' पाण्यात टाकल्या जाणाऱ्या वाळ्याने कधीकाळी मुघलांनाही 'भुरळ' पाडली होती

पाण्यात टाकल्या जाणाऱ्या वाळ्याने कधीकाळी मुघलांनाही ‘भुरळ’ पाडली होती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो कल्पना करा, एखादा प्रियकर जेव्हा आपल्या प्रेयसीची तुलना अत्तराशी करताना म्हणतो की ‘ये तेरा जिक्र है..या इत्र है..” किंवा एखादी जेव्हा आपल्या पतीकडे हट्ट करते, की अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया..तेव्हा कसे मोहोरायला होते ना?

हीच तर खासियत आहे अत्तर नावाच्या जादुई कुपीची! त्यात ते अत्तर मनाला आणि शरीराला थंडावा देणारे असेल तर? मग बहारच उमलते नाही का?

आपला देश यासाठीही वेगळा ठरतो कारण आपल्या पूर्वजांना २००० वर्षे आधिपासून विविध अत्तरे बनवण्याचे ज्ञान होते आणि त्या अत्तरांचे उपयोग ही माहिती होते. अरोमा किंवा गंध चिकित्सेची त्यांना जाण होती.

 

perfume1-InMarathi

 

कपूर कचौरी, नागरमोथा, केवडा यांसारख्या वनस्पति आणि गुलाब, मोगरा,चमेली, चाफा, आंब्याचा मोहोर यांसारखी फुले इतकेच नाही तर मातीवरचे दव किंवा पावसाचे थेंब यांच्यामुळे मातीला येणार्‍या सुवासचे अत्तर बनवण्याची कला देखील त्यांना अवगत होती.

तुम्ही पहिले असेल, की वेगवेगळ्या देवांची पूजा करताना देखील आपल्याकडे वेगवेगळी फुले वाहिली जातात. हा गंध चिकित्सेचाच एक भाग आहे.

याच मांदियाळीत येतो ‘वाळा’, वाळा नुसते गवत नाही तर त्याने आपल्या थंड आणि खुशबूदार स्वभावाने सुगंधाचे शौकीन असलेल्या मुघलांना आपलेसे केले होते, इतके की सम्राट अकबराने त्याच्या महालातील खिडक्यांना खास वाळ्याचे पडदे लावून घेतले होते.

दिवसभर त्यावर पाणी शिंपण्यात येवून ते थंड ठेवले जात असत ज्यामुळे वार्‍याच्या झुळुकीसोबत वाळ्याचा सुगंध सगळीकडे दरवळेल…होय, मित्रांनो आपल्याकडे थंडाव्यासाठी पाण्यात टाकल्या जाणार्‍या वाळ्याचे असेही अनेक सुगंधी उपयोग आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही मुळात भारतीय असलेली, बारमाही उगवणारी तृणप्रकारातील एक वनस्पती आहे. वाळ्याची मुळे सुगंधी असून त्यांत उष्णतानाशक गुणधर्म असतात. त्यामुळे उष्णताशामक सरबते बनवण्यास व उन्हाळ्यापासून आडोसा देणाऱ्या ताट्या, चटया, पडदे बनविण्यासाठी त्यांचा वापर होतो.

वाळ्यामध्ये शीत, मूत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड उत्तेजक व मूत्रल आहे. वाळा पित्त व कफनाशक तसेच दुग्धीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, या विकारांवर उपयुक्त आहे.

 

khas im 1

 

वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे.

उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याची जैविक बांधासाठी लागवड करतात. तसेच वाळ्याचे तेल अत्तरे, सौंदर्यप्रसाधने व खाद्य पदार्थात वापरतात.

बाजारात वाळ्याचे उशीरासव, पंडगोदक, उशीरादि चूर्ण मिळतात. वाळ्यात राळ, रंगद्रव्ये, आर्यन ऑक्साईड , आम्ल चुन्याचे प्रमाण असते. तुम्ही जर वाळ्याला सामान्य गावात समजत असाल तर त्याचे हे उपयोग वाचून तुम्हाला ठंडा ठंडा कूल कूल असा फील येईल.

