' वाराणसीच्या मशिदीत शिवलिंग : हा तिढा सुटणार की वाद आणखीन चिघळणार? – InMarathi

वाराणसीच्या मशिदीत शिवलिंग : हा तिढा सुटणार की वाद आणखीन चिघळणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या धार्मिक स्थळांविषयीच्या वादांना पेव फुटतंय. आधी मशिदींमध्ये लावण्यात येणाऱ्या भोंग्याचा वाद झाला. त्यानंतर कुतुबमिनार हे मुळात हिंदू मंदिर असल्याचा दावा एका हिंदू संघटनेने केला.

‘ताजमहाल-तेजोमहाल’ हा वाद तर वर्षानुवर्षे सुरूच आहे. तिथल्या २२ बंद खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती असू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोडक्यात, विविध ठिकाणच्या इस्लामी धर्मस्थानांमध्ये मुळात हिंदू मंदिरं असल्याच्या खुणा आढळून येत आहेत.

 

tajmahal final inmarathi

 

अशी काही उदाहरणं सापडल्यामुळे धार्मिक द्वेषापोटी पूर्वीच्या काळी खरंच मंदिरं पाडून मशिदी बांधल्या गेल्या असाव्यात का यातलं तथ्य जाणून घेण्याच्या हेतूने अनेक हिंदू अभ्यासकांकडून विविध इस्लामी धर्मस्थानांची पुनर्तपासणी केली जात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचं असंच एक प्रकरण. या मंदिराच्या नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून एक नवीच खळबळजनक माहिती समोर आली आहे. मशिदीच्या आतील वजूखान्यात चक्क एक शिवलिंग आढळून आलं आहे.

शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस हे सर्वेक्षण सुरू होतं. यासंदर्भात कोर्टात याचिकाही दाखल केली गेली आहे. एकूण वृत्त काय आहे? आणि कोर्टाने यासंदर्भात काय निर्णय दिलाय? कोर्टाच्या निर्णयावर कुणी नापसंती व्यक्त केलीये? जाणून घेऊ.

 

mosque IM

 

रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून ज्ञानवापी परिसरामध्ये ऍडव्होकेट कमिश्नर यांची कारवाई सुरू झाली. फार ऊन व्हायच्या आत मशिदीच्या परिसरातील मोकळ्या जागेचे आणि घुमटाचे फोटोज आणि व्हिडियोज घ्यायचं ठरलं. जिथे प्रार्थना केली जाते तिथे लोक अनवाणी पायांनी पोहोचले.

घुमटाच्या आतील संरचनेकडे जितकं जवळून बघणं शक्य होईल तितकं जवळून बघितलं गेलं. ज्या शिडीने वर जायचा रस्ता होता ती शिडी हळूहळू अरुंद होत गेली आणि श्वास घेणं कठीण होऊ लागलं. घुमटाच्या रचनेकडे बघून सगळेजण आश्चर्य व्यक्त करत होते.

बराच वेळ सर्वेक्षण करून झाल्यावर काही महत्त्वाचे पुरावे गोळा करून सर्वेक्षण करायला आलेली टीम शिडीवरून छतावर गेली. तिथे फोटो आणि व्हिडियोज घेतले गेले. जिथे नमाज म्हटलं जातो तिथल्या मोठ्या खोलीच्या छतापासून तिथल्या फरशीचे फोटो आणि व्हिडियोज काढले गेले.

तिथल्या दारांवर आणि सिलिंगवर चकित करणाऱ्या बऱ्याच आकृत्या होत्या ज्यांचे फोटोज आणि व्हिडियोज ही मशीद मुळात मंदिर असल्याची भूमिका असणाऱ्या वकिलांनी काढले. १०० हून अधिक फोटोज इथे काढले गेले आणि व्हिडियोजही काढणं बराच काळ सुरू राहीलं.

 

gyanvyapi 2 IM

 

त्यानंतर ही संपूर्ण टीम तळघरात गेली. फोटोज घ्यावेत अशा बऱ्याच गोष्टी इथेदेखील आढळून आल्या. दुपारी १२ वाजेपर्यंत ही सगळी कारवाई चालली. सोमवारी या सर्वेक्षणाचा तिसरा दिवस होता.

या तिन्ही दिवसांच्या सर्वेक्षणाचा व्हिडियो तयार केला गेला. तिसऱ्या दिवशी सर्वेक्षण झाल्यानंतर हिंदू पक्षकारांनी या मंदिरात शिवलिंग आढळून आल्याची खात्रीशीर माहिती दिली. सर्वेक्षणाचा अहवाल १७ तारखेला म्हणजेच आज सादर केला जाणार आहे.

मशिदीत वजू खान्यातील पाणी आधी बाहेर काढलं गेलं आणि तिथे आत शिवलिंग आढळून आलं. त्यानंतर त्या परिसरात ‘हर हर महादेव’चे नारे लावले गेले. वकील विष्णू जैन यांनी मशिदीतील वजू खान्यात शिवलिंग आढळून आल्याची याचिका कोर्टात दाखल केली.

 

shivling inmarathi

 

हे स्थान सील केलं जावं अशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती. कोर्टाने या मागणीचा स्वीकार करून मशिदीच्या आतील ज्या वजू खान्यात शिवलिंग सापडलंय त्याला सील करण्यात यावं आणि जिल्हा प्रशासनाने ते आपल्या संरक्षणाखाली घ्यावं असे आदेश वाराणसी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

दिवाणी न्यायाधीश रवीश कुमार दिवाकर यांनी म्हटलंय की कोर्टाने तपासासाठी नेमलेल्या मंडळाला आपल्या कारवाईदरम्यान मशिदीच्या परिसरात तथाकथित शिवलिंग सापडणं हा एक महत्त्वपूर्ण असा पुरावा आहे.

कोर्टाने आपल्या आदेशात कुठल्याही व्यक्तीला सील केलेल्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवेश निषिद्ध केला आहे असं म्हटलंय आणि सील केलेल्या ठिकाणाला संरक्षित आणि सुरक्षित करण्याची जबाबदारी जिल्हा मॅजिस्ट्रेट, पोलीस कमिशनर, वाराणसीचे सीआरपीएफ कामांडेंट यांनी घ्यावी असा आदेश दिला आहे.

आता या मशिदीत केवळ वीसच मुस्लिम व्यक्ती नमाज म्हणायला जाऊ शकतील. प्रशासनाकडून काय काय केलं जाईल यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पोलीस महासंचालक, उत्तर प्रदेशाचं पोलीस मुख्यालय आणि उत्तर प्रदेश मुख्य सचिव यांच्यावर सोपवली गेली आहे.

मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा दावा मुस्लिम पक्षकारांनी फेटाळून लावला आहे. AIMIM चे प्रमुख असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी या सगळ्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

 

owaisi inmarathi
zoomnews.com

 

त्यांनी ज्ञानवापी मशीद प्रकरणाची तुलना बाबरी मशीद प्रकरणाशी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, “ही बाबरी मशीद प्रकरणाची पुनरावृत्ती आहे. हा आदेशच मुळात मशिदीच्या धार्मिक स्वरूपाला बदलून टाकतो. हे १९९१ च्या कायद्याचं उल्लंघन आहे.” हे असं होणार याची मला भीती वाटलीच होती जी खरी ठरली असं ते म्हणाले.

ज्ञानवापी मशीद होती आणि शेवटपर्यंत राहील असंही त्यांनी म्हटलंय. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना ते म्हणाले, ” सर्वोच्च न्यायालय जर उद्या या प्रकरणावर सुनावणी करणार आहे, अजून कोर्टात अहवालही सादर केला गेलेला नाही तर मग परिसराला सील करण्याचा आदेश इतक्या लवकर का दिला गेला.

१९९१ मध्ये उच्च न्यायालयाने या मागणीवर स्टे दिला होता. तो स्टे आता संपलाय का?” बाबरी मशीद प्रकरणाच्या वेळी मी म्हटलं होतं की जो निर्णय दिला गेलाय तो श्रद्धेवर आधारित आहे.

 

babari inmarathi

 

आता बाकीही वाद बाहेर येतील आणि आला आहे असं ओवेसी म्हणाले. ओवेसी यांच्या ट्विटवर पलटवार करत केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते भाजपा नेते गिरीराज सिंग म्हणाले, “देश संविधानानुसार चालतो. तुष्टीकरणाने नाही. नेहरू जींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच हे कार्य करायला हवं होतं.”

ज्ञानवापी मशिदीत  शिवलिंग आढळल्याचं खरंच पूर्णतः सिद्ध झालं तर त्याचे देशाच्या राजकारणावर, सामाजिक पातळीवर काय पडसाद उमटतील हे तेव्हाच कळेल जेव्हा हा वाद संपेल.

हा वाद असाच सुरू राहणार, अनिर्णित राहून थंडावणार की एका नेमक्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?