' देव भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २६ – InMarathi

देव भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २६

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २५

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

रामेश्वरभटांच्या घरचा आबाचा पहिला दिवस सुरळीत पार पडला. दुसऱ्या दिवशी आबा आणि नारायण एकत्र आहेत असे पाहून रामेश्वरभटांनी आपणहूनच विषय काढला. म्हणाले,

आबा, तुम्ही काल विचारलात तो प्रश्न खुद्द तुकोबांनाच एकदा विचारला गेला होता. कुणीतरी त्यांना त्यांचा जीवनप्रवास कसा झाला ते विचारले होते. तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यात काय कसे घडले ते स्वतःच सांगितले आहे. तुकोबा म्हणतात,

 

 

याती शूद्र वैश्य केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ।।

नये बोलो तरी पाळिले वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ।।

संवसारें जालों अतिदुःखे दुःखी । मायबाप सेखीं क्रमिलिया ।।

दुष्काळे आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली ।।

लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे । वेवसाय देखें तुटी येतां ।।

देवाचे देऊळ होते ते भंगले । चित्तासी जें आलें करावेसें ।।

आरंभी कीर्तन करी एकादशी । नव्हते अभ्यासीं चित्त आधी ।।

काही पाठ केलीं संतांची उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ।।

गाती पुढे त्यांचे धरावे धृपद । भावें चित्त शुद्ध करोनिया ।।

संतांचे सेविले तीर्थ पायवणी । लाज नाही मनीं येऊं दिली ।।

टाकला तो कांही केला उपकार । केले हे शरीर कष्टवूनि ।।

वचन मानिले नाही सुहृदाचे । समूळ प्रपंचे वीट आला ।।

सत्यअसत्यासी मन केले ग्वाही । मानियेलें नाही बहुमतां ।।

मानियेला स्वप्नीं गुरुचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ।।

यांवरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्ती विठोबाचे ।।

निषेधाचा कांही पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ।।

बुडविल्या वह्या बैसलों धरणे । केले नारायणे समाधान ।।

विस्तारीं सांगता बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ।।

आतां आहे तैसा दिसतो प्रकार । पुढील प्रकार देव जाणे ।।

भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ।।

तुका ह्मणे माझे सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ।।

हा अभंग सांगून रामभट पुढे म्हणाले,

कुणी विचारले तर स्वतःबद्दल काही सांगू नये हेच योग्य पण आता तुम्ही संतांनी मला बोलावयास भाग पाडले आहे म्हणून बोलतो असे तुकोबांनी सुरुवातीसच म्हटले आहे. ते सांगून तुकोबा म्हणतात मी शूद्र जातींपैकी, वाण्याचा व्यवसाय ज्यांच्या घरात पूर्वीपासून चालत आलेला होता अशा घरात जन्मलो. पण एकवेळ अशी आली की मागोमाग आलेल्या अतिदुःखद प्रसंगांनी मी फार दुःखी झालो. माझे आईवडील फार थोर(सेखी) होते पण मागोमाग गेले. त्या मागोमाग दुष्काळ पडला. दुष्काळाने द्रव्य तर नेलेच पण समाजात मान होता तो ही नेला. एक बायको अन्न अन्न करून मेली. व्यवसायात तूट आली आणि परिस्थिती लाजिरवाणी झाली. अशा संकटांमागून संकटांनी जीव नुसता त्रासून गेला. घरी देऊळ होते, ते सांभाळावे असे मनापासून वाटत होते तर तेच पडले! एक गोष्ट मात्र मी आधीपासून करीत होतो. कीर्तनात मी मागे टाळ धरून मागे उभा असे व चालू असेल त्या अभंगाचे धृपद धरून ठेवीत असे. ती कीर्तने मी अतिशय शुद्ध चित्ताने ऐकीत असे. त्या कथेकरीबुवांची पडेल ती सेवा करण्यातही मी कधी मागे राहिलो नाही. त्यांनी काम सांगावे व मी आपले शरीर कष्टवून ते करावे. अशा कामांची लाज मी काही मनात येऊ दिली नाही. तशी मी काही संताची वचने त्यांच्यावरील आदरविश्वासाने पाठ केली होती व त्या जोरावर सुरुवातीस मी एकादशीला कीर्तन करण्यासही उभा राहात असे. मात्र ह्या विषयाच्या अधिक अभ्यासात मात्र माझे मन तेव्हा गुंतत नव्हते. एकीकडे असे हे दुःखाचे डोंगर कोसळून जीव जेव्हा त्रासला तेव्हा मात्र मला ह्या संसाराचा समूळ वीट आला. त्याकाळात माझे आप्तजन मला जे सांगत होते त्याने माझे समाधान होत नव्हते व मी ते मानीनासा झालो. एके दिवशी मात्र विशेष प्रसंग झाला – त्या दिवशी असे झाले –

 

 

सद्गुरुराये कृपा मज केली । परी नाही घडली सेवा कांही ।।

सांपडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ।।

भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ।।

कांही कळे उपजला अंतराय । ह्मणोनिया काय त्वरा जाली ।।

राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ।।

बाबाजी आपले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्णहरि ।।

माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगिकार तुका ह्मणे ।।

 

 

