' ‘१२६’ वर्षीय पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुषी असण्याचं ‘सिक्रेट’ – InMarathi

‘१२६’ वर्षीय पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुषी असण्याचं ‘सिक्रेट’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वीच्या काळी बरीच माणसं दीर्घायुषी असायची. अगदी आपल्या पणजोबा-आजोबांनीसुद्धा ८०-९० वय पार केलेलं असायचं. त्या काळी अकाली मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी असायचं.

आताच्या काळात भलