' चौथ्या मजल्यावरून पडली, पाय मोडले, पण हिंमत तशीच राहिली; जबरदस्त प्रेरणादायी गोष्ट – InMarathi

चौथ्या मजल्यावरून पडली, पाय मोडले, पण हिंमत तशीच राहिली; जबरदस्त प्रेरणादायी गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आयुष्यात कधी कधी आपण कधी विचारही केलेला नसतो अशी आपल्याला अंतर्बाह्य हेलावून टाकणारी वळणं येतात. त्यावेळी आपण समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला कशा प्रकारे तोंड देतोय यावरून आपण किती खंबीर आहोत हे लक्षात येतं.

आपल्यावर कुठला प्रसंग येईल हे आपल्या हातात नसलं, तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा याची निवड बऱ्याच अंशी आपल्या हातात असते. काहीजण अशा वेळी पूर्णतः खचून जातात तर काहीजण आपल्याकडची सगळी हिंमत एकवटून त्यावर यशस्वीपणे मात करतात.

अगदी जीवघेणे आजार झाले तरी आहे ती परिस्थिती स्वीकारून तिला हसतमुखाने सामोऱ्या जाणाऱ्या माणसांची उदाहरणंही आपण ऐकलेली, पाहिलेली असतात. कठोर परीक्षा पाहणाऱ्या आयुष्यातल्या प्रसंगांवर अशी यशस्वीपणे मात केलेल्यांची उदाहरणं तुलनेने कमी असतात, त्यामुळेच ती माणसं इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ऐतिज्य सरकार या मुलाने इतक्यातच कोरावर आपल्या बहिणीची जबरदस्त प्रेरणा देणारी अशीच एक गोष्ट शेअर केलीये. आपल्या ताईवर ओढावलेल्या एका भीषण प्रसंगाचा त्याच्यावर खोलवर परिणाम झालाच, पण या प्रसंगातून स्वतः गेलेल्या त्याच्या ताईने त्या परिस्थितीशी किती निकराने लढा दिला याविषयी त्याने कोरावर लिहिलंय.

नेमकं काय घडलं त्याच्या बहिणीच्या बाबतीत? आणि त्या सगळ्याला ती कशी पुरून उरली? जाणून घेऊ.

 

aitijya sarkar im

 

कोरावर विचारलेल्या “अतिशय प्रेरणादायी अशा खऱ्या किंवा काल्पनिक कुठल्या व्यक्तीला तुम्ही भेटला आहात किंवा पाहिलं आहे?” या प्रश्नाला उत्तर देताना ऐतिज्यने चौथ्या मजल्यावरून खाली पडून पाय मोडलेल्या आणि तरीही या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडलेल्या आपल्या बहिणीची, अनेकांच्या मनात सकारात्मकता झिरपवणारी कहाणी जगाला सांगितलीये.

ऐतिज्यची बहीण वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी चौथ्या मजल्यावरून पडली आणि तिला जबरदस्त दुखापत झाली.  जेव्हा तुम्ही इतक्या उंचावरून पडता तेव्हा तुमच्या शरीराने त्याची नोंद करण्यापूर्वी बऱ्याचदा तुम्हाला इतक्या उंचावरून पडल्याचा धक्काच आधी बसतो असं ऐतिज्य म्हणतो.

त्याने लिहिलंय, “फाटून तुकडे झालेला तुटलेला मणका हीच अवस्था अखेरीस दिसते आणि एकतर मृत्यू किंवा अर्धांगवायू याच दोन प्रकारची नशीबं अनेकांसमोर असतात.” मात्र त्याच्या बहिणीच्या अशा प्रकारे पडण्याने सगळ्यांनाच चकीत करून टाकलं. त्याने लिहिलंय, “अशा प्रकारे पडताना संपूर्ण वेळ माझी ताई भानावर होती. ती तिच्या पायांवर पडली.”

डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितलं, की केवळ याच कारणामुळे ती जगू शकली. मात्र तिला गंभीर दुखापत झालीच. तिच्या उजव्या पायावर याचा चांगलाच परिणाम झाला आणि त्याचा तुकडा पडला.

बहिणीच्या उजव्या पायाचा पडलेला तुकडा आणि रक्ताने माखलेल्या रुग्णालयातल्या बेडशीट्सच्या भयप्रद आठवणी त्याने लिहिल्या आहेत. इतक्या लहान वयात आपल्या बहिणीच्या संपूर्ण शरीरभर लावलेल्या नळ्या त्याने पहिल्या.

