' अमेरिकेच्या जन्माचा आणि हा देश घडण्याचा रंजक इतिहास – InMarathi

अमेरिकेच्या जन्माचा आणि हा देश घडण्याचा रंजक इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – तुषार दामगुडे 

===

आधुनिक जगतातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती! अमेरिकन राज्यक्रांतीचा प्रभाव जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या स्वातंत्र्य चळवळींवर पडला.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामावर देखील अमेरिकन राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव आहे.

एक राजवट जेव्हा लोकांच्या स्वातंत्र्यांवर बंधन आणते, आर्थिक, राजकीय, मानसिक शोषण करते, तेव्हा समाजातील विचारवंत त्या अन्यायाला वाचा फोडतात, समाजाला दिशा देतात व हळूहळू एक देश कसा निर्माण होतो याचे जगातील पहिले उदाहरण म्हणजे अमेरिकेची निर्मिती.

 

american-revolution-marathipizza01

 

अमेरिकन क्रांती आणि प्रत्यक्ष युद्ध अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु प्रत्यक्ष युद्ध हे अमेरिकन क्रांतीचाच एक भाग आहे.

अमेरिकन राज्यक्रांती १७६५ – १७८३ पर्यंत चालली तर १७७५ – १७८३ हा प्रत्यक्ष युध्दाचा काळ आहे. हे युद्ध घडले ते अमेरिकन राष्ट्रवादी मंडळी आणि ब्रिटिशांमधे.

तत्कालीन परिस्थितीत अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना “कॉलनीस्ट” म्हटले जात असे. तर मुळच्या आदिवासी अमेरिकन लोकांना “रेड इंडियन” म्हटले जाते.

१४९२ मध्ये कोलंबस अमेरिकेत पोहोचला आणि त्याने या जमिनीला नाव दिले “west indies”, कारण हा भारत शोधायला निघाला होता. हा स्पॅनीश होता त्यामुळे स्पॅनीश राजाने अमेरिकेत पहिली वसाहत स्थापन केली.

त्यापाठोपाठ फ्रांस व इंग्लंडने अमेरिकेत जमीनी ताब्यात घेउन आपापल्या वसाहती स्थापन केल्या. सोळावे आणि सतरावे शतक हे युरोपियन शक्तींनी वेगवेगळ्या प्रदेशात आपल्या वसाहती निर्माण करण्याचे होते.

इंग्लंडने १६०७ ते १७३२ पर्यंत तेरा वसाहती स्थापन केल्या. या सगळ्या वसाहती पुर्वीय समुद्र तटाजवळ होत्या.

त्यात न्युयॉर्क, नॉर्थ साऊथ कॅरोलीना, न्युजर्सी, कनेक्टीकट अशी शहरे येतात. स्पेनच्या जवळ दक्षिणेचा भाग होता, जो आज फ्लोरीडा व मेक्सिको म्हणुन ओळखला जातो.

तर फ्रेंचांजवळ मिसीसीपी नदिच्या लगतचा, ग्रेट लेक लगतचा बहुतांश प्रदेश ताब्यात होता. फ्रांसच्या ताब्यातील बहुतांश प्रदेशात मुलनिवासी रहात तर लुईजीयाना वगैरे समुद्र तटाजवळील भाग फ्रेंच वापरात आणत होते.

या वसाहती उभा करण्याचा हेतू वसाहतींमधील साधनसंपत्ती वापरून मूळ देशाची भरभराट हाच होता. त्यामुळे सगळी यंत्रणा शोषणावरच आधारलेली होती.

वसाहतींमधून कच्चा माल स्वस्त दरात आणायचा आणि त्यावर प्रक्रिया करुन पुन्हा वसाहतींमध्येच महाग दराने विकायचा ही निती युरोपियन व ब्रिटिशांची होती.

 

american-revolution-marathipizza02

 

अमेरिकन वसाहतींच्या शोषणाचे तीन भाग करता येतील जे बंडास कारण ठरले.

१} सामाजिक- सांस्कृतिक

२} राजकीय

३} आर्थिक

 

१) सामाजिक :

वेगवेगळ्या युरोपियन राष्ट्रांत कॅथलीक, प्रोटेस्टंट अशा वादात राजा, धर्मगुरु, सरकारी अधिकारी यांच्याकडून सांस्कृतिक शोषणाची बळी ठरलेली बरीच मंडळी अमेरिकेत पळून आली होती.

ही मंडळी येथे मुक्तपणे राहायला आली होती. या लोकांना जन्मजात हक्क घेऊन आलेल्या धर्ममार्तंडाचा धार्मिक तसेच अमीर उमरावांचा उच्च निच्चतेचा जाच अमेरिकेत देखील नकोसा होता.

 

२) राजकीय :

या कॉलनीमध्ये जे लोक निवडून येत, ते अमेरिकन कॉलनीमधून येत असले तरी या सर्वांच्या वर असणारा गवर्नर मात्र इंग्लंडमधून थेट राजाच्या नियुक्तीवर येत असे.

