“मुजरा राजे”- एका हुतात्मा सैनिकाने छत्रपती शिवरायांबरोबर साधलेला हृदय पिळवटून टाकणारा संवाद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : तुषार दामगुडे

===

“छत्रपती शिवाजी महाराज की” शिक्षकांनी आरोळी देताच माझ्या सहित सर्व मुलांनी ” जय” असा नारा दिला. “शिवाजी” या नावाचं गारूड माझ्या मनावर लहानपणापासून होतं, तो माझा हिरो होता.

या नावाचं गारूड असलेला मी एकटाच नव्हतो, तर माझ्या सारखी लाखो मुलं हे नाव ऐकताच जय म्हणत असत, पण फक्त जय म्हणून मी थांबणार नव्हतो. छत्रपतींच्या बोटाला धरून माझ्या मातीच्या रक्षणासाठी उभा ठाकणार होतो.

अफजलखान आजही दाहीदिशांतुन चालून येतंच होता आणि आता माझ्या सारख्या प्रत्येकाला स्वतःच शिवाजी होण्याची गरज होती.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून कंप्युटर तज्ञ किंवा एम बी ए होण्यापेक्षा मी सैनिकी प्रशिक्षणासाठी हट्टाने अर्ज भरला.

घरी एकुलता एक होतो म्हणून नातेवाईकांनी आई वडलांना मला माझ्या निर्णयापासुन परावृत्त करण्याविषयी सुचवलं पण शिवाजी सुद्धा एकुलताच होता आणि माझ्याच वयाचा.

 

shivaji-inmarathi
punerispeaks.com

 

तो कुठे एवढा मोठा घाट घालताना डगमगला होता? मग मी का मागे सरावं? आई बाबांनी देखील मोडता घातला नाही.

प्रवेश प्रक्रीये नंतर एकदाची माझी निवड झाली आणि सुरू झाले खडतर प्रशिक्षण.

दिवस पहाटे सुरू व्हायचा आणि रात्र कधीतरी उशीरा. माझ्या शिक्षणात काय समाविष्ट  नव्हते? विज्ञान, गणित, जुजबी वैद्यकीय ज्ञान, हत्यारांचे प्रशिक्षण, शारीरिक कसरत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांचे मनोबल वाढवणारा राष्ट्राविषयीचा ज्वाजल्य अभिमान.

दिवस, महिने, वर्षे निघून गेली आणि सर्व प्रशिक्षण पूर्ण होऊन डोक्यावर मानाची कॅप आणि खांद्यावर अभिमानाने मिरवण्याजोगे स्टार्स आले.

माझं वय बावीस तेवीस म्हणजे तसं जास्त नाही आणि कमीही नव्हतं. आई अधुनमधून आता लग्नाविषयी सुचवत होती पण मी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतो.

जे क्षेत्र निवडलं होतं तिथे कसलीच शाश्वती नव्हती. तिथे लग्नासारख्या भावनिक गुंतागुंत वाढवणाऱ्या विषयाला थाराच नव्हता.

तारुण्य सुलभ भावना मलाही होत्या पण मी माझी प्रेयसी निवडली होती. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेली ही अथांग भूमी हिच माझी प्रेयसी होती, जिच्या कुशीत मी हवं तसं लोळू शकत होतो. माझी मान विश्वासाने तिच्या खांद्यावर टाकू शकत होतो.

आईला माझ्या मनातील हे सर्व कळत होतं की नव्हतं माहिती नाही पण तिने नेहमीप्रमाणे माझ्यावर विश्वास टाकला होता.

 

indian-soldier-marathipizza01
zittara.com

 

होता होता दोन वर्षे निघून गेली. लष्करी नोकरी आणि शिस्त अंगात मुरली होती. दिवस मजेत चालले होते. कॅंपवर असताना आम्ही मनोरंजनासाठी टिव्ही लावायचो आणि दिवसेंदिवस टिव्ही लावणं म्हणजे जड होत होतं.

कुणीतरी चॅनेल सर्फींग करता करता वृत्तवाहिन्या लावल्या आणि त्यात लष्कराविषयी काही चर्चा सुरू असेल तर नको नको ते ऐकावे लागत असे.

कुठेतरी सुरक्षित बसलेले आणि कसला अनुभव नसलेले माझेच काही देशबांधव इतके निष्काळजीपणे बेलगाम वक्तव्य करत असत, की त्यांना गनपॉईंट वर उभे करून सगळा सिमावर्ती भाग आणि काश्मीर खोरे फिरवून आणावे असे वाटत असे.

वस्तुस्थिती काय आहे आणि माझे सहकारी कुठल्या परिस्थितीत काय यातना सहन करत आपले कर्तव्य करत आहेत याची किमान जाणीव तरी होईल असे वाटत असे.

ही उद्दिग्नता फक्त मला एकट्यालाच येत असे असं नाही तर कित्येक सहकारी खाजगीत देखिल बोलत असत. पण… हा “पण” मोठा होता.

आमच्या सगळ्यांची प्रेयसी एकच होती आणि आमचे तिच्या वर अतुट प्रेम होते. ती म्हणजे हिंदुस्थान…

आणि…तो दिवस उजाडला…!

खोऱ्यातील एका गावात काही दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे अशी पक्की खबर आली. यात कुख्यात अतिरेकी सलाहुद्दीन सामील होता.

 

terrorist groups inmarathi

 

माझ्या एका सहकाऱ्याच्या हत्याकांडात या सलाहुद्दीनचा हात होता त्यामुळे खबर आल्यापासून तळपायाची आग मस्तकात गेली होती. शेर शिवाचा हा छावा शत्रुला फाडल्याशिवाय राहणार नव्हता.

माझ्या युनिटने सर्व तयारी केली. प्रथेप्रमाणे कदाचित शेवटचंच म्हणून एक पत्र मी आई बाबांसाठी मागे ठेऊन आम्ही कुच केली.

दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेले गाव सीमेजवळ होते. इथे घराघरात त्यांचे समर्थक बसलेले होते. आपला- परका ओळखण्याची कुठलीही सोय नव्हती, त्यामुळे सगळी परिस्थितीच शत्रु बनलेली होती.

रात्रीच्या अंधारात आम्ही गावाची वीज तोडुन वेढा टाकला. अत्यंत शिताफीने एकेक घर सर्च करत करत पुढे जात होतो आणि रात्रीच्या शांततेत पहिली ठिणगी पेटली.

दहशतवाद्यांना आमची चाहुल लागली होती. एक गोळी सणसणत येऊन माझ्या शेजारी असलेल्या सहकाऱ्याच्या मस्तकाचा वेध घेऊन गेली तो तिथेच कोसळला. लगेच कव्हर घेत मी माझ्या रायफलमधून प्रतिहल्ल्याला सुरुवात केली.

अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. दहशतवाद्यांच्या संख्येबाबत जी टिप आम्हाला होती ती चुकीची होती हे वेगवेगळ्या ठिकाणांवरून होणाऱ्या फायरींग वरुन माझ्या लक्षात आले.

पण आता माघार नव्हती. कारण हेच दहशतवादी इथून शिताफीने निसटुन पुढे वेगवेगळ्या शहरात बॉंम्बस्फोट दहशतवादी हल्ले करत निरपराध भारतीयांना मारतात.

त्यामुळे आज मी तिथे असताना एकतर मी राहणार होतो किंवा ते.  हिच भावना माझ्या प्रत्येक सहकाऱ्याच्या मनात असेल याची मला खात्री होती.

हवालदार करणसिंगला मला कव्हर द्यायला सांगितले कारण कुणीतरी पुढे होऊन हल्लेखोरांवर जवळून प्रतिहल्ला केल्याशिवाय त्यांचे मनोधैर्य खचणार नव्हते. आक्रमण हाच उत्कृष्ट बचाव होता.

 

indian-soldier-marathipizza02
english.jagran.com

 

करणसिंगने आपल्या रायफलमधून अंदाधुंद फायरींग सुरू केल्यावर आडोसा घेत घेत मी समोरील दुमजली घराजवळ पोहचलो. समोरून येणाऱ्या गोळ्यांवरून दहशतवाद्यांच्या पोझीशनचा मला अंदाज आला.

ते पाच जण होते. माझे सहकारी आपल्या परीने वेगवेगळ्या आघाडीवर तोंड देतच होते.

मी सगळा विचार करून विजेच्या वेगाने त्या घराच्या जवळ पोहचुन एक हातबॉंब खिडकीतून आत फेकला, आतली एक मशिन गन थंडावली.

आत बहुतेक काहीतरी गोंधळ माजला असावा पण विचार करायला वेळ नव्हता. मी लाथेच्या एका धडकेत दरवाजा उघडून आत घुसलो…

विजेच्या चपळाईने उजव्या खोलीत घुसून समोर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शरीरात चार भोकं पाडून त्याला थंड केला. खालचा मजला रिकामा होता.

अत्यंत सावधपणे जिन्याने वर पोहचलो. आत भयाण शांतता होती कदाचित मी आत आल्याची जाणीव त्यांना झाली होती.

समोर दोन खोल्या होत्या, अत्यंत सावधपणे हलक्या हाताने डावा दरवाजा ढकलला, आत फर्निचर उलथेपालथे पडले होते आणि गोळ्यांचे ठसे पसरलेले होते. एक दहशतवादी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आता फक्त एक खोली राहिली होती.

आयुष्यातील सगळा भुतकाळ क्षणात डोळ्यासमोरून गेला, जय भवानी म्हणत खोलीत विजेच्या वेगाने घुसलो तेच आतल्या लोकांना अचानक आश्चर्यचकीत करण्यासाठी, आतले दोघे तयारीतच असावेत.

त्यांनी देखील माझ्यावर झेप टाकुन हातघाईच्या लढाईला प्रारंभ झाला. बाहेर गोळीबाराचे आवाज सुरू होते म्हणजे ऑपरेशन अजून फत्ते झाले नव्हते.

 

wounded-soldier-inmarathi
wordsarework.com

 

 

हे विचार मनात येतात न येतात तोच सहा फुटाचे ते दोन राक्षस माझ्याशी झुंजू लागले, त्यातील एक प्रत्यक्ष सलाहुद्दीन होता.

आई भवानीचे तेज आणि भारतीय लष्करी प्रशिक्षण यांचा संगम साधत आज याला सोडायचे नाही या हिशोबाने मी लाथा बुक्क्यांचे वर्मी घाव घालु लागलो.

पूर्ण ताकद लावून ते माझ्याशी झुंजू लागले, मी सुद्धा पुर्ण शक्तिने एकाला लाथेने उडवले आणि सलाहुद्दीनच्या मानेवर माझ्या हाताचा फास टाकला. हा एक विशिष्ट प्रकारचा डाव होता जो सोडवणे त्याला आता अशक्य होते.

 सलाहुद्दीन “मार दो साले को” कसेबसे ओरडला आणि मी त्याकडे दुर्लक्ष करून हाताची बोटे त्याच्या गळ्यावर विशिष्ट ठिकाणी रोवुन माझ्या गुडघ्याने त्याचे शरीर एका हिसड्यात जोरदारपणे पुढे ढकलले. त्याची मान मोडली आणि तो कायमचा थंडावला.

त्याच क्षणाला एक जीवघेणी कळ पाठितुन संपुर्ण शरीरात पसरली. काहीतरी थंडगार पाठित खोलवर रूतले होते. मी तसाच मागे फिरलो…तो मगाशी लाथेने उडवलेला राक्षस माझ्या कडे बघून हसत होता.

“फौजी, काश्मीर अलग नही होता तब तक हम रूकने वाले नही, तुम जैसे इंडियन कुत्ते हमारा कुछ नही बिगाड सकते!”

हे शब्द ऐकताच पाठितील कळ अजुन तिव्र झाली ती त्वेषाने आणि संतापाने. मी जिवंत असताना माझ्या मातृभुमिचे तुकडे? काय अर्थ होता मग माझ्या जीवनाला? यासाठीच का मी प्रशिक्षण घेतले? यासाठीच का सैन्यदल निवडले. नाही, त्रिवार नाही!

माझ्या जन्माचे निमित्त आणि ध्येय या भूमीचे आणि तिथे राहणाऱ्या कोट्यावधी नि:शस्त्र निरपराध नागरीकांचे रक्षण एवढेच होते.

“छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशी जोरदार आरोळी देत मी तो रूतलेला सुरा उपसुन काढला, रक्ताची चिळकांडी उडाली, मेंदु बधीर झाला तशाच अवस्थेत झेप घेऊन मी त्या नरराक्षसाच्या शरीराला भिडलो.

माझा त्वेष पाहून आता त्याच्या डोळ्यात भिती दिसत होती तो आकांताने बचाव करत होता, त्याने माझ्या जखमेत हात खुपसून जोरदारपणे हाताला लागेल ते अवयव बाहेर उपसुन काढले पण मी सगळ्या वेदनेपलीकडे गेलो होतो.

हातातील सुरा योग्य पकड घेत मी सपासप वार त्याच्या शरीरावर करत राहिलो. वेदनेने किंचाळत हातपाय झाडत माझ्या देशाचे तुकडे करण्याची स्वप्न बघणारा तो डुक्कर थंड झाला.

मी त्याच्या शरीरातुन सुरा उपसून बाहेर काढला आणि तिथेच भिंतीला टेकलो. शुद्ध भानावर आणत बाहेरची चाहुल घेतली. बाहेर देखील गोळीबार थंडावला होता.

याचा अर्थ काय असावा हे कळण्यास मार्ग नव्हता, कारण माझी हालचाल होत नव्हती, रक्तस्त्राव फार वेगाने होत होता. माझी शुद्ध हरपत होती, तेवढ्यात जिन्यावर पाऊले वाजली, मी डोळ्यांवर येणारी झापड दुर सारत सुरा पवित्र्यात धरला.

ऑपरेशन सक्सेसफुल हुवा साबजी, पुरे बारा terrorist खतम, आप फिकर ना करे हम जल्दी आपको अस्पताल पहुचाते है|

आवाज करणसिंगचा होता. ते शब्द ऐकुन सुरा हातातुन गळुन पडला. शरीर भरभर ओलं होत होतं, ते माझं रक्त असावं. शरीर वेदनेच्या पलीकडे पोहचलं होतं. डोळे गपकन मिटले.

हा कसला प्रकाश होता? आणि माझी वेदना कशी बरी झाली? मी शरीर चाचपुन पाहिलं आणि कुठेच रक्त कसं लागत नाहीये? माझ्या बरोबर झालं तरी काय? आणि तो आवाज कसला? टापांचा आवाज आणि इथे? इथे कोण घोड्यावरून येत आहे?

 

iindian-soldier-inmarathi
thestatesman.com

 

हळूहळू त्या दिव्य प्रकाशातुन तो पांढरा शुभ्र घोडा समोरून आला आणि ती व्यक्ती माझ्या नजरेच्या टप्प्यात आली.

त्या व्यक्ती मागे तशाच घोड्यांवर स्वार असलेले रूबाबदार मिशांचे झुबके असलेली धिप्पाड माणसे होती. पांढरा घोडा आणखी जवळ आला आणि माझ्या जवळ थांबला. आता ती व्यक्ती स्पष्ट दिसत होती…

हे कसं शक्य होतं…?

अंगावर स्वच्छ शुभ्र वस्त्र, डोक्यावर जिरेटोप, कमरेला तलवार, त्या रूबाबदार मिशा, गालावर पसरलेली दाढी, स्वच्छ काळे डोळे, कपाळावर गंध, गळ्यात तीच (हो तीच ) कवड्यांची माळ आणि ओठांवर माझ्या कडे पहात आलेलं मंदस्मीत.

“मुजरा राजे” शब्द आपोआपच माझ्या तोंडुन कधी बाहेर पडले ते मलाही कळलं नाही.

सगळा प्रकार काय आहे ते मला काही कळेना आणि कदाचित हे त्या थोर राजाला नेहमीप्रमाणे कळाले असावे. आयुष्यभर त्याने गोंधळलेल्या जीवांना तर मार्गदर्शन केले होते.

 

shivaji mharaj InaMarathi 5

 

त्या माझ्या राजाने काही न बोलता एका दिशेकडे बोट केले आणि मी आत्ता प्रथमच त्या दिशेला पाहिले.

क्षणभर बसलेल्या धक्क्यानंतर हळूहळू माझ्या लक्षात सर्व येऊ लागले. समोर माणसांची तुडूंब गर्दी जमली होती. काही माणसं डोळ्यातुन अश्रू लपवत होती तर काहींनी हंबरडा फोडला होता.

