' मीनाकुमारी ते बोरीस बेकर: या कलाकारांचं गरिबीत जगणं पैशांच्या गुंतवणुकीचं महत्त्व पटवून देतो – InMarathi

मीनाकुमारी ते बोरीस बेकर: या कलाकारांचं गरिबीत जगणं पैशांच्या गुंतवणुकीचं महत्त्व पटवून देतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – नितीन एस. धर्मावत

===

वैयक्तिक वित्ताहून अधिक महत्त्वाचं काही नाही आणि बरेच जण आपल्या उमेदीच्या काळात अगदी व्यवस्थित कमवूनसुद्धा या बाबतीत अपयशी ठरतात. दुर्दैवाने, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात वैयक्तिक वित्तावर भर दिला जात नाही.

शिवाय, कुटुंबामध्ये लहान मुलांशी आर्थिक बाबींसंदर्भात उघडपणे चर्चा केली जात नाही. त्यामुळे पैशाचं, बचतींचं आणि गुंतवणूकींचं महत्त्व समजून घ्यायला त्यांना कुठलीच पार्श्वभूमी नसते.

जेव्हा ही लहान मुलं मोठी होतात, यशस्वी होतात तेव्हाही त्यांच्याकडे वैयक्तिक वित्तातल्या मूलभूत कौशल्यांची कमतरता असते. पैशाच्या, गुंतवणुकींच्या, बचतींच्या महत्त्वाकडे फारसं कौतुकाने पाहीलं जात नाही.

अशा प्रकारच्या बऱ्याच उदाहरणांमध्ये ते गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करतात. विशेषतः ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असतात तेव्हा पैशांचा ओघ आपल्याकडे कायम असेल असा विचार ते करतात, पण असं होत नसतं. ज्या दिवशी त्यांना व्यावसायिक आघाडीवर उतरती कळा लागते तेव्हापासून त्यांची आर्थिक अडचणींचा सामना करायला सुरुवात होते. अशा परिस्थितीतली घसरण ही बऱ्याचदा वेगाने होते आणि बऱ्याच वेळा हे नुकसान भरून न येणारं असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक संघर्षाला सामोरं जावं लागलेल्या बॉलिवूडशी संबंधित सेलिब्रिटीजची अनेक उदाहरणं आहेत. भारत भूषण, भगवान दादा, मीना कुमारी, नवीन निश्चल, एके हंगल, विमी, राज किरन, ओ. पी. नैय्यर, अचला सचदेव, सतीश कौल या आणि अशा काही मंडळींचा यात समावेश होतो.

ही यादी न संपणारी आहे. ते ज्या प्रकारचं आयुष्य जगले त्यावरून मी हे म्हणणं मांडतो आहे. आपण कमावते असताना आपल्या आर्थिक उत्पन्नाचं व्यवस्थापन आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे करता यावं यासाठी हे धडे आपल्या प्रत्येकाकरता आहेत. यातली बरीचशी माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्द्ध आहे.

सतीश कौल हे टीव्ही आणि पंजाबी चित्रपटांमधले अतिशय यशस्वी अभिनेते होते. बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतील देवराज इंद्र आणि सुभाष घई यांच्या कर्मा आणि राम लखन या मालिकांसोबत आणखी बऱ्याच मालिकांमध्ये त्यांनी कामं केली.

त्यांच्या उमेदीच्या काळात ते सेलिब्रिटी होते. मात्र वृद्धापकाळात त्यांना पोटापाण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यांच्या उमेदीच्या काळात ते काम करत असताना त्यांनी पैशांची बचत आणि गुंतवणूक नीट न केल्यामुळे त्यांच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीला केवळ तेच जबाबदार होते.

 

satish kaul im

 

त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट झाली होती, की त्यांना वृद्धाश्रमात रहावं लागलं आणि चांगल्या मदतगार व्यक्तींनी त्यांची काळजी घेतली. औषधं, किराणा सामान आणि मूलभूत गरजांसाठी ते संघर्ष करत होते. त्यांच्या उमेदीच्या दिवसांमध्ये ते टेलिव्हिजन, बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांमधल्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होते आणि तेव्हा ते अगदी घसघशीत कमाई करत असावेत.

