' काश्मीर फाईल्समधून घराघरात पोहोचलेला हा अभिनेता एकेकाळी पाण्यात बिस्कीट बुडवून खायचा – InMarathi

काश्मीर फाईल्समधून घराघरात पोहोचलेला हा अभिनेता एकेकाळी पाण्यात बिस्कीट बुडवून खायचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखादा चेहरा अचानक प्रकाशझोतात येतो आणि लोकांच्या चर्चेचा विषय बनतो. पण बऱ्याचदा तो चेहरा प्रकाशझोतात येण्यापूर्वी त्याचं आयुष्य कसं होतं याची लोकांना कल्पना नसते.

घरात अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या, सिनेसृष्टीशी काहीही संबंध नसलेल्या बऱ्याच कलाकारांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर आणि समोर येईल त्या आव्हानावर मात करत चित्रपटसृष्टीत आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. शाहरुख खान, नवाझुद्दीन सिद्दीकी ही त्यातली पटकन डोळ्यांसमोर येणारी उदाहरणं.

अशा स्वतःच्या हिमतीवर नाव कमावलेल्या बड्या कलाकारांचा घवघवीत यश मिळण्यापूर्वीचा खडतर प्रवास आपल्याला कळतो तेव्हा त्यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीवर, यशावर, पैशांवर त्यांचा नक्कीच हक्क आहे अशी भावना आपल्या मनात येते.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दमदार अभिनय करणारा दर्शन कुमार हा अभिनेता आता घराघरात पोहोचला आहे. या चित्रपटातले सगळेच अभिनेते-अभिनेत्री सरस अभिनय करणारे असले तरी दर्शन कुमारचा चित्रपटातला अभिनय त्यांच्याइतकाच लक्षवेधी ठरलाय.

 

darshan kumar im

 

हे यश मिळेपर्यंतचा दर्शन कुमारचा प्रवास किती खाचखळग्यांनी भरलेला होता, इथवर पोहोचेपर्यंत त्याला किती वर्षं वाट पाहावी लागली हे तुम्हाला माहितीये? जाणून घेऊया त्याविषयी.

दक्षिण दिल्लीतल्या किशनगढ या गावातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेला दर्शन कुमार वयाच्या २४व्या वर्षी अभिनय क्षेत्रात करियर करायचं म्हणून मुंबईत आला, पण मुंबईत आल्यानंतर त्याला प्रचंड संघर्षांला सामोरं जावं लागलं. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तो ५ वर्षं ‘सहेज थिएटर ग्रुप’मध्ये ‘थिएटर आर्टिस्ट’ म्हणून काम करायचा.

इथे असतानाच त्याला दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. २००१ साली ‘मुझे कुछ केहना है’ या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. याचा अर्थ आज तो आपलं जे नाव झालेलं पाहतोय त्यामागे त्याची तब्बल २० वर्षांहूनही अधिक काळाची मेहनत आहे.

२००३ साली आलेल्या सलमान खानच्या ‘तेरे नाम’ या बहुचर्चित चित्रपटात त्याने एक किरकोळ सहाय्यक भूमिका केली होती. दर्शनने २००८ साली झी टीव्हीवरच्या ‘छोटी बहू’ या मालिकेत ‘पुरब’ हे पात्र साकारून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. त्याने दोन वर्षं या मालिकेत काम केलं.

२०१० साली त्याने ‘बाबा ऐसा वर ढुंडो’ या इमॅजिन टीव्ही वरील मालिकेत म्रिदंग लाल या पात्राची भूमिका साकारली होती. २०११ साली तो लाईफ ओके वरच्या त्या काळी चांगल्याच गाजलेल्या ‘देवों का देव महादेव’ या पौराणिक मलिकेत ‘आदी शुक्राचार्य’ यांच्या भूमिकेत दिसला होता, पण टेलिव्हिजनवर इतकं चांगलं काम करूनही त्याच्या अभिनय क्षमतेला न्याय देईल अशी ओळख त्याला मिळत नव्हती.

प्रत्येक भूमिका मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागायचा. २०१४ साली आलेल्या ‘मेरी कॉम’ या मेरी कॉमच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये मेरीकॉमच्या नवऱ्याची म्हणजेच ‘ओन्लर कॉम’ यांची भूमिका त्याला साकारायला मिळाली तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या करियरने वेग पकडला. आता ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातलया त्याच्या उत्तम अभिनयामुळे त्याला आधीपेक्षाही चिक्कार प्रसिद्धी मिळतेय.

