' ‘१० मे’चं अज्ञात महत्व: १८५७ च्या उठावाचं पहिलं अग्निकुंड आजच पेटलं होतं! – InMarathi

‘१० मे’चं अज्ञात महत्व: १८५७ च्या उठावाचं पहिलं अग्निकुंड आजच पेटलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी

===

२९ एप्रिल रोजी Times मधे एक बातमी वाचली – अमृतसर जिल्ह्याच्या अजनाला शहरात एका विहिरीत जे शेकडो सांगाडे सापडले ते १८५७ च्या स्वातंत्र्य समरातले आहेत! Frontiers in Genetics या जर्नलमधे याबद्दल सविस्तर लेख आहे. त्यावेळी २६ वी नेटिव (भारतीय) बंगाल इनफंट्री बटालियन त्या भागात तैनात होती! पुराव्यांवरून हेही सिद्ध झालं की यात प्रामुख्यानं बंगाल, ओडिशा, बिहार आणि उत्तर प्रदेशातले भारतीय सैनिक होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फ्रेड्रिक हेनरी कूपर या तत्कालीन कमिशनरच्या आज्ञेनुसार कोणतीही संधी न देता,कोणताही कायदा न पाळता २४२ सैनिकांची सामूहिक कत्तल करून त्यांना अजनालमधल्या पोलिस ठाण्याजवळच्या कोरड्या विहिरीत टाकून देण्यात आलं होतं. वर कोळसा आणि इतर कचरा टाकून ती विहिर बुजवण्याचा प्रयत्नही केला.

 

ajnala im

 

मार्च २०१४ मधे गुरुद्वाराच्या प्रमुखांनी उत्खननात हे सांगाडे मिळाल्याचं कळवलं. या विहिरीला पंजाबी भाषेत “शहीदन दा खु” किंवा “कलियनवाला खु” (काळी विहिर)असं म्हणतात. २०१४ पासून त्या सांगाड्यांवर प्रयोग आणि संशोधन सुरू होतं. आता त्याची खात्री पटली आहे!

कुणी फ्रेड्रिक अशा प्रकारे सैनिक मारून विहिरीत ढकलतो, कुणी विल्यम हडसन दिल्लीत अंदाधुंद गोळीबार करून हजारो प्राण घेतो! कुणी जेम्स नील कानपुरात शेकडो भारतीयांना झाडांझाडांवर फाशीवर लटकवतो आणि त्यावर गर्व व्यक्त करतो!

अशा शेकडो रक्तरंजित व्यथा, बेचिराख होणारी गावं,धुळीला मिळणारी मोठी मोठी संस्थानं, लिलावात विकल्या जाणारे हत्ती-घोडे आणि भारतीय राण्यांच्या अंगावरचे दागिने…त्यांची भांडी -कुंडी, अगदी महालांच्या चौकटीही….!

गांजलेले हजारो निर्धन शेतकरी आणि मजूर, तुरुंगात डांबून अमानुषपणे अत्याचार करून मारलेले शेकडो क्रांतिकारक…आणि आपल्याला शाळेत शिकवलं गेलं – १८५७ म्हणजे सैनिकांचा “उठाव” होता…आणि काडतुसं हे त्याचं कारण होतं! वास्तवात भारतीयांनी सर्वस्व पणाला लाऊन लढलेला स्वातंत्र्यासाठीचा तो धगधगता रणसंग्राम होता!

 

1857 Revolt of soldiers.Inmarathi
defence.pk

 

यशापयशाच्या पुढे जाऊन या संग्रामानं मनामनातलं “भारतीयत्त्व” जागं केलं! हे आज स्मरण्याचं कारण म्हणजे केवळ सैनिकांमधला उठाव न रहाता जनमानसापर्यंत हा लढा पोचून संग्रामाचा प्रारंभ १० में रोजी मेरठ इथून झाला असं मानलं जातं!

१८०३ साली मराठे आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या सुरजी-अंजनगाव तहानंतर मेरठ हा भाग पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात गेला. तेव्हापासून रस्ते आणि इमारती बांधून एक मजबूत छावणी म्हणून इंग्रजांनी मेरठला विकसित केलं.

