' मार्केटमध्ये राकेश जोशीच्या अंगलटीस आलेल्या चुका; महत्वाचे ६ कानमंत्र!

मार्केटमध्ये राकेश जोशीच्या अंगलटीस आलेल्या चुका; महत्वाचे ६ कानमंत्र!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : नितीन धर्मावत

===

स्टॉक मार्केटच्या क्षेत्रात नशिबाची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरते, मात्र नशिबावर अवलंबून राहून चालत नाही. या विषयात तुम्हाला संयम आणि शिस्त या दोन्ही गोष्टींची गरज भासते.

एखादा स्टॉक विकत घेणं सोपं आहे, मात्र तो काही काळ स्वतःजवळ ठेवणं नक्कीच कठीण आहे. माणसाच्या वागणुकीचा, दृष्टिकोनाचा इथे मोठ्या प्रमाणावर कस लागतो.
आपण एखादा स्टॉक खरेदी केला, ज्याची किंमत त्यानंतर वाढतेच आहे आणि चांगला नफा मिळवून आपण हा स्टॉक विकला अशा घटना वारंवार घडत नाहीत. केवळ काही प्रसंगीच घडतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखादी व्यक्ती तुम्हाला असं सांगत असेल, की असा नफा त्या व्यक्तीला वारंवार मिळतो, तर ती व्यक्ती एक तर देव असू शकते किंवा खोटारडी!

काही लोक मार्केटमध्ये धाडसी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे त्यांना ‘ऍड्रेनॅलीन रश’चा अनुभव घेता येतो. तुम्ही आगीत पेटले आहात, किंवा हवेत उडत आहात अशी निराळी भावना यावेळी अनुभवता येते.

 

 

अर्थात हवेतून जमिनीवर आदळायला किंवा आगीत होरपळून जायला फार वेळ लागत नाही. अशा मानवी चुका, स्टॉक मार्केटमधील प्रवास अचानक आणि कायमचा संपवू शकतात.

माझा एक माजी सहकारी राकेश जोशी (नाव बदलले आहे) याची कहाणी मी आज सांगणार आहे. एका पुराणमतवादी महाराष्ट्रीय कुटुंबाचा सदस्य असणारा राकेश, एक इंजिनियर होता. तो हुशार होता आणि काम सुद्धा अतिशय उत्तमरीत्या करत होता. त्याच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याने कधी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली नव्हती.

२००४ ची गोष्ट आहे. तो त्याच्या ऐन तिशीत होता. २००३ च्या एप्रिल महिन्यापासून सेन्सेक्सने वेगाने उसळी घेण्यास सुरुवात केली होती. वर्षभरातच शंभर टक्के वाढ पाहायला मिळाली होती. या घटनेमुळे प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळत होता.

गुंतवणूकदारांची श्रीमंती, समृद्धी यात कशी वृद्धी होत आहे, याचीच सर्वत्र चर्चा होती. याच काळात राकेश मार्केटकडे आकर्षित झाला. त्याने छोट्या प्रमाणात गुंतवणूक सुरु केली आणि त्याची छोटी मात्र चांगली कमाई सुरु झाली. त्याचा आत्मविश्वास सुद्धा वाढला. यादरम्यानच त्याला स्टॉक शॉर्टींगविषयी कळलं.

स्टॉक शॉर्टींग म्हणजे काय?

स्टॉक शॉर्ट करणं म्हणजे असा स्टॉक विकणं, जो तुमच्याकडे सध्या नाही, मात्र तो तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू इच्छित आहात.

 

stock shorting IM

 

समजा ABC हा स्टॉक १० रुपयांना विकला जातोय. तुम्हाला असं वाटतंय की हाच स्टॉक आज १०० रुपयांहून कमी किंमतीला विकला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमच्याकडे नसताना हा स्टॉक १०० रुपयांना विकलात. त्यानंतर ज्यावेळी त्याच स्टॉकची किंमत ९० रुपये झाली, त्यावेळी तुम्ही तो त्या किंमतीला खरेदी केलात. म्हणजेच तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये तो स्टॉक नसतानाही तुम्ही १० रुपये कमाई केलीत. अर्थात, ही सगळी प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणं गरजेचं आहे.

