' डोकं बाजूला न ठेवताही 'पैसा वसूल' सिनेमा देता येतो हे बॉलीवूडने KGF कडून शिकायला हवं!

डोकं बाजूला न ठेवताही ‘पैसा वसूल’ सिनेमा देता येतो हे बॉलीवूडने KGF कडून शिकायला हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

गेली २ वर्षं ज्याची आतुरतेने वाट बघत होतो ती अखेर अनुभवायला मिळाली..खचाखच १००% occupancy ने भरलेली थिएटर्स, टाळ्या शिट्ट्या, धुमाकूळ, अंगावर रोमांच आणणारा माहोल आणि सुपर डुपर हिट पॅन इंडिया लेव्हलचा सिनेमा.

असा अनुभव शेवट बाहुबली आणि Endgame बघताना आला होता आणि आज अगदी तसाच अनुभव KGF chapter 2 बघताना आला आणि खरंच धन्य होऊन बाहेर पडलो.

 

kgf chapter IM

 

सिनेमा हे २ प्रकारचे असतात एक तुम्हाला अत्यंत विचार करायला भाग पाडतात तर एक जे तुम्हाला असलेलं डोकं बाजूला ठेवून केवळ मनोरंजन करतात. या दोन्हीचा समतोल साधलाय तो साऊथच्या सिनेमांनी हे मी वेगळं सांगायची गरजच नाही कारण गेली काही वर्षं आपण ते याची देही याची डोळा अनुभवतो आहोत.

बाहुबली, पुष्पा, मास्टर आणि आता KGF या सिनेमांनी या दोन्ही गोष्टीचा अचूक समतोल साधून प्रेक्षकांना थिएटरकडे खेचलं आहे. बाहुबलीने एक वेगळा इतिहास रचला, पुष्पाने तर ओटीटीवर रिलीज होऊनसुद्धा बॉक्स ऑफीसवर करोडोची कमाई केली, आणि आता KGF 2 ने तर अक्षरशः अटकेपार झेंडे रोवले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जेव्हा या सिनेमाचा पहिला भाग रिलीज झाला तेव्हा बऱ्याच लोकांनी सिनेमावर टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.

त्यांच्यासाठी KGF 2 चे कमाईचे आकडे हीच जबरदस्त चपराक आहे. नो डाऊट हे एक वेगळं विश्व आहे आणि त्या विश्वात खेचून घेऊन जाण्यात या सिनेमाच्या मेकर्सना छप्परफाड यश मिळालं आहे.

 

KGF scenes IM

 

साऊथचे सिनेमे लोकांना सध्या प्रचंड कनेक्ट होतात कारण त्यातली कथा लोकांना आपलीशी वाटते आणि नेमकी हीच कमी सध्या आपल्याला हिंदी सिनेमात बघायला मिळतीये.

तसं ideology wise बघायला गेलं तर KGF ची विचारधारासुद्धा थोडीफार communism शी मिळती जुळती आहे, establishment आणि श्रीमंत वर्गाबद्दल द्वेष आणि त्याला एक इमोशनल अँगल हे सगळं आपण मनी हाईस्टपासून असंख्य हिंदी सिनेमात पाहिलं आहे, तरी KGF वेगळा का ठरतो?

कारण सिनेमाचं कथानक आणि पात्रं इतक्या बारकाईने लिहिली गेली आहेत की लोकं त्यामागच्या ideology कडे कानाडोळा करतात, हेच समजा हिंदी सिनेमात किंवा सध्याच्या ‘बॉलिवूड’ मध्ये झालं तर लोकं त्याकडे प्रॉपगंडा म्हणून बघतात.

अर्थात यात बॉलिवूडचीसुद्धा तितकीच चूक आहे कारण इतकी वर्षं त्यांनी systematically आपल्याच देशाविषयी इतक्या भयानक गोष्टी सिनेमातून प्रमोट केल्या आहेत की त्यांनी आता चांगलं जरी काही केलं तरी लोकं त्याकडे संशयाच्या नजरेतूनच बघतात. आणि हो ज्यांना वाटत की सिनेमा आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यांनी कृपाकरून बच्चन देऊ नये, कारण या दोन गोष्टी कशा एकमेकांना affect करतात याची असंख्य उदाहरणं आहेत.

El dorado म्हणजे एक असं काल्पनिक शहर जे सोन्याने आणि इतर खूप साऱ्या संपत्तीने समृद्ध होतं, आणि याच आधारावर वेस्टकडे असे कित्येक सिनेमे बनले आहेत, पण याच कॉन्सेप्टवर भारतीय चित्रपटात झालेला KGF हा बहुदा एकमेव प्रयोग.

