' राज यांच्या भाषणातली 'ही' गोष्ट तमाम मतदारांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहे

राज यांच्या भाषणातली ‘ही’ गोष्ट तमाम मतदारांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

खरंतर राजकीय काही लिहिणार नाही असं ठरवलेलं पण न राहवून आज लिहायला घेतलं. कालचं राज ठाकरे यांचं भाषण ऐकताना पुन्हा २००५ आणि २००६ सालच्या राज ठाकरेंची प्रकर्षाने आठवण झाली म्हणून हा लेखप्रपंच!

एका झंजावातासारखे राज यांनी तेव्हा महाराष्ट्र हादरवून सोडला होता, त्यांची भाषणं, त्यांचे विचार हे सगळं लोकांना पटत होतं. मी तेव्हा शाळेत होतो जेव्हा हे सगळं घडत होतं, बाळासाहेबांनंतर कोण? तर राज ठाकरे! शिवसेना सोडल्यानंतरही बाळासाहेबांनंतर राज यांचंच नाव घेतलं जायचं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राज यांच्या राजकीय कारकीर्दीवर टीका झाली. निवडणुकीतली सपशेल हार असो किंवा नाशिक महानगरपालिकेत केलेली चांगली कामं असो, राज यांच्यावर दरवेळेस टीकाच होताना आपण पाहिलं आहे.

 

raj thackrey inmarathi featured

 

यामागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला एक लक्षात येईल की राज यांच्या पक्षाची राजकीय भूमिका ही कायम बदलती होती. सुरुवात हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्याने झाली खरी पण नंतर मात्र मधल्या काळात त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत बिकट झाली.

निवडणुकीतील हार, नाशिक महानगरपालिका हातून जाणे, नंतर केंद्र सरकारवर केलेली जहरी टीका अशा अनेक कारणांमुळे राज यांच्या राजकीय भूमिकेवरच लोकांनी प्रश्नचिन्ह उभं करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर राज हे कायम त्यांच्या सोयीप्रमाणे पक्षाची भूमिका बदलतात असेही आरोप कित्येकांनी केले.

मात्र गुढीपाडव्याच्या महूर्तावर राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये भव्य सभा घेऊन त्यांच्या खास शैलीत या सगळ्याचा चांगलाच समाचार घेतला.

कोणताही राजकारणी हा धुतल्या तांदळाचा दाणा नाही, पण कालचं राज ठाकरे यांचं भाषण ऐकून एक सामान्य माणूस म्हणून असं वाटलं की खरंच नेता असावा तर असा!

 

raj thackrey 2 IM

 

राज यांच्या भाषणाची जादू आपण कित्येकदा अनुभवली आहे. राज यांचं भाषण हे फक्त करमणूक म्हणून नसतं, ते फक्त टिंगल करतात म्हणून लोकं त्यांची खिल्ली उडवतात, पण त्यांच्या भाषणाचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणात उमटतात!

रंग दे बसंती मध्ये मोहन आगाशे यांचा एक डायलॉग आहे “लोकांची स्मरणशक्ती कमजोर असते”! हेच राज यांनी त्यांच्या कालच्या भाषणातून आपल्याला पटवून दिलं की आपण किती सहजपणे झालेल्या गोष्टी विसरतो.

एकाअर्थी हे चांगलं आहे पण एक समाज म्हणून ही गोष्ट अत्यंत घातक आहे. गेल्या २ वर्षांचा आढावा राज यांच्या तोंडून ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की एक समाज म्हणून आपण योग्य लोकांच्या हाती सत्ता देण्यात असफल ठरतो तेदेखील नेहमीच.

राजकारणात कुणीच पूर्णपणे सर्वगुणसंपन्न नसतं की कुणीच पूर्णपणे व्हिलन नसतं, सुवर्णमध्य गाठून त्यातल्या त्यात योग्य कोण हे आपल्याला निवडून द्यायचं असतं पण त्यातही आपण दरवेळेस पूर्णपणे असफल ठरतो, हे काल जाणवलं!

२०१९ साली जे काही नाट्य घडलं ते आपण विसरलो, जनतेचा कौल डावलून केवळ खुर्चीसाठी ज्यापद्धतीचं गचाळ राजकारण केलं गेलं ते आपण विसरलो, वाझे प्रकरण आपण विसरलो, सुशांत सिंग प्रकरण विसरलो, नवाब मलिक प्रकरण विसरलो.