असंच काहीसं उदाहरण भारत भूषण यांचं. आताच्या पिढीतल्या बऱ्याच जणांनी त्यांचं नाव कदाचित ऐकलं नसेल. पण १९५० आणि ६०च्या दशकांत ते बॉलिवूडमधले आघाडीचे अभिनेते होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मुंबईत त्यांच्या मालकीचे बंगले होते. आपल्या भावाच्या विनंतीवरून सह-निर्माता झाल्यानंतर त्यांच्या वाईट काळात त्यांना आपले बंगले आणि कार्स विकाव्या लागल्या.

त्यांचे काहीच चित्रपट चालले आणि दुर्दैवाने बाकीचे अयशस्वी ठरले. पैशाच्या बाबतीत आपल्या नातलगांवर विश्वास ठेवताना बचतींचं आणि गुंतवणूकींचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं नाही.

 

money inmarathi

 

१९८०च्या दशकात पोटापाण्यासाठी त्यांच्यावर छोटे साईड रोल्स स्वीकारण्याची वेळ आली. १९९२ साली अत्यंत हालाखीच्या आर्थिक परिस्थितीत त्यांचं निधन झालं. त्यांच्या उमेदीच्या काळात अतिशय यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असलेल्या त्यांच्या बाबतीत हे का घडलं?

विमी यांची कहाणी याहूनही अधिक दुर्दैवी आहे. मुंबईच्या सोफिया महाविद्यालयातून मानसशास्त्र हा विषय घेऊन त्या पदवीधर झाल्या आणि हार्डवेअर बिझनेसमध्ये असलेल्या कलकत्यात राहणाऱ्या शिव अग्रवाल या बिझनेसमनशी त्यांनी लग्न केलं.

त्यांचं नशीब जोरावर होतं आणि त्यांना बीआर चोप्रा यांच्या सु ‘हमराझ’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली. बॉक्स ऑफिस वर हा चित्रपट हिट झाला आणि त्या लगेचच स्टार झाल्या.

विमी या स्टाईल आयकॉन होत्या. मार्च १९६८ च्या फिल्मफेअरच्या कव्हरसकट प्रत्येक बड्या चित्रपट मासिकांमध्ये त्यांचे फोटो शूट्स दिसले. आपण चित्रपट क्षेत्रात येण्यामागे पैसा हे कारण नाही हे त्यांनी सुरुवातीलाच अगदी स्पष्ट केलं होतं.

त्यांच्याकडे पाली हिल अपार्टमेंट, डिझायनर कपडे, मिंक कोट आणि स्पोर्ट्स कार होती. गोल्फ, बिलियर्ड्स खेळायला आणि लॉन्ग ड्राइव्हवर जायला त्यांना आवडायचं, पण त्यांच्या पैशांबाबतीतल्या या निष्काळजी वृत्तीने त्यांना रसातळाला नेलं. त्या आणि त्यांचा नवरा वेगळे झाले. त्या एका सिनेमा दलालासोबत राहायच्या ज्याने त्यांचा सतत छळ केला.

 

actress vimi im

 

कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपल्या कलकत्त्यातल्या विमी टेक्स्टाईल्स या व्यवसायावर पाणी सोडावं लागलं. आसपास कुणीही काळजी घ्यायला, प्रेम द्यायला नसताना एकाकी पडून त्यांना अत्यंत गरिबीत मरण आलं. त्या वेश्याव्यवसायात गेल्या होत्या आणि वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहत होत्या असंदेखील लिहिलं गेलं होतं.

बॉलिवूडमधलं यश म्हणजे काय याचं खऱ्या अर्थाने कुठली अभिनेत्री प्रतीक असेल तर ती म्हणजे मीना कुमारी. ती ‘द ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखली जाते. १९३९ ते १९७२ या काळात ती सक्रिय होती. हिंदी सिनेमातली ‘ऐतिहासिकदृष्ट्या अतुलनीय’ अभिनेत्री असं समीक्षकांनी मीना कुमारीचं वर्णन केलं होतं.

त्यांच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत त्या ‘साहिब बिबी और गुलाम’, ‘पाकिझा’, ‘मेरे अपने’, ‘आरती’, ‘बैजू बावरा’, ‘परिणीता’, ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘फूट पाथ’, ‘दिल एक मंदिर’ आणि ‘काजल’ अशा ९० चित्रपटांमधून दिसल्या होत्या. त्यांच्या काळातल्या जवळपास सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत त्यांनी कामं केली.

