' फक्त २६ रुपये घेऊन फोटोग्राफर बनण्यासाठी मुंबईत आला अन् बनला कपटी खलनायक! – InMarathi

फक्त २६ रुपये घेऊन फोटोग्राफर बनण्यासाठी मुंबईत आला अन् बनला कपटी खलनायक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हीरोची हीरोपंती ढांसू दिसण्यासाठी खलनायकाचे किडे ढांसू असावे लागतात. कोणत्याही गोष्टीतला खलनायक हा जितका क्रूर, कुजका, कपटी तितका हिरो मोठा. अगदी महाभारतासारख्या महाकाव्यातही कौरवांचा दुष्टपणा आणि कपट मोठं असल्यानं अर्जून, श्रीकृष्ण आणि इतर पांडव यांची धवल प्रतिमा जास्त उजळते.

वाईटाच्या नाशासाठी हिरोचा अवतार होतो म्हणूनच हे जे वाईट आहे ते जितकं मोठं तितका त्यावर विजय मिळविणारा हिरो मोठा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे हिंदी चित्रपटांचा जर इतिहास लिहायचा तर यातल्या नामवंत खलनायकांत वरच्या स्थानावर असणारं नाव म्हणजे जीवन.

 

jeevan IM

 

साधारण साठ सत्तरच्या दशकात जीवनखेरीज हिंदी चित्रपट अधुरे होते. नायिकेवर अत्याचार करणारा, कट-कारस्थानांनी हिरोला बेजार करणारा जीवन पडद्यावर आला रे आला की प्रेक्षकातल्या बायाबापड्या त्याला शिव्या शाप द्यायला सुरवात करत असत.

अत्यंत कपटी चेहरा असणारा जीवन पडद्यावर नुसता आला तरिही प्रेक्षक सरसावून बसत कारण त्याची पडद्यावरची कृत्यंच तशी असत. जीवन हे पडद्यावरचं नाव असणार्‍या या कलाकाराचं खरं नाव होतं, ओंकार नाथ धर.

ओंकारनाथांचा जन्म श्रीनगरमधे झाला. त्यांचं कुटुंब कबिला म्हणण्याइतकं मोठं होतं. त्यांना पाच दहा नाहीत तर तब्बल २३ भावंडं होती. ओंकारनाथांच्या जन्माच्यावेळेसच त्यांची आई स्वर्गवासी झाली. त्यानंतर तीनच वर्षात वडीलही गेले आणि लहानगे ओंकारनाथ पोरके झाले.

jeevan 2 IM

 

मोठ्या कुटुंब कबिल्यात आईवडीलांविना ओंकारनाथ लहानाचे मोठे झाले आणि काश्मीरमध्ये फोटो स्टूडिओ थाटण्याचं स्वप्न पाहू लागले. त्या काळात फोटोग्राफीबाबत लोकांत प्रचंड कुतुहल होतं. घरोघरी कॅमेरा नसण्याचे ते दिवस असल्याने सहज म्हणूनही लोक नटून थटून स्टुडिओत येत आणि फोटो सेशन करत असत.

फोटोग्राफर बनायचं तर त्यातलं तांत्रिक कौशल्य आत्मसात करणं गरजेचं होतं आणि यासाठीच ओंकारनाथ घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून गेले ते थेट मुंबई गाठली.

मुंबईत ते उतरले तेंव्हा त्यांच्या खिशात फक्त २६ रुपये होते. मुंबईत जगायचं तर पडेल ते काम करण्याची तयारी हवी.

ओंकारनाथांची ही तयारी असल्यानं त्यांनी अनेक छोटी, किरकोळ कामं केली. यातलंच एक काम म्हणजे, दिग्दर्शक मोहन सिन्हा यांच्या स्टूडिओत रिफ़्लेक्टरवर चांदिचा कागद चिकटवण्याचं काम. त्यानंतर मोहन सिन्हा यांच्याच फ़ॅशनेबल इंडिया नावाच्या चित्रपटात (१९३५) त्यांना एक किरकोळ भूमिका मिळाली.

 

fashionable india IM

 

फोटोग्राफर बनण्यासाठी आलेल्या ओंकारनाथांना चित्रपट, नाटकांत छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या आणि त्यांचा अभिनय प्रवास चालू झाला.

गंमत म्हणजे त्यांना एका कालखंडात नारद म्हणूनच ओळखलं जायचं. याचं कारण त्यांनी एक दोन नाही तर तब्बल ६१ चित्रपट आणि नाटकात नारदाची भूमिका साकारली. हा एक प्रकारचा विक्रमच म्हणायला हवा.

 

jeevan as naarad IM

 

नायकाला साजेसा चेहरा नसला तरिही चेहर्‍यावर एक कमालिचा ड्रामेबाजपणा होता आणि यामुळेच त्यांना हिंदी चित्रपटांतला एक आघाडीचा खलनायक बनवलं. निर्माता विजय भट्ट यांनी ओंकारनाथ हे सोज्वळ नाव बदलून त्यांना जीवन हे स्क्रिन नेम दिलं.

हिंदी चित्रपटांचा इतिहास उल्लेखताना जीवन हे नाव आणि हा खलनायकी कालखंड टाळणं अशक्य आहे, इतकी कामगिरी करुन वयाच्या ७१ व्या साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

कोण कुठला काश्मिरमधला एक तरूण मुंबईत फोटोग्राफर बनायला येतो काय आणि खलनायक म्हणून राज्य करुन जातो काय. खरोखरच ओंकारनाथ या तरूणाची जिवनकथा पुरी फ़िल्मी है!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?