तसेच याला “नकाराचा म्हणजे “veto” अधिकार बहाल होता. याशिवाय कॉलनीचे भवितव्य ठरवणाऱ्या इंग्लंडच्या संसदेत कॉलनीचे प्रतिनीधीत्व करणारे कुणीही नव्हते किंवा तशी सोयच नव्हती. हे मुद्दे असंतोषात भर घालणारे होते.

 

३) आर्थिक :

यात कॉलन्यांचा व्यापार सुरुवातीला थेट इंग्लंडशी होत असला तरी तो नंतर दक्षिण व उत्तरेतील तेरा कॉलनीमध्ये आपापसात देखील होऊ लागला.

यामुळे या तेरा कॉलनीमध्ये हळूहळू एकीची भावना निर्माण झाली. कुठल्याही औद्योगिक निर्णयासाठी ब्रिटिश संसदेची किंवा अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणे वसाहतीतील लोकांना जाचक वाटू लागले.

स्वातंत्र्याच्या कल्पनेने फक्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रालाच स्पर्श न करता आर्थिक स्वातंत्र्याचे सुद्धा स्वप्न फुलवले.

 

american-revolution-marathipizza03

 

वसाहतीतील लोकांच्या असंतोषाला खतपाणी घालणारी काही आर्थिक उदाहरणे पुढीलप्रमाणे :

१) वसाहतीतून चालणारे व्यवसायिक दळणवळण फक्त ब्रिटिश जहाजांतून करण्याचा कायदा.

२) साखर, तंबाखू, कॉटन आणि इंडीगो आदी पिकांची निर्यात फक्त इंग्लंड मध्येच करण्याचा कायदा

३) वसाहतींतून चालणारा पुर्ण व्यापार फक्त इंग्लंड मार्गे करण्याचा कायदा ( वसाहत इतरांशी किंवा इतर कुणीही वसाहतीशी थेट व्यापार करू शकत नव्हते. )

या सगळ्यात असे लक्षात येते की, कच्चा माल स्वस्तात विकत घेणे आणि त्याचे पक्क्या मालात रूपांतर करुन पुन्हा वसाहतींनाच चढ्या दराने विकणे, दळणवळणाच्या माध्यमातून तसेच करांच्या रूपातून पैसा गोळा करणे, असे चारही दिशेने फक्त इंग्लंडची तिजोरी भरणारे धोरण राबवले जात होते.

कॉलनीतील व्यापारी, या जाचक धोरणांना कंटाळून स्मगलींगच्या मार्गे व्यापार करत. परंतु अठराशेच्या सुरवातीच्या काळात स्मगलींग विरोधात कडक कारवाया करण्यास ब्रिटिशांनी सुरुवात केली. म्हणून व्यापाऱ्यांमधे अस्वस्थता पसरली.

याला पार्श्वभूमी होती इंग्लंड आणि फ्रांसमध्ये सात वर्षे झालेले युध्द… ज्यात फ्रांसने उत्तर अमेरिकेतील आपल्या ताब्यातील भुभाग ब्रिटिशांना गमावला.

हे युद्ध इंग्लंडने जिंकले असले तरी ते कर्जात बुडाले व हे कर्ज फेडण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश राजा जॉर्ज तिसऱ्याने कॉलनी वर आणखी कर वाढवले.

यापैकी एक कर म्हणजे स्टँप ऍक्ट. या करानुसार कॉलनीत छापल्या जाणाऱ्या प्रत्येक कागदावर टॅक्स भरणे आवश्यक होते.

याचा विपरीत परिणाम पत्रकार, वकिल, साहित्यिक या वर्गावर झाला. वृत्तपत्रांनी सरकार विरोधी लेख लिहायला सुरुवात केली. अभिजन वर्गाने व्याख्यान, भाषणे याद्वारे आघाडी उघडली.

एकूणच क्रांतीला पोषक वातावरण निर्माण झाले. या सगळ्या अमेरिकन विचारवंतांवर प्रभाव होता “जॉन लॉक” या ब्रिटिश विचारवंताने लिहिलेल्या ” The Enlightenment” या पुस्तकाचा. या पुस्तकात राजकीय, वैचारिक, आर्थिक स्वातंत्र्य विषद करणारे विचार मांडले होते.

 

american-revolution-marathipizza04

 

वसाहतींच्या वतीने “सॅम्युएल ऍडम्स” या जहाल विचारांच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली समिती (Sons of liberty) नेमली गेली. सुरुवातीला सरकार विरोधात असहकार आंदोलन छेडले गेले.

याचा परिणाम म्हणून स्टँप एॅक्ट मागे घेतला गेला, परंतु लोकांच्या अडचणी व भावना समजून न घेतलेल्या राजाने “townshend act” नावाचा आणखी एक जुलमी कायदा वसाहतीमधे लागू केला.

या कायद्यानुसार चहा, कागद, काच, रंग अशा गरजेच्या वस्तुवर भरमसाठ कर लावला गेला. तसेच ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटल्यास कुठल्याही जहाजाची व इमारतीची तपासणी करण्याची मुभा दिली गेली.

या “townshend act” विरोधात बोस्टन येथे जे आंदोलन झाले त्यावर ब्रिटिश सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाच लोक ठार झाले. या घटनेला paul revere, samuel adams या क्रांतीकाऱ्यांनी जोरदार प्रसिद्धी दिली.

आतापर्यंत ब्रिटिश अधिपत्य मानणाऱ्या जनतेच्या मनात देखील स्वतंत्र अमेरिकेची ठिणगी पेटली. सगळी परिस्थिती पाहून, पुन्हा एकदा राजाने सगळे कर हटवून फक्त चहा वर मात्र कर तसाच ठेवला.

भारतातून येणारा चहा पिणे हे तत्कालीन युरोप अमेरिकेत व्यसन होते. वसाहतीतील लोकांना चहा वरील करामुळे सरकारचा विरोध करण्यासाठी आणखी एक निमित्त मिळाले.

इस्ट इंडिया कंपनीतून बोस्टन बंदरात आलेला दहा हजार पौंड किंमतीचा चहा सॅम्युएल ऍडम्सच्या नेतृत्वाखाली समुद्रात फेकुन दिला. हीच ती “बोस्टन टी पार्टी.”

 

american-revolution-marathipizza05

 

या नुकसानीमुळे भडकलेल्या ब्रिटिश सरकारने अमेरिकेत जमाव बंदी ,व्यापार बंदी, सॅम्युएल ऍडम्सची शरणागतीची मागणी आदी पावले उचलली. सरकारच्या या कृतीमुळे अमेरिकेत खऱ्या अर्थाने सशस्र क्रांतीला सुरुवात झाली.

तेरा कॉलनीच्या प्रतिनीधींनी एकमताने ब्रिटिश मालाची होळी, असहकार, सशस्र कारवाया आदी गोष्टींना मान्यता दिली. अमेरिकन क्रांतीकारकांनी बंडखोरांना हत्यारांचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

एप्रिल १७७५ मध्ये अमेरिकन बंडखोर विरुध्द ब्रिटिश सैनिक यांच्यातील पहिल्या युद्धाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला. याचे नेतृत्व केले जॉर्ज वॉशिंग्टन यांनी!

बंडखोरांना ग्रामीण भागातून जोरदार प्रतिसाद मिळाला, परंतु शहरांत अद्यापही ब्रिटिश सरकार समर्थक लोक होते जे बंडखोरांविरोधात होते. त्यामुळे बंडखोरांना शहरी भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी मात्र सतत संघर्ष करावा लागत होता.

या दरम्यानची महत्वाची घटना म्हणजे १७७५ च्या धामधुमीच्या दरम्यान “common sense” नावाचे सोप्या भाषेत लिहिलेले स्वातंत्र्याचे विचार व समर्थन उघड मांडणारे पत्रक खूप मोठ्या प्रमाणात वितरीत व प्रसिद्ध झाले.

हे पत्रक तेव्हा निनावी असले तरी ते विचार थॉमस पेनने मांडल्याचे पुढे उघड झाले. वसाहतीतील जनतेच्या विचार प्रणालीत या पत्रकाने आमुलाग्र बदल घडवला व सर्व स्तरावर बंडखोरांना पाठिंबा व मदत मिळू लागली.

वर्षभरात बंडखोरांनी जज, गवर्नर असे अनेक ब्रिटिश अधिकारी हटवून तेरा कॉलनीमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले व तेरा वसाहतींना आता कॉलनी ऐवजी “states” म्हणून घोषित केले.

तेरा कॉलनीच्या प्रतिनीधींनी मिळून ४ जुलै १७७६ रोजी “The Declaration Of Independence” फिलाडेल्फीया येथे जाहीर केला, हा जाहीरनामा लिहिला होता थॉमस जेफरसनने.

 

american-revolution-marathipizza06

 

या घडामोडींचा फायदा घेण्यासाठी इंग्लंड वर डुख धरून बसलेल्या फ्रांसने बंडखोरांना पैसा, सैनिक तथा शस्त्रांची मदत पुरवली. पुढे स्पेन व नेदरलँडने देखील बंडखोरांना मदत पुरवली.

१७८१ मध्ये यॉर्क टाऊन येथे ब्रिटिश विरुध्द अमेरिकन बंडखोरांची शेवटची लढाई झाली व ब्रिटिशांतर्फे पराभूत सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिसने शरणागती पत्करली.

१७८३ मध्ये अमेरिका व ब्रिटिशांमधे अधिकृतरीत्या तह झाला (paris treaty) व इंग्लंडने अमेरिकेला राष्ट्र म्हणून मान्यता दिली.

जॉन लॉक, कांत आदी विचारवंतानी पुस्तकात मांडलेल्या विचारांना परिश्रम व एकतेच्या बळावर मुर्त स्वरूप आले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?