 

meenakumari im

 

‘सर्वोकृष्ट अभिनेत्री’ या श्रेणीअंतर्गत त्यांना ४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. १९५४ मध्ये ‘बैजू बावरा’ या चित्रपटकरता त्या फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराच्या उद्घाटनाच्या मानकरी ठरल्या होत्या आणि त्यानंतर १९५५ साली सलग दुसऱ्या फिल्मफेअरमध्ये त्यांना ‘परिणीता’ या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला.

१९६३ साली १०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोकृष्ट अभिनेत्री’ या श्रेणीअंतर्गत तिन्ही नामांकन मिळवून त्यांनी इतिहास रचला आणि त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम’ या चित्रपटातल्या अभिनयासाठी त्यांना पुरस्कार मिळाला.

चित्रपटक्षेत्रात इतकं उल्लेखनीय करियर घडवल्यानंतरही त्या निर्धन होऊन त्यांना मरण आलं. हॉस्पिटलची बिलं भरायलाही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते.

ही काहीच उदाहरणं झाली. अशी आणखी बरीच उदाहरणं आहेत. मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे, ही यादी न संपणारी आहे. शिवाय, हे केवळ भारतापुरतंच मर्यादित नाही. जगभरात अशीच परिस्थिती आहे. आपल्या कारकिर्दीत १३० मिलियन डॉलर कमावलेले बोरिस बेकरसारखे सेलिब्रिटीज आपल्याकडे आहेत, पण तरीही तो कर्जबाजारी झाला आणि अगदी ‘ऐतिहासिक’ म्हणावं असं कर्ज त्याच्या नावावर जमा झालं.

त्याचप्रमाणे, माईक टायसन हा अतिशय प्रसिद्ध बॉक्सर त्याच्या पैशांच्या अपुऱ्या व्यवस्थापन कौशल्यांमुळे कर्जबाजारी झाला.

 

mike tyson im

 

डाइगो माराडोना हा जगातला सर्वाधिक वेतन मिळणारा फुटबॉलपटू होता. पण त्याच्या बँक खात्यात काहीही रक्कम शिल्लक नव्हती इतक्या गरिबीत त्याला मरण आलं.

या सगळ्यांमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत :

• वर्तमानातल्या उत्पन्नावरून ते किती वाढेल याचा अंदाज बांधणे
• उमेदीच्या काळात मिळणाऱ्या उत्पन्नाएवढं उत्पन्न शेवटपर्यंत मिळेल असं गृहीत धरणे
• गरजेपेक्षा जास्त पैसे उधळणे
• स्वतःच्या क्षमतेवरचा अति-आत्मविश्वास आणि अपुरी व्यवस्थापन कौशल्यं
• दिखावा करायला पैसे खर्च करणे
• व्यवस्थित गुंतवणुकी आणि आर्थिक नियोजनाचा अभाव
• खूप संधी घेणे

खऱ्या जगात, आपल्याला वाटतं त्याप्रमाणे गोष्टी क्वचितच घडतात आणि आपली निराशा होते. एकाच पगारातून बरेच पैसे आणि संबंधित गोष्टींची गुंतवणूक करणे म्हणजे श्रीमंत होणं नाही हे लक्षात घ्या; दीर्घकाळ नियमितपणे गुंतवणूक करण्याचा तो परिणाम असतो.

आज गुंतवलेले पैसे तुमच्या उद्याच्या कमाईचा स्रोत असतात. त्यासाठी नियमितपणे पैशांची बचत करून कर्ज फेडण्यास पुरेसे ठरतील अशा प्रकारे ते गुंतवणं गरजेचं असतं. आज जर तुम्ही एक व्यवस्थित कमावणारी व्यक्ती असाल, तर भविष्यासाठी पैसे कसे वाचवता येतील याची अधिक काळजी घ्या.

वारेन बफेट म्हणालाय ते योग्यच आहे, “ज्या गोष्टींची गरज नाही त्या जर तुम्ही विकत घेत असाल, तर लवकरच तुमच्या गरजेच्या वस्तू तुम्हाला विकाव्या लागतील.”

नितीन हे ‘औरुम कॅपिटल’ या SEBI रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषक कंपनीचे एक संस्थापक आहेत. या लेखात कुठल्याही वैयक्तिक शिफारसी आणि सल्ला दिलेला नाही. niteen.dharmawat@aurumcapital.in या इमेल आयडीवर किंवा @niteen_india या ट्विटर हँडलवर नितीन यांच्याशी संपर्क साधता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?