 

nawab malik anil parab IM

 

महाविकास आघाडी ऐवजी भाजपा किंवा इतर पक्ष सत्तेत असता तर हे सगळं घडलंच नसतं असं कुणीच म्हणत नाहीये, पण राज यांच्या भाषणातली एक गोष्ट मनाला लागली ती म्हणजे “ही लोकं निर्लज्जपणे या सगळ्या गोष्टी आपल्या नाकावर टिच्चून करतायत, आपण यांचं काहीच वाकडं करू शकत नाही!”

खरंच गेल्या अडीच वर्षात प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट एकदातरी आलीच असेल, ती फक्त काल राज यांनी उघडपणे बोलून दाखवली इतकंच!

शरद पवारांचा राजकीय सल्ला घेणं असो किंवा त्यांची घेतलेली जाहीर मुलाखत असो, तरी त्यांनीच जातीचं राजकारण सुरू केलं हे उघडपणे म्हणणारा बाळसाहेबांनंतर एकमेव नेता तो म्हणजे राज ठाकरे!

ज्यापद्धतीने गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी कोंग्रेसने जातीवरून होणाऱ्या राजकारणाला खतपाणी घातलं ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. काल फक्त राज यांच्या भाषणातून सामान्य माणसाच्या मनातली ती खदखद बाहेर पडली.

 

sharad-pawar-inmarathi

 

शरद पवार हे राजकारणात किती मुरलेले आहेत हे जसं आपण जाणतो तसंच राजदेखील जाणतात, त्यामुळे पुढे भविष्यात मनसे-राष्ट्रवादी युती जरी झाली तरी त्यात एवढं आश्चर्य वाटून घेण्यासारखं काही नसेल कारण ३ नंबरचा पक्ष पहिल्या २ पक्षांना फिरवू शकतो तर तिथे राज यांच्या पक्षालासुद्धा तो नक्कीच त्यांच्या बाजूने फिरवू शकतो.

असो, या सगळ्या जर तरच्या गोष्टी झाल्या अर्थात राजकारणात आज एखादा तुमचं शत्रू असेल तर तो परवा घनिष्ट मित्रही होऊ शकतो हे आपण गेल्या अडीच वर्षात अनुभवलं आहेच!

या सगळ्या जातीच्या पलीकडे जाऊन राज यांनी मूळ मुद्द्याला म्हणजेच हिंदुत्वाच्या मुद्द्याला जेव्हा हात घातला तेव्हा खरंतर खूप लोकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे कित्येकांनी या भाषणावर भरकटलेलं भाषण म्हणून बरीच टीका केली, पण राज यांनी सत्य परिस्थितीच आपल्यापुढे मांडली.

जोवर आपण या जातीच्या दलदलीतून बाहेर पडणार नाही तोवर कोण हिंदू आणि कसलं हिंदुत्व? त्यांनी मांडलेले इतर मुद्दे तुम्हाला पटतील किंवा नाही पटणार पण हिंदू आणि हिंदुत्वाबद्दल राज जे बोलले ते अगदी खरंय, हेच हिंदुत्व राज यांना शोभून दिसतं!

 

raj 2 IM

 

दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या राज्यांचा विचार करणारे त्यांचा मान ठेवणाऱ्या राज यांनी त्यांच्या या राजकीय भूमिकेबाबत कायमच असं unapologetic असावं असंच मला वाटतं आणि कालच्या भाषणामधून तर प्रखरतेने जाणवलं.

कालच्या राज यांच्या भाषणावर बऱ्याच लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आणि हीच ती काही लोकं आहेत जी म्हणतात आम्ही राज ठाकरे यांना सीरियसली घेत नाही, काय ही विडंबना!

राज यांच्या कालच्या भाषणातून बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या होत्या पण त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदारांनी, म्हणजेच आपण आपला स्वाभिमान जपला पाहिजे. सत्तेत कुणीही असो, रिमोट कंट्रोल आपल्याकडेच असला पाहिजे.

कठीण आहे हा बदल घडणं, आणि असा एका झटक्यात हा बदल होणं अशक्यच आहे पण याची सुरुवात आता करायलाच हवी. तुम्ही मत कुणालाही द्या पण जर आपण असेच लाचारासारखे जीवन जगणार असू तर या मतदानाला आणि या निवडणुकांनाही खरंच काही अर्थ नाही!

राज ठाकरे सत्तेत येवो अथवा न येवो त्यांच्या भाषणातली ही गोष्ट एक सामान्य नागरिक म्हणून आणि जबाबदार मतदार म्हणून आपण ध्यानात ठेवली पाहिजे, तर आणि तरच हा बदल घडू शकतो!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?