' मनसेच्या नेत्याने लाऊडस्पिकरवर हनुमान चालीसा लावली आणि… – InMarathi

मनसेच्या नेत्याने लाऊडस्पिकरवर हनुमान चालीसा लावली आणि…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राज ठाकरेंनी इतक्यातच केलेलं भाषण सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर नेतेमंडळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मनसेतल्या सदस्यांवर राज ठाकरे यांचा दबदबा असतोच. राजकीय वर्तुळात त्यांचा दबदबा नसला तरी त्यांनी काय म्हटलंय याची दखल नेहमीच घेतली जाते.

त्यामुळे, आपल्या कामगिरीपेक्षाही अधिक आपल्या भाषणांमुळे राज ठाकरे चर्चेत असणं हे आपल्याला नवं नाही. बरीच वर्षं सुरू असलेली एखादी कृती कधी राजकीय पेचाचं लक्ष्य ठरेल हे सांगता यात नाही. असंच काहीसं आता घडताना दिसतंय.

 

raj thackrey loudspeaker IM

 

शनिवारी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला मशिदींमधले लाऊडस्पिकरर्स काढून टाकण्याचा आदेश दिला. तसं जर झालं नाही तर आपण मशिदींसमोर लाऊडस्पिकर आणून त्यावर ‘हनुमान चालीसा’ लावू असा इशारा त्यांनी दिला होता.

त्यानंतर मनसेच्या एका नेत्याने मनसेच्या मुख्यल्यात लाऊडस्पिकरवर ‘हनुमान चालीसा’ लावली आणि त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. ५ हजारापेक्षाही जास्त दंड त्याच्यावर लावण्यात आला आहे. काय आहे हे सगळं वृत्त? जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत राज ठाकरे म्हणाले होते, “मी नमाजाच्या विरोधात नाही. तुम्ही तुमच्या घरी नमाज पढू शकता. मात्र सरकारने मशिदींमधले लाऊडस्पीकर्स हटवायचा निर्णय घेतला पाहीजे. मी आता आदेश देतोय… लाऊडस्पिकर हटवा नाहीतर मशिदीच्या समोर लाऊडस्पिकर लावू आणि ‘हनुमान चालीसा’ लावू.” रविवारी घाटकोपर मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी झाडांच्या वर लाऊडस्पिकर्स लावले आणि ‘हनुमान चालीसा’ लावली.

मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांनी आपल्या ऑफिसवर लाऊडस्पिकरवर ‘हनुमान चालीसा’ लावली. पोलिसांची कुठलीही परवानगी न घेता अशा प्रकारे मोठ्यांदा ‘हनुमान चालीसा’ लावल्यामुळे मुंबई पोलिसांनी महेंद्र भानुशाली यांनी अटक केली. याचबरोबर, ५,०५० रुपयांचा दंडही त्यांच्यावर लावला आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

 

mahendra bhanushali IM

 

“केवळ मीच नाही तर कुणीच परवानगी घेत नाही. त्यामुळे जर माझ्यावर कारवाई केली गेली आहे तर ती प्रत्येकावर केली जावी. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं आहे. राज (ठाकरे) साहेब म्हणतात ‘पोलिसांना कधीही काही म्हणू नका’ जिथेजिथे लाऊडस्पीकर्स वापरले जातात तिथे सगळीकडे कारवाई व्हायला हवी.”, भानुशाली म्हणाले.

यासंदर्भांत ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना भानुशाली म्हणाले, “मुंबई पोलिसांनी माझ्यावर ५,०५० रुपयांचा दंड लावलाय आणि नोटीस दिली आहे की पुन्हा जर मी असं केलं तर माझ्यावर कडक कारवाई केली जाईल. जर महाराष्ट्र सरकारने मशिदींमधून लाऊडस्पीकर्स हटवले नाहीत तर आमची पार्टी त्यांच्यासमोर मोठमोठे लाऊडस्पीकर्स लावून ‘हनुमान चालीसा’ वाजवेल.”

