' संपूर्ण देशाला दिवाळखोरीत काढण्यामागे 'या' घराण्याला दोषी ठरवलं जात आहे

संपूर्ण देशाला दिवाळखोरीत काढण्यामागे ‘या’ घराण्याला दोषी ठरवलं जात आहे

 आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

श्रीलंकेतील रस्त्यारस्त्यांवर सध्या घोषणा ऐकू येत आहेत, ‘ गो गोटा गो’ किंवा ‘बासील कपुता का का का …’ या घोषणांचा अर्थ आहे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे आणि अर्थमंत्री बासील राजपक्षे राजीनामा द्या आणि घरी जा. खरेतर हा काळ सिहंली लोकांच्या नववर्षाचा काळ! इतर वेळी या काळात श्रीलंकेतील रस्ते पर्यटक आणि स्थानिकांच्या गर्दीने फुलून जातात.

 

 

या ही वेळी ते फुलले आहेत पण आंदोलक, पोलीस आणि सैन्यबळाच्या गर्दीने…युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात अनेक घडामोडी घडत असताना श्रीलंकेत उद्भवलेली आर्थिक दिवाळखोरीची परिस्थिती सध्यातरी आऊट ऑफ कंट्रोल गेली आहे असंच म्हणावं लागेल.

 

sri lanka im

 

राजकीय विश्लेषकांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वजण लंकेच्या या पतनासाठी एकाच घराण्याला जबाबदार ठरवत आहेत. आजवरच्या घटना बघता हे काही अंशी खरे ही आहे. नक्की काय घडले? कोणत्या घरण्यावर लोकांचा रोष ओढावला आहे, चला जाणून घेवू.

चीनकडून कर्ज घेणे किती भारी पडू शकते, याचे ताजे उदाहरण आहे श्रीलंका. आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना सध्या श्रीलंका करत आहेत. आधीच कोरोना संकटामुळे देशातील पर्यटन क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. तसेच वाढलेला सरकारी खर्च आणि कर कपातीमुळे परिस्थिती आणखी वाईट झाली आहे.

दुसरीकडे चीनचे कर्ज फेडताना श्रीलंकेचे कंबरडे मोडले आहे. देशातील परकीय चलनाचा साठा एका दशकातील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. देशांतर्गत कर्जे आणि विदेशी रोखे फेडण्यासाठी सरकारला पैसे छापावे लागत आहेत. या आर्थिक संकटात असतानाच श्रीलंकेने १४ एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरे केले.

 

sri lanka final im

 

दरवर्षी सिंहली नववर्षानिमित्त श्रीलंकेतील रस्त्यांवर जल्लोषाचे आणि आनंदाचे दृश्य पाहायला मिळत होते. मात्र, यावेळी स्वरूप बदलले आहे. लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात निदर्शने करत निषेध व्यक्त केला. गोटाबाया राजपक्षे, महिंदा राजपक्षे आणि त्यांचे इतर दोन्ही भाऊ यांना सत्तेतून हटवण्याची मागणी नागरिक करत आहेत.

रस्त्यांवर तंबू लावण्यात आले असून श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील गॅलेफेस परिसरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गॅले फेस ग्रीन बीच परिसरात मोठे आंदोलन सुरू आहे. वाढती महागाई आणि सरकारच्या आर्थिक कारभाराविरोधात दोन आठवड्यांपूर्वी श्रीलंकेत निदर्शने सुरू झाली होती. हातात झेंडे आणि पोस्टर घेऊन आंदोलक, सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत.

 

sri lanka im 2

 

विशेष गोष्ट म्हणजे, या आंदोलनाला कोणी नेता नाही. तसेच त्यामागे कोणताही राजकीय पक्ष नाही. सध्याच्या व्यवस्थेमुळे निराश झालेले हे लोक आहेत. आपल्या वेदना व्यक्त करत असतानाच सरकार बदलवण्याची इच्छा या लोकांची आहे. घरी रेशन नसलेले आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या रांगेत ज्यांच्या प्रियजनांचा मृत्यू झाला, असे लोक या आंदोलनात दिसून येत आहेत.

सुमारे २० दशलक्ष (२.२ कोटी ) लोकसंख्या असलेला श्रीलंका हा देश सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. खाण्यापिण्यापासून सामान्य जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व वस्तूंच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.

जनतेची समस्या केवळ महागाईच नाही, तर जीवनावश्यक वस्तू न मिळणे हीदेखील आहे. श्रीलंकेतील सामान्य जनतेने आर्थिक संकटाला राजपक्षे कुटुंबाला जबाबदार धरलं आहे. गेली दोन दशकं एकाच घराण्याने राज्य केल्याने देशाची ही अवस्था झाली आहे असं स्थानिक जनतेचे म्हणणे आहे.

