' ”ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” : भक्तांच्या आवाहनामागचा इतिहास फार कमी लोकांना माहितीये! – InMarathi

”ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” : भक्तांच्या आवाहनामागचा इतिहास फार कमी लोकांना माहितीये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठल्याही मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेणं ही पवित्र गोष्ट असते. पण आपल्याकडच्या बऱ्याच प्राचीन देवस्थानांच्या बाबतीत हे विशेषत्वाने म्हणता येतं ते त्यांच्यामागे असलेल्या आख्यायिका, इतिहासामुळे.

मोठ्या शुभकार्यापूर्वी अशा प्राचीन देवस्थानांना भेटी देऊन कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी देवांचं दर्शन घेण्याची परंपरा आपल्याकडे आहे. अशा काही प्रसिद्ध देवस्थानांचं दर्शन आपण घेतलं तरी बऱ्याचदा आपल्याला त्यांचा अगदी वरवरचाच इतिहास ठाऊक असतो.

 

temple im

 

सुदैवाने प्राचीन देवळांच्या, वास्तूंच्या अभ्यासकांनी अशा पवित्र स्थानांबद्दलची माहिती आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे.

आजही मंदिराविषयी जाणून घेण्याची आवड असलेली अनेक मंडळी औपचारिक-अनौपचारिक स्वरूपात मंदिरांचा, देवतांचा अभ्यास करतात.

सगळेच देव श्रेष्ठ, मात्र काही देवांच्या बाबतीत आपल्याला विशेष ममत्व, विशेष जवळीक वाटते. विघ्नहर्ता गणेश आणि दख्खनचा राजा ज्योतिबा हे असेच काही देव.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आपल्याकडे ‘ज्योतिबाच्या नावाने चांगभलं’ असं नेहमी म्हटलं जातं. पण हे नेमकं का म्हटलं जातं हे आपल्यातला अनेकांना माहीत नसेल. हे म्हणण्यामागचं नेमकं कारण आणि आपली चांगुलपणावरची श्रद्धा वाढवण्याला बळ देणाऱ्या ज्योतिबाच्या आख्यायिकांविषयी जाणून घेऊ.

 

temple 1 im

 

डाव्या बाजूला पन्हाळगड आणि उजव्या हाताला ज्योतिबाच्या डोंगरावर ज्योतिबाचं केदारलिंग हे देवस्थान आहे. ग्वाल्हेरचे मराठे सरदार राणोजी शिंदे यांनी १७३० मध्ये हे मंदिर बांधलं. ज्योतिबाचं दर्शन घेण्यापूर्वी आपल्याला काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं. ज्योतिबाने रत्नासुराचा वध केला होता.

काळभैरवाला हा वध करणं शक्य झालं नसलं तरी त्याने रत्नासुराला पुरतं नामोहरम केलं होतं. त्याचा हा पराक्रम पाहून ज्योतिबांनी त्याला आपल्या विश्वासात घेतलं. त्या प्रेमाचं प्रतिमा म्हणून आधी काळभैरवाचं दर्शन घ्यायचं असतं.

ज्या फरसबंदी मार्गावरून भाविक दर्शन घ्यायला ज्योतिबाच्या मंदिरात जातात त्या मंदिराच्या पायऱ्यांवर भाविकांनी आपल्या पितरांचं स्मरण करून फारश्या बसवण्याची प्रथा आहे. या फरश्यांवर भाविक मृत व्यक्तीचं किंवा आपल्या गोत्राचं नाव टाकतात.

मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्या गोत्राचा उद्धार व्हावा हे उद्देश त्यामागे असतात. या मार्गाच्या पायऱ्यांवर जेव्हा जेव्हा भक्त पाय ठेवून जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या पापांचा नाश होतो आणि त्यांना पुण्यप्रती होते अशी एक कथा आहे.

कोल्हापूरपासून ज्योतिबाच्या मंदिरापर्यंत अनवाणी पायांनी चालत गेलं तर आपले नवस पूर्ण होतात अशीही एक आख्यायिका आहे. त्यामुळे आजही अनेक भाविक इथे अनवाणी चालत येतात.

