' ८ खेळाडूंचं जीवन कायमचं बदलून टाकणारा “अदृश्य” राहुल द्रविड – InMarathi

८ खेळाडूंचं जीवन कायमचं बदलून टाकणारा “अदृश्य” राहुल द्रविड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुणाचंही कुणाशिवाय अडत नाही असं म्हणतात. नोकऱ्यांपासून नात्यांपर्यंत सगळ्या बाबतीत लागू होणारी गोष्ट आहे ही, पण काहीजण मात्र आपापल्या क्षेत्रात इतकी विलक्षण कामगिरी करतात की ते त्या क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांची जागा जरी दुसऱ्या कुणी घेतली तरी त्यांचं जाणं मात्र कमालीचं चुटपूट लावून जातं.

भारतीय क्रिकेटविश्वातलं असंच एक नाव म्हणजे राहुल द्रविड. आज जागतिक दर्जावर भारतीय क्रिकेटने आपलं वजन निर्माण केलं असलं तरी एक काळ असा होता जेव्हा क्रिकेटविश्वात आपला देश काहीसा मागे पडला होता.

ऑस्ट्रेलियाबरोबर मॅच असली की आपला संघ धास्तावलेला असायचा. संघाच्या या कठीण काळात संघाची सगळी भिस्त त्यावेळचा कर्णधार राहुल द्राविड याच्यावर होती. उगाच नाही आपण त्याला ‘वॉल’ असं संबोधत!

 

rahul dravid inmarathi

 

द्रविड संघात नसण्याला बराच काळ लोटला, पण आपल्या कारकिर्दीत त्याने कर्णधारपदाची धुरा किती व्यवस्थित सांभाळली याचं आपल्याला आजही कौतुक आहे. बाकी क्रिकेटर्सच्या बाबतीत त्यांच्या खेळासोबतच त्यांच्या अफेअर्सच्याही चर्चा व्हायच्या, पण द्रविडच्या बाबतीत त्यावेळी आपण कधी असं ऐकलं नाही.

आज द्रविड ‘भारतीय क्रिकेट संघा’चा मुख्य प्रशिक्षक आहे, पण सुरुवातीला जेव्हा त्याला प्रशिक्षकपदाची विचारणा झाली होती तेव्हा ‘अंडर १९’ संघासाठी मी काही गोष्टी करणं अजून बाकी आहे असं सांगून त्याने त्यावेळी ते पद नाकारलं होतं.

द्रविडच्या या कृतीमुळे त्याची खेळाप्रती, खेळाडूंप्रती असलेली निष्ठा नव्याने अधोरेखित झाली. राहुलला खेळाडू हेरता येतात. आजवर त्याने काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना खेळाच्या दृष्टीने साहाय्य केलं आहे.

८ जणांनी आपल्या कारकिर्दीसाठी राहुलचे जाहीररित्या आभार मानले आहेत. कोण आहेत हे खेळाडू आणि प्रशिक्षक? जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. प्रवीण तांबे :

 

pravin tambe featured IM

 

४१ वर्षांच्या या खेळाडूची क्षमता राहुल द्रविडनेच हेरली होती. राहुल द्रविडमुळेच त्याला २०१३ साली ‘राजस्थान रॉयल्स’च्या संघात स्थान मिळू शकलं होतं.

आज प्रवीण तांबे वर बायोपिक येतो आहे. प्रवीण तांबेचं त्याच्या यशात श्रेय आहेच. पण राहुल द्रविड केवळ त्याच्या संघात सामील होण्यासाठीच लढला नाही तर त्याने एक अप्रतिम भाषण करून प्रवीणची कथा लाखो लोकांना सांगितली. प्रवीणच्या बायोपिकमध्ये द्रविडचं हे भाषण समाविष्ट केलं गेलेलं आहे.