राजपक्षे यांच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान, राष्ट्रपती, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि खेळ मंत्री ही पदं राजपक्षे कुटुंबाकडे आहेत. त्यामुळं देशातील सामान्य जनतेने आर्थिक संकटासाठी राजपक्षे कुटुंबाला जबाबदार ठरवत त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

या घराण्याची चौथी पिढी राजकारणात आहे. अमाप संपत्ती साठवली असल्याचे आरोप देखील या घराण्यावर केले जात आहे. तसेच परकीय गुंतवणुकीत आपले काळे पैसे साठवले गेले आहेत अशी माहिती समोर आली आहे.

देशात सुरु असलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे महिंदा राजपक्षे यांनी अर्थमंत्री बेसिल राजपक्षे यांना पदावरून हटवलं आहे. राष्ट्राध्यक्षांची चुकीची धोरणं आणि व्यवस्थापन यांच्यामुळेच श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. लोक राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पायउतार न होण्यावर ठाम आहेत.

 

rajpakshe im

 

भारताच्या दक्षिण बाजूस निवांत पहुडलेलं एक मध्यम आकाराचं बेट म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेला पाचूचं बेट म्हणूनही ओळखलं जातं. हा देश पर्यटनाच्या बाबतीत जगभरात प्रसिद्ध आहे. इथले समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या आणि निसर्गसमृद्ध जंगलं पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक श्रीलंकेला भेट देत असतात.श्रीलंका तसा एरवी जागतिक माध्यमांच्या प्रसिद्धीझोतापासून दूर असतो.

भारतातही फारच कमी वेळा या शेजारी देशाबाबत चर्चा होते. पण गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेतील आर्थिक स्थिती हा जगभरातच चर्चेचा विषय बनला आहे. विशेषतः श्रीलंका सरकार मध्ये महत्त्वाच्या पदांवर असलेल्या राजपक्षे कुटुंबाविषयी जास्त बोललं जात आहे. मूळचे हम्बनटोटा जिल्ह्यातील जमीनदार असलेले राजपक्षे घराणे श्रीलंकन राजकारणाचा ‘डॉन’ आहे.

राजकीय विश्लेषक जयदेव उयानगोडा म्हणाले होते, “श्रीलंकेत पूर्वीसुद्धा सेनानायके, जयवर्धने आणि भंडारनायके यांच्यासारख्या राजकीय घराण्यांचं वर्चस्व राहिलं आहे. पण राजपक्षे कुटुंबाने घराणेशाही सर्वोच्च पातळी गाठली आहे.” त्यांच्या मते, “आधीच्या कुटुंबांना फक्त सरकावर नियंत्रण पाहिजे होतं. पण राजपक्षे कुटुंबाला संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे.

 

rajpakshe im 1

 

इतके मंत्रालय आणि महत्त्वाची पदे या कुटुंबाकडे सध्या आहेत. हा म्हणजे शासनयंत्रणेवर कब्जा करण्याचाच प्रकार आहे.”७२ वर्षीय गोटाबाया राजपक्षे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर एक-एक करत राजपक्षे कुटुंबाशी संबंधित९ जण सरकारमध्ये सहभागी झाले. अशाने राजकारण हा राजपक्षे घराण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्याचे चित्र दिसत आहे.

एका खाजगी वेबसाईटवरील एका बातमीनुसार, राजपक्षे कुटुंबाकडे असलेल्या ९खात्यांकडेच श्रीलंकेच्या एकूण बजेटपैकी ७५ टक्के वाटा होता. गेल्या २०वर्षांपासून राजपक्षे कुटुंब सत्तेच्या अवतीभोवतीच पाहायला मिळतं. विशेषतः श्रीलंकेतील बहुसंख्याक सिंहली समाजावर या कुटुंबाचं वर्चस्व पाहायला मिळतं.

श्रीलंकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीस पूर्णपणे राजपक्षे कुटुंबाला जबाबदार धरलं जात असल्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लोकांकडून केली जात होती परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि देशात एकच उन्माद सुरु झाला आहे.

 

sri lanka im 4

अर्जुन रणतुंगा म्हणतोय, “IPL जाऊद्या आधी ‘आपल्या’ देशासाठी उभे रहा”

चीनशी वाढती जवळीक नडली आणि पाकिस्तान श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली

अन्नधान्याचा तुटवडा आणि परिणामी त्यांच्या वाढत्या किमतींमुळे श्रीलंकेतील नागरिक त्रस्त आहेत. वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने त्याचा विरोध म्हणून जनता रस्त्यावर उतरून आक्रोश करत आहे. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक आणीबाणीही लावण्यात आली आहे.कॅबिनेट मंत्रिमंडळ तसंच सेंट्रल बँकेचे गव्हर्नरचा राजीनामा, नव्या मंत्रिमंडळातील बदल अशा काही गोष्टी राष्ट्राध्यक्षांनी केल्या तरी त्यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन शांत बसणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. चीनशी हातमिळवणी करून विकासाच्या नावाखाली श्रीलंकेला आर्थिक गर्तेत ढकलण्याचा राजकीय गुन्हा राजपक्षे कुटुंबाने केला आहे म्हणूनच संपूर्ण देशाला दिवाळखोरीत काढण्यामागे या घराण्याला दोषी ठरवलं जातं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?