“शिवलिंगाची” पूजा माहीत आहेच – पण आसाम मधल्या मंदिरात आजही ‘योनीची’ पूजा होते!

भगवान शंकराचा जन्म कसा झाला? कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय…

ज्योतिबाच्या दर्शनाला जाताना एकवेळ पेढे नेऊ नयेत. पण ज्योतिबाला प्रिय असलेला गुलाल आणि खोबरं बरोबर घेऊन जावंच. मंदिरापाशी पोहोचल्यावर सर्वप्रथम तुळस आणि मारुतीचं दर्शन घ्यायचं असतं. तुळस हे एकनिष्ठ पातिव्रत्याचं, निष्ठेचं प्रतीक तर हनुमंत हा भक्तीचं प्रतीक! हे दोन्ही गुण अत्यंत आवश्यक आहेत म्हणून अशा प्रकारे दर्शन घेतलं जातं.

 

jyotiba im

 

ज्योतीबांना ‘ज्योतिबा’ हे नाव कसं मिळालं?

ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची परीक्षा पाहण्यासाठी आदिशक्तीने शतमुख ब्रह्मा, शतमुख विष्णू आणि शतमुख महेशला प्रकट केलं. त्या तिघांच्या एकत्रीकरणात जमदग्नीचा क्रोध आणि १२ सूर्याचं तेज मिसळून जगाला तारेल आणि गरिबांचा कैवारी ठरेल असा पुत्र आपल्याला लाभावा अशी तीव्र इच्छा असणाऱ्या विमलांबुजा मातेच्या ओजळीत परब्रह्माने ज्योतिस्वरुप अवतार धारण केला. त्यावरूनच त्यांना ‘ज्योतिबा’ हे नाव मिळालं.

 

jyotiba 1 im

 

पौगंडऋषी आणि विमलांबुजा या दांपत्याच्या तपाचं हे फळ होतं.

नंदीमंडपातील दोन नंदींचं वैशिष्ट्य :

सर्वसाधारणपणे मंदिरांमध्ये एकच नंदी असतो. पण ज्योतिबाच्या मंदिरातील नंदीमंडपात दोन नंदी आहेत. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी या नंदीमंडपाची स्थापना केली. यातल्या एका नंदीचं मुख एका बाजूला झुकलेलं आहे तर दुसऱ्या नंदीचं मुख समोर आहे.

 

nandi im

 

उजवीकडच्या नंदीची किंचित झुकलेली नजर हे सगुणभक्तीचं प्रतीक मानलं जातं तर स्वरूपचिंतनापेक्षा आत्मज्ञानाची ओढ असलेला, समोर मुख असलेला नंदी निर्गुणभक्तीचं प्रतीक आहे.

काशीविश्वेश्वराच्या शिवलिंगाचं महत्त्व :

सध्याच्या घडीला इथल्या केदारेश्वर मंदिराजवळच्या गाभाऱ्यात ३ शिवलिंग आहेत. त्यातलं पाहिलं नाथ केदाराचं केदारेश्वर शिवलिंग, दुसरं मराठेशाहीची ध्वजा भारतभर फडकावणाऱ्या ग्वाल्हेरकरांनी स्थापलेलं शिवलिंग आणि तिसरं काशीविश्वेश्वराचं शिवलिंग.

दख्खनचा राजा असलेल्या नाथकेदार ज्योतिबाचं मुख दक्षिणेला आहे. इथल्या बाकी सगळ्या मंदिरांच्या देवांचं मुख दक्षिणेला आहे. मात्र केदारेश्वराच्या मंदिरातल्या देवाचं मुख उत्तरेला आहे.

३ शिवलिंगांपैकी काशीविश्वेश्वराचं शिवलिंग वगळता इतर दोन शिवलिंगाची पारनालिका पूर्वेला आहे. मात्र काशीविश्वेश्वराचं शिवलिंग पारंपरिक पद्धतीनुसार उत्तरेला आहे.

इथल्या संपूर्ण वाडीरत्नागिरी परिसरात नाथांनी स्वतःच्या शरीरातून, तेजातून १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली त्यातलं प्रधान शिवलिंग म्हणजे काशीविश्वेश्वराचं शिवलिंग. ‘केदारविजय’ ग्रंथाच्या २५व्या अध्यायात नाथांनी असा उल्लेख केला आहे.

