' आईच्या स्वप्नातून उभा राहीला ‘निळ्या’ भूमिकांचा चित्रपट – जगभरात कमावला सर्वाधिक गल्ला – InMarathi

आईच्या स्वप्नातून उभा राहीला ‘निळ्या’ भूमिकांचा चित्रपट – जगभरात कमावला सर्वाधिक गल्ला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘अवतार’ या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. २००९ साली जेव्हा ‘अवतार’ हा चित्रपट आला होता तेव्हा त्याने आधीचे सगळे रेकॉर्ड्स ब्रेक करून बॉक्स ऑफिस दणक्यात गाजवलं होतं. त्यामुळे आता चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर चित्रपट बघण्याची लोकांची उत्कंठा वाढली आहे.

२००९ साली ‘अवतार’ हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आपण वाचलेल्या सगळ्या सायन्स-फिक्शन्सनी प्रेरित होऊन जेम्स कॅमरनने या चित्रपटाचं स्क्रिप्ट लिहिलं होतं. हा चित्रपट सायन्स-फिक्शन आणि फॅन्टसीचा अनोखा मिलाफ होता.

या चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेत मात्र बरेच अडथळे आले होते. चित्रपटासाठी आपल्याला हवं तसं तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे जेम्स कॅमरनला चित्रपटाची संहिता लिहिल्यानंतरही बरीच वर्षं थांबावं लागलं होतं.

हव्या असलेल्या नायकाने चित्रपटाला नकार देणे, दुसरा निर्माता शोधावा लागणे अशा बऱ्याच संघर्षातून या चित्रपटाला जावं लागलं. मात्र चित्रपटाच्या घवघवीत यशाने जेम्स कॅमरनच्या सगळ्या प्रयत्नांचं चीज केलं.

या चित्रपटाच्या बाबतीतली एक लक्षवेधी बाब अशी की चित्रपटातली सगळी पात्र निळीच आहेत. यामागे एक रंजक किस्सा आहे. हा किस्सा आणि चित्रपटाविषयीचे आणखी काही किस्से थोडक्यात जाणून घेऊ.

एखादी गोष्ट घडायची असली तर कितीही संकट आली तरी ती घडते याचं उदाहरण म्हणजे ‘अवतार’ या चित्रपटाचा एकूण प्रवास म्हणता येईल. १९९४ मध्ये जेम्स कॅमरन ने ‘अवतार’ या चित्रपटाची ८० पानी संहिता लिहिली होती.

१९९९च्या सुमारास हा चित्रपट रिलीज करायचा त्याचा विचार होता. पण त्याची व्हिजन मोठ्या पडद्यावर साकारू शकेल असं तंत्रज्ञान तेव्हा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना चित्रपटावरचं काम थांबवावं लागलं.

 

avtaar movie im

 

त्या दरम्यान त्यांच्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटाने लोकांना चांगलीच भुरळ घातली. ‘टायटॅनिक’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आता जेम्स कॅमरन कुठला चित्रपट बनवणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले.

जेम्स कॅमरनला मात्र आता कसंही करून ‘अवतार’ हाच चित्रपट बनवायचा होता. आधुनिक तंत्रज्ञान येईपर्यंत त्याने इतर कुठला चित्रपट न बनवता डॉक्युमेंटरीज बनवल्या. त्याला या चित्रपटासाठी खऱ्या जगात नसलेले व्हर्च्युअल अभिनेते घ्यायचे होते. हा चित्रपट त्याला एका पूर्णतः नव्या भाषेत बनवायचा होता.

याकरता ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’चे भाषाशास्त्रज्ञ डॉ. पॉल फ्रॉमर यांना बोलावलं गेलं. या चित्रपटकरता त्यांनी एक नवी भाषा बनवली. या भाषेला ‘नावी’ असं नाव दिलं गेलं.

२००५ मध्ये त्याने या चित्रपटावर पुन्हा काम करायला सुरुवात केली. ’20th ecntury Fox’ या निर्मिती संस्थेला कॅमरन जो कुठला चित्रपट बनवत होता त्याच्या संकल्पनेची एक क्लिप पाहायची इच्छा होती. चित्रपटाची संकल्पना दमदार वाटल्यामुळे ’20th ecntury Fox’ ही कंपनी चित्रपटाची निर्मिती करायला तयार झाली.

’20th ecntury Fox’ ने यापूर्वी कॅमरनच्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. पण त्यातून फायदा होण्याऐवजी त्यांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे ‘अवतार’ची निर्मिती करण्याबाबत ते साशंक होते.