२. जॉन रिट :

 

john write im

 

२००० ते २००५ या कालावधीत जॉन रिट भारतीय संघाचा प्रशिक्षक होता. तो भारतात असताना द्रविडने त्याला खूप मदत केली असल्याचं तो सांगतो.

एका मुलाखतीत त्याने म्हटलंय, “मी राहुलचं खूप देणं लागतो. प्रशिक्षक म्हणून भारतातल्या माझ्या कार्यकाळात (२००० ते २००५) त्याने मला पुष्कळ मदत केली. मी त्याच्यासोबत केंटमध्ये आणि भारताबाहेर काम केलंय जिथे तो आमचा फलंदाजीसाठीचा मुख्य आधार होता, विशेषत: भारताबाहेर. आमच्याकडे बरेच उत्तम खेळाडू होते. पण बऱ्याच विजयांमध्ये त्याचं योगदान होतं.”

३. केएल राहुल :

 

k l rahul im

 

काही काळापूर्वी केएल राहुल आपला स्टॅन्ड इन कसोटी कर्णधार होता. हा त्याचा कमबॅक ठरला कारण २०१८ मध्ये तो फारश्या बऱ्या फॉर्ममध्ये नव्हता. इतक्यातच त्याने त्या काळाला उजाळा दिला आणि राहुल द्रविडने आपल्याला पुन्हा ट्रॅकवर आणायला खूप मदत केली असल्याचं सांगितलं.

४. युनिस खान :

 

yuonis khan im

 

युनिस खान हा पाकिस्तानचा एक महत्त्वाचा खेळाडू. अगदी युनिस खाननेदेखील आपण द्रविडचं देणं लागत असल्याचं जाहीरपणे म्हटलं आहे.

ज्ञान देताना हातचं राखून देऊ नये असं म्हणतात. द्रविड या विधानाला पुरेपूर जागला आहे. हा खेळाडू आपल्या संघातला नाही, तो पाकिस्तानचा असूनदेखील राहुलने त्याला फलंदाजीविषयीचे मौल्यवान धडे दिले, ज्यामुळे युनिस त्याच्या संघातला तिसऱ्या क्रमांकाचा उत्तम फलंदाज ठरला.

याविषयी एका मुलाखतीत बोलताना युनिस म्हणाला, “द्रविड हा अतिशय प्रोफेशनल आणि आधुनिक युगातल्या महान खेळाडूंपैकी एक आहे आणि मी त्याच्याकडून बरंच शिकलो.” राहुलप्रमाणेच युनिसलादेखील पाकिस्तानच्या ‘अंडर – १९’ संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं.

५. प्रियम गर्ग :

priyam garg im

२०१८ मध्ये विश्वचषक जिंकलेल्या ‘अंडर- १९’ संघाचा राहुल प्रशिक्षक होता. ‘इंडिया ए कोच’ आणि त्यानंतर राष्ट्रीय प्रशिक्षक होण्यापूर्वी बराच काळ तो या पदावर होता.

प्रियम म्हणतो, “मी जेव्हा त्याच्यासोबत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला गेलो तेव्हा त्याने त्याचा अनुभव माझ्याशी शेअर केला ज्याचा मला खूप उपयोग झाला. वेगवेगळ्या परिस्थितीत कशी खेळी खेळायची, फलंदाजी कशी करायची, गोलंदाजांना कसं हातळायचं आणि तर्हेतर्हेच्या आव्हानांचा कसा सामना करायचा हे त्याने मला समजावून सांगितलं. त्या सगळ्यादृष्टीने माझी फलंदाजी सुधारायला बरीच मदत झाली.”

६. केविन पीटरसन :

 

bat im

 

२०१० साली केविन पीटरसन आपला फॉर्म परत यावा म्हणून धडपड करत होता. त्याने द्रविडला सल्ला विचारला. आपल्या उदार स्वभावानुसार राहुलने या गोऱ्या खेळाडूला २ पानी ईमेल धाडला ज्यात त्याने फिरकी गोलंदाजीविरुद्ध खेळताना तो त्याचा खेळ कसा सुधारू शकतो याविषयी लिहिलं होतं.

