' जेव्हा आर आर पाटलांनी प्लॅनिंग करून राज ठाकरेंची अटक घडवून आणली होती

जेव्हा आर आर पाटलांनी प्लॅनिंग करून राज ठाकरेंची अटक घडवून आणली होती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला केलेल्या त्यांच्या भाषणात मशिदींमधून लाऊडस्पीकर्स हटवा नाहीतर आम्ही मशिदींसमोर लाऊडस्पिकरवर ‘हनुमान चालीसा’ लावू असा इशारा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेतेमंडळी, कलाकार अशा सगळ्यांकडूनच संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही सेलिब्रिटीजनी भोंग्यांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण हा मुद्दा लक्षात घेत या मुद्याचं समर्थन केलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राज ठाकरे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त भाषणांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांनी इतक्यातच केलेल्या भाषणातली वादग्रस्त वक्तव्यं त्यांना महागात पडतील की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

raj thackrey 3 IM

 

याआधी राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. वेळोवेळी प्रक्षोभक विधानं करणे, दिलेल्या अटी न पाळता त्यांचं उल्लंघन करणे या कारणांमुळे तसेच दोन समूहांमध्ये कलह निर्माण केल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात आला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना अटक होऊ शकते. पण कदाचित आपल्यातला काही जणांना आठवत नसेल की यापूर्वीही राज ठाकरेंवर असा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. आर. आर पाटलांनी या अटकेची रणनीती आखून राज ठाकरेंना अटक करण्याचे आदेश दिले होते. काय होती ही संपूर्ण घटना? जाणून घेऊ.

 

raj thackrey featured IM

 

शिवसेनेतून वेगळं होऊन राज ठाकरेंनी ९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या पक्षाची स्थापना केली. फार कमी वेळात राज ठाकरेंनी जनमानसाचा कौल मिळवला होता. मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात आपला जम बसवण्यासाठी हा पक्ष धडपड करत होता.

मराठी माणसांवर अन्याय होतोय आणि तो थांबवणे हे आपल्या पक्षाचं ध्येय्य असल्याचं मनसेने सांगितलं. या नव्या पक्षाकडे पाहून खरंच हे घडेल असा विश्वास लोकांच्याही मनात त्यावेळी निर्माण झाला होता.

राज ठाकरेंच्या भाषणांना तुडुंब गर्दी व्हायची. युवा पिढी त्यांच्या भाषणांनी प्रेरित झाली होती. उत्तरेकडून मुंबईत लोकांचे लोंढेच्या लोंढे येतात आणि मुंबईत आपला जम बसवतात.

मुंबईची अवस्था आधीच वाईट झालेली असताना जर हे असंच घडत राहीलं तर ती आणखी वाईट होईल असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या लोकांचा समाचार घेतला. असं सगळं असताना वातावरण कसं शांत राहील? फेब्रुवारी २००८ मध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते यांच्याच बेबनाव झाला.

 

raj balsaheb featured IM

 

राज ठाकरेंच्या भाषणांवर समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही भडकवणारी भाषणं करून प्रत्युत्तरं दिली. दोन्ही पक्षांमध्ये केवळ शाब्दिक चकमकीच घडल्या नाहीत तर या कलहात बऱ्याच सार्वजनिक मालमत्तेचंही नुकसान झालं. मुंबईतल्या बऱ्याच टॅक्सींची तोडफोड केली गेली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यांवर उतरून धिंगाणा घातला.

आर. आर. पाटलांनी आखली अटकेची रणनीती :

त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. तर आर. आर. पाटील हे उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्रालयाची जबाबदारीही त्यांच्याचकडे होती. केंद्रातही त्यावेळी काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं.

उत्तर भारतातल्या राजकीय नेत्यांनी मनसे नेते राज ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांना लवकरात लवकर अटक करण्याचा दबाव केंद्र सरकारवर आणला. सरतेशेवटी, आर. आर. पाटलांनी राज ठाकरे आणि अबु आझमी यांना अटक करण्याची रणनीती आखली.

 

rr patil im

 

मुंबईत आंदोलन होतं त्यावेळी आर. आर. पाटील विदर्भ दौऱ्यावर होते. राज ठाकरे आणि अबु आझमी यांना अटक करायची की नाही या संदर्भात नागपूरमध्ये पोलीस खात्यातल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेण्यात आली. ही चर्चा दोन दिवस चालली. सर्वसामान्य माणसांचं या सगळ्यात रक्षण व्हावं यासाठी केंद्र सरकारही सैन्य पाठवायला तयार झालं.

ठाकरे आणि आझमी यांना अटक केल्यावर काय प्रतिक्रिया उमटू शकतात यावर २ दिवस चर्चा केली गेली. काही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की जर या नेत्यांना अटक केली गेली तर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

सर्वसामान्य माणसांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका पोहोचू शकतो असे मुद्दे त्यांनी मांडले. त्यामुळे जी पावलं उचलाल ती सांभाळून उचला असा सल्ला आर. आर. पाटलांना देण्यात आला.

या सगळ्या दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा दौरा होणार असल्यामुळे पोलीस कर्मचारी व्हीआयपी सिक्युरिटीच्या कामात व्यस्त असणार होते. लूटमार केलेल्या लोकांकडून नुकसानभरपाई करून घेण्यासंबंधी प्रस्ताव मांडावा अशी पाटील यांनी गृह खात्याला विचारणा केली.