 

el dorado IM

 

KGF आणि रॉकी ची गोष्ट आपण पहिल्या chapter मध्ये अनुभवली आहेच पण या दुसऱ्या भागाची गोष्ट दसपट वर आहे कारण इथे फक्त रॉकी नव्हे तर देश, राजकारण, सामाजिक व्यवस्था, हे सगळं समोर येतं आणि मग जे काही आपल्यासमोर घडतं ते फक्त आ वासून बघत राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही.

गरुडाला मारल्यानंतर रॉकी हा KGF चा सर्वेसर्वा बनलाय, अर्थात त्याने तिथल्या शोषित लोकांना न्याय मिळवून दिलाय पण तरी तो गरुडाच्याच पावलावर पाऊल ठेवून KGF चालवतोय, किंबहुना त्याच्यापेक्षा आणखीन वेगळ्या पद्धतीने, आणि याच सगळ्या गोष्टींना एका आणखीन मोठ्या स्केलवर या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्ये नेऊन ठेवलं आहे.

KGF चे पार्टनर आणि अधिरापासून इनायत खलीलपर्यंत सगळ्यांच्या मुसक्या आवळण्यात रॉकीला यश मिळालं आहे पण तरी नेहमीसारखं happy ending, वाईटावर चांगल्याचा विजय हे असं काही KGF च्या दुनियेत होत नसतं.

खरंतर इथे सगळेच वाईट कारण सगळ्यांनाच सत्ता हवीये, सगळ्यांनाच पॉवर हातात हविये मग ते विधानभवनातले मंत्री असो, इतकी वर्षं गप्प बसलेला अधिरा असो, KGF चे पार्टनर असो किंवा KGF च्या लोकांना गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करणारा खुद्द रॉकी असो. शेवटी हा सगळा पॉवरचाच गेम आहे आणि यात रॉकी सगळ्यांचा बाप आहे.

 

kgf characters IM

 

नो डाऊट रॉकीच्या गुन्हेगारी वृत्तीला, त्याच्या कृत्यांना, त्याच्या हिंसाचाराला एकप्रकारे खतपाणी घालून, आईचा अत्यंत इमोशनल अँगल देऊन एका व्हिलनला हिरोच्या स्वरूपात सादर केलंय पण तरी कुठेच तुम्हाला ते खटकत नाही हीच खरी किमया आहे सिनेमाच्या कथेची, पटकथेची आणि त्यातल्या पात्रांची!

या सिनेमाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे ही एक काल्पनिक कथा आहे असं पदोपदी आपल्या मनावर बिंबवलं जातं पण त्यातले काही संदर्भ आणि कोलार फील्डचा इतिहास बघता आपल्याही मनात शंकेची पाल चुकचुकते की हे सगळं खरंच घडलं नसेल ना?

जेवढी मेहनत सिनेमाच्या कथेवर, पटकथेवर घेतली आहे तितकीच तांत्रिक बाजूसुद्धा तेवढीच स्ट्रॉंग आहे. पावणे तीन तासाचा हा सिनेमा एक क्षणही तुम्हाला तुमची पापणी लवू देत नाही. प्रत्येक पात्राला योग्य स्क्रीन टाइम आणि त्यांची धमाकेदार एंट्री खरंच पैसा वसूल ठरते.

KGF च्या पहिल्या भागात सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यातल्या अॅक्शन सिक्वेन्सची. भरपूर कट असलेले धासु अॅक्शन सिक्वेन्स तुम्हाला या भागातसुद्धा बघायला मिळतात पण या भागात ते आणखीन उत्तमरित्या सादर केले आहेत.

कार चेस सिक्वेन्स दरम्यान मध्येमध्ये येणाऱ्या ब्लॅक फ्रेम्स आणि मग अचानक होणारा धमाका हे अक्षरशः तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतात. रॉकी जेव्हा इनायत खलीलला भेटायला जातो तेव्हाचा सीन तर निव्वळ राडा घालतो.

या सगळ्यावर कळस म्हणजे सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या सिक्वेन्स दरम्यान येणारा अधिरा आणि रॉकी यांच्यातली लढत. मुळात संजय दत्तने साकारलेलं अधिरा हे पात्र Viking पासून प्रेरित असलं तरी त्याला एक भारतीय टच देण्यात दिग्दर्शकाला यश मिळालं आहे.

 

sanjay dutt IM

 

शेवटचा तो फाईट सिक्वेन्स बघताना तुम्हाला बऱ्याच मोठमोठ्या सिनेमातल्या किंवा सिरिजमधल्या फाईट सिक्वेन्सची आठवण येईल. GOT मधल्या शेवटच्या सीझनमधल्या Hound vs Mountain चा फाईट सिक्वेन्सची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

याबरोबरच धमाकेदार डायलॉगबाजीने तर प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद दिला आहे. शिवाय सिनेमाच्या सुरुवातीपासून अत्यंत हेवि असं बॅकग्राऊंड म्युझिक दरवेळेस आणखीनच गडद होत जातं आणि रवी बसरूर यांनी ती जवाबदारी अत्यंत चोखपणे बजावली आहे.