हे पैसे कमावण्याचं एक फार सोपं साधन वाटतं. मात्र यातील जोखीम समजून घेतलीत, तर हे फारसं सोपं नाही हे लक्षात येईल. ज्यांना स्टॉकमार्केट बद्दल फार माहिती नाही, किंवा या क्षेत्रात ते नवीन आहेत, अशा लोकांना ही बाब अजब वाटणार यात शंका नाही. जे त्याच्याकडे/तिच्याकडे नाही, ते विकलं कसं जाऊ शकतं?

मात्र स्टॉकमार्केटमध्ये हे कायदेशीर आहे आणि असं करण्याची परवानगी असते. जर एखादा स्टॉक फारच अस्थिर असेल, तर काही गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स स्टॉक नसताना विकणं आणि त्यातून कमाई करण्याची अपेक्षा ठेऊ शकतात. जास्त किंमतीला स्टॉक विकून नंतर कमी किंमतीत तोच स्टॉक उपलब्ध झाल्यास खरेदी करून अशी कमाई ते करू शकतात.

राकेशला त्याच्या ब्रोकरकडून शॉर्टींग विषयी माहिती मिळाली. एखादं लहान मूळ ज्याप्रमाणे नव्या खेळण्याकडे आकर्षित होईल, त्याप्रमाणे तो आकर्षित झाला. सुरुवातीला त्याने कागदावर मांडून ही गोष्ट करण्यास सुरुवात केली. म्हणजेच तो थेट मार्केटमध्ये शॉर्टींग करत नव्हता. कागदावर मांडून शॉर्टींग करत असल्यामुळे कुठलेही आर्थिक दायित्व नव्हते.

त्याचे हे काम तो फारच उत्तमरित्या करत होता. कुठलेही रीतसर प्रशिक्षण किंवा आकलन नसताना सुद्धा त्याने मार्केटमध्ये चांगल्या योजना आणि डावपेच रचले. त्याच्या या योजना यशस्वी ठरत होत्या. कागदावर सुरु असलेल्या शॉर्टींगमध्ये तो चांगली कमाई करत होता.

एक दिवस त्याने खरोखर स्टॉक शॉर्ट करण्याचा निर्णय घेतला. कागदावरील नफा प्रत्यक्षात मिळवण्याचं ठरवलं. श्रीराम इंडस्ट्रियल एंटरप्रायझेस लिमिटेड हा स्टॉक यासाठी त्याने निवडला. मात्र या कंपनीविषयी त्याला काहीच ठाऊक नव्हतं. ही कंपनी नेमकं काय करते, त्यांचा महसूल किती, नफा किती, कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे, याबद्दल तो अनभिज्ञ होता.

 

company IM

 

काही दिवस या स्टॉकची चढउतार, त्याची किंमत याकडे तो लक्ष ठेऊन होता. म्हणूनच या स्टॉकमधून पैसे कमावण्याचा निर्णय घेऊन त्याने स्टॉक शॉर्ट केला. मात्र त्याच्या अभ्यासात कुठेही तांत्रिक बाबींचा समावेश नव्हता.

त्यानंतर काय घडलं?

त्याच्या अपेक्षेप्रमाणे स्टॉकची किंमत कमी झाली. त्याने एका दिवसात ‘इंट्रा डे’ ट्रेडिंगच्या माध्यमातून २२०० रुपयांची कमाई केली. यामुळे त्याचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर वाढला. काही दिवसांनी पुन्हा एकदा स्टॉक शॉर्टींग करून त्याने ३००० रुपयांची कमाई केली.

