' एक असं गाव जिथे लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी बायका पळून जातात

एक असं गाव जिथे लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी बायका पळून जातात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दुष्काळाची समस्या महाराष्ट्राकरता नवी नाही. महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये अशी अनेक लहानमोठी गावं आहेत जी वर्षानुवर्षे दुष्काळाच्या, पाणी टंचाईच्या समस्येशी झुंज देत आहेत. दुर्दैवाने यातल्या अनेकांच्या वाट्याला आलेले हे भोग आजही संपलेले नाहीत.

धुणीभांडी, स्वयंपाकाला, पिण्यासाठी पाणी हवं म्हणून अशा गावागावांमधल्या बायकांना मैलोन् मैल रस्ते तुडवत पाणी आणायला जावं लागतं. वातावरण कसं आहे, रात्रीची वेळ आहे की पहाटेची, दुपारची वेळ आहे की संध्याकाळची हा विचार करणं त्यांना परवडणारं नसतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कडक उन्हाळ्यात थोड्या वेळापुरतं बाहेर पडल्यावर उन्हाच्या झळा सहन न होणाऱ्या आपल्यासारख्यांना या बायका तासंतास उन्हात प्रवास करून पाणी आणायला कशा जातात याची कल्पनाही करता येऊ शकत नाही.

 

draught im

 

महाराष्ट्रात असंच एक गाव आहे जिथे पाणीटंचाई, दुष्काळाची अशीच तीव्र समस्या आहे. पाणी आणण्यासाठी या गावातल्या बायकांना किती हालअपेष्टा सहन कराव्या लागतात हे पाहून या गावात लग्न करून आलेली नवी नवरी लग्न झाल्यानंतर एकदोन दिवसांतच गावातून पळून आपल्या माहेरी जाण्याच्या घटना या गावात घडत आहेत.

आपलं वैवाहिक जीवन सुखात जावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं. पण महाराष्ट्रातल्या ‘दांडीची बारी’ या गावातल्या तरुणांसाठी आता ही केवळ एक इच्छाच राहिलेली नसून जवळपास स्वप्नवत म्हणावी अशी गोष्ट झाली आहे.

कारण, गावात आलेली नवी नवरी इथली दुष्काळाची परिस्थिती पाहून एकतर घाबरून पळूनच जाते नाहीतर सुरू झालेली लग्नाची बोलणी गावाचं नाव ऐकल्याबरोबर थांबतात. काय आहे इथली एकूण परिस्थिती? जाणून घेऊ.

नाशिकपासून ९० किलोमीटरवर असलेल्या ‘सुरगणा’ या तालुक्यात ‘दांडीची बारी’ हे गाव आहे. या गावात ३०० लोक राहतात. गावातली तीव्र पाणी टंचाईची समस्या पाहून गावात आलेल्या नव्या नवऱ्या घाबरून जातात. त्यांना गावात राहावंसं वाटत नाही आणि त्या आपल्या माहेरी परततात.

 

surgana im

 

गावातली एक व्यक्ती गोविंद वाघमारे यांनी याच कारणामुळे जेमतेम दोनच दिवस एक लग्न टिकल्याची पूर्वी गावात घडलेली एक घटना सांगितली. ते म्हणाले, “२०१४ साली गावातली एक नवरी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गावातून पळून गेल्याची घटना सगळीकडे चांगलीच पसरली होती. सगळ्या बायकांच्या मागोमाग पाणी आणायला ती टेकडीखाली गेली. पण हे किती अवघड आहे हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिथेच कळशी सोडून ती आपल्या माहेरी निघून गेली.

” गोविंद वाघमारे सांगतात की २००८-०९ साली गावातली पाण्याची टंचाई बघून लग्न झालेल्या तीन बायकांना इतका धक्का बसला की लग्न झाल्यानंतरच्या काहीच दिवसांत त्यांनी गाव सोडलं. आपल्या मुलींची लग्नं गावातल्या पुरुषांशी करायला कुटुंबं आता धजावत नाहीत. वाघमारे पुढे म्हणतात, “नवरामुलगा ‘दांडीची बारी’ गावातला आहे हे एकदा त्यांना कळलं की ते लग्नाची बोलणी थांबवतात.”

 

wedding inmarathi

जगातील सगळ्यात सुंदर स्त्रिया राहतात या प्रांतात, जाणून घ्या यामागचं रहस्य

सांस्कृतिक शहरातील ‘झपाटलेली’ ठिकाणं, पुण्यातील ६ गूढ गोष्टी

पाणी आणण्यासाठी बायकांना करावा लागणरा संघर्ष :

ज्या बायका थांबतात त्यांना उन्हाळ्यात मार्च हे जून या महिन्यांमध्ये टेकडीच्या मागच्या बाजूला खाली जवळपास कोरड्या असलेल्या एका प्रवाहातून पाणी आणण्यासाठी दीड किलोमीटर चालत जावं लागतं. खडकाळ भूभागातून असं चालत गेल्यानंतरही त्यांचा त्रास संपत नाही.