 

darshan kumar im 4

 

सिद्धार्थ कननबरोबरच्या एका मुलाखतीत त्याच्या दोन दशकांच्या करियरमध्ये त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं का असं विचारलं गेलं तेव्हा मागे वळून आपल्या संघर्षमय दिवसांकडे पाहताना तो भावूक झाला आणि आपल्या प्रवासाचं त्याने ‘रोलर कोस्टर राईड’ अशा शब्दांत वर्णन केलं.

या मुलाखतीत तो म्हणाला, “हो. मी अनेक संघर्षांतून गेलो. हा प्रवास माझ्यासाठी रोलर कोस्टर राईड होता. मी जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा खूप भावूक होतो. सुरवातीपासून आतापर्यंतचा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. ऑडिशन्स देण्यासाठी आम्हाला मुंबईच्या बाहेर जाऊन खूप दूर पर्यंत प्रवास करावा लागायचा.

एकदा आम्हाला फॉर्मल कपड्यांमध्ये जायचं होतं आणि चांगल्यातले बूट घ्यायची माझी ऐपत नव्हती त्यामुळे मी अंधेरीतून साधारण २००-३०० रुपयांचे बूट खरेदी केले आणि त्यानंतर बराच काळ मी तेच वापरत होतो. माझ्याकडे बससाठी पैसे नसायचे त्यामुळे मी चालतच सगळ्या ऑडिशन्सना जायचो.

बसचे पैसे वाचवून मी त्या पैशात पारले जीचा पुडा विकत घायचो. जर चहा मिळाला तर ठीक. नाहीतर मी पाण्यात बुडवून बिस्किटं खायचो कारण त्याच्यावरच मला पुढचा अख्खा दिवस काढायचा असायचा.”

एकदा ऑडिशनवरून परत येताना आपले बूट फाटल्यामुळे आपल्याला बरेच किलोमीटर्स अनवाणीच चालत यावं लागलं होतं अशी आठवण दर्शनने सांगितली.

 

darshan kumar im 3

 

तो म्हणाला, “साधारण रात्री ९-१० च्या दरम्यान मी चालत चालत परतत होतो आणि माझे बूट खालच्या बाजूने फाटले. मी धड चालू शकत नव्हतो. लंगडत चालत होतो. मला जवळपास कुणी मोचीही दिसला नाही. त्यामुळे मी माझे बूट हातात घेतले आणि जवळपास ५ ते ७ किलोमीटर तसाच चालत गेलो.” त्याच्याकडे बाहेर खाण्यासाठी विकत घ्यायला पैसे नसायचे त्यामुळे अशाही अनेक रात्री गेल्या जेव्हा त्याला उपाशी पोटी झोपावं लागलं होतं असंही त्याने सांगितलं.

मेरी कॉम चित्रपटानंतर आपल्याला भरपूर प्रेम मिळालं असं त्याने सांगितलं पण त्यानंतरही त्याने चांगलं काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवला आणि आपण टाइपकास्ट होणार नाही याची दक्षता घेतली.

‘एनएच १०’, ‘सरबजीत’, ‘अ जंटलमन’, ‘बाघी २’, ‘तूफान’ या चित्रपटांतून तो मोठ्या पडद्यावर झळकला होता. २०१५ साली आलेल्या ‘एनएच १०’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या ‘सतबीर’ या पात्राच्या खलनायकी भूमिकेसाठी त्याला उत्कृष्ट अभिनयाचा ‘आयफा’ पुरस्कार मिळाला होता.

 

darshan kumar im 2

 

२०१९ साली ‘झी ५’वरील ‘परछाई’ या वेब सिरीजमधून त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. त्यानंतर तो आपल्याला ‘द फॅमिली मॅन’, ‘अवरोध द सेईज’ आणि ‘आश्रम’ या वेब सिरीजमधून दिसला आहे. सध्या ‘द काश्मीर फाईल्स’मधल्या त्याच्या भूमिकेवर लोक कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

दर्शनची ही यशोगाथा सिनेसृष्टीत करियर करू इच्छिणाऱ्या अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. झटपट प्रसिद्धी मिळूनही आपल्या कौशल्यांची चुणूक न दाखवू शकणाऱ्या अनेकांच्या दुनियेत दर्शनसारखी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कितीही कठीण आव्हानांचा सामना करण्याची तयारी दाखवणारी, अतिशय संयमी, मजल दरमजल करत यशाच्या पायऱ्या चढणारी माणसं दुर्मिळ ठरतात हेच खरं. अशाच उत्तम कलाकृतींतून दर्शनने याहीपुढे आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवावं हीच सदिच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?