' 'वाढती मुस्लिम लोकसंख्या आणि हिंदू वास्तव'

‘वाढती मुस्लिम लोकसंख्या आणि हिंदू वास्तव’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : सौरभ गणपत्ये

===

मुस्लिम धर्मियांची वाढती लोकसंख्या हा हिंदुत्ववाद्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

२०६० साली ह्या देशात मुसलमान बहुसंख्यांक होण्याचा धोका अनेक लोकांना भेडसावत असतो. त्यातूनच स्त्रियांनी १० किंवा अधिकाधिक मुले जन्माला घालावीत असा विनोदी प्रस्ताव मान्यवरांकडून येत असतो.

सर्वाधिक विनोदी प्रकार घडतो ते धार्मिक मुखंडांकडून हिंदूंची लोकसंख्या वाढवण्याच्या गोष्टी येतात तेंव्हा. शंकराचार्य असोत किंवा कोणीतरी साध्वी वगैरे लोक, ह्यांनी स्वतः लग्न कधीही केलेली नसतात.

भिन्न लिंगी व्यक्तीशी संसार, त्या व्यक्तीचं मन शरीर आणि आत्मा समजून घेणे, व्यक्तीशी आलेले शरीर संबंध पुढे गर्भधारणा आणि त्यातून त्या व्यक्तीचा आईपणाचा प्रवास हा तर सहजीवनातला पहिला टप्पा असतो. ही वर उल्लेखिलेली भगवी मंडळी त्यापासून अनभिज्ञ असतात.

 

hindu final im

 

पुढचा टप्पा सुरु होतो तो मुलं वाढवण्याचा. सहा ते सात वर्षांपर्यत रोजची मुलांची साफसफाई त्यांचं खाणं पिणं, पुढे त्यांचे अभ्यास आणि इतर करियर ह्यात आईवडील रीतसर म्हातारे होऊन गेलेले आढळतात. अर्थात तो जगाचा दस्तूर झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ह्याच जोडीला शहरी भागांमध्ये असलेली जीवघेणी महागाई जीव घेऊन टाकते. घराच्या किमती गगनाला भिडलेल्या, डोक्यावर बँकांचे कर्ज, त्याचे हफ्ते संपण्यात माणसाचं आयुष्य जात असतं. त्याउपर आजकाल महाग झालेली शिक्षणव्यवस्था आणि एकूणच जगणं यातून ‘हम दो हमारा एक’ च्या पलीकडे पालक जात नाहीत. दुसरं मूल जन्माला सोडा डोक्यातही येत नसतं.

अश्या पार्श्वभूमीवर हिंदूंची संख्या वाढवायची असेल तर दहा मुलं चार मुलं जन्माला घाला वगैरे बरळणारे लोक दुर्लक्षच करायच्या लायकीचे असतात. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लोकसंख्या आणि प्रगती यांचा संबंध असता तर महाराष्ट्रात ब्राह्मण समाज सर्वात दरिद्री राहिला असता. आणि जगभरात ज्यू समाज सर्वात मागास, किंवा एव्हाना संपून गेला असता.

इस्रायल, ज्यू आणि त्या अनुषंगाने अमेरिका या विषयाचा जरा जरी कोणी अभ्यास केला तर हादरून जायला होईल. या ज्यू समाजाचं अमेरिकेत लोकसंख्या प्रमाण दोन टक्के आहे.

 

jews IM

 

तरीही भविष्यात हिंदूंचा नायनाट करू शकेल खरा मसला पुढेच आहे आणि एकही हिंदुत्ववादी अजून त्याला भिडायची हिंमत दाखवू शकलेला नाही.

भारतातल्या मुलींच्या जन्माचा दर गेल्या दीड दशकात लक्षणीय रित्या खाली घसरला आहे ह्यावर कोणी हिंदुत्वावाद्याने कधी आवाज उठवलाय?

मुलगी जन्माला येते तेंव्हा काय घडतं ते कोणाच्याही गावी नसण्याचा हा परिणाम आहे. मुलगी किंवा महिला हा घटक इकडे ‘मादी’ म्हणून घ्यायला हरकत नाही. एखाद्या प्राणिजातीचे नर आणि मादी एकत्र येतात तेंव्हा त्या जातीतला नवीन प्राणी जन्माला घालण्याचं काम कोण करत असतं? समजा एखाद्या जातीतल्या प्राण्यांमध्ये पन्नास टक्के नर जन्माला आले आणि पन्नास टक्के माद्या जन्माला आल्या तर त्या प्राण्याची संख्या कितीने वाढेल? आणि जर समजा फक्त २५ टक्के नर जगले आणि ७५ टक्के माद्या जन्माला शिल्लक राहिले आणि जर नरांना प्रत्येकी तीन माद्यांशी संभोग करण्याची परवानगी मिळाली (जी प्राण्यांमध्ये असतेच, नर हा मुळातच बहुपत्नीक असतो) तर लोकसंख्या कितीने वाढेल?

