' जगातला सर्वात लहान सिरीयल किलर : ८ वर्षीय अमरजीतची झोप उडवणारी गोष्ट! – InMarathi

जगातला सर्वात लहान सिरीयल किलर : ८ वर्षीय अमरजीतची झोप उडवणारी गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“लहान मुलांना व्यावहारिक किंवा गुन्हेगारी जगाबद्दल काय कळतं?” असं आपण सहज म्हणत असतो. वयाने मोठे झाल्यावर कोणी कितीही चतुर, चलाख असला तरी निदान १० वर्ष वयापर्यंत आपण निरागस असतो हे आपण मानतो. पण, प्रत्येक गोष्टीला जसा अपवाद असतो तसा या वाक्याला देखील आहे.

बिहारमधील ‘अमरजीत सदा’ या ८ वर्षाच्या मुलाने ३ लोकांचा जीव घेतला आहे कोणाला ऐकूनही खरं वाटणार नाही.

अमरजीत सदार हा भारतीय मुलगा जगातील वयाने सर्वात लहान असलेला ‘सिरीयल किलर’ म्हणून कुप्रसिद्ध असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली आहे.

 

amarjeet sada IM

 

पाटी, पेन्सिल वापरण्याच्या आणि बॅट, बॉल खेळण्याच्या कोवळ्या वयात अमरजीतने हातात कोयता का घेतला असावा? त्याने जीव घेतलेले लोकसुद्धा कोणी मोठी माणसं नव्हती तर तेसुद्धा १० वर्षांच्या आतली मुलं होती, बाळं होती. मग का ? जगाबद्दल, लोकांबद्दल अमरजीतच्या मनात इतका तिरस्कार का होता? जाणून घेऊयात.

२००६ मध्ये बिहारच्या पटना जेलमध्ये १० वर्षाच्या अमरजीतला आरोपी म्हणून हजर करण्यात आलं आणि पूर्ण जेल हादरलं होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बिहारच्या ‘बेगुलसराय’ नावाच्या लहान खेडेगावात १९९६ मध्ये जन्मलेल्या अमरजीतने काही बिस्किटांच्या आमिषाने आपला गुन्हा कबूल केला आणि जगासमोर हे विदारक सत्य समोर आलं होतं.

अमरजीत सदाने केलेला पहिला खून हा त्याच्या ७ वर्षांच्या चुलत बहिणीचा होता. घरात कोणी मोठी व्यक्ती दिसली नाही की, त्या घरातील लहान मुलाला जीवे मारण्यात अमरजीतला एक वेगळाच आसुरी आनंद मिळायचा.

मानसिक विकृतीने ग्रस्त असलेल्या अमरजीतने दुसरा खून हा त्याच्या सख्ख्या, ८ महिन्यांच्या बहिणीचा होता हे जाहीर करतांना पोलीस सुद्धा भावुक झाले होते.

बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा आपण सिनेमा मधून बघितलं आहेच. काही प्रमाणात त्यामध्ये अतिशयोक्ती असली तरी खरी परिस्थिती त्याहून फारशी वेगळी नाहीये हे अमरजीतने केलेल्या खुनांचा विचार केला की लक्षात येतं.

 

crime in bihar IM

 

एका छोट्या गावात दोन बालकांचे खून होतात आणि तरीही पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचत नाही यातच सगळं आलं. गुन्हा होतो, पण त्याबद्दल कोणीच वाच्यता करत नाही. गुन्हेगार मोकाट फिरत असतो असं चित्र बिहारमधील छोट्या गावांमध्ये आजही बघायला मिळतं.

अमरजीत सदारने जेव्हा आपल्या शेजारी रहाणाऱ्या ६ महिन्याच्या ‘खुशबू’ या मुलीचा खून केला तेव्हा हे प्रकरण पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचलं. घराशेजारी असलेल्या एका बंद शाळेत खुशबू नावाच्या त्या बाळाला तिच्या आईने खेळण्यासाठी सोडलं होतं.

काही वेळासाठी त्या आपलं मजुरी काम करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. अमरजीत सदारने तेवढ्या वेळात एक विषारी औषध त्या बाळाला पाजलं आणि त्याचा जीव घेतला. इतकंच नाही तर एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणे त्याने त्या बाळाला तिथून लांब नेऊन त्याला जमिनीखाली पुरलं.

कुठून आला इतका क्रूरपणा? याचं उत्तर अमरजीत शेवटपर्यंत देऊ शकला नाही. पोलिसांनी कोणताही प्रश्न विचारला की तो नुसताच हसायचा.

खुशबूच्या पालकांनी मात्र पोलिसांकडे जाऊन तिची बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार नोंदवली आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.

 

small kid IM

 

पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. पण, या प्रकरणामुळे काही गावकरी एकत्र आले आणि त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यास भाग पाडलं.

चौकशी सुरू झाली तेव्हा पोलिसांच्या असं लक्षात आलं की, गावातून अजून दोन बाळंसुद्धा बेपत्ता झाले आहेत. गावातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत असतांना पोलिसांना अमरजीत सदार या मुलासोबत बोलतांना त्याचं वागणं, बोलणं पोलिसांना संशयास्पद वाटलं. गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की, “अमरजीत काहीच बोलत नाही. नुसताच हसत असतो.”

अमरजीत सदारची चौकशी करायला सुरुवात करताच त्याने आधी बिस्कीट खायला देण्याची मागणी केली. पोलिसांनी ती मागणी पूर्ण करताच त्याने स्वतःहून आपला गुन्हा कबूल केला.

पोलीस या आश्चर्याच्या धक्क्यात असतांनाच अमरजीतने त्यांना खुशबूला त्याने कुठे पुरलं आहे? ती जागा दाखवली. अमरजीत हे सगळं अगदी शांतपणे सांगत होता. पोलीस, ‘बेगुलसराय’चे गावकरी हे सगळेच हे सर्व ऐकून स्तब्ध झाले होते.

 

amarjeet sada bihar IM

 

२००६ मध्ये अमरजीत सदारचं प्रकरण जेव्हा पटना उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलं तेव्हा माननीय कोर्ट त्यावर बिहार राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं.

आपल्या कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार, अमरजीतला ८ वर्षांचा असल्याने त्याला शिक्षा देणं शक्य नव्हतं. १८ वर्षांचा असेपर्यंत त्याची रवानगी बालसुधार कारागृहात केली जावी असा निकाल कोर्टाने दिला होता.

अमरजीत सदार हा अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा होता. त्याचे वडील मजुरी करायचे. त्याला रोज दोन वेळेस जेवणसुद्धा मिळत नसे. त्याच्या मनातील गरिबी विरुद्ध असलेला राग तो निष्पाप बालकांवर काढायचा असा अंदाज केवळ वर्तवण्यात आला होता.

आपल्या तिन्ही गुन्ह्यांबद्दल अमरजीतने न्यायालयात हसत हसत सांगितलं ज्यामुळे कोर्टात हजर असलेल्या प्रत्येकाच्या रागाचा पारा चढला होता. पण, अमरजीतवर त्याचा कोणताच फरक पडत नव्हता.

पटना मधील मनोविकारतज्ञ डॉक्टर शमशाद हुसैन यांनी या प्रकरणावर बोलतांना हे सांगितलं की, अमरजीत हा एक ‘सॅडिस्ट’ होता. दुसऱ्याचं दुःख बघण्यात त्याला आनंद वाटायचा. योग्य समुपदेशन केल्यास हा मानसिक विकार नक्कीच बरा होऊ शकतो.

अमरजीतला काय योग्य आणि काय चूक? यातील फरक कळणं खूप आधीच बंद झालं होतं. त्यामुळे लोकांचा जीव घेऊनही त्याच्या मनात अपराधीपणाची कोणतीच भावना निर्माण होत नव्हती.

 

amajeet sada 2 IM

 

२०१६ मध्ये वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर अमरजीत सदाला जेलमधून सोडण्यात आलं. त्यानंतर तो कुठे गेला? याची नोंद पोलिसांनी देखील ठेवली नाही.

अमरजीत सदा हा असा गुन्हा करणारा एकमेव नाहीये. १९९३ मध्ये अमेरिकेत दोन दहा वर्षांच्या मुलांनी एका दोन वर्षांच्या मुलाला मारल्याची माहिती समोर आली होती.

मात्र गुन्हा कबूल करण्यासाठी बिस्किटांची मागणी करणारा अमरजीत हा पहिलाच बाल गुन्हेगार त्या काळात जगासमोर आला होता. आजच्या पालकांनी आपल्या लहान मुलांना अशा विकृत व्यक्ती, घटनांपासून लांब ठेवावं इतकाच केवळ या लेखाचा उद्देश आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?