ही जलदगतीने सुरु असणारी कमाई पुढे काही दिवस सुरूच राहिली आणि त्याला १०००० रुपयांची कमाई केली. यादरम्यान छोट्या प्रमाणात झालेले तोटे सुद्धा त्याने अनुभवले. मात्र एकूण सौद्याचा विचार करता त्याला तो फारच किफायतशीर आणि फायदेशीर ठरला. त्याच्याकरिता ते सहज पैसा मिळवण्याचं साधन ठरलं.

त्याची ही नवी आवड त्याने माझ्यासह आणि इतरही काही सहकाऱ्यांशी शेअर केली. त्याच्या योजना त्याने सांगितल्या. स्टॉकची किंमत त्यात होणारे दिवसातील चढउतार पाहून त्याची किंमत कमी होणार की नाही, हे ओळखणं कसं शक्य आहे याविषयी सुद्धा त्याने चर्चा केली. त्याचे निर्णय वेळोवेळी योग्य ठरत होते. सगळ्यांसाठी तो आता एक हिरो ठरू लागला होता.

मी त्याला धोक्याची सूचना दिली. ही गोष्ट थांबवण्याचा सल्लाही दिला. भूतकाळात अचानक कोसळणारं मार्केट मी पाहिलं होतं. मात्र काही गोष्टी शिकवल्या जाऊ शकत नाहीत. त्या अनुभावातूनच शिकता येतात.

 

share market down IM

 

‘कधीही नाही म्हणायचं नाही’ हा आत्मविश्वास प्राप्त केल्यामुळे, तो धाडसी झाला होता. एक दिवस त्याने मोठ्या संख्येने स्टॉकचं शॉर्टींग केलं. स्टॉकची किंमत कमी झाली नाही, तर उद्भवू शकणारी परिस्थिती त्याच्या क्षमतेपलीकडे जाऊ शकत होती. प्रत्यक्षात मात्र, त्याने स्टॉक शॉर्ट केल्यानंतर किंमत कमी होऊ लागली. त्याला चांगला नफा मिळण्याची चिन्हं दिसत होती.

दुपारी १२.४५ च्या सुमारास ब्रोकरने त्याला फोन केला. स्टॉक विकत घेऊन नफा निश्चित करायला सांगितलं. त्याने याला नकार दिला. तुम्हाला अपेक्षा नसते, त्याचवेळी फार भीषण स्थिती उद्भवते. त्याचं म्हणणं होतं की स्टॉक फक्त ७% कमी झाला आहे, आणि तो २० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा त्याला आहे. म्हणजेच अधिक नफा होणं शक्य आहे.

हे बोलणं झाल्यावर तो जेवायला निघून गेला. स्मार्टफोन्स सर्वसाधारणपणे वापरले जाण्याच्या आधीच तो काळ होता. डेस्कटॉप/लॅपटॉपचा वापर करून किंवा ब्रोकरकडूनच स्टॉकची किंमत जाणून घेणं शक्य होतं. तो जेवण संपवून परत आला तोवर स्टॉकची किंमत चक्क अप्पर सर्किटमध्ये जाऊन २० टक्क्यांनी वाढली होती.

आता तो एका अशा पेचप्रसंगात सापडला होता, ज्यातून बाहेर पडणं अशक्य होतं. त्याच्याकडे डिलिव्हरी देण्यासाठी स्टॉकही नव्हता आणि तोटा भरून काढण्यासाठी गरजेची असणारी रक्कम सुद्धा नव्हती.

याचा मोबदला म्हणून स्टॉक डिलिव्हरी गरजेची होती. मात्र त्याने स्टॉक शॉर्ट केलेला असल्यामुळे त्याच्याकडे तो अस्तित्वातच नव्हता. याचा परिणाम म्हणून या देवाणघेवाणीत लिलावाचा प्रवेश झाला. या लिलावात स्टॉक ओपन मार्केटमध्ये विकत घेतला जातो. मात्र त्यासाठी जी काही रक्कम पदरात पडेल ती स्वीकारावी लागते.

