' रीमिक्स, रिमेकच्या दुनियेत संगीताचा 'आत्मा' जपणारा दर्जेदार संगीतकार: अमित त्रिवेदी!

रीमिक्स, रिमेकच्या दुनियेत संगीताचा ‘आत्मा’ जपणारा दर्जेदार संगीतकार: अमित त्रिवेदी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

मी ९० च्या जनरेशनचा, तसं बघायला गेलं तर आमच्या जनरेशनने हिंदी सिनेमातल्या म्युझिल इंडस्ट्री मधले अनेक चढ-उतार पाहिले.

जतीन-ललित, नदीम श्रवण, इस्माईल दरबार, आदेश श्रीवास्तव, रेहमान अशा काही ग्रेट माणसांच्या संगीताचे संस्कार मनावर झाले, त्यानंतर आला हिमेश रेशमिया ज्याने संगीतविश्वाला एक ‘भलतंच’ वळण दिलं पण, असो काही सिलेक्टिव्ह गाणी वगळता तो माणूस मला कधीच आवडला नाही पचला नाही रुचला नाही!

 

indian music composers IM

 

त्यानंतर आले प्रीतम साहेब ज्यांची बरीचशी गाणी चोरलेलीच आहेत तरी चांगल्या गोष्टीची चोरी करण्याचा गुण त्याच्यात आहे त्यामुळे तो चालून गेला, त्याने तर आमच्या पिढीला कॉलेज दिवसांमध्ये कसली भन्नाट गाणी दिली!

त्यांनंतर आले सलीम-सुलेमान..प्रचंड हुशार आणि ताकदीचे संगीतकार आणि काहीतरी नाविन्यपूर्ण काम देणारे पण दुर्दैव सध्या त्यांचंसुद्धा कुठे नाव नाही. त्यानंतर जणू हिंदी चित्रपट संगीताला ग्रहणच लागलंय!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रेहमान आणि शंकर एहसान लॉय हेच इतकी वर्षे टिकून आहेत बाकी आता सगळा जमाना रिमेक आणि रॅपचा झालाय ज्यात संगीत आणि काव्य हे कमीच अगदी नाहीच म्हणा फक्त उघड्या नागड्या पोरी, दारू, हुक्का, गचाळ डान्स स्टेप्स आणि महागड्या गाड्या आणि कपडे बास!

तरी या सगळ्या दलदलीत एक माणूस आहे जो कायम त्याच्या मुळांना धरून आहे आणि त्याच्या सिनेमातून तो सदैव दर्जेदार संगीत देत आहे, तो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून अमित त्रिवेदी!

 

amit trivedi IM

 

रेहमानसुद्धा हायवे नंतर काही ठिकाणी मोनोटोनस वाटायला लागला होता. पण अमित त्रिवेदी सारखी विविधता मला नाही वाटत सध्याच्या कोणत्या इतर म्युझिक कंपोझरमध्ये आहे!

मी आणि माझं कुटुंब संगीत क्षेत्राशी जोडलेलो असल्याने माझ्या आई वडिलांमुळे मला चांगल्या संगीताचा आस्वाद घ्यायची सवय लागली आणि त्यामुळेच माझे कान खूप परिपक्व झाले!

अमित त्रिवेदीचं संगीत आणि त्याची कारकीर्द बघून मला त्याच्यात दोन जुन्या मोठ्या संगीतकारांची आठवण होते, एक म्हणजे ओ पी नय्यर त्याच कारण असं की ओ पी यांच्या कोणत्याही गाण्याची जान म्हणजे त्यात वापरलेली हार्मोनियम आणि मेलडी अगदी तोच प्रकार मला अमितच्या संगीतात प्रकर्षाने जाणवतो फक्त इथे तो हार्मोनियम ऐवजी कीबोर्ड किंवा पियानोचा वापर करतो आणि अगदी तसेच माधुर्य त्याच्या गाण्यातून कानात उतरते.

दुसरे संगीतकार म्हणजे शंकर जयकिशन ही जोडी. जसं त्यांच्या गाण्यांमध्ये इन्स्ट्रुमेंटवाल्यांचा ताफा असायचा तसा अमित त्रिवेदीच्या काही गाण्यांमध्ये आहे..आणि त्याला या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं फार उत्तम जमतं म्हणूनच त्याचं कोणतही गाणं मोनोटोनस वाटत नाही!

 

amit trivde 2 IM

 

अगदी देव डी पासून नुकत्याच आलेल्या केदारनाथ, अंधाधुनपर्यंत त्याचं कोणतंही गाणं ऐका..काही न काही तरी नवीन प्रयोग त्यात तुम्हाला नक्कीच जाणवेल!

देव डी मधलं इमोशनल अत्याचार असो किंवा ‘वेक अप सिड’मधलं इकतारा असो दोन्ही गाणी आजही खूप फ्रेश वाटतात, इकतारा मधला तर फ्रेशनेस किमान पुढची १५ वर्ष तरी तसाच राहील इतके ते गाणं मनाला भिडणारं आहे.

ईश्कजादे आणि aiyaa चा तर पूर्ण अल्बम आजही तोंडपाठ आहे, काय पो चे मधलं शुभारंभ गाणं आजही ऐकलं तरी आपोआप गरब्याच्या ठेक्यावर नाचावंसं वाटतं.