मुख्य म्हणजे या भागाला खूप जास्त strategic importance होता! म्हणून पुढच्या काही दशकांत या मेरठ छावणीच्या आधारावर आजूबाजूचे अनेक प्रदेश त्यांनी वर्चस्वाखाली आणले. हा जणू त्यांचा बालेकिल्लाच होता…!

१८५७ सालात मेरठ एक मोठं मिलिटरी स्टेशन होतं. भारतीय सैन्य (native)आणि ब्रिटिश रेजिमेंट्स हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी रहात असत. या दोन्हींचं मिळून मेरठ गॅरिसन काम करत असे. ब्रिटिश सैन्यात १ पायदळ रेजिमेंट(साठावी Kings Royal Rifles,९०१ संख्या), एक घोडदळ रेजिमेंट(सहावी Dragoon Guards,६५२ संख्या),१ तोफखान्याची रेजिमेंट (२२५ संख्या) आणि अतिरिक्त काही सैन्य होतं.

 

maratha war inmarathi

 

तर भारतीय विभागात पायदळाच्या २ तुकड्या (७८०+९५०संख्या), एक घोडदळ (५०४ संख्या) आणि शिवाय १२३ विशेष तरबेज भारतीय गोलंदाज होते. ही संख्या हे स्पष्ट सांगते की मेरठमधे भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणात इंग्रजांसाठी काम करत होतं.

८ एप्रिल रोजी क्रांतिवीर मंगल पांडेला बराकपूर इथे फाशी देण्यात आली! त्याचा देह गेला पण त्यातलं चैतन्य जणू तो भारतीय सैनिकांमधे रुजवून गेला!आता कुणीही या काडतुसांवरून बंड करणार नाही याची इंग्रजांना खात्री होती! त्यामुळं कर्नल स्मिथ यानं २४ एप्रिल रोजी drill साठी भारतीय शिपायांना आज्ञा दिली.

यात सरावासाठी गाय आणि डुकराची चरबी लावलेलं तेच काडतूस त्यांना तोंडांनं ओढायचं होतं! पण एक दिवस आधीच भारतीय सैन्यातल्या हिंदू आणि मुस्लिम दोघांनी गंगेचं पाणी आणि पवित्र कुराण यांच्या साक्षीनं काडतुसांना शिवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती! म्हणून ८५ सैनिकांनी काडतुसांना हात लावण्यास स्पष्ट नकार दिला. इंग्रजांसाठी हे आश्चर्यकारक होतं! स्पेशल कोर्ट मार्शल होऊन त्यांच्यावर ६ ते ८ में पर्यंत खटला चालवण्यांत आला.

 

mangal pandey inmarathi

 

९ मे चा दिवस उजाडला! इतर भारतीय सैन्याला अद्दल घडावी या हेतूनं परेडच्या मैदानावर संपूर्ण भारतीय सैन्याला निशस्त्र उभं करण्यांत आलं. ब्रिटिश सैन्यही होतं,त्यांच्याकडे मात्र रायफल्स होत्या. या सगळ्यांच्या समोर बंडखोर ८५ सैनिकांना १० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा मोठ्यांनं जाहिर करण्यात आली!

कोणत्याही सैनिकाला सगळ्यात अपमानास्पद वाटणारी गोष्ट इथे केली गेली. या सगळ्यांचा गणवेश काढून टाकण्यात आला, फाडून ओढून घेण्यात आला. लोहाराला बोलावून त्यांच्या हातापायात साखळदंड बांधण्यात आले. ते ८५ जण घोषणा देत होते.अखेरीस त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं.

समोर उभ्या असलेल्या भारतीय सैन्याला काहीही बघवत नव्हतं! आता पुरे! प्लासीची लढाई जून १७५७…१०० वर्षं…१०० पापाचे घडे भरलेच होते! संपूर्ण भारतात स्वातंत्र्यसमरासाठी योजनाबद्ध रीतीनं ३० -३१ में ची तारीख ठरली होती. पण त्याला अजून २० दिवस बाकी होते. भारतीय सैन्याच्या वेदना आता अनावर झाल्या!

 

plasi battle inmarathi
hindinotes.org

 

१० मे चा दिवस…कडक उन्हाळ्यातला रविवार! आधीच इंग्रज या उन्हानं हैराण होते. सदर बाजारातल्या दुकदुकानात काल जे झालं त्याबद्दल धुसफूस सुरू होती. भारतीय सैन्यात ज्वालामुखी खदखदत होता. पण कुणीही तसं दाखवलं नाही. अनेक जण कामावर गेले नाहीत. पण तरीही इंग्रजांना पुढच्या वादळाची जराही शंका आली नाही!