तुम्ही जर एकदा वाळा किंवा खास पासून बनवलेल्या सरबताचा आस्वाद घेतलात तर तुम्ही त्याचे फॅन व्हाल हे नक्की. झारा आणि डायर सारखे ब्रँड आज त्यांच्या लक्झरी परफ्यूममध्ये खस वापरतात, पण याच्या खूप आधीपासून भारतीय दैनंदिन जीवनात या सुवासिक गवताचा वापर करत आहेत.

 

vetiver grass im

 

जर आपण इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला कळेल, की भारत हजारो वर्षांपासून खस निर्यात करत आहे. पहिल्या शतकात, ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’, ग्रीक नेव्हिगेटरच्या प्रवासावरील पुस्तकात असे म्हटले आहे की भारत मोठ्या प्रमाणात व्हेटिव्हर ( वाळा ) परदेशात निर्यात करत होता.

दोन हजारांहून अधिक वर्षांपूर्वी लिहिलेल्या प्राचीन संगम साहित्यात खसाचा उल्लेख ‘ओमलीगाई’ असा आहे, ज्याचा वापर आंघोळीसाठी केला जात होता.

मुघलांच्या शाही आश्रयाखाली, ‘कनौज’ हे प्राचीन शहर भारताची सुगंधी राजधानी म्हणून उदयास आले होते. गंगेच्या काठावर वसलेले हे शहर गुलाब, चमेली आणि खस या सुगंधी फुलांच्या लागवडीसाठी विशेष प्रसिद्ध होते. कनौजचे खास ‘रुह’ अत्तर आज आंतरराष्ट्रीय व्यापार जगतात बहुमोल आहे.

अरमानीच्या ‘व्हेटिव्हर बॅबिलोन’ आणि टॉम फोर्डच्या ‘ग्रे व्हेटिव्हर’ सारख्या प्रतिष्ठित परफ्यूमचा आधार वाळाच आहे. हे जाणून घेणे मनोरंजक असेल की कलाकार-पत्रकार सेलिया लिटलटन तिच्या ‘इन द सेंट ट्रेल’ या पुस्तकात लिहितात, “शास्त्रज्ञांनी व्हेटिव्हरपासून 150 रेणू वेगळे केले आहेत. त्याच्या मुळापासून अजून रहस्ये उलगडणे बाकी आहे.”

भारतीयांसाठी वेटिव्हरची कहाणी केवळ मातीच्या परफ्यूमची नाही. याहूनही पुढे म्हणजे ९० च्या दशकात वाळ्याचा समावेश असणार्‍या डेझर्ट कूलरने अनेक भारतीय घरांमध्ये थंडावा दिला आहे, लोखंडापासून बनवलेल्या या कुलरमध्ये वॉटर लिफ्टिंग मोटर, पंखा आणि खस गवत असते.

वाळ्याचा औषधे, सौंदर्यप्रसाधने यासाठीचा केला जाणारा वापर ही आपली ऐतिहासिक परंपरा आहे. सण-उत्सवांपासून ते लोककलेपर्यंत तिला विशेष स्थान आहे.

 

khas im

 

वाळ्याची खासियत एवढ्यापुरती मर्यादित नाही. त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. ही छोटी वनस्पती माती घट्ट धरून ठेवते आणि त्यामुळे जमिनीची धूप होत नाही.

यात कोणत्याही बिया नसतात आणि त्याची लांब आणि कठीण मुळे बाहेर न पसरता शेतात नैसर्गिक बांध बनवण्यास मदत करतात. म्हणून आजही वाळा कुंपणाच्या स्वरूपात शेताच्या सीमेवर किंवा नदीच्या काठावर लावले जाते.

व्हेटिव्हर नेटवर्क इंटरनॅशनल म्हणते, “या गवताचा योग्य वापर केल्यास ते जमिनीची धूप (९८ टक्क्यांपर्यंत) कमी करू शकते, पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखू शकते, पाण्याचे संवर्धन करू शकते (७० टक्क्यांपर्यंत) आणि भूजल पातळी वाढवण्यात ते महत्त्वाचे ठरू शकते. त्याच वेळी, ते पाणी स्वच्छ करण्यात आणि पुराचा धोका कमी करण्यात मदत करते.

त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही उष्णतेपासून त्रस्त असाल आणि तुम्हाला ठंडा ठंडा कूल कूल असा फील हवा असेल तेव्हा मुघलांनाही भूल पडणार्‍या या मल्टी पर्पज वाळ्याच्या सुगंधाचा, सरबताचा आस्वाद घ्या आणि फ्रेश व्हा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?