दुर्दैवाने पुढील दोन दिवस हा स्टॉक अप्पर सर्किटमध्येच राहिला. त्यामुळे त्याला प्रत्येकवेळी कमाल रक्कम देऊन हा स्टॉक विकत घेणं भाग पडलं. एवढंच नाही, तर या स्टॉक खरेदीच्या मोबदल्यात त्याला दंडदेखील भरावा लागला.

त्यादिवशीचं जेवण त्याला फारच महागात पडलं; थोडथोडकं नव्हे तर तब्बल २.५ लाख रुपयांना! मागील अनेक दिवसांमध्ये त्याने केलेल्या कमाईपेक्षा काही पट अधिक तोटा त्याने त्या एका दिवसात सहन केला. या व्यवहारात त्याला केवळ आर्थिक फटका बसला नाही. त्याची झोपही उडाली. याविषयी पत्नीला सांगण्याचं धाडस त्याच्याकडे नव्हतं. तो मोठ्या तणावाखाली वावरत होता.

 

share market loss IM

 

ही किंमत भरण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्याला त्याच्या डिमॅट अकाउंटमध्ये त्याच्याकडे उपलब्ध असलेले स्टॉक, पडतील त्या किंमतीला विकण्यावाचून दुसरा कुठलाही पर्याय त्याच्याकडे नव्हता. म्हणजेच त्या दुपारच्या जेवणाची किंमत फक्त अडीच लाख रुपये नाही, तर त्याहून अधिक जास्त ठरली.

ही किंमत सुद्धा कमी की काय, म्हणून त्याला याहून मोठी किंमत मोजावी लागली. हा सर्वात मोठा फटका म्हणजे, त्याने स्टॉक मार्केटपासून स्वतःला कायमचं दूर करून घेतलं. पुन्हा एकदा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचं धैर्य तो पुन्हा कधीही गोळा करू शकला नाही.

यातून आपण काय शिकलं पाहिजे? / यातून आपल्याला काय धडे घेता येतील?

१. स्टॉक मार्केट हा सहज पैसे कमावण्याचा मार्ग नाही. यासाठी योग्य कौशल्य, संयम आणि मनावर, वागण्यावर योग्य नियंत्रण असण्याची आवश्यकता आहे.

२. मार्केटमध्ये करत असलेल्या प्रत्येक व्यवहाराचा धोका आधी जाणून घेणं आवश्यक आहे. उत्तम मोबदला आणि धोका एकाच पानावर आहेत का? याचा विचार व्हायला हवा. याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे त्यातून मिळणारा मोबदला अधिक आहे की त्या व्यवहाराचा धोका अधिक आहे. या गोष्टी जाणून घेतल्या, तर आपण चुकीचं पाऊल उचलणार नाही.

३. कौशल्य सतत वाढत राहायला हवं. स्वैर स्वच्छंदी वागणं टाळायला हवं.

४. वाजवी किंमतीत घेतलेले, योग्य कंपन्यांचे स्टॉक्स, योग्य व्यवस्थापन करून, योग्य वेळी वेळी विकले गेले, तर स्टॉक मार्केटमधून चांगला मोबदला मिळू शकतो. मात्र हे घडण्यासाठी मोठा कालावधी लागतो.

५. तुम्हाला स्टॉक मार्केटबद्दल पुरेशी माहिती नसेल, तर त्या क्षेत्रातील जाणकार प्रोफेशनल व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यायला हवं. अथवा म्युच्युअल फंडस्, इंडेक्स फंडस् अशा पर्यायांची गुंतवणुकीसाठी निवड करायला हवी.

 

investment advice IM

 

६. कायम विनम्र राहणं, आपल्या कौशल्यासह नशिबाला सुद्धा योग्य श्रेय देणं आवश्यक आहे. असं न घडल्यास तुमची स्टॉक मार्केटमध्ये तुमची फजिती होणं अगदी सहजशक्य आहे. त्याला फार वेळ लागणार नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?