काहीजण ९ में रोजी क्रांतीचा संदेश घेऊन रात्रीच दिल्लीला रवाना झाले होते. उन्हामुळे रविवारची चर्चची प्रार्थना देखील सकाळच्या ऐवजी संध्याकाळी सुरू होण्याच्या बेतात होती. साधारण संध्याकाळी साडे पाचची वेळ…आणि वादळ सुटलं! आक्रमण! सदर बाजारात जे जे इंग्रज अधिकारी आणि शिपाई त्यांच्या कामासाठी फिरत होते, त्यांच्यावर भारतीय सैनिक तुटून पडले! सदर कोतवालीमधून पोलीसही त्यात येऊन सामील झाले!

पायदळातल्या भारतीय सैनिकांनी बंदुका उचलल्या, दारूगोळा घेतला. घोडदळातले स्वार घोड्यावर बसले. एक गट आपल्या ८५ सैनिक बांधवांना कैदेतून बाहेर काढण्यासाठी नवीन जेलच्या दिशेनं सरसावला. जेलची दारं तोडली. लोहरानं बेड्या तोडून त्यांना मोकळं केलं! हे पाहून ब्रिटिश जेलर अक्षरशः थिजला! एक गट “दीन दीन…” घोषणा देत मेरठमधल्या लोकांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी सामील होण्याचं आवाहन करू लागला.

हे पाहून भारतीय सैन्याचे प्रमुख ब्रिटिश अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धावले. तेव्हा – “तुम्ही तुमच्या देशात परत जा आता…कंपनीचं राज्य कायमचं संपुष्टात आलंय…भारत स्वतंत्र झाला!” असं त्यांना ठासून सांगण्यात आलं! कर्नल जॉन फिनिस नावाचा अधिकारी गोळी लागून घोड्यावरून कोसळला. इतर अधिकारीही कळून चुकले की आता परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे! तेव्हा ते ब्रिटिश सैन्याच्या छावण्यांकडे पळत सुटले!

 

british war inmarathi

 

संपूर्ण मेरठला गारद करून भारतीय सैन्य जास्तीत जास्त शस्त्र, दारूगोळा,घोडे घेऊन जवळच्या रिठानी गावात एकत्र जमले. योजना करून काही मुरादाबादमध्ये तर काही दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले…चलो दिल्ली! ते ११ में च्या पहाटे दिल्लीत पोचले. दुपारपर्यंत दिल्ली ताब्यात घेऊन बहादुर शहा जफरला भारताचा राजा म्हणून घोषित केलं गेलं!

मेरठमधले लहान झोपड्यांमधे रहाणारे भारतीयही एकत्र आले. त्यांनी इंग्रजांच्या बंगल्यांवरती हल्ले केले. अगदी कमिश्ंनर ग्रिथेडलाही सोडलं नाही. तो त्याच्या बायकोसह कसाबसा निसटून गेला. मध्यरात्रीपर्यंत भयाण शांतता होती.

कुणीही बाहेर निघालं नाही. शेवटी मध्यरात्री ब्रिटिश सैनिकांचा एक छोटा गट त्यांच्याकडच्या पडलेल्या सैनिकांना घेऊन जाण्यासाठी म्हणून बाहेर पाठवला गेला. पुढे मेरठजवळच्या गावागावात सशस्त्र क्रांतीचा हा वणवा पसरला.

ब्रिटिश चौक्या, पोलिस ठाणे दिसेल त्याच्यावर हल्ला करून गावांनी स्वतःला स्वतंत्र म्हणून घोषित केलं! मदतीसाठी १५ में रोजी रुडकीवरून मेरठला आणल्या गेलेल्या भारतीय सैन्यानंही मेजर फ्रेजर याला ठार मारलं आणि मोठा विद्रोह केला!

यातल्या ५०- ६० सैनिकांना एकत्र उभं करून गोळ्या झाडण्यांत आल्या. अशाच प्रकारच्या लढाया आग्रा, अयोध्या, कानपूर, लखनौ, माळवा, बुंदेलखंड, झाशी, काल्पी, ग्वाल्हेर,बिहार आणि तिथून दक्षिणेतही अनेक झाल्या!