ते पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांना जे म्हणायचं होतं ते त्यांनी म्हटलंय. आदेश आलेला आहे. आम्ही बुधवारपासून आमच्या कार्यालयांमध्ये सकाळ-संध्याकाळ ‘हनुमान चालीसा’ लावणार आहोत. ती किती वाजता लावायची यावर विचार सुरू आहे. कुणाला त्रास द्यायचा आमचा हेतू नाही. मात्र १० मिनिटं आम्ही लाऊडस्पिकरचा प्रयोग करू. उद्यापासून तयारी सुरू केली जाईल. आम्ही लाऊडस्पीकर्सच्या ऑर्डर्स आधीच देऊन ठेवल्या आहेत.”

 

raj thackrey 3 IM

 

ते म्हणाले, “हिंदू प्रार्थनांमुळे वैर उत्पन्न व्हायला हवं का? जर कुणाला यामुळे (‘हनुमान चालीसा’मुळे) त्रास होत असेल तर त्यांनी आपले कान बंद करावेत आणि आपल्या घरांमध्ये जाऊन बसावं. अशा गोष्टींना जर ते विरोध करत असतील तर त्यांना उत्तर दिलं जाईल. काय झालंय ते थोडक्यात सांगायला मी उद्या राज साहेबांना भेटणार आहे.”

या सगळ्यावर भाजपाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी भानुशाली यांच्यावर दंड लावण्यासंदर्भात मुंबई पोलिसांना घेरलं आहे. लाऊडस्पीकरवरून अजान देणाऱ्यांवरही अशा प्रकारची कारवाई केली जाईल का असा सवाल त्यांनी ट्विट करून केला आहे.

राज ठाकरे यांनी सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं की १९९९ मध्ये त्यांच्या पक्षाची निर्मिती केल्यानंतर महाराष्ट्रात जातीय राजकारणाची जी वाढ झाली त्याला ते जबाबदार आहेत.

कोल्हापूरमधील पत्रकारांशी बोलताना पवार त्यावर म्हणाले की, “मनसेचे प्रमुख एखाद्या प्रश्नावर कधीच एकच भूमिका घेत नाहीत आणि वर्षातले तीन ते चार महिने “निष्क्रिय” राहणे हे त्यांचं “वैशिष्ट्य” आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्या जातींमधल्या लोकांना एकत्र आणतो. (अशी वक्तव्यं करण्यापूर्वी) राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासाचा अभ्यास करायला हवा होता.”

 

raj thackrey and shard pawar IM

 

रविवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील राज ठाकरेंच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भाजपाचं सरकार असलेल्या कुठल्या राज्यात अजान वर बंदी आणली गेलीये आणि मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवला आहे हे राज ठाकरे यांनी आधी पाहिलं पाहिजे. राऊत म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे आणि सगळं कायद्याप्रमाणे चालेल.

मनसे प्रमुखांचं भाषण हे भाजपाकडून ‘स्क्रिप्टेड’ आणि ‘स्पॉन्सर’ केलं गेलेलं होतं, असंही राऊत म्हणाले. “लाऊडस्पीकरच्या आवाजचं जे भाषण शिवाजी पार्क येथे झालं ते भाजपाकडून स्क्रिप्टेड आणि स्पॉन्सर्ड होतं हे स्पष्ट आहे.”, मनसे प्रमुखांच्या संदर्भात राऊत उघडपणे पत्रकारांना म्हणाले.

लाऊडस्पिकरवरून झालेलं हे राजकारण राजकीय वर्तुळात किती काळ तापतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मात्र जनतेच्या दृष्टीने खरोखर महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांना सोयीस्करपणे बगल देत काहीतरी खळबळजनक विधानं करून आणि समाजातल्या वाढत्या जातीय-धार्मिक तेढीबद्दल वरवरची कळकळ व्यक्त करून प्रसिद्धीत येण्याचा राजकारण्यांचा पूर्वापार चालत आलेला फॉर्मुल्या मजेशीर आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?