पूर्वी भारतपूरवगैरे जागी राजे महाराजे शिकारीचा खेळ आयोजित करत. आफ्रिकेतून चित्ते मागवले जात. त्याना व्यवस्थित ट्रेन केले जाई. ते करताना अंगावर काळा कपडा पांघरून ट्रेनर धावत सुटे आणि चित्ता त्याच्या मागे धावत असे. असं का?

माळरानावर काळवीट असायचे. फक्त नर काळवीट काळा असतो. मादा हरीण भुरकट असते. चित्त्याने बरोब्बर नर काळवीट धरावा अश्या उद्देशाने त्याला असे ट्रेन केले जाई. काळविटांच्या कळपातून चित्ता नेमका नर काळवीट हेरत असे आणि शिकार करत असे.

नरच का?

कारण एक नर अनेक माद्यांना अनेकवेळा गर्भदान करू शकतो. पण एक मादा मेली तर तिच्यासोबत पुढच्या सगळ्या पिढ्या खतम होतात. झुंज देखील कोंबडा, बोकड, रेडा इत्यादींची घडवतात ते ह्यामुळे. मासेमारीसुद्धा मार्च ते जुलै महिन्यात बंद असते कारण तो प्रजननाचा काळ असतो. तोच जर होऊ दिला नाही तर पुढे मासे राहणार नाहीत.

 

fish mating IM

 

याचाच अर्थ निव्वळ समाजनिर्मिती, निसर्गनिर्मिती आणि सृष्टीचा निर्माण ह्या घटकांना विचारात घेतलं तर मादी ही नरापेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ आहे. त्यामुळे स्त्री ही किती श्रेष्ठ आहे याचा उलगडा होऊ शकेल.

भारतात या आघाडीवर काय चित्र आहे? आऊटलूक या मासिकाने ‘मिसिंग द गर्ल चाईल्ड’ या नावाचा एक दीर्घलेख दीड दशकभरापूर्वी प्रसिद्ध केला होता. उत्तर भारतातल्या अनेक गावांमध्ये मुलगी जन्माला येणं जवळपास थांबलंय अश्या स्वरूपाचा तो लेख होता.

वानगीदाखल अनेक गावांचं सर्वेक्षणही त्यात मांडलं होतं. पुराणातली वानगी पुराणात असं मानलं तर काय अवस्था आहे? २०२१ च्या जनगणनेनुसार हरयाणामध्ये १००० मुलांच्या मागे 893 मुली जन्माला येतात. पंजाबमध्ये हे प्रमाण ९०४ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये १००० मुलांमागे हे प्रमाण ९३७ आहे तर फुले शाहू आंबेडकरांच्या प्रगत महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण आहे ९२०.

राजस्थानात हे प्रमाण आहे ८९१ तर उत्तरप्रदेश यात महाराष्ट्रापेक्षा काकणभर सरस म्हणजे ९४१ वर आहे. उत्तराखंडमध्ये हे प्रमाण आहे ९८४ आणि मध्यप्रदेशात आहे ९५६. म्हणजेच प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरातने काय करून दाखवलंय हे लक्षात येईल.

आजही ‘नकोशी’ सारख्या योजना किंवा सेल्फी विथ डॉटर अथवा बेटी बचाओ बेटी पढाओ सारखे कार्यक्रम घ्यावे लागतात म्हणजे हा प्रश्न उग्र झालाय.

beti bachao beti padhao IM

 

आता हिंदुत्ववाद्यांना काळजी असण्याऱ्या हिंदूंच्या संख्येबद्दल. हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तराखंड हे काही मुस्लिमबहुल वगैरे प्रांत नाहीत. या भागांमध्ये असणारी मुलींच्या जन्मदराची समस्या ही हिंदू बांधवांची समस्या आहे. या लेखात स्त्रियांना मादी गृहीत धरून जे कथन केलंय ते या भागातल्या हिंदूंना लागू होत नाही का

हरयाणासारख्या राज्यात अनेक ठिकाणी लग्नाला मुली नाहीत हा प्रकार घडतो आहे. थोडक्यात कमी मुली म्हणजे कमी लोकसंख्या वाढ हे सत्य आहे. कोणत्या हिंदुत्ववाद्याने या सिद्धांताला अनुसरून आवाज उठवलाय? अधिकाधिक मुले जन्माला घाला सांगताना जन्माला येणाऱ्या बाळाला लिंग आहे की योनी हा मुद्दाच दखलपात्र नाही का?

