' जेव्हा हॉलिवूडचा सुपरस्टार हिंदू रीती-रिवाजाप्रमाणे स्वतःच्या मुलाचं श्राद्ध घालतो!

जेव्हा हॉलिवूडचा सुपरस्टार हिंदू रीती-रिवाजाप्रमाणे स्वतःच्या मुलाचं श्राद्ध घालतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदू धर्मातल्या प्रत्येक विधीला काहीएक महत्त्व असतं. आपल्याकडे हे विधी व्यवस्थित पार पाडले जाणं ही पवित्र गोष्ट मानली जाते. असाच एक विधी म्हणजे श्राद्ध! श्राद्धाच्या विधीला आपण आपल्या घरातल्या मरण पावलेल्या व्यक्तींचं स्मरण करतो.

घरातली जी माणसं वारली आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी हा हेतू त्या व्यक्तींचं श्राद्ध घालण्यामागे असतो. या विधीत ‘कावळा पिंडाला शिवणं’ या गोष्टीला खूप महत्त्व असतं. कावळा पिंडाला शिवला तर आपल्या पितरांचे आत्मे समाधानी आहेत आणि नाही शिवला तर त्यांच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या आहेत असं आपण मानतो.

 

shraddh vidhi

 

कुठल्याही हिंदू धर्मीय माणसाकरता श्राद्ध ही संकल्पना आणि हा विधी नवा नाही. मात्र जेव्हा एक परधर्मीयच नाही तर वेगळ्याच देशातली, फारच वेगळ्या संस्कृतीत वाढलेली व्यक्ती आपल्या वारलेल्या मुलाचं श्राद्ध घालते तेव्हा क्षणभर आपल्याही भुवया उंचावतात.

आपल्याला आश्चर्य वाटेल, पण चक्क हॉलिवूडच्या एका सुपरस्टारने हिंदू रीती रिवाजाप्रमाणे आपल्या मुलाचं श्राद्ध घातलं आहे. त्याला हे का करावंसं वाटलं असेल? श्राद्ध घालतात म्हणजे काय करतात हे त्याला कसं कळलं असेल? जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणारा एखादा अभिनेता त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कुणाचातरी मुलगा, कुणाचातरी बाप, नवरा असतो आणि आपल्याला जरी त्याची पडद्यावरची चंदेरी दुनिया भुरळ घालत असली तरी त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात त्यालाही आपल्यासारखीच सुखदुःखं असतात.

हॉलीवूडचा सुपरस्टार सिल्वेस्टर स्टॅलन याच्या आयुष्यात २०१२ साली एक अतिशय दुःखद घटना घडली होती. आपण जिवंत असताना आपल्या मुलाचं मरण बघावं लागणं याहून मोठं दुर्दैव एखाद्या बापासाठी आणखी कुठलं असेल! पण नेमकं हेच दुर्दैव या सुपरस्टारच्या वाट्याला आलं आणि आपला ३६ वर्षांचा लेक त्याला गमवावा लागला.

 

sylvester stallon son IM

 

त्याच्या मुलाचं नाव सेज होतं. त्याच्या लॉस इन्जेलिसमधल्या फ्लॅटमध्ये तो मृत अवस्थेत सापडला. सिल्वेस्टरच्या मुलाचा मृत्यू अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाला अशी वृत्तं अमेरिकन वृत्तपत्रांतून सुरवातीला प्रसिद्ध झाली होती. मात्र नंतर हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं.

आपल्या मुलाच्या मृत्यूने सिल्वेस्टरची चिडचिड व्हायची. तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. त्याला आपला वारलेला मुलगा दिसायचा. कितीही झालं तरी बापाचंच काळीज ते!

आपल्या मुलाशी आपल्याला काहीतरी बोलता यावं या तीव्र इच्छेपायी त्याने ज्यांच्याकडे परलोकविद्या आहे अशांच्या आपण संपर्कात येऊ शकतोय का यासाठी प्रयत्न केले.

हे प्रयत्न करत असतानाच त्याची प्रतीक मिश्रापुरी या भारतीय ज्योतिषाशी गाठ पडली. ‘हफिंगटन पोस्ट’च्या एका लेखानुसार, ऋषिकेशचे हे ज्योतिषी प्रतीक मिश्रापुरी लॉस एंजेलिस मध्ये आले असताना सिल्वेस्टरची आणि त्यांची भेट झाली.

त्यावेळी मिश्रापुरी यांच्याकडून सिल्वेस्टरला हिंदूच्या ‘श्राद्ध’ या विधीविषयी कळलं आणि त्याने आपल्याही मुलाचं श्राद्ध घालायचं ठरवलं.

 

shraddh 2 IM

यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना मिश्रापुरी म्हणाले, “आमच्या ‘एलए’ मधल्या भेटीत सिल्वेस्टर स्टॅलनने मला त्याच्या मुलाशी बोलता येऊ शकेल का असं विचारलं. हो हे शक्य आहे पण त्यामुळे सेजच्या आत्म्याला खूप क्लेश होतील असं मी त्याला सांगितलं. आपण आपल्या मुलाला पाहिलं असल्याची आणि त्यामुळे आपण प्रचंड अस्वस्थ झालो आहोत अशी कबुली त्याने दिली.”

मिश्रापुरी यांनी पंचांग पाहून हे विधी करण्यासाठी योग्य दिवस आणि वेळ सिल्वेस्टरला सांगितली. सिल्वेस्टरने स्वतःच यायचं ठरवलं होतं पण नंतर त्याने हा प्लॅन रद्द केला. आपलं ज्यांच्याशी रक्ताचं नातं असतं तेच हा विधी करू शकतात असं मिश्रापुरी यांनी त्याला सांगितलं.

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, त्यांचा सल्ला ऐकून सिल्वेस्टरने आपला सावत्र भाऊ मायकेल, आपली पत्नी आणि आणखी दोघांना आपल्या मुलाचं हे ‘तिथी श्राद्ध’ घालण्यासाठी हरिद्वारच्या कनखल इथे पाठवलं.

 

sylvester stallone son shraddha IM

 

अपघातात मरण पावलेल्या आणि खून झालेल्यांसाठी हा विधी केला जातो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना मिश्रापुरी पुढे म्हणाले, “या कुटुंबाला हा विधी गुपचूप व्हायला हवा होता. मग मी त्यांना जिथे ते राहू शकतील अशा, सहज कुणाला वर्णन करून सांगता येणार नाहीत अशा हॉटेल्सचे तपशील दिले.”

अशा प्रकारे, पॅपराझ्झी आपल्याभोवती गराडा घालेल या भीतीपायी सिल्वेस्टरचे कुटुंबीय मायकेल, त्याची पत्नी आणि आणखी दोन जणांनी हरिद्वारच्या कनखल इथे जाऊन २०१५ साली गुपचूप सिल्वेस्टरच्या मुलाचं ‘तिथी श्राद्ध’ घातलं.

२०१२ साली वयाच्या ४८ व्या वर्षी वारलेली आपली बहीण टोनी ऍन हिचंही त्यावेळी मायकेलने श्राद्ध घातलं. श्राद्धविधी आटोपल्यावर ते फिलाडेल्फियाला परतले.

सिल्वेस्टर स्टॅलन रॉकी बालबोआ या त्याच्या पात्राच्या नावाने जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या मुलाचा मृत्यू झालाय हे कटू वास्तव स्वीकारणं सिल्वेस्टरला कठीण गेलं होतं. सिल्वेस्टरचा मुलगा सेज स्टॅलन १९९० साली ‘रॉबर्ट बालबोआ जुनियर’ म्हणून रॉकी सिरीज मध्ये झळकला होता.

मुलाच्या मृत्यूनंतर सिल्वेस्टर पहिल्यांदा ऑगस्ट २०१२ मध्ये ‘गुड मॉर्निंग अमेरिका’ मध्ये दिसला होता. त्यावेळी ‘द एक्स्पेंडेबल्स २’ चं प्रमोशन करताना तो म्हणाला होता, “हे कठीण आहे. प्रचंड कठीण आहे. ही परिस्थिती भयानक आहे. पण वेळ हाच सगळ्यावरचा इलाज आहे अशी आशा करतो. तुम्ही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता. हेच जीवनाचं वास्तव आहे.”

 

sylvester with his son IM

 

कुणाच्याही भावना, मग तो सेलिब्रिटी असो की सामान्य माणूस, सारख्याच असतात. आपल्याला मनःशांती मिळावी म्हणून सगळेचजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.

आजच्या काळातही धार्मिक विधी हा त्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. धार्मिक विधींचा सहारा केवळ त्या धर्मातलीच व्यक्ती नाही तर अगदी सातासमुद्रापार असलेली एखादी व्यक्तीही घेऊ शकते हेच आपल्याला वरच्या उदाहरणावरून लक्षात येतं.

इंटरनेटमुळे जग जवळ आलेलंच आहे. पण वेगवेगळ्या संस्कृतीतल्या रीती रिवाजांचं अशाच प्रकारे आदानप्रदान होत राहीलं तर जग भावनिकदृष्ट्याही अधिकाधिक जवळ येईल अशी आशा करायला हरकत नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?