. पण त्यांच्यातल्या प्रेमासाठी, आदर मिळावा यासाठी आसुसलेल्या स्त्रीकडे, त्यांच्यातल्या माणसाकडे आजही पारदर्शी नजरेने पाहायला समाज बिचकतो. वरच्या चित्रपटांमध्ये वेश्यांच्या जीवनाचं चित्रण अगदी सिनेमॅटिक म्हणावं असं केलेलं असलं तरी त्यांच्यातलं तीव्र दुःख आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. या वेश्यांच्या भूमिका उत्तम साकारलेल्या अभिनेत्रींना यासाठी दादच द्यायला हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?