“अमर रहे” चा जयघोष सुरु होता आणि काही लष्करी अधिकारी ताठ मानेने चेहरा गंभीर करून शिस्तित उभे होते. त्या गर्दीत कितीतरी चेहरे मला ओळखीचे दिसू लागले आणि तो परिसर सुद्धा माझ्या ओळखीचा वाटू लागला.

“अरेच्या हे तर माझेच गाव” आणि ते काय सर्वात पुढे उभे असलेले माझे आई बाबा सगळ्यांना चेहऱ्यावर हसू आणत ओल्या डोळ्यांनी अभिवादन करत आहेत.

अचानक शांतता झाली आणि माझ्या युनिट मधल्या सहकाऱ्यांनी तिरंगा गुंडाळलेली अवजड पेटी तालबद्ध रितीने खाली ठेवली आणि चेहऱ्याचा भाग थोडा उघडा केला…

 

army soldiers inmarathi

 

माझा देह त्या तिरंग्या खाली ठेवलेला होता. अगदी शांत निश्चिंत आणि वेगळेच तेज माझ्या त्या चेहऱ्यावर होते. आजवर हजारो वेळा आरसा पाहिला होता पण असे तेज मला माझ्या चेहऱ्यावर आजवर दिसले नव्हते.

नवरदेवाच्या चेहऱ्यावर लग्नात एक वेगळेच तेज दिसते असं आई नेहमी म्हणायची. आज माझे लग्नच नव्हते का?

इतके वऱ्हाडी, पुष्पगुच्छ, प्रेम दु:ख यांच्या मिश्रणाने हेलकावणारा जनसागर, अभिमानाने छाती फुलून आलेले माझे आईबाबा आणि या सगळ्यावर कडी करणारा आणि कुठल्याही सामान्य वराला न लाभणारा तिरंग्याचा वेष…….. आणखी काय हवं आयुष्यात ?

काही वेळातच सर्व विधी पार पडले आणि धाडधाड गोळ्या झाडत मानवंदना दिली गेली. बाबांनी एकेक पाऊल दमदारपणे पुढे टाकत शेवटचा नमस्कार केला आणि अग्नीची प्रज्वलीत तेज शलाका माझ्या देहाला लावली आणि इतका वेळ आवरुन धरलेला कढ आईने मोकळा केला…

त्या हंबरड्याने पूर्ण वातावरण हेलावून गेले. मी सुद्धा नजर बाजूला फिरवली तर घोड्यावरील तो महान तेजपुंज ध्रुव तारा देखील डोळ्याची कड पुसताना दिसला…खऱ्या अर्थाने आज माझ्या देहाचे सोने झाले होते…

 

indian-soldier-marathipizza04
livemint.com

 

“राजे! तुमचे तेज या मातीत चैतन्य खेळवत आहे तोवर माझ्या सारखे मावळे जन्म घेत राहतील, हाच काय अजुन हजारो जन्म मिळाले तरी पुन्हा पुन्हा त्या औरंग्याला गाडण्यासाठी आयुष्य रणात कुर्बान करत राहतील.

इथल्या काही घरात अफजुल्या पैदा झालातर घरा घरातुन बाजी तानाजी आणि येसाजी जन्म घेतील.

“शिवाजी महाराज की” म्हटल्यावर क्षणार्धात “जय” म्हणणारी पिढी येथे जन्म घेतेय तोवर संपूर्ण जग चालून आले तरी ही भूमी अजिंक्य राहिल.

“राजे तुम्ही निश्चिंत रहा”

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““मुजरा राजे”- एका हुतात्मा सैनिकाने छत्रपती शिवरायांबरोबर साधलेला हृदय पिळवटून टाकणारा संवाद

  • February 25, 2018 at 11:07 pm
    Permalink

    महाराष्ट्र तील 10 कोटी मराठा जनता ही आत्मघाती आहे भारत भूमी च्या रक्षणासाठी शिवाजी म्हणतं मारण्यास आणि मरण्यास केव्हा ही तयार आहे . जो पर्यंत महाराष्ट्र जिवंत आहे तो पर्यंत भारत आहे आणि असेल

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?