' महाराष्ट्र अंधारात! या भागांमध्ये पुन्हा होणार लोडशेडिंग? वाचा, यामागची कारणं – InMarathi

महाराष्ट्र अंधारात! या भागांमध्ये पुन्हा होणार लोडशेडिंग? वाचा, यामागची कारणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साधारण होळीच्या आसपास आपल्याला हवेत उकाडा जाणवायला सुरुवात झाली होती. एप्रिल महिना अजून अर्धाही संपलेला नाही आणि आतच आपण उन्हाने हैराण झालोय.

बराच काळ लॉकडाऊनमुळे सगळे घरूनच काम करत होते. एकीकडे सगळी कामं पुन्हा ऑफलाईन सुरू झालीयेत म्हणून बरंही वाटतंय, तर दुसरीकडे आता बाहेर पडायला सुरुवात झाल्यामुळे उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवतेय.

जरा वेळ जरी लाईट गेले तरी नकोनकोसं होतंय. वैयक्तिक पातळीवर जरी आपण सगळे आपल्याला बरं वाटावं म्हणून विजेचा बेसुमार वापर करत असलो तरी यातून उद्भवणाऱ्या विजेच्या तुटवड्याच्या फार मोठ्या समस्येचा आपण म्हणावं तितक्या गांभीर्याने विचार करत नाही.

 

electricity im

 

उन्हाळा कितीही असह्य झाला असला, तरी महाराष्ट्रातल्या बऱ्याच ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आता पुन्हा लोडशेडिंग होणार आहे. पुण्या-मुंबईत मात्र असं लोडशेडिंग होणार नाही. बाकी भागांमध्ये लोडशेडिंग होणार यामागे आणि पुण्या-मुंबईत ते होणार नसण्यामागे नेमकी काय कारणं आहेत? जाणून घेऊ.

‘महाराष्ट्र राज्य वीज पुरवठा कंपनी’ (MSEDCL) चे चेअरमन आणि एमडी असलेले विजय सिंघल म्हणाले, “पँडेमिकनंतर सगळीकडेच कामकाज वाढल्यामुळे विजेच्या मागणीची लाट येऊन त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.”

त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात कोळशाचाही तुटवडा निर्माण झालाय. MSEDCL कडून अतिरिक्त वीज खरेदी केल्यानंतरही महाराष्ट्राला दर दिवशी १५०० मेगावॅट वीज तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे असं ते म्हणाले.

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, कृषी आणि औद्योगिक ग्राहकांच्या गरजांमध्ये वाढ झाल्यामुळे २८,००० मेगावॅट पेक्षाही जास्त विजेची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या मानाने ही मागणी जवळपास १६ टक्क्यांनी वाढली आहे.

 

electricity im1

 

सद्यस्थितीत महाराष्ट्रात दिवसाला साधारण ४,००० मेगावॅटचा तुटवडा निर्माण झालाय. MSEDCL साधारण २४,८०० मेगावॅटचा पुरवठा करतेय. हा पुरवठा गेल्या वर्षीच्या मानाने जवळपास ४,००० मेगावॅटने जास्त आहे.

२५,५०० मेगावॅटपर्यंत यात वाढ होईल असा अंदाज आहे. काही ठिकाणी खाजगी वीज निर्मिती कंपन्यांनी एका युनिटनुसार २० रुपयांची मागणी केली होती, पण भारत सरकारने ही किंमत साधारण १२ रुपयांवर आणली आहे.

विजेच्या समस्येचं आणखी एक कारण म्हणजे कोळशाच्या मागणी आणि पुरवठ्यातली तफावत. पॉवर जनरेशन आणि नॉन पॉवर सेक्टर्स या दोघांनीही इष्टतम पातळीपेक्षा कोळशाचा पुरवठा कमी होत असल्याचा दावा केला असल्याचं आणि ‘कोल इंडिया’ सुमार दर्जाचा कोळसा पुरवत असल्याचं फेब्रुवारीच्या बिझनेस स्टॅंडर्ड अहवालाने लक्षात आणून दिलं आहे.