२००६ मध्ये ’20th ecntury Fox’ या कंपनीने कॅमरनला आपल्याला या चित्रपटाची निर्मिती करण्यात फारसा रस उरला नसल्याचं सांगितलं. चित्रपटाला निर्माता मिळावा यासाठी कॅमरनने वेगवेगळ्या स्टुडियोजना विचारणा केली.

 

avtaar 10

 

‘वॉल्ट डिज्नी स्टुडियो’ ला कॅमरनची संकल्पना आवडली. या चित्रपटासाठी मिळून काम करता येईल का यासंदर्भात ‘वॉल्ट डिज्नी स्टुडियो’ ’20th ecntury Fox’ कंपनीशी बोलला. फॉक्सने त्यावर साफ नकार दिला, मात्र पुढे ‘इंडिजेनस मीडिया’ या कंपनीसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती करायला फॉक्स कंपनी तयार झाली.

आपल्या चित्रपटाच्या नायकाच्या भूमिकेसाठी कॅमरनने मॅट डॅमन या अभिनेत्याला विचारणा केली. त्यावेळी तो दुसऱ्या एका चित्रपटाचं शूटिंग करत होता. तो चित्रपट अर्धवट सोडून आपण हा चित्रपट करू शकत नाही असं त्याने कॅमरनला सांगितलं.

आपल्या जॅक या पात्राच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा शोधायला कॅमरनने सुरुवात केली. सॅम वर्थिंगटन या ऑस्ट्रेलियन अभिनेत्याला त्याने चित्रपटात घ्यायचं ठरवलं. त्यावेळी सॅम वर्थिंगटनकडे स्वतःचं घरही नव्हतं. तो त्याच्या कारमध्ये राहायचा. अखेरीस सॅम वर्थिंगटन या अभिनेत्याचं नाव चित्रपटासाठी नक्की झालं.

‘अवतार’मधली सगळी पात्रं निळी असण्यामागचं गूढ :

 

avtaar im

 

‘अवतार’चं कथानक पूर्णतः काल्पनिक होतं आणि कॅमरच्या स्वतःच्या संकल्पनेतून ती अख्खी गोष्ट तयार झाली होती. ‘अवतार’ चित्रपटाची कथा ‘पंडोरा’ नावाच्या एका चंद्रावर घडते.

तिथली हवा मानवांसाठी सोयीची नसते. मात्र या पंडोरा नामक चंद्रावर एलियन्स राहतात. १० फुटांहून अधिक उंची असलेले हे सगळे एलियन्स निळ्या रंगाचेच असतात.

सगळ्या पात्रांकरता कॅमरनने निळ्याच रंगाची निवड करण्यामागे एक किस्सा आहे. समोर आलेल्या एका बातमीनुसार, ‘अवतार’ चित्रपट बनवण्याच्या खूप वर्षं आधी कॅमरनच्या आईला एक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात त्यांना पूर्ण निळ्या रंगाचं शरीर असलेली एक ११-१२ फूट उंचीची मुलगी दिसली.

 

avtaar im1

 

सकाळी उठल्यावर कॅमरनच्या आईने जेव्हा त्याला या स्वप्नाविषयी सांगितलं तेव्हा त्या मुलीच्या प्रतिमेने त्याच्या मनात घर केलं. एका मुलाखतीत कॅमरनने सांगितलं होतं की त्याला ही प्रतिमा खूप कूल वाटली होती म्हणून त्याच्या ती लक्षात राहिली.

पात्रांसाठी निळा रंग निवडण्यामागचं हे एक कारण झालं. मात्र या निवडीमागे एक तार्किक कारणही आहे. शंकरासारख्या हिंदू देवदेवतांचा निळ्या रंगाशी संबंध आहे. म्हणून त्याने निळ्या रंगाची निवड केली. ‘अवतार’ एलियन्सकडेही अशा काही जादुई शक्ती होत्या ज्या माणसांसकडे नसतात.

कलाकृती साकारणाऱ्याच्या मनात स्वप्नासारख्या, तेही दुसऱ्याला पडलेल्या स्वप्नासारख्या अगदी बिनमहत्त्वाच्या वाटाव्या अशा गोष्टीतूनही एखादी प्रतिमा कशी आकार घेऊ शकते हेच वरच्या उदाहरणातून आपल्या लक्षात येतं.

कॅमरनच्या ‘अवतार’ या चित्रपटाचा ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा सिक्वेल यावर्षी १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिक्वेलच्या टिझरवरून तरी ‘अवतार’ पेक्षा हा दुसरा भाग वेगळा आहे की नाही हे प्रेक्षकांना कळू शकलेलं नाही.

कॅमरनची जादू पुन्हा बॉक्स ऑफिसवर चालेल की प्रेक्षकांची निराशा होईल ते कळेपर्यंत १६ डिसेंबरची वाट पहावी लागणार आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?