पेशावरपासून ते कलकत्त्यापर्यंत पेटलेल्या १८५७ च्या या क्रांतीला अंतस्थ हेतू होता… या हेतूशिवाय ती केवळ हिंसा ठरली असती! पण कारणीभूत ठरलेला हा अंतस्थ हेतू कोणता? या क्रांतीमागची मूळ तत्त्वं कोणती होती? स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात त्याप्रमाणं “हजारो शूरांच्या तलवारी त्यांच्या म्यानांतून ओढून काढून रणांगणात चमकविणारी ही तत्त्वे कोणती होती?

निस्तेज झालेल्या मुकुटांना सतेजता देणारी आणि मोडून पडलेल्या ध्वजांचे पुनरुद्धरण करणारी ही तत्त्वे कोणती होती?दिल्लीच्या मशिदीतून व काशीच्या देवळातून ज्याच्या यश:प्राप्तीसाठी परमेश्वराकडे दिव्य प्रार्थना धाडण्यांत याव्या.. आणि ज्यासाठी झाशीच्या महालक्ष्मीनं शुंभानिशुंभांच्या रक्तात भिजलेली आपली पुराणप्रसिद्ध तरवार पुन्हा उपसू लागावे अशी ही दिव्य तत्त्वं होती – स्वधर्म आणि स्वराज्य! स्वधर्माशिवाय स्वराज्य तुच्छ आणि स्वराज्याशिवाय स्वधर्म बलहीन होय!”

वर्तमानानं घ्यायचा बोध – अनेक पैलूंनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या उठावातून आज घेण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक आणि धार्मिक ऐक्य होय! राष्ट्रावर संकट आल्यावर लष्करी वा बिन लष्करी, राजा वा रंक,हिंदू वा मुसलमान हे कोणतंही द्वैत उरलं नाही!

हिंदू धर्मातल्या समस्त जातीजमाती एकवटून यात लढल्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई-झलकारी बाई-गुलाम गौस खान हे एकत्र होऊन शत्रूवर बरसले!बेगम हजरत महल – राजा लाल सिंह हे अहमद शहा मौलवींबरोबर एकत्र लढले! विद्वान क्रांतीदूत अझीमुल्ला खान म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा उजवा हात!

 

jhalkari against british inmarathi

ब्रिटिशांचे नंबर १ चे शत्रू “मराठे”च होते, मुघल नव्हे; एक अज्ञात ज्वलंत इतिहास!

“ऐतिहासिक गद्दार”: या देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले

संन्यासी आणि फकीर यांनी मिळून योजना आखल्या आणि संपर्काचं मोठं जाळं विणलं! शिवाय या स्वातंत्र्य समरात महिलांचं योगदान लक्षणीय होतं! राजघराण्यातली अवंतीबाई असो वा कोठ्यावरची अजीजन बेगम…सोळा वर्षांची एखादी सामान्य घरातली किशोरी असो वा झाडावरून पिस्तुलानं वेध घेणारी उदा देवी!कितीतरी दुर्गा या रणात लढल्या!

घराघरातून फिरणार्‍या निरोपाच्या पोळ्या असो वा क्रांतीसाठी फिरणारी लाल फुलं…हजारो हात या स्वातंत्र्यरथाला अविरत पुढे नेत होते! अखंड भारतासाठी लढणार्‍या या वीरांना जातीपातीच्या कुंपणात बसवून इतिहासाचा विपर्यास करण्यासाठीही मागे पुढे न पहाणार्‍या आजच्या समाजानं या एकेका क्रांतिवीराचं चरित्र आवर्जून वाचलं पाहिजे! आणि भारतात रहाणार्‍या सगळ्या धर्मांनी आपलं राष्ट्रीयत्त्व सर्वतोपरी ठेवलंच पाहिजे ही जाणीव करून देण्याचं सामर्थ्य १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात आहे!

“शहिदांच्या रक्तात काय तेज असेल ते असो, परंतु त्यांच्या नामस्मरणाने देखील मनात उदात्त वृत्तींना जास्त बहर येऊ लागतो!” म्हणून हे स्मरणपुष्प त्यांना समर्पित!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?