' पेट्रोल वाचवण्याच्या, कोणालाही माहित नसलेल्या ६ भन्नाट टिप्स! – InMarathi

पेट्रोल वाचवण्याच्या, कोणालाही माहित नसलेल्या ६ भन्नाट टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पेट्रोलचे वाढणारे भाव आताशा गगनाला भिडू लागले आहेत. त्यावरून एका बाजूला तापलेलं राजकारण सुद्धा पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे सध्यातरी या पेट्रोलच्या वापराशिवाय दुसरा चांगला पर्याय दिसत नाहीये.

इलेक्ट्रिक गाड्या, हा भविष्यात इंधन दरवाढीवरील एक उत्तम पर्याय नक्कीच ठरू शकतो. मात्र सध्यातरी आपल्याकडे असणाऱ्या पेट्रोल गाड्या हाच दळणवळणाचा मुख्य पर्याय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पेट्रोलचे दर कमी करणं आपल्या हातात नसलं, तरी आपल्या गाडीचं ऍव्हरेज वाढवणं आपल्या हातात नक्कीच आहे. म्हणजेच कमी पेट्रोलमध्ये गाडी अधिक पळवणं शक्य आहे. यासाठी फक्त काही छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊन, तुमच्या गाडीची थोडी अधिक काळजी घ्यावी लागेल.

आता पैसे वाचवायचे असतील, तर हे कष्ट तर करावेच लागणार, नाही का! चला तर मग जाणून घेऊयात, अशाच काही सोप्या युक्त्या…

१. हवेचा योग्य दाब कमी करेल ताण

 

air pump im

 

गाडी चालत असताना सर्वाधिक घर्षणात असणारा गाडीचा भाग म्हणजे गाडीचे टायर्स. गाडी चालत असताना टायर आणि रस्ते यांच्यातील घर्षणाचा परिणाम गाडीच्या वेगावर आणि परिणामी इंधनाच्या वापरावर होत असतो.

चाकांमधील हवेचा दाब कमी असल्यास, अधिक पृष्ठभाग रस्त्याला घासला जातो आणि गाडीला अधिक इंधनाची गरज पडते. त्यामुळे हवेचा दाब योग्य राखणं आवश्यक ठरतं.

बहुतांश पेट्रोल पंपांवर मोफत हवा भरून दिली जाते. अशी मोफत हवा भरणं शक्य नसेल, तरी हवेसाठी १०-२० रुपये खर्च करणं, त्याहून अधिक किंमतीचा इंधन वाचवण्यासाठी उपयोगी ठरेल हे नक्की!

२. वेग फार जास्त नको, आणि फार कमी सुद्धा नको!

 

car clutch inmarathi

 

गाडीचा वेग आणि तुम्हाला मिळणारं ऍव्हरेज यांचा फार मोठा संबंध असतो. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. मात्र केवळ वेगात गाडी चालवल्यामुळेच अधिक इंधन लागतं असं तुम्ही समजत असाल, तर हा गैरसमज दूर करण्याची हीच वेळ आहे.

गाडीच्या वेगाने शंभरी गाठली, की इंधनाच्या वापरात जवळपास १० टक्क्यांनी वाढ होते. हाच वेग आणखी वाढत गेला तर इंधनाचा वापर २५% किंवा त्याहून अधिक वाढू शकतो.

तुम्ही गाडी कमी वेगाने चालवत असाल, त्यावेळी गाडी छोट्या गियरमध्ये असते. परिणामी त्यासाठी अधिक इंधनाचा वापर केला जातो.

हायवेला असताना साधारणपणे ५० किमी प्रतितास याहून कमी वेगाने गाडी चालवताना अधिक इंधनाचा वापर होतो. म्हणजेच ५० ते ९० कमी प्रतितास हा वाहनाचा योग्य वेग ठरेल असं म्हणता येईल.

३. गाडीतील सामानाचं वजन

सहकुटुंब किंवा मित्रमंडळींसह कुठे फिरायला जायचं म्हटलं, की थोडं थोडं करत सामानाचं वजन कधी वाढत जातं ते लक्षातच येत नाही.

गाडीत वाढणारं सामानाचं वजन इंधनाचा वापर सुद्धा अधिक वाढवणार आहे. त्यामुळेच जेवढं सामानाचं वजन वाढलं तेवढी तुमच्या इंधनाची बचत कमी झाली, हेही लक्षात असू द्या.

४. अधिक वेगाने गाडी चालवताना एसीचा वापर

 

car ac im

 

वेगाने गाडी चालवत असताना गाडीच्या काचा उघड्या ठेवणं, तुमचं अधिक इंधन जाळणारं ठरू शकतं. ८० किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक वेगाने गाडी चालवत असाल, तर वेगाने गाडीत शिरणाऱ्या हवेमुळे गाडीला मोठ्या प्रमाणावर हवेचा प्रतिरोध होतो.

अशावेळी एसीचा वापर करत असाल, आणि गाडीच्या काचा बंद असतील तर तुमच्या इंधनाची बचत होण्याची शक्यता अधिक असते.

५. ऍक्सिलरेशन थोडं दमाने

गाडीचा वेग वाढवण्यासाठी ऍक्सिलरेशन करत असताना अधिक इंधनाचा वापर केला जातो. तुम्ही गाडी जितकी अधिक ऍक्सिलरेट कराल तेवढा पेट्रोलचा अधिक वापर होईल. त्यामुळे गरज नसताना वेग वाढवणं खिसा हलकं करणारं ठरेल.

गाडी पूर्ण थांबली असेल तर तिचा वेग शून्यापासून २० किमी प्रतितास नेण्यासाठी साधारणपणे ५ सेकंद लागावीत इतक्याच वेगाने गाडी ऍक्सिलरेट करा.

६. ट्रॅफिकचा योय अंदाज घेणं

 

pune traffic inmarathi

 

आता तुम्ही म्हणाल, “ट्रॅफिकचा अंदाज घेतल्याशिवाय थोडीच गाडी चालवली जाते. काहीही सांगताय राव!” पण मंडळी गाडी चालवताना ट्रॅफिकचा अंदाज घेणं आणि इंधन बचतीसाठी अंदाज घेणं, यात थोडासा फरक आहे.

तुमच्या पुढे असणाऱ्या गाडीपासून अंतर राखणं, इतर वाहनचालक आणि पादचारी नेमकं काय करत आहेत यावर बारीक नजर ठेवणं, यामुळे ब्रेकचा वापर कमी केला जाऊ शकतो.

असं केल्यास इंधनाची बचत होते. याशिवाय वाहनाचा कमी झालेला वेग पुन्हा वाढवण्यासाठी लागणारं इंधन सुद्धा वाचतं.

७. ब्रेकचा वापर थोडा प्रेमानं

ब्रेक पॅडलचा वापर करताना काळजी घेतली नाही, तरी इंधनाच्या वापरावर परिणाम होतो. अधिक ताकदीने किंवा जोर लावून ब्रेक पॅडलचा वापर केल्यास, म्हणजेच करकचून ब्रेक लावल्यास त्याचा गाडीच्या ऍव्हरेजवर विपरीत परिणाम होतो.

८. योग्य मार्गाची आणि वेळेची निवड

 

google maps inmarathi2

 

गाडी सतत बंद चालू करणं, अथवा सातत्याने थांबणं आणि पुन्हा पुढे जाणं अशाप्रकारच्या ड्रायविंगमुळे गाडीचं ऍव्हरेज मोठ्या प्रमाणावर कमी होतं.

रहदारी फार मोठ्या प्रमाणात असलेल्या मार्गावर किंवा अशा वेळात प्रवास करत असाल, तर या समस्येचा सामना नक्कीच करावा लागेल. त्यामुळे असा मार्ग आणि फार गर्दीची वेळ टाळू शकलात तर उत्तमच!

९. एकाच जागी उभं राहणार असाल तर….

तीन मिनिटं किंवा त्याहून अधिक काळ एकाच जागी उभं राहणं आणि त्यावेळी गाडीचं इंजिन सुरु असणं हा इंधनाचा सर्वात मोठा अपव्यय मानला पाहिजे. गाडीच्या ऍव्हरेजवर याने फरक पडत नसला, तरी गरज नसताना जळलेल्या इंधनामुळे तुमचं बजेट बिघडेल हे मात्र नक्की!

काहींना गाडी एका ठिकाणी उभी असताना एसी सुरु करून ठेवायला आवडतं. ही सवय मोडलीत, तरीही इंधनावरील खर्चात बरीच कपात करता येणं शक्य आहे.

१०. फुल टॅंक आणि पेट्रोल रिफिलिंग

 

petrol pump featured inmarathi

 

गाडीचा नियमित वापर होत असेल, तर गाडीचा टॅंक फुल करून घेणं फायदेशीर ठरतं. ज्यामुळे सतत पेट्रोल भरायला जाण्यासाठी लागणारा वेळ आणि इंधन या दोन्हीची बचत होते. तुमच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर पेट्रोल पंप असेल, तरीही हा प्रयोग नक्की करून पहा.

याशिवाय एकदा गाडीचा टॅंक फुल केल्यानंतर साधारण किती काळाने पुन्हा पेट्रोल भरण्याची गरज पडते याकडे सातत्याने लक्ष ठेवा. हा कालावधी अचानक कमी झाला असेल, तर इंधन अधिक जळतंय हे लक्षात येईल आणि त्यानुसार उपाय करणं शक्य होईल.

एवढंच नाही, तर हा कालावधी तुमच्या अपेक्षेहून कमी असेल, तर गरज नसलेल्या ठिकाणी गाडीचा वापर होतोय हे लक्षात येईल आणि हा वापर कमी करून इंधन बचत करता येईल.

११. नियमित सर्व्हिसिंग

गाडीचं इंजिन चांगल्या पद्धतीने काम करत असेल, तर कमीतकमी इंधनाचा वापर करून अधिकाधिक उत्तम परफॉर्मन्स मिळणं शक्य असतं.

नियमितपणे गाडीचं सर्व्हिसिंग करणं तुमच्या गाडीचं ऍव्हरेज वाढवण्यासाठी आवश्यक आहे. ते पैसे वाचवण्याच्या नादात गगनाला भिडणाऱ्या पेट्रोलचा अपव्यय करून अधिक पैसा खर्च होणार नाही, याची काळजी नक्की घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?