जे काही घडले ते स्वप्नवत घडले. त्या दिवशी माघातली शुद्ध दशमी होती. वार गुरुवार होता. मी गंगेवर स्नानाला निघालो होतो. तोच अवचित, मला शोधून काढल्यासारखी एक व्यक्ती माझ्यासमोर आली आणि तिने माझ्या मस्तकी हांत ठेवला. रामकृष्णहरि हा मंत्र दिला व माझा शिष्य म्हणून अंगिकार केला. स्वतःचे नांव बाबाजीचैतन्य म्हणून सांगितले व राघवचैतन्य केशवचैतन्य अशी आपली गुरुपरंपरा सांगितली. इतके झाल्यावर माझ्यापाशी त्यांनी भोजनाकरिता पावशेर तूप मागितले. पण मला काही कळेल तर ना? मी भानावर येईपर्यंत ते निघूनही गेले होते! मी जणू स्वप्नातच होतो. माझ्याकडून तूप देणे झाले नाही, काही सेवा घडली नाही पण त्यांची कृपा माझ्यावर झाली. मला जपण्यासाठी, साधनेसाठी मंत्र सद्गुरुंकडून मिळाला. या सर्वांतून मला कवित्व करण्याची स्फूर्ती झाली आणि मी विठोबाचे पायच धरले. त्यातच –

 

 

नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ।।

सांगितले काम करावे कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ।।

माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें समाधान ।।

प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी । उरले शेवटीं लावी तुका ।।

 

 

माझ्या कवित्व करण्याच्या इच्छेला साक्षात पांडुरंगानेच मनावर घेतले. खुद्द नामदेव महाराज विठ्ठलाला घेऊन माझ्या स्वप्नात आले आणि मला जागे करून म्हणाले, तुकारामा, तुझ्या मनात अभंग रचायचे आले आहे ना? तेच तू यापुढे कार्य म्हणून कर. ते न करण्याला कोणतीही वावगी सबब सांगायची नाही. असा हा कार्याचा म्हणून विषय केलेला ऐकून मी जरा भेदरलो. ते पाहून श्री विठ्ठलानेच मला थोपटले आणि धीर दिला. नामदेवांनी शतकोटी अभंग करायचा केलेला संकल्प अपूर्ण राहिला आहे तो तू शेवटाला ने असे सांगितले. हे स्वप्न म्हणजे नामदेव पांडुरंगाचा प्रसाद, संकेत समजूनच मी ह्या कार्याला लागलो. परंतु, मी कवित्व करतो हे काही सर्वांना आवडले नाही आणि समाजातून मोठा निषेधाचा आघातच माझ्यावर पडला. माझ्या अभंगांच्या वह्या नदीत बुडवाव्या लागल्या पण त्या प्रसंगातून मला पांडुरंगानेच मला वाचविले. माझ्या आयुष्याची सगळी कथा सांगत बसलो तर खूप उशीर होईल. तेव्हा आता आवरावे हे बरे. आज तरी आहे ही अशी स्थिती आहे. पुढे काय प्रकार होतील ते कुणी सांगावे? ते देवच जाणे. मात्र एक सांगतो की मला एक गोष्ट कळून आली ती अशी की देव भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. आज पाहा, मला त्याने भांडवल दिले आणि हे अभंगांचे बोल तो माझ्याकडून बोलवून घेत आहे!

 

 

हे सारे ऐकून नारायण म्हणाला,

नामदेवांच्या परंपरतेला संत प्रत्यक्ष जगत असल्याच्या काळात आपण जगत असावे आणि त्याचा जीवनप्रवासही आपल्याला कळावा हे आपले मोठे भाग्य आहे!

हे ऐकून आबा म्हणतो,

पन म्यां म्हन्तो ह्यो आभंगात तुकोबांनी रहस्य म्हनून काई बी सांगितलेलंच न्हाई. आज आसं जालं, उद्या तसं जालं ह्येतून काय बी कळत न्हाई. माजा प्रश्न येगळा हुतां. मानसाचा संत हुन्यासाटी तो मानूस नेमकं काय करतु त्ये मला कळून घ्यायचं हाय. दुष्काळ पडला हुतां हे खरं हाय. त्येंत फक्त तुकोबांची बाईल न्हाई ग्येली. आनेकांच्या बायका गेल्या. आनेकांचं द्रव्य गेलं. मायबाप जायाचेच. त्येंत काय इशेष? दुःख हुनारच. दुःख जालं म्हनून कुनी मोटा होत नसतुय. बुवा, तुमाला मी पुना सांगतु, तुकोबांनी ह्यो आभंगात काईबी सांगितल्यालं न्हाई. त्येंचा प्रवास गुरुजी सांगतील तर लय उपकार हुतील. पन म्यां फार बोलत न्हाई. त्येंना हवं तसं. तरी गुरुजी, म्यां एक विचारतुं, ह्यो आभंगात येक कडवं हाय त्येचा अर्थ तुमी सांगितला न्हाईत. सत्यअसत्यासी मन केले ग्वाही । मानियेलें नाही बहुमतां ।। ह्येचा अर्थ काय?

असं स्पष्ट आणि मोकळं बोलणाऱ्या आबाकडे रामभट कौतुकाने पाहात होते. तोच नारायण म्हणाला,

रामकाका, हा आबा लागला आता तुमच्या मागे. आता त्याच्या पाशात अडकलात तुम्ही!

 

 

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?