' "तुम्ही वर येऊ नका मी यांना बघून घेतो" म्हणत देशासाठी प्राण पणाला लावणारा 'मेजर'!

“तुम्ही वर येऊ नका मी यांना बघून घेतो” म्हणत देशासाठी प्राण पणाला लावणारा ‘मेजर’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या स्मार्ट जगात “देशासाठी तुम्ही काय करू शकता ?” असा कोणी प्रश्न विचारला तर आपण आपला अमूल्य वेळ, वेळेवर टॅक्स भरणे किंवा एखाद्या सरकारी योजनेबद्दल लोकांपर्यंत माहिती पुरवणे अशी उत्तरं देऊ.

काही जण, “तू कोण रे बाबा, आम्हाला प्रश्न विचारणारा ?” असा उपप्रश्न देखील करतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करूयात. पण, जर संवेदनशील मनाने वरील पहिल्या प्रश्नाचा विचार केला तर असं जाणवतं की, जर देशाच्या सैनिकांसोबत तुलना केली तर आपण या देशासाठी म्हणून विशेष काहीच करत नाही असं वाटतं.

 

indian army IM

 

देश सर्वांचा आहे. सैनिकांनी फक्त गणवेश परिधान करून देशाचं संरक्षण करण्याचा वसा घेतला आहे. इतकाच खरं तर आपल्यात आणि सैनिकांमध्ये फरक आहे. “देस मेरे, देस मेरे, मेरी जान है तू…” असं आपण गाण्यात म्हणतो, पण ते खरंच मानतो का?

हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. ‘मेजर’ या संदीप उन्नीकृष्णन् यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचं ट्रेलर बघितलं की हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने पडतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

३१ वर्षांचा हा तरुण महाराष्ट्रात घडलेल्या एका अतिरेकी हल्ल्याचा समाचार घेण्यासाठी मुंबईत येतो आणि आपल्या जिवाचीही पर्वा न करता अतिरेक्यांशी एकटाच लढतो. आपण एकटेच पुढे गेलो तर नक्कीच मरणार आहोत हे माहीत असूनही तो लढला आणि त्याने संपूर्ण देशाचं मन जिंकलं.

संदीप उन्नीकृष्णन् सारख्या लोकांची मानसिकता, झटपट विचार आणि कृती करण्याची पद्धत हे सगळं समजण्या पलीकडचं आहे.

 

major movie IM

 

“जान दुन्गा, देश नही” हे ‘मेजर’ची टॅगलाईन सार्थ ठरवणारे संदीप उन्नीकृष्णन् यांच्यासारखे लोक हे त्यांच्या असामान्य वृत्तीमुळे कायम आदरणीय असतात. २६/११ च्या रात्रीचा तो थरार मुंबई, महाराष्ट्र आणि देश कधीच विसरू शकणार नाही.

ज्याप्रकारे कसाब आणि इतर अतिरेकी जलमार्गाने गेटवे ऑफ इंडिया मधून मुंबईत दाखल झाले, निष्पाप लोकांना त्यांनी गोळ्या घातल्या आणि ‘ताज’ हॉटेल मधील पर्यटकांना ओलीस ठेवलं हे सर्व सुन्न करणारं होतं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले होते.

अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत एटीएस चीफ हेमंत करकरे, विजय साळसकर आणि असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस अशोक कामटे यांना वीरमरण प्राप्त झालं होतं आणि त्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं.

मेजर संदीप उन्नीकृष्णन् आणि त्यांचे सहकारी मुंबईत दाखल होईपर्यंत पाकिस्तानी अतिरेकी हे ताज मध्ये ठाण मांडून बसले होते.

 

taj attack inmarathi
NPR

 

‘देशासाठी कायपण’ अशी खूणगाठ बांधलेल्या या ‘मेजर’ला या मिशनसाठी का निवडण्यात आलं? त्याने परिस्थितीवर नियंत्रण कसं मिळवलं? हल्ला परतवून लावण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं? हे या सिनेमातून आणि तूर्तास या लेखातून सुरुवातीपासून जाणून घेऊयात.

मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांचा जन्म १५ मार्च १९७७ रोजी केरळमधील कोझीकोडे या छोट्या गावात झाला होता. त्यांचे वडील के. उन्नीकृष्णन् हे इसरो मध्ये ‘ऑफिसर’ होते.

संदीप उन्नीकृष्णन् हे लहानपणापासून सचिन तेंडुलकरचे फार मोठे चाहते होते. भारत क्रिकेटची मॅच हरला की ते फार नाराज व्हायचे. खेळात भाग घेतला तर आपण जिंकलोच पाहिजे अशी त्यांची स्वतःकडून देखील नेहमी अपेक्षा असायची.

१९९५ मध्ये त्यांनी पुणे येथील ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’मधून सैनिकी शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर इंडियन मिलीट्री अकॅडमी डेहराडून येथून त्यांनी पुढील शिक्षण घेतलं आणि ‘बिहार रेजिमेंट’ मध्ये जॉईन करून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली.

