' गडकरींची 'इकोफ्रेंडली हायड्रोजन' कार, सामान्यांना फायदेशीर ठरणाऱ्या गाडीची खासियत बघा

गडकरींची ‘इकोफ्रेंडली हायड्रोजन’ कार, सामान्यांना फायदेशीर ठरणाऱ्या गाडीची खासियत बघा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘पेट्रोल-डिझेल महागलं’ हा आता जवळपास रोजच्या बातमीचा मथळा झाला आहे. निवडणुकांची रणधुमाळी संपली, की इंधनाचे भाव पुन्हा वाढू लागतील अशी चर्चा १० मार्चच्या आधीपासूनच सुरु होती. त्यातच रशिया-युक्रेन युद्ध सुद्धा थांबत नसल्याने, इंधन दरावर अधिक ताण येत असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय.

या सगळ्यात पेट्रोल दरवाढीसह इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. इंधनाचे दर परवडत नसल्याने, लोकांनी इलेक्ट्रिक वेहिकलकडे आपला मोर्चा वळवला आहे.

वाढत्या प्रदूषणाचा त्रास लक्षात घेता, केंद्र सरकार सुद्धा सातत्याने इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या गाड्यांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतंय.

परिवहन मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे नितीन गडकरी यांचा यात पुढाकार आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. केवळ बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून सुद्धा त्यांनी याविषयी व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.

 

nitin gadkari im

 

याचंच ताजं उदाहरण म्हणजे त्यांनी हायड्रोजन कारमधून संसदेत मारलेली एंट्री! पण त्यांनी संसदेत आणलेली ही हायड्रोजन कार नेमकी आहे तरी कशी? चला आज जाणून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बोले तैसा चाले…

गेली काही वर्षे नितीन गडकरी सातत्याने हायड्रोजन इंधनाचा वापर करावा यासाठी जनतेला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. पाण्यापासून बनणाऱ्या ग्रीन हायड्रोजनचा वापर करून चालणारी वाहनं हेच भविष्य असल्याचं त्यांचं म्हणणं त्यांनी अनेकदा मांडलं आहे.

‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे ‘आत्मनिर्भर’ बनण्यासाठी हायड्रोजन वाहनांचा वापर करावा असं म्हणणारे गडकरी स्वतः हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीतून संसदेत आले.

 

car im

 

त्यांनी वापरलेली ही गाडी म्हणजे एक पायलट प्रोजेक्ट असून, हा प्रयोग यशस्वी करण्याचा त्यांचा निर्धार आहे. यामुळे देशात हायड्रोजन इंधनाची निर्मिती सुद्धा सुरु होईल आणि रोजगार निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणावर होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. लवकरच भारत हा हायड्रोजन निर्यात करणारा देश बनेल असा विश्वास सुद्धा गडकरी व्यक्त करतात.

दिल्लीच्या वास्तव्यात लवकरच ते हायड्रोजन कारने प्रवास सुरु करतील, अशी घोषणा गडकरी यांनी जानेवारी महिन्यातच केली होती. त्यानुसार, त्यांनी आपलं म्हणणं खरं करून दाखवलं असून, याचा प्रत्यय आता सगळ्यांनाच आलेला आहे. टोयोटाची निर्मिती असणाऱ्या मिराई या गाडीतून प्रवास करायला त्यांनी सुरुवात केली आहे.

टोयोटा मिराई रस्त्यांवर धावणार…

 

hydrogen car im 1

 

काही दिवसांपूर्वीच गडकरी यांच्या हस्ते या गाडीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. टोयोटा कंपनीची निर्मिती असलेली मिराई ही कार हाइड्रोजन एडवांस्ड फ्यूल सेल इलेक्ट्रिक वाहन आहे. या गाडीत केवळ पाच मिनिटांमध्ये इंधन भरणं शक्य आहे, आणि एकदा इंधन पूर्णपणे भरून घेतलं की तब्बल ६४६ किमी चालण्याची क्षमता या गाडीत आहे, असं टोयोटाने जाहीर केलं आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटर और इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने हे पायलट प्रोजेक्ट हाताळलं जात आहे. या इंधनावर भारतात गाडी चालवणं किती उपयुक्त आणि फायदेशीर ठरू शकतं यावर अधिकाधिक संशोधन करण्यावर भर देण्यात येत आहे.

ग्रीन हायड्रोजन हा पारंपरिक इंधनाचा एक उत्तम पर्याय आहे. लांबचा पल्ला गाठण्यासाठी सुद्धा या इंधनावर चालणारी गाडी फायदेशीर आणि उपयुक्त ठरू शकते असं म्हटलं जात आहे.

 

hydrogen car im

 

मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न करणारं हे इंधन सगळ्या प्रकारच्या गाड्यांमध्ये वापरणं शक्य आहे. या गाडीमधून बाहेर पडणारी एकमेव टाकाऊ गोष्ट म्हणजे पाणी! मग हा पर्याय उत्तम का ठरू नये!

दोन वर्षात किंमत होणार कमी…

हायड्रोजनवर चालणाऱ्या या गाडीत एका हाय प्रेशर टॅंकमध्ये गॅस भरलेला असतो. तो वीजनिर्मितीसाठी फ्युएल सेलमध्ये जातो. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक क्रियेतून वीजनिर्मिती होते. हीच वीज मग गाडी चालवण्यासाठी वापरली जाते.

सध्या हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांपेक्षा अधिक आहे. मात्र ग्रीन इंधनाच्या अधिक वापरामुळे हळूहळू ही स्थिती बदलू शकते. येत्या दोन वर्षात या वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांप्रमाणे होऊन जाईल असं भाकीत गडकरी यांनी केलं आहे.

अगदी सामान्य माणसांच्या वापरातील स्कूटर, कार आणि रिक्षा यांची किंमत सुद्धा पेट्रोलवर चालणाऱ्या एकसमान वाहनाच्या किंमतीएवढी होईल असं गडकरी यांनी म्हटलं आहे. दोन वर्षात ही परिस्थिती नक्कीच पाहता येईल अशी खात्री त्यांना आहे.

लिथियम-आयन बॅटरीची किंमत कमी होत असून, इतर अनेक पर्याय आणि त्याविषयी संशोधन सुरु आहे. ग्रीन इंधन असणाऱ्या गाड्या वापरणं फारच श्रेयस्कर ठरणार आहे. जिथे पेट्रोल गाडीसाठी १०० रुपये मोजण्याची गरज पडते, तिथे या गाड्यांसाठी अवघी १० रुपये किंमत मोजावी लागेल. म्हणजेच आर्थिक दृष्ट्या सुद्धा या गाड्या वापरणं फारच सोयीचं असणार आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?