 

shivling-inmarathi

 

कलियुगात १२ ज्योतिर्लिंगांची परिक्रमा करणं भक्तांना सहज शक्य होणार नाही आणि त्यांना ती सहज शक्य व्हावी हा नाथांनी अशा प्रकारे १२ ज्योतिर्लिंग स्थापन करण्यामागचा हेतू आहे. शिवलिंगाच्या पारनालिकेची दिशा उत्तरेला असावी या नियमाला हे मंदिर अपवाद आहे.

जगदंबा चोपडाई मातेची आख्यायिका :

इथे जगदंबा चोपडाई मातेचीही एक मूर्ती आहे. चर्मासुराचा वध करायला चोपडाई माता चंबळ नदीच्या तीरावरून हरिद्वारला आली. नाथ केदारांच्या भैरवसैन्यापैकी काही जणांना झालेला अहंकार दूर करण्यासाठी तिने आपल्याकडची परडी असुरांच्या चर्माने आणि रक्ताने भरली आणि ती या सैनिकांना उचलायला सांगितली. अनेकांनी प्रयत्न करूनही ती जराही हलवता येत नाहीये हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यांचं गर्वहरण झालं.

 

devi im

 

नाथ केदारांनी सांगितल्याप्रमाणे तिने श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री रत्नासूराचा वध केला. दैत्यांचा, असुरांचा संहार करण्यासाठी नाथ केदारांबरोबर इथे आलेल्या जगदंबा महालक्ष्मीचीही एक मूर्ती या मंदिरात आहे.

साडेसातीचं विघ्न दूर करणारी हनुमंताची मूर्ती :

रामाचा परमभक्त असलेला मारुती, वीर मारुती अशी मारुतीची वेगवेगळी रूपं आहेत. या मंदिरातला ‘चपेटदान मारुती’ हे त्याचं आणखी एक रूप! या मारुतीचा उजवा हात एखाद्याला मारण्यासाठी उगारलेला असावा अशा स्थितीत आहे.

 

maruti im

 

अनेक जणांना विघ्नांनी पछाडणाऱ्या साडेसातीची भीती असते. या चपेटदान मारुतीने चक्क साडेसातीलाच आपल्या पायांखाली घेतलं आहे.

‘ज्योतिबाच्या नावाने चांगभलं’ असं का म्हटलं जातं?

ज्यावेळी राक्षसांनी भारतावर आक्रमण केलं, अत्याचार करायला सुरुवात केली त्यावेळी ज्योतिबाने त्या सगळ्या राक्षसांचा संहार केला. आपल्यावरचं संकट टळलं म्हणून खुश झालेल्या नागरिकांनी ‘चंगा भला, चंगा भला’ असा जयघोष सुरू केला. ‘चंगा’ आणि ‘भला’ हे दोन पंजाबी शब्द आहेत. पंजाबी भाषेत कुठलंही शुभ कार्य झालं की चंगा भला म्हणण्याची पद्धत आहे.

या दोन शब्दांचा अपभ्रंश होऊन ‘चांगभलं’ हा शब्द तयार झाला. ज्योतीबांनी असुरांचा संहार केल्यानंतर जेव्हा लोकांनी ‘चंगा भला, चंगा भला’ असा जयघोष केला तेव्हापासून ”ज्योतिबाच्या नावाने चांगभलं’ असं म्हणण्याची प्रथा आपल्याकडे सुरू झाली.

 

changbhala im

 

वेगवेगळ्या देवतांच्या संदर्भातल्या अशा अनेक बोधप्रद आणि रंजक आख्यायिका पुराणात आहेत. प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून देवस्थानांचं महत्त्व, तिथल्या आख्यायिका आपल्यापर्यंत सहजसोप्या भाषेत पोहोचवणाऱ्या अभ्यासकांचं आपण खूप देणं लागतो. आपल्या पौराणिक, सांस्कृतिक संदर्भांचा शोध याहीपुढे असाच सुरू राहावा हीच इच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?