या घटत्या जन्मदराचं प्रमुख कारण असतं हुंडा. लग्नानंतर भरमसाठ हुंडा द्यावा लागेल आणि लग्नानंतर मुलीला नोकरी करता आणि नाही तर तिच्या शिक्षणावरचा खर्च पाण्यात जाईल ह्या प्रमुख भीतीमुळे मुलगी नकोशी असते.

पुढे समाजातर्फे चालणारं राजरोस शारीरिक शोषण अक्राळविक्राळ असतंच. एकूणच मुलगी म्हणजे कमजोरी आणि जबाबदारी हा दृष्टिकोन असतो.

 

girl IM

 

वंश टिकवणं हा अजून एक भाग इकडे असतो. आपल्या खापरपणजोबाचं नाव माहित नसणाऱ्या अनेकांना अजबपणे आपला वंश पुढे सरकावासा वाटत असतो. त्यापायी स्त्रीला जन्माला येण्याआधी किंवा जन्माला आल्याआल्या मारून टाकलं जातं.

भारतात बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी एक हैवान डॉक्टर स्त्री अर्भक मारून कुत्र्यांना खायला घालायचा. अधिकृतरित्या बंदी असलेल्या या देशात अनेक गोष्टी चालतात. इकडे नाही तर खिशात पैसे खुळखुळणारे लोक शेजारच्या देशात हे करू शकतात.

हिंदू समाजाचे जर कोणी सर्वात मोठे शत्रू असतील तर हेच आहेत. कारण एका हिंदू स्त्रीभ्रूणहत्येमुळे केवळ एक हिंदू अर्भक किंवा हिंदू व्यक्ती कमी कमी होत नसते, तर त्यातून पुढे तिने भविष्यात जन्माला घालू पाहत असलेल्या हिंदूचाही काटा काढला जात असतो.

आजच्या घडीला १००० ला ९०० स्त्रियांचा प्रश्न कोणालाही उग्र वाटत नसेल. पण याचाच अर्थ वीस कोटी मुले जन्माला येण्यामागे १८ कोटी महिला कमी जन्माला येतात म्हणजेच दोन कोटी महिला जन्माला कमी येतात. आपोआप भविष्यात तेवढेच हिंदू कमी जन्माला येणार.

पण इतकं लॉजिक वापरलं जाण्यापेक्षा चार मुलं जन्माला घाला हे सांगणं सोपं पडतं. १००० हिंदू मुली एक हजार हिंदू जन्माला घालतील ह्या लॉजिकपेक्षा उर्वरित मुलींनी अधिकाधिक मुलं जन्माला घालणं सोयीचं पडतं. स्त्रियांची योनी म्हणजे जादूगाराच्या खेळातली टोपीच समजायची असेल तर प्रश्नच मिटतो.

 

indian women IM

 

आणि हिंदू स्त्रियांनी अधिकाधिक मुलं जन्माला घालण्यापेक्षा अधिकाधिक स्त्रिया जन्माला आल्यास हा भर हलका होईल हे कोणी म्हटलं की अश्या माणसाला पुरोगामी समाजवादी हिंदूद्वेष्टा म्हणणं हीच अनेकांसाठी खरी धर्माची सेवा असते.

जाता जाता एक. ज्या ठिकाणी पुरुष आणि स्त्री जन्माचं लिंग गुणोत्तर व्यस्त आहे, तिकडे अर्थातच स्त्रीभ्रूणहत्या प्रमाण अधिक आहे. नेमका तिकडूनच ‘ ‘हिंदू वाचवायचा असेल तर अधिकाधिक मुलांचा’ रेटा लावला जातो. धर्म मला वाढावासा वाटतोय पण मुलगी मात्र नकोय ही दांभिकता जागोजागी दिसते.

ता. क. हा सगळा माहिती प्रवाह pib वरून घेतला आहे. आणि हे नमूद करायला हवं की गेल्या पाच आकडे खरंच सुधारले आहेत. म्हणजेच आधीची परिस्थिती किती वाईट होती हे दिसून येतं.

दुसरी महत्वाची गोष्ट, हा संपूर्ण लेख म्हणजे शास्त्रीय माहिती न वाटता स्त्रियांचा अपमान वगैरे वाटेल त्यांना चार आठ दहा मुलं जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य कायद्याने सध्यातरी आहेच.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 32 posts and counting.See all posts by sourabh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?