 

sandeep unnikrishnan IM

 

जुलै १९९९ मध्ये भारतीय आर्मीच्या ‘ऑपरेशन विजय’चे संदीप हे महत्वपूर्ण भाग होते. या मिशन मध्ये संदीप यांनी ६ सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं आणि शत्रूसोबत २०० मीटर इतक्या कमी अंतरावर जाऊन त्यांनी ही लढाई लढली होती.

२००५ मध्ये संदीप उन्नीकृष्णन् यांच्यावर ‘मेजर’ पदाची जबाबदारी देण्यात आली होती. सियाचीन, जम्मू काश्मीर, गुजरात, हैद्राबाद, राजस्थान सारख्या ठिकाणी आपलं योगदान दिल्यानंतर त्यांना जानेवारी २००७ मध्ये त्यांना ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’च्या ‘५१ स्पेशल ऍक्शन ग्रुप’मध्ये सहभागी करण्यात आलं होतं.

२६/११ च्या ‘ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो’साठी त्यांनी आपली पात्रता त्यांनी अशी सिद्ध केली होती.

२६/११ चा थरार :

ताज हॉटेलमधील पर्यटकांची सुटका करण्याच्या मिशनवर मुंबईत आलेले संदीप उन्नीकृष्णन् हे १० कमांडोना घेऊन ‘टीम कमांडर’म्हणून या मिशनचं नेतृत्व करत होते. ताज मधील सहाव्या, पाचव्या मजल्यावरील पर्यटकांची सुटका केल्यानंतर त्यांना चौथ्या मजल्यावर अतिरेकी एक खोलीत असल्याचं त्यांना जाणवलं.

 

taj attack 2 IM

 

सुनील कुमार यादव हे सहकारी हे त्यांच्यासोबत होते. या दोघांनी मिळून एका खोलीचा दरवाजा तोडला आणि समोरून अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या. सुनील कुमार यादव यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या होत्या.

संदीप यांनी सुनील कुमार यांना वाचवलं. पण, तोपर्यंत अतिरेक्यांनी खोलीत ग्रेनेडचा स्फोट करून तिथून पळ काढला. पुढे १५ तास हाच थरार ताज मध्ये सुरू होता.

अतिरेक्यांनी निर्माण केलेली कोंडी फोडायची कशी? हा सैन्यासमोर प्रश्न होता. मध्यभागी असलेल्या पायऱ्यांचा वापर करून अतिरेक्यांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांचा खात्मा करायचा असा प्लॅन तयार करण्यात आला. या प्लॅन मध्ये धोका होता. पण, संदीप उन्नीकृष्णन् आणि त्यांची टीम हा धोका पत्करण्यास तयार होते.

पहिल्या मजल्यावर पोहोचल्यावर आपले कमांडो सुनील कुमार ओझा हे जखमी झाले होते. चारही अतिरेकी याच मजल्यावर आहेत याची खात्री पटल्यावर मेजर संदीप यांनी त्यांचा पाठलाग केला. अतिरेक्यांना वरील मजल्यावर जाऊ द्यायचं नाही हे संदीप यांनी ठरवलं आणि विंगेतील त्या जागेतून ते अतिरेक्यांवर गोळ्या झाडत राहिले आणि त्यांनी चारही अतिरेक्यांना उत्तरेच्या टोकाला असलेल्या ‘बॉलरूम’ पर्यंत आणलं.

 

sandeep unnikrishnan 3 IM

 

हे साध्य करत असतांना संदीप उन्नीकृष्णन् यांना आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. पण, ते मागे हटले नाहीत. त्यांनी तळमजल्यावर असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की, “कोणीही वर येऊ नका, मी एकटा यांना बघून घेतो.” हे मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांचे शेवटचे वाक्य होते.

लिहितांना अंगावर काटा येणाऱ्या या प्रसंगात ज्याप्रकारे संदीप उन्नीकृष्णन् यांनी जे धाडस केलं त्याचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.

मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांच्या उजव्या खांद्यावर गोळी लागलेली होती, तरीही ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि त्यांनी १४ पर्यटकांचा जीव वाचवला. संदीप धारातीर्थी पडल्यानंतर कमांडो टीममधील कॅप्टन दलाल आणि त्यांच्या शार्प शूटरने ‘बॉलरूम’च्या दुसऱ्या बाजूने अतिरेक्यांवर हल्ला करुन त्यांचा खात्मा केला.

“अतिरेकी लपून बसल्याचं नेमकं ठिकाण हे मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांच्यामुळे कळलं, पळून जाण्यासाठी जागा नसेल अशा ठिकाणी संदीप यांनी त्यांना आणलं आणि म्हणून हे मिशन यशस्वी झालं.” असं ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं होतं.

 

sandeep unnikrishnan 2 IM

 

२८ नोव्हेंबर २००८ रोजी पहाटे ३ वाजता कमांडो टीमने ताजचे पूर्ण २१ मजले मुंबई पोलिसांच्या हवाले केलं आणि मृत्यूचं तांडव थांबलं.

२६ जानेवारी २००९ रोजी मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांना तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मरणोत्तर ‘अशोक चक्र’ प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

२६/११ च्या हल्ल्यात प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या प्रत्येक योद्ध्याला आमचा मानाचा मुजरा!!!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?