‘क्वीन’मधलं लंडन ठुमकदा आणि इंग्लिश विंग्लिश मधलं नवराई लाडाची या गाण्यांसारखा फॅन बेस कोणत्याच गाण्याला नाहीये, शानदार आणि फितूर सिनेमे सुपर फ्लॉप असले तरी अमित त्रिवेदीच्या संगीतामुळे ते सिनेमे थोडेफार चालले!

उडता पंजाब मधलं इक कुडी आणि दादा डस्से या गाण्यातले शब्द परिचायचे नसले तरी ती गाणी आजही मनात घर करून आहेत.

 

udta punjab IM

डियर जिंदगी आणि सिक्रेट सुपरस्टार मधली गोड गाणी आजही किती इमोशनल करतात, ब्लॅकमेलसारख्या ब्लॅक कॉमेडी ला खतरनाक तडका फक्त हाच माणूस देऊ शकतो.

मनमर्जीयां सिनेमातलं दरिया हे गाणं आणि ती ट्यून पुढचे कित्येक वर्षे मी विसरू शकणार नाही! अंधाधून मधला अमितने केलेला पियानोचा वापर आणि त्याचे पियानो पिसेस अजूनही जसेच्या तसे कानात घोळतायत!

केदारनाथचं म्युझिक म्हणजे अमित त्रिवेदीच्या क्रिएटिव्हिटीचा कळस आहे..काफिराना गाणं ऐकताना मनात एक वेगळीच हळवी भावना येईलच आणि नमो नमो जी शंकरा गाणं डोळे बंद करून एका, त्या गाण्यातूनच तुम्हाला सूंदर केदारनाथचे आणि भगवान शंकराचे दर्शन होईल इतक्या भक्तीने ते गाणं अमितने गायलंय आणि कंपोझ केलय!

 

namo namo IM

 

तरी यात दोन सिनेमातल्या गाण्यांचा उल्लेख आत्ता करतो, ते सिनेमे म्हणजे उडान आणि लुटेरा! अमितची या सिनेमातली गाणी माझी सर्वात आवडती आहेत, या दोन सिनेमात त्याने त्याच्या पेटाऱ्यातल्या बहुतेक सगळ्याच चांगल्या चाली बाहेर काढल्या आहेतअसं मला वाटतं.

लुटेरा मधलं संवार लुं गाणं म्हणजे आमच्या जनरेशनला आमच्या संगीतकाराकडून मिळालेली आजवरची उत्कृष्ट मेलडी असंच म्हणेन त्यातून मोनाली ठाकूरचा प्रचंड गोड आवाज आणि तितकंच गोड संगीत ऐकून कान तृप्त होतात!

या सिनेमातलं शेवटचं गाणं झिंदा..या गाण्यात तर त्याने सर्वस्व पणाला लावून जगायचं सार सांगितलं आहे इतके ते काळजाला भिडत…त्यातले हे शब्द

“मेरे हाथों, हुआ जो किस्सा शुरू
उसे पूरा तो करना है मुझे
कब्र पर मेरे सर उठा के खड़ी हो ज़िन्दगी
ऐसे मरना है मुझे!”

 

ranveer singh IM

 

उडान मधलं नांव है तेरी हे गाणं तुम्ही आजही एकलं तरी एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्या मनात येईल इतकी सकारात्मकता त्या चालीत आणि त्या शब्दांमध्ये आहे!

“जिगर जुटा के पाल बाँध ले
है बात ठहरी जान (शान) पे तेरी
हैय्या हो की तान साध ले
जो बात ठहरी जान (शान) पे तेरी
चल जीत-जीत लहरा जा, परचम तू लाल फहरा जा
अब कर जा तू या मर जा, कर ले तैयारी
उड़ जा बन के धूप का पंछी
छुड़ा के गहरी छाँव अँधेरी,”

मोहन आणि जॉय बरूआ यांचा आवाज, अमित भट्टाचार्य यांचे शब्द आणि अमित त्रिवेदीचं उठावदार संगीत ही भट्टी पून्हा कधी जमतीये याच आशेवर मी आहे.

 

udaan IM

 

शिवाय याच सिनेमातल्या शेवटच्या सिन ला जेंव्हा तो नायक त्याच्या भावला घेऊन स्वतःच्या मार्गी जायला निघतो तेंव्हा येणारं आझादीयां हे गाणं आणि त्यातली म्युझिक अरेंजमेंट्स, व्हायोलिनचा ताफा, अतिशय सुंदर बँड आणि शब्द आजही आपल्याला निशब्द करतात.

संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि या ग्रेट माणसाने त्याच्या या अजरामर चालींनी सध्याच्या रिमिक्स आणि रिमेकच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान इंडस्ट्रीमध्ये आणि माझ्या सारख्या लाखो करोडो लोकांच्या मनात मिळवलं आहे.

तुम्हीसुद्धा संगीत प्रेमी आणि अमित त्रिवेदीच्या कामाचे फॅन असाल तर तुमच्याही मनात याच भावना नक्की उफाळून आल्या असतील.

 

amit trivedi 3 IM

 

त्यामुळे या माणसाला कोपरापासून दंडवत करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि लवकरच तुझी अशीच झकास गाणी पुन्हा कानावर पडोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना…धन्यवाद!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?