 

hospital bed inmarathi

 

‘या शस्त्रक्रियेत हाडाच्या तुकड्यांमुळे तुमच्या मुलीच्या रक्तवाहिन्या तुटू शकतात. त्यामुळे ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे’ असा इशारा डॉक्टरांनी दिला होता.

यात जगण्याचा दर १०% इतका नाजूक असतो असा अंदाज त्यांनी सांगितला आणि तुमची मुलगी पुन्हा चालू शकेल या आशेवर राहू नका असं ते म्हणाले.

त्याच्या बहिणीने या सगळ्या अवघड परिस्थितीशी २ वर्षं शर्थीची लढत दिली. ऐतिज्यने या काळात आपल्या वडिलांना अक्षरश: लहान मुलासारखं रडताना पाहिलं. आपल्या आईला पूर्णतः निराश झालेलं पाहीलं.

बहिणीला बरं करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागताना आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावताना पाहिली, पण या दोन वर्षांमध्ये तो भावना आणि श्रद्धेविषयी खूप काही शिकला.

श्रद्धेविषयीच्या आपल्या अनुभवाचं अतिशय सुंदर शब्दांत वर्णन करत त्याने लिहिलंय, “तिला आशेची गरज होती. त्या दिवसांमध्ये ती देवी तिची आशा होती. ७ वर्षांमध्ये तिच्या श्रद्धेवर मी कधीही प्रश्न उपस्थित केला नाही. तिच्या धर्माला तिची गरज नव्हती. तिला तिच्या धर्माची गरज होती.”

त्याच्या बहिणीने दोन वर्षं रुग्णालयात काढली. तिला तिची १२वीची परीक्षा देता आली नाही. त्याच्या पुढल्या वर्षी स्ट्रेचरवर बसून १२वीची परीक्षा दिल्यानंतर आणि आणखीनही बऱ्याच अडचणींना तोंड दिल्यानंतर आयुष्याने आपल्यावर केलेले सगळे वार परतवून लावत तिने बोर्डात भौतिकशास्त्रात ९२ आणि गणितात ९४ मार्क असं घवघवीत यश संपादन केलं.

शाळेने तिला ‘असामान्य विद्यार्थी पुरस्कारा’ने गौरवलं. शिवाय, एक मोबाईल भेट दिला आणि तिच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तीपत्रकही दिलं.

आज तिच्याकडे भौतिकशास्त्रातली एक आणि हॉटेल मॅनेजमेंटमधली एक अशा दोन पदव्या आहेत आणि ती एमबीएच्या तिसऱ्या वर्षाची तयारीदेखील करत आहे.

“हाथों की लकीरों पर क्यों भरोसा करते हो, तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते” असं आपल्याकडे म्हटलं जातं. ही मुलगी याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

‘हिला परत चालता येणार नाही’ असा डॉक्टरांनी दावा केला होता. आज हीच मुलगी स्वावलंबीपणे घरापासून दूर एकटी राहून हैद्राबादमध्ये गुगलच्या एका उपकंपनीत काम करते आहे.

‘प्रेरणा?’ कोरामध्ये विचारलेल्या प्रश्नाकडे निर्देश करत ऐतिज्य विचारतो. “जेव्हा मी तिच्याकडे पाहतो तेव्हा मला काय वाटतं याचं वर्णन करायची सुरुवातही या शब्दाने करता येत नाही. ती एक जीताजागता चमत्कार आहे.”

रोजच्या आयुष्यातल्या त्याच त्याच कुरबुरींबद्दल रडारड करणाऱ्या आपल्यातल्या अनेकांसाठी ऐतिज्यच्या बहिणीने इतक्या भयानक परिस्थितीतही हार न मानणं ही गोष्ट थक्क करणारी आहे.

आपल्याला धडधाकट शरीर मिळालंय, इतक्या बिकट अवस्थेतून आपल्याला सुदैवाने कधी जावं लागलं नाही याविषयी सगळ्यात आधी आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

ऐतिज्यच्या बहिणीला आणि अशा बिकट परिस्थितीतून मार्ग काढून वर येणाऱ्या तिच्यासारख्या इतरांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?