' सेक्स, दारू, सिगरेट, शिवीगाळ म्हणजेच बोल्डनेस : OTT विश्वाचा हा गैरसमज कधी दूर होणार

सेक्स, दारू, सिगरेट, शिवीगाळ म्हणजेच बोल्डनेस : OTT विश्वाचा हा गैरसमज कधी दूर होणार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

“कावळ्याचा हाती दिला कारभार आणि त्याने घाण करून सोडला दरबार” अशी अवस्था सध्या भारतीय कलाकारांची झाली आहे. त्यातही खासकरून हिंदी चित्रपटसृष्टीतले आणि मराठी चित्रपटसृष्टीतले कलाकार यांच्या बाबतीत तर ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते.

वेबसिरीज किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म या दोन्ही गोष्टींचा या कलाकारांनी ज्या पद्धतीने वापर केला आहे आणि करत आहेत ते बघता ही म्हण याबाबतीत अगदी चपखल बसते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरंतर माझ्या मनात या गोष्टी खूप दिवसांपासून घोळत होत्या, पण नुकत्याच प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या एका कलाकृतिचा टीजर पाहिला आणि याविषयी बोलणं अनिवार्य आहे असं वाटलं म्हणून हा खटाटोप.

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रानबाजार नावाची एक सिरिज किंवा सिनेमा येणार आहे, आणि नुकताच त्याचा टीजर प्रदर्शित झाला असून तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्री त्यात मुख्य भूमिकेत असणार आहेत असा अंदाज आपण लावू शकतो.

 

raanbazaar IM

 

एकंदरच हे दोन्ही टीजर हे इतके बोल्ड आहेत की सोशल मीडियावर फक्त या बोल्डनेसचं कौतुक सुरू आहे, कशाप्रकारे मराठीत एक धाडसी बोल्ड प्रयोग होत आहे आणि मराठी इंडस्ट्री कशी वेगळे प्रयोग हाताळत आहे, अशा बऱ्याच चर्चा होताना आपल्याला दिसत आहे.

प्रथमदर्शनी तरी मला हा टीजर बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये. एकंदरच ओटीटी विश्वातल्या क्रांतिमुळे आपल्या लोकांच्या बोल्डनेसच्या व्याख्याच जणू बदलल्या आहेत याची प्रकर्षाने जाणीव झाली.

खरंतर या टीजरविषयी किंवा कथेविषयी आपण आत्ता बोलू शकत नाही कारण अजून हा सिनेमा किंवा सिरिज प्रदर्शित झालेली नाही, किंवा याचा ट्रेलरही अजून आलेला नाही, त्यामुळे याविषयी मी आणखीन काही बोलणं उचित ठरणार नाही.

पण याच आधारावर आपण वेबसिरिजचं विश्व आणि त्यातल्या बोल्डनेसविषयी चर्चा करणार आहोत, किंबहुना ओटीटीचा खरा अर्थ आणि भारतीय कलाविश्वाने त्याचं केलेलं हिडीस रूप याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.

 

ott platform IM 2

 

आपण कितीही नाही म्हंटलं तरी सिनेमा, सिरिज, कला साहित्य क्षेत्र हे समाजावर कळत-नकळत प्रभाव पाडत असतं. त्यामुळे सध्याच्या डिजिटल युगात तरी याकडे फक्त मनोरंजनाचं साधन म्हणून आपण बघू शकत नाही.

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवार सोनी लिवने केली. २०१३ साली त्यांनी प्रथम भारतात ओटीटी ही कॉन्सेप्ट रुजवली, आणि मग पाठोपाठ हॉटस्टार, नेटफ्लिक्स, प्राइम. झी५ यांनी या भारतात हळू हळू जम बसवायला सुरुवात केली.

या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे पश्चिमेकडील देशातला वेबसिरिज हा प्रकार लोकांना परिचित होऊ लागला. तसं बघायला गेलं तर TVF ने यूट्यूबच्या माध्यमातून हा प्रकार भारतात पहिले सुरू केला होता, पण त्याला ओटीटीचं स्वरूप नव्हतं.