कोलार माइन्सचं भयावह वातावरण निर्माण करण्यात तर सिनेमॅटोग्राफर आणि एडिटरने नुसता कल्ला केला आहे. क्लायमॅक्सचा इंडियन ओशन्समधला सीन तर अंगावर रोमांच उभा करणारा आहे.

 

kgf climax scene IM

 

संजय दत्तच्या वयाला आणि अनुभवाला साजेसा असा ग्रँड रोल त्याला बऱ्याच काळानंतर मिळालाय आणि त्याने त्याचं सोनं केलं आहे. रविना टंडन हीला स्क्रीन टाइम जरी कमी असला तरी रॉकीच्या तोडीस तोड तिने काम केलं आहे.

रॉकी जेव्हा रमिका सेनला भेटायला जेव्हा PMO मध्ये येतो तो सीन तर रविनाने अक्षरशः खाऊन टाकला आहे. रॉकीची लव्ह स्टोरी एका गाण्यात आटोपती घेतली असली तरी श्रीनिधी शेट्टीची भूमिका खूप महत्वाची आहे आणि तिचंच पात्र सिनेमाला एक वेगळं वळण देतं.

 

raveena tandon IM

 

बाकी यश विषयी काय बोलणार. अवघ्या एका सिनेमाने त्याला जे फेम आणि ओळख मिळवून दिली आहे ती निव्वळ अविश्वसनीय आहे. याआधी यश हे नांव फारसं कोणाला ठाऊकच नव्हतं, पण KGF मुळे त्याचं फॅन फॉलोइंग एवढं वाढलंय की केवळ त्याला बघण्यासाठी लोकांनी थिएटरमध्ये तोबा गर्दी केली आहे.

रॉकी हे पात्र त्याने ज्या स्टाइलने आणि ज्या अॅटीट्यूडने साकारलं आहे आणि हे फक्त आणि फक्त यशच करू शकतो हे पुन्हा त्याने सिद्ध केलं आहे. सिनेमा स्वतःच्या खांद्यावर कसा पेलावा आणि लोकांना कसं गुंगवून ठेवायचं हे सध्या फक्त यशलाच जमलं आहे.

Marvel च्या Endgame ने ज्या पद्धतीने Avatar चे रेकॉर्ड ब्रेक केले तसेच हा KGF 2 हा बाहुबलीचे रेकॉर्ड ब्रेक करणार का? याचं उत्तर काहीच दिवसांत मिळेल, पण ज्या पद्धतीने हे हॉलीवूडवाले एक स्वतंत्र विश्व निर्माण करतात, तसंच एक वेगळी दुनिया निर्माण करण्यात दिग्दर्शक प्रशांत नील यांना यश मिळालं आहे.

 

yash kgf IM

 

बहुदा पोस्ट क्रेडिट हा प्रकार आपल्याला इंग्रजी सुपेरहिरो सिनेमातच बघायला मिळतो, पण आता तोच प्रकार KGF 2 मध्ये आणून भारतीय सिनेमाला निश्चितच एक वेगळं वळण मिळालं आहे.

DC किंवा marvel प्रमाणे KGF चं एक वेगळं विश्व तयार करून ते आणखीनच भव्य दिव्य होणार का? हे येणारा काळच ठरवेल, आणि हे असंच व्हावं अशी माझीसुद्धा इच्छा आहे, कारण सध्या ती ताकद फक्त आणि फक्त दाक्षिणात्य सिनेमात आहे, बॉलीवूड यांच्या आसपासही कुठे नाही.

त्यामुळे डोकं पूर्णपणे बाजूला न ठेवता पैसा वसूल सिनेमा अनुभवायचा असेल, म्हंटलं तर काल्पनिक म्हंटलं तर सत्यपरिस्थितिची आसपास जाणाऱ्या अशा अद्भुत दुनियेची सफर करायची असेल तर तातडीने तुम्ही KGF चा दूसरा भाग बघायलाच पाहिजे!

दुसऱ्याआधी निश्चितच पहिला भाग बघणं हे अत्यावश्यक आहे आणि हो सिनेमा संपल्यावर उठून निघू नका, एक सरप्राईज आहे आणि ते बघून बाहेर पडताना सिनेमा बघितल्याचा आनंद द्विगुणित होईल हे मात्र नक्की!

 

kgf chapter 3 IM

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?