' सौंदर्यस्पर्धा सर्वांना माहीत आहे, पण इथे तर... वाचा, 'फेस्टिवल ऑफ अग्लीनेस' बद्दल!

सौंदर्यस्पर्धा सर्वांना माहीत आहे, पण इथे तर… वाचा, ‘फेस्टिवल ऑफ अग्लीनेस’ बद्दल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कितीही नाही म्हटलं तरी आजही जगभरात सगळीकडे शारीरिक सौंदर्याला महत्त्व दिलं जातं. वस्तुतः तुम्ही सुंदर दिसणं किंवा न दिसणं हे तुमच्या हातात नसतं, मात्र तरीदेखील छान दिसणाऱ्या आणि फारश्या बऱ्या न दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये कायमच भेदभाव केला जातो.

एखादी व्यक्ती एखाद्या नोकरीसाठी पुरेशी पात्र नसतानाही केवळ ती सुंदर दिसते म्हणून बाकी गोष्टीकडे डोळेझाक केली जाऊन तिला नोकरी दिली गेल्याचीही अनेक उदाहरणं आपण पाहतो.

लोकांनी कितीही नॉन जजमेंटल असल्याचं भासवलं तरी बऱ्याचदा सुंदर दिसणाऱ्यांच्या पदरी झुकतं मात पडतं. सौंदर्याच्या काही ठराविक मापदंडांच्या आधारे सौंदर्य साजरं केलं जातं.

‘लॅक्मे फॅशन विक’सारख्या मोठमोठ्या सोहळ्यांना मानाचं स्थान असतं. ‘मिस वर्ल्ड’-‘मिस युनिव्हर्स’सारखे मुकुट बहाल केले जातात.

 

aishwarya rai jodha akbar inmarathi

 

थोडक्यात , सुंदर दिसणारी व्यक्ती सामान्य रूप असलेल्या व्यक्तीपेक्षा विशेष ठरते, पण या सगळ्यात सामान्य रूप असलेल्या व्यक्तींच्या मनात निर्माण होणारा न्यूनगंड, केवळ रूपापायी हुकलेल्या संधी याकडे समाज दुर्लक्ष करतो.

समाजाच्या तथाकथित मापदंडांनुसार कुरूप दिसणारी व्यक्ती कित्येकांच्या निंदेचं लक्ष्य ठरते.

बाह्य सौंदर्य महत्त्वाचं नाही, तुमचं आंतरिक सौंदर्य महत्त्वाचं आहे हे नुसतं बोलण्यापुरतं उरतं. इटलीमधलं एक सुंदर शहर मात्र याला अपवाद ठरलं आहे.

कुरूप दिसणं साजरं केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? इटलीमधल्या एका सुंदर शहरात मात्र ‘कुरूपतेचाच उत्सव’ साजरा केला जातो. गेल्या १४० वर्षांपासून इटलीतल्या ‘पिओब्बिको’ या शहरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘Festival of Ugly’ या अनोख्या उत्सवाविषयी विषयी जाणून घेऊ.

 

festival of ugly im

 

इटलीमधले अपेनाइन पर्वत आणि ऍड्रिऍटिक समुद्र यांच्या मधल्या दरीत ‘पिओब्बिको’ नावाचं हे छोटंसं मध्ययुगीन शहर वसलेलं आहे.

हिरव्यागार जंगलांनी वेढलेल्या भव्य दगडी इमारतींचं हे देखणं शहर ओळखलं जातं ते मात्र त्यातल्या कुरूप दिसणाऱ्या लोकांमुळे. १८७९ पासून हे शहर ‘Club die Brutti’ म्हणजेच ‘The Ugly Club’ या क्लबचं माहेरघर आहे.

२००० नागरिकांच्या शहरात सुरू झालेल्या या उदात्त संकल्पनेच्या क्लबने आता जागतिक चळवळीचं स्वरूप घेतलेलं असून आता ‘वर्ल्ड असोसिएशन ऑफ अग्ली पीपल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेची जगभरात २५ वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालयं आहेत आणि जगभरात ३०,००० पेक्षाही जास्त सदस्य आहेत.

“माणूस कसा दिसतो यावरून नाही तर तो माणूस म्हणून कसा आहे यावरून तो कसा आहे हे ठरतं” असं या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे.

या क्लबच्या फेसबुक पेजनुसार, “ज्या समाजात शारीरिक सौंदर्याला प्रचंड महत्त्व दिलं जातं त्यातल्या कुरूप व्यक्तींना आपली ओळख मिळावी याकरता लढा देण्यासाठी या संस्थेने स्वतःला वाहून घेतलं आहे.”

पिओब्बिकोमधल्या अविवाहित स्त्रियांना आपला जोडीदार शोधायला मदत व्हावी म्हणून १९६३ साली ही संस्था रिलॉन्च केली गेली.

२००७ साली आरशात स्वतःला पाहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या पुतळ्याचं पिओबिको शहराच्या चौकात अनावरण केलं गेलं. हा पुतळा कुरूप दिसणाऱ्या लोकांना समर्पित केलेला आहे.

‘Festival of Ugly’ कधी आणि कसा साजरा केला जातो?

 

festival of ugly im1

 

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरातले लोक पिओब्बिको शहरातल्या या क्लबमध्ये जमून या वार्षिक सोहळ्यात सहभागी होतात.

आजच्या घडीला या सोहळ्याचा भाग बनणं सोपं झालं आहे. या सोहळ्यात क्लबमधले वरिष्ठ सदस्य चक्क ‘कुरूपते’नुसार सदस्यांची क्रमवारी करतात.

‘अनिर्दिष्ट’ पासून ते ‘असामान्य कुरूप’ अशा श्रेण्या यात असू शकतात. पण याचा अर्थ क्लबमध्ये असलेले सदस्य कुरूपच दिसणारे असतात असं नाही.

बाकी गोष्टींकडे महत्त्व न देता व्यक्तीचं आंतरिक सौंदर्य साजरं करण्याला हा क्लब अधिक महत्त्व देतो. या वार्षिक सोहळ्यात सदस्य क्लबचा नवा अध्यक्ष निवडतात.

नव्या सदस्यांची नोंद करतात आणि तिथल्या पास्ता, ट्रफल्स आणि पोलेंटा या स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेतात.

 

pasta inmarathi

 

संस्थेचे सध्याचे अध्यक्ष गिआन्नी अलुईगी म्हणाले, “स्वतःला फार गांभीर्याने न घेणं आणि केवळ बाह्य सौंदर्याचे निकष म्हणजेच सौंदर्य या समजाविरोधात लढा देणं ही आमच्या संस्थेची उद्दिष्टं आहेत. आमचे सदस्य रूढार्थाने कुरूप नसतात.

ते कदाचित सुंदर नसतील, पण याकडे आम्ही खेळकरपणे पाहतो. “गिआन्नी पुढे म्हणाले, “आम्ही शक्य तितक्या मिटिंग्ज घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला जोडीदार मिळू शकत नाहीये याविषयी लिहिणाऱ्या शेकडो लोकांची म्हणणी ऐकतो. प्रत्येकवेळी जरी हे शक्य नसलं तरी आम्ही त्यांना दिलासा देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो.

उदाहरणार्थ, काही दिवसांपूर्वी एका ६० वर्षीय वृद्ध महिलेने मला एक पत्रं लिहिलं होतं ज्यात तिने तिची कमाई किती आहे आणि तिची मालमत्ता किती आहे याविषयी लिहून माझ्यासाठी जोडीदार शोधाल का अशी विचारणा केली होती.

अर्थातच मी यात फारसं काही करू शकत नाही. पण ज्याअर्थी आमचा क्लब आहे आणि आमच्या सदस्यांची संख्या सातत्याने वाढत आहे ते पाहता आम्ही पूर्वग्रहांविरुद्ध लढा देण्यात हळूहळू यशस्वी ठरतोय आणि जेव्हा मी पूर्वग्रह असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ सगळ्या प्रकारचे पूर्वग्रह असा होतो. केवळ शारीरिक सौंदर्याविषयीचेच नाहीत तर समलैंगिक व्यक्ती, स्थलांतरित, मुस्लिम… जगातले सगळे अल्पसंख्यांक यांच्या विरोधात असलेले पूर्वग्रह.”, हे म्हणत असताना त्यांच्या स्वरात काहीसा अभिमान होता.

आपल्या देशात, जगातल्या इतर देशांमध्ये कुरूपतेचा असा सोहळा कधी होईल, होईल की नाही माहीत नाही. सोहळा तर दूरची गोष्ट राहिली, आपल्या समाजात कुरूप दिसणाऱ्या व्यक्तींच्या वाट्याला येणारे नाहक अपमान, कुचेष्टा हेही कधी थांबेल हे आपल्याला माहीत नाही.

आपण म्हणजे आपलं दिसणं नाही हे ओळखून सामाजिक प्रभावांखाली दबून न जाता हळूहळू का होईना स्वतःला स्वीकारणं आणि आपल्या दिसण्याविषयी बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायला शिकणं, प्रसंगी विनोदाने पाहणं आपल्या हातात नक्कीच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?