यूट्यूब हा मोफत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म होता आणि त्यासाठी वेगळे पैसे भरावे लागत नव्हते. पण या ओटीटी प्लॅटफॉर्मनी वेबसिरिज या प्रकाराला एक आकार दिला आणि भारतातही वेबसिरीजचं पेव फुटलं.

आज याच ओटीटी प्लॅटफॉर्मचा आकडा हा ५० च्या घरात जाऊन पोहोचला आहे. यात नेटफ्लिक्स, हॉटस्टारसारख्या प्रीमियम प्लॅटफॉर्मपासून अल्ट बालाजी, उल्लूसारखे सॉफ्ट पॉर्न कंटेंट पुरवणाऱ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

 

ott platform 3 IM

 

जियोने सुरुवातीला फुकट इंटरनेट सुविधेची सवय लावून लोकांना त्याकडे आकर्षित केलं आणि मग हळूहळू याच फास्ट इंटरनेटच्या जोरावर याच ओटीटी प्लॅटफॉर्मनी त्यांचं साम्राज्य उभं केलं.

बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टी इंटर कनेक्टेड आहेत. जसं दूरदर्शनच्या माध्यमातून काम करणाऱ्यांना २४ तास न्यूज चॅनल्सची कॉन्सेप्ट पचायला एक काळ जावा लागला तसंच सध्याच्या कलाक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वेबसिरीज ही कॉन्सेप्ट पचवून घ्यायला जड जात आहे.

जी कथा २ ते ३ तासात मांडणं कठीण असतं त्यामुळे त्याला सिरियलचं स्वरूप दिलं जातं आणि सिरियलला खूप लांबण लागू नये यासाठीच वेगवेगळ्या एपिसोड आणि सीझनच्या वेबसिरीज तयार केल्या जातात हा पाश्चिमात्य देशातला सरळ साधा हिशोब आहे.

आपल्याकडे मात्र या वेबसिरीज आणि ओटीटीचा अर्थ म्हणजे निव्वळ सेक्स, शिव्या, हिंसक दृश्य, मारहाण, मद्यपान, ड्रग्स असाच झाला आहे. आपल्याकडे सिनेमावर सेन्सॉरची कात्री चालते तशी कात्री अजूनतरी ओटीटीच्या कंटेंटवर चालत नाही, आणि याचाच फायदा घेऊन आपल्याकडे सध्या कंटेंट निर्मिती होत आहे.

 

bold series IM

 

अगदी हातावर मोजता येतील अशा काही वेबसिरिज आहेत ज्या खरोखर उत्तम आहेत आणि त्यात या इतर गोष्टींचा भडिमार नाहीये.

नेटफ्लिक्सवर आलेली सेक्रेड गेम्स ही भारतातील पहिली वेबसिरीज मानली जाते. त्यात हे शिवीगाळ, नग्नता, अश्लील दृश्य हे सगळं प्रथम लोकांना अनुभवायला मिळालं आणि भारतीय कलाकार आणि प्रेक्षक यांच्या मनात ओटीटी आणि वेबसिरिज याविषयी एक मत तयार झालं आणि याच आधारावर अजूनही वेबसिरीज बनत आहे आणि लोकं त्या चवीचवीने बघत आहेत.

यानंतर आलेल्या मिर्झापुरने तर कळस गाठला आणि मग हळूहळू प्रत्येक भारतीय वेबसिरीजमध्ये या गोष्टी जणू अनिवार्यच झाल्या. भारतातल्या कलाकारांनी या गोष्टीला सेलिंग पॉइंट बनवून खूप कंटेंट तयार केला आणि लोकांच्या माथी मारला.

आजच्या रेसमध्ये नेटफ्लिक्सपेक्षाही जास्त मेंबर्स हे हॉटस्टारवर आहेत कारण हॉटस्टार हे स्पोर्ट्स स्ट्रीमिंगमध्येसुद्धा टॉपवर आहे. ते सोडलं तर यावरही असाच भारतीय कंटेंट आपल्याला बघायला मिळतो.

ही झाली हिंदी कलाकारांची गोष्ट, आता हळूहळू मराठी इंडस्ट्री आणि कलाकारसुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना आपण पाहिलं आहे. मराठीतही समांतरसारख्या सिरिजमधून आपण या गोष्टी पाहिल्या.

 

samantar 2 IM

 

यूट्यूबवरच्या स्त्रीलिंग पुलिंग या सिरिजमध्ये तर उघडपणे हे असले सीन्स दाखवण्यात आले होते, झी ५ च्या काळे धंदेने तर एक वेगळीच टोकं गाठली. प्लॅनेट मराठीच्या सोप्पं नसतं काही या सिरीजमधून तर उघडपणे विवाहबाह्य संबंध आणि एका स्त्रीने २ लोकांसोबत राहण्यासारख्या गोष्टी ग्लोरिफाय केल्या गेल्या.

या सगळ्या गोष्टीला माझा विरोध नाहीये, किंवा या गोष्टी सिनेमात असूच नये असंही माझं मत नाही. ९ मानवी रसांपैकी हा देखील एक रसच आहे आणि ते पडद्यावर दाखवणंदेखील काही गैर नाही, पण सध्या या गोष्टी करणे म्हणजेच बोल्ड असणे हा एकप्रकारचा गैरसमज ज्यापद्धतीने लोकांच्या मनात ठसवला जातोय ते मला कुठेतरी खटकतय.

तुम्हाला एखादी बोल्ड व्यक्तिरेखा किंवा बोल्ड कथानक मांडायचं असेल तर त्यात हे सगळे सीन्स असायलाच हवेत असं नाही. ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत असेच बोल्ड विषय हाताळले होते, तेव्हा त्यांनी कधीच या अशा गोष्टींचा सेलिंग पॉइंट म्हणून वापर केला नाही.

मराठी सिनेमात जब्बार पटेल यांनी उंबरठासारखा सिनेमा करून स्मिता पाटील यांच्या माध्यमातून खरा बोल्डनेस काय असतो हे दाखवून दिलं. हिंदीतही गुलजार यांनी इजाजतसारखा सिनेमा बेधडकपणे मांडला आणि लोकांनी तो तितक्याच खुल्या मनाने स्वीकारला.

 

umbartha and ijaazat IM

 

या कोणत्याही कलाकृतीत तुम्हाला अश्लील सीन्स दिसणार नाहीत की शिवीगाळ ऐकायला मिळणार नाही, ना कुठला स्कीन शो किंवा हिंसा.

आज अर्धनग्न होऊन, हॉट सीन्स देऊन या सगळ्याला मराठीतला आजवरचा सर्वात बोल्ड प्रयत्न म्हणून जी लोकं स्वतःचेच गुणगान गातायत त्यांनी हे असे काही जुने सिनेमे बघून बोल्डनेस म्हणजे नेमकं काय असतं हे समजून घेणं फार आवश्यक आहे.

सध्याच्या एकंदरच उथळ आयुष्यात आपण खरा बोल्डनेस कुठेतरी हरवून बसलो आहोत. विचारांमधल्या बोल्डनेस, कथेतल्या बोल्डनेसपेक्षा या अशा स्कीनशोला आणि हॉट सीन्सला लोकं जास्त प्राधान्य देत आहेत.

याला जवाबदार जितके कलाकार आहेत तितकेच प्रेक्षकदेखील आहेत. प्रेक्षक बघतायत म्हणून कायम तसाच कंटेंट ओटीटीच्या माध्यमातून सतत पुढे येत आहे.

कथेची गरज म्हणून गेम ऑफ थ्रोन्समध्ये असणारे सेक्स सीन्स आणि महिला संशक्तीकरणाच्या नावावर four more shots please मधले किंवा बॉम्बे बेगम्समधले बीभत्स सीन्स यात जमीन आस्मानाचा फरक आहे आणि हा क्रिएटिव डिफ्रंस जेव्हा आपल्या इथल्या कलाकारांना कळेल तेव्हाच आपण या दलदलीतून बाहेर येऊ.

 

bombay begums IM

 

हिंदी असो किंवा मराठी, आपल्या देशातल्या कलाविश्वातल्या सगळ्याच लोकांनी यावर चिंतन मनन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक आपल्याला समजलाच पाहिजे तरच ओटीटीचा योग्य वापर आपल्याला करता येईल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?