खडकांच्या त्या पोकळीत पाणी भरलं जाईपर्यंत त्यांना तासन् तास वाट पाहावी लागते. त्यांचा नंबर आला की त्या आत जातात आणि वाडग्याने पाणी काढून ते आपल्या कळशीत ओततात. जेव्हा त्या खड्ड्यातलं सगळं पाणी संपतं तेव्हा पुन्हा पाणी भरलं जाईपर्यंत बायकांना वाट पहावी लागते. या बायकांकडे दोन-दोन कळश्या असतात.

 

dushkal im

 

दोन्ही कळश्या आपल्या डोक्यावर ठेवून त्या चढण चढत आपल्या गावाकडे परततात. पाणी आणण्याचं त्यांचं हे काम फार जिकिरीचं असतं. त्यांना दिवसातून दोनदा पाणी आणायला जावं लागतं. भल्या पहाटे ४ वाजता त्या पाणी आणायला बाहेर पडतात. उन्हाळ्यात इथलं तापमान ४० डिग्री सेल्सियसपर्यंत जातं. उन्हाने शरीराची लाहीलाही होण्यापूर्वी पुरेसं पाणी भरून घरी परतता यावं अशी प्रार्थना त्या करतात.

सूर्यास्तानंतर पाणी भरण्याच्या ठिकाणी त्या परत येतात. आपला नंबर यायची वाट बघत असलेल्या लक्ष्मीबाई वासळे म्हणतात, “एक कळशी भरायला तीन तास लागू शकतात आणि मग रात्रीच्या अंधारात आम्ही गावापर्यंत चालत जातो.” जंगली जनावरांपासून आपला बचाव करण्यासाठी बायका आपल्यासोबत टॉर्च घेऊन जातात किंवा शेकोटी पेटवतात. पाणी हाच इथे खजिना आहे.

 

tiger and cow inmarathi

 

उंच पायवाटेवरून चालताना बायकांना आपल्या डोक्यावर दोन हंडे आणि एका हातात टॉर्च धरावा लागतो. बायका आपापसात घरच्या, घरच्या कामांच्या, गावातल्या लोकांच्या गप्पा मारतात. या सगळ्या कठीण परिस्थितीचा सामना करायला न जमल्यामुळे ज्या नव्या नवऱ्या गावातून पळून गेल्या त्यांचाही विषय बायकांच्या गप्पांमध्ये असतो.

सरपंचांचे प्रयत्न आणि खंत :

सरपंच जयराम वाघमारे कधी कधी टँकर उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतात. त्यांनी सांगितलं की, टँकर येतो तेव्हा प्रत्येक घराला दोन बादल्या पाणी मिळतं. गावकऱ्यांची पाणी मिळवण्यासाठीची धडपड मी समजू शकतो असं ते सांगतात. ते म्हणतात, “अनेक बाबू आणि पत्रकार आम्हाला भेट देतात आणि आमच्या या व्यथेचे फोटो काढतात. मात्र कुणीही आमची मदत करत नाही.

 

water tank im

 

पिढ्यान् पिढ्या आमचं गाव दुष्काळग्रस्त आहे.” लग्नाच्या मार्केटमध्ये आपल्या गावाची अपकीर्ती झाली असल्याचं ते मान्य करतात. या सगळ्यादरम्यान, उद्याच्या पहाटेची भ्रांत दडवून डोक्यावर दोन कळश्या घेऊन परतणाऱ्या लक्ष्मीबाई म्हणाल्या, “पाणी आणण्याभोवतीच आमचं सगळं आयुष्य फिरतं. सरकार काहीतरी करेल आणि पुढच्या पिढीतल्या नववधूंना आमच्यासारख्या त्रासातून जावं लागणार नाही अशी आम्ही आशा करतो.”

ज्यांना माहेरी परतणं शक्य आहे त्या नव्या नवऱ्या माहेरी परतत असल्या तरी इतर जणींना नाईलाजाने का होईना गावातच थांबून निमूटपणे हे कष्ट सोसत जगावं लागतंय. पाणी टंचाई, दुष्काळाच्या या समस्येमुळे गावातल्या तरुणांनीही जरी गाव सोडून दुसरीकडे बिऱ्हाड थाटलं तरी मूळ समस्येवरचा हा तोडगा नक्कीच नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यात लक्ष घालून या गावाला खरोखरच ‘अच्छे दिन’ आणावेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?