“पॅड्स न वापरता किंवा नि पॅड्स वापरून (शक्यतो मॅचच्या आदल्या दिवशी नको) Swann आणि Monty विरुद्ध फलंदाजी करणे हा एक चांगला सराव आहे. जेव्हा तुम्ही पॅड्स वापरत नाही तेव्हा बॅट पॅड्सच्या पुढे घेण्यासाठी कधीकधी त्रासदायकपणे तुमच्यावर दबाव येऊ शकतो आणि चेंडूकडेदेखील तुम्ही अधिक लक्षपूर्वक पाहता.”

पीटरसनने बऱ्याच प्रसंगी द्रविडच्या या कृतीसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. द्रविडने पाठवलेला हा मेल फलंदाजीचा मास्टरक्लास कसा असेल याचा हुबेहूब नमुना आहे.

७. खलील अहमद :

 

khalil ahemad im

 

२०१८ साली खलील अहमदला जेव्हा राष्ट्रीय संघात पाचारण करण्यात आलं तेव्हा त्याने त्याचा ‘अंडर-१९’ संघाचा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडचे सर्वप्रथम आभार मानले.

तो म्हणाला, “मी त्याचे कितीही आभार मानले तरी ते कमीच पडतील. जेव्हा मी अंडर -१९ लेव्हलला खेळायला सुरुवात केली तेव्हा मी सुरुवातीला घाबरलेला असायचो. त्या नादात मूर्खासारख्या चुका करायचो, पण त्याच्या मार्गदर्शनामुळे माझ्यात आत्मविश्वास आला आणि क्रिकेटर म्हणून माझ्या झालेल्या प्रगतीत त्याचा मोठा वाटा आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकतो.

द्रविड सरांच्या बाबतीत सगळ्यात चांगली गोष्ट अशी की ते तुम्हाला हवं तसं खेळण्याचं स्वातंत्र्य देतात. अवघड काळात आपण उत्तम प्रकारे शिकू शकतो आणि नव्या गोष्टी आजमावून बघण्यात आपण मागे हटता काम नये असं त्यांनी मला सांगितलं. माझं करियर घडण्यावर त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे.”

८. चेतेश्वर पुजारा :

 

cheteshwar poojara im

 

चेतेश्वर पुजाराची द्रविडशी तुलना केली जाते. २०२० मध्ये चेतेश्वर पुजारा म्हणाला होता, की क्रिकेटमधून थोडा ब्रेक घेणं हे खेळाडूच्या फॉर्मच्या आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं असा सल्ला द्रविडने त्याला दिला होता.

द्रविडचं वर्णन कसं करशील अशी त्याला विचारणा केल्यावर आपण एका वाक्यात त्याचं वर्णन करू शकत नाही असं तो म्हणाला.

तो म्हणाला, “क्रिकेटमधून स्वीच ऑफ करण्याचं महत्त्व त्याने माझ्या लक्षात आणून दिलं. माझ्याही मनात साधारण असाच विचार आला होता. पण जेव्हा मी त्याच्याशी बोललो तेव्हा याविषयी मला अधिक स्पष्टता आली आणि मी काय करण्याची गरज आहे हे मला निश्चितपणे समजलं.”

आपल्याकडे अनेक उत्तम खेळाडू आहेत. पण उत्तम खेळाडू असण्याबरोबरच गुणी असणारे काही मोजकेच खेळाडू असतात. द्रविडच्या गुणांमुळे आपल्याला त्याचं नेहमीच कौतुक वाटत आलंय.

या क्रिकेटपटूंनी आणि प्रशिक्षकांनी मानलेले त्याचे आभार पाहून द्रविडविषयी आपल्याला वाटणारा आदर द्विगुणित होईल यात शंकाच नाही. नव्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करण्यासोबतच द्रविडकडून त्याचे हे गुणही शिकावेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?