‘महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी’ (MahaGenco) जे ‘थर्मल पॉवर स्टेशन्स’ चालवते त्यातल्या सगळ्या प्रकारच्या कोळशांवर आणि त्यांच्या वापराच्या क्षमतांवर याचा परिणाम होणार आहे.

तुटवडा निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच सिचन विभागाने पश्चिम महाराष्ट्राच्या ‘कोयना जल विद्युत प्रकल्पा’कडून १० टीएमसी पाण्याचा अतिरिक्त कोटा दिला आहे. अतिरिक्त १,००० मेगावॅटची निर्मिती करायला ते फायद्याचं ठरेल.

‘नॅशनल थर्मल पॉवर कोर्पोरेशन’ने गेल्या १० दिवसांत ७०० मेगावॅटची निर्मिती केली आहे. महाडिस्कॉमने ‘टाटा पॉवर’ची उपकंपनी असलेल्या ‘कोस्टल गुजरात पॉवर’कडून ७५० मेगावॅट मिळवले आहेत आणि मंगळवारच्या रात्रीपासून राज्याला एव्हाना त्यापैकी ४१५ मेगावॅट मिळायला सुरुवात झाली आहे. अशी सगळी पावलं उचलल्यानंतरही जवळपास १,५०० मेगावॅटचा तुटवडा जाणवणार असल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे लोडशेडिंग होणार आहे?

 

electricity im2

 

विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात लोडशेडिंग होणार आहे. नाशिक, अहमदनगरच्या ग्रामीण भागांमध्ये आणि औरंगाबादसकट मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये वीजकपात व्हायला एव्हाना सुरुवातही झाली आहे. काही काही ठिकाणी तर तब्बल ८ तास वीज नसणार आहे.

मुंबई-पुण्यात लोडशेडिंग का होणार नाही?

MSEDLCच्या म्हणण्यानुसार मुंबई आणि जवळपासच्या ठाणे आणि नवी मुंबईवर या सगळ्याचा परिणाम होणार नाही कारण, या भागांमध्ये वीज वितरणामुळे कमी नुकसान झालंय आणि बिलाची रक्कमही बऱ्यापैकी परत मिळवता आलेली आहे.

नवी मुंबई, वसई-विरार, भांडुप, मुलुंड, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, इतर शहरं आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये महाडिस्कॉम वीजपुरवठा करतं.

शहरांवर याचा परिणाम होणार नाही. मात्र खेडेगावांवर होईल. त्यामुळे मुंबईला लोडशेडिंगचा सामना करावा लागणार नाही.

वारंवार होणारी वीज चोरी, वीज वितरणामुळे झालेलं नुकसान आणि बिलाची रक्कम म्हणावी तशी परत न मिळवता आल्यामुळे मुंबईबाहेर असलेलं कल्याण मात्र या त्रासातून सुटणार नाही.

 

electricity im3

 

वीज देय मोठ्या प्रमाणावर परत मिळवता आल्याने पुण्यातदेखील लोडशेडिंग होण्याची शक्यता कमी आहे. महाडिस्कॉमने सगळ्यांना विजेचा वापर कमी करण्याचं आणि घाईगडबडींच्या तासांमध्ये नेटवर्कवर अचानक ताण न आणण्याचं आवाहन केलं आहे.

उन्हाळ्यातले हे २ महिने आपल्या सगळ्यांकडूनच दरवर्षीच अतिरिक्त वीज वापरली जाते, तशी ती यंदाही वापरली जाणार आहे.

एकूण सगळी परिस्थिती लक्षात घेता केवळ आपल्याला छान वाटतंय म्हणून सतत पंखे, एसी सुरू ठेवणं टाळूया. गरज नसताना ते कटाक्षाने बंद ठेवूया.

ऑफिसमध्ये जरी शक्य झालं नाही तरी घरातल्या ज्या खोलीत इतर खोल्यांच्या मानाने हवा खेळती असेल तिथे जास्तीत जात वेळ बसूया.

प्रत्येकाने जर हे प्रामाणिकपणे करायचं ठरवलं तर बाकी काही प्रयत्न करता येणं शक्य नसलं तरी निदान वीजबचतीद्वारे तरी आपण नक्कीच ही समस्या सोडवण्यात काही अंशी तरी हातभार लावू शकू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?