दोन गटांमध्ये शत्रुत्त्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर करण्यात आला. कलम १५३ (अविचाराने जमावाला चिथावून गोंधळ माजवणे) च्या कलम १५३ अ (जन्माचं, निवासाचं ठिकाण इत्यादींवरून दोन गटांमध्ये शत्रुत्त्व निर्माण करण्याला प्रोत्साहन देणे) आणि कलम १५३ ब (राष्ट्रीय ऐक्यावर प्रतिकूल प्रभाव करणारी दूषणं देणे) अंतर्गत मनसेचे नेते राज ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

abu-azami-marathipizza
afternoonvoice.com

राज ठाकरेंविरुद्धच्या गुन्ह्याची नोंद विक्रोळी पोलीस ठाण्यात झाली तर अबु आझमी यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याची नोंद शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात झाली. राज ठाकरेंवर एफआयआर दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुणे, नाशिक, मराठवाडा या भागांमध्ये मनसेच्या नेत्यांनी बऱ्याच ठिकाणी बसेसवर आणि सार्वजनिक मालमत्तेवर हल्ले करायला सुरुवात केली.

भडकलेल्या मनसेच्या सैनिकांनी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती येथेही दंगे करायला सुरुवात केली. राज ठाकरेंना अटक करावी की नाही याविषयी विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण मुंबईत टॅक्सींची तोडफोड झाल्यावर मात्र आर. आर. पाटील यांनी राज ठाकरे आणि अबु आझमींना अटक करायचं निश्चित केलं.

अशी झाली अटक :

दोन्ही नेत्यांच्या भाषणांच्या आणि टॅक्सींवर झालेल्या हल्ल्यांच्या व्हिडियो क्लिपिंग्स पोलिसांना मिळाल्या आणि कायदेशीर सल्लाही घेतला गेला. विदर्भ दौऱ्यावरून आर. आर. पाटील विमानाने मुंबईत आले आणि थेट मंत्रालयात गेले. त्यानंतर सगळ्यात आधी पाटील यांनी राज ठाकरे आणि अबु आझमी यांना असलेली सिक्युरिटी आहे त्यापेक्षा अर्धी करण्याचा धाडसी निर्णय घेत तसं करायला आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं.

पाटील म्हणाले, “लोकांच्या संरक्षणासाठी मला कर्मचारी हवे आहेत. लोकांच्या संरक्षणासाठी सैन्य हवं आहे का हे मी माझ्या लोकांना विचारलं आहे.” त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सदस्यांची संख्या २४ वरून १२ वर आली आणि अबु आझमी यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सदस्यांची संख्या १० वरून ५ वर आली.

 

arrest raj im

 

१३ फेब्रुवारीला सकाळी आर. आर. पाटील यांनी राज ठाकरेंच्या अटकेच्या निर्णयावर सही केली. त्यानंतर राज ठाकरे यांना शिवाजी पार्क येथील त्यांच्या कृष्ण कुंज या निवासस्थानावरून अटक करण्यात आली आणि विक्रोळी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनाही यावेळी अटक करण्यात आली. राज ठाकरेंना अटक केली गेली त्यादिवशी बुधवार होता.

संध्याकाळी ४:१५ वाजता त्यांना अटक करण्यात आली. सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी दोन दिवसांपासून राज ठाकरे यांना अटक करण्याच्या तयारीत होते. त्यांच्यातला एक अधिकारी म्हणाला, “मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी आम्ही राज ठाकरेंना अटक करण्याचा विचार करत होतो. पण त्याचे काय बरेवाईट परिणाम होतील याचा आम्ही विचार केला आणि बुधवारी संध्याकाळी राज ठाकरेंना अटक करायचं ठरवलं.” राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मुंबईतील शांततेला धोका निर्माण झाल्याचे आणि दंगली पेटत असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले.

 

arrerst im 3

 

राज ठाकरे यांचे वकील अशोक मुंदर्गी यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावत या सगळ्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाला जबाबदार धरले. कुठल्या परिस्थितीत राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषणं केली हे विचारात घ्यावं असं ते कोर्टात म्हणाले. ते म्हणाले, “समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी जे बोलले त्यावर माझ्या अशिलाने केवळ उत्तरं दिली आहेत.” ते म्हणाले, “त्यांच्याविरोधात कुठल्याही मोठ्या गुन्ह्याची नोंद एफआयआर मध्ये झालेली नाही आणि एफआयआर ही केवळ भाषणांवरूनच दाखल केली आहे.

 

law-court-inmarathi

 

ज्या घटना घडल्या त्या भाषणांनंतर घडल्या.” दंडाधिकारी एस. जे. शर्मा यांनी “लोकांची शांतता हरवेल आणि तुमच्या करियरचं नुकसान होईल अशी भाषणं देऊ नका.”, असा सल्ला राज ठाकरे यांना दिला. त्यानंतर १५ हजार रुपये जामिनावर संध्याकाळी ६:४५ वाजता राज ठाकरे यांची सुटका करण्यात आली.

राज ठाकरे यांनी अजूनही वादग्रस्त विधानं, भाषणं करणं थांबवलेलं नाही. भोंग्याचा हा वाद लवकर मिटेल की चिघळत राहील, राज ठाकरेंना खरंच पुन्हा अटक होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल. मात्र या सगळ्या लोकांचे माथे भडकून पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण व्हायला नको आणि सार्वजनिक मालमत्तेचं पुन्हा नुकसान व्हायला नको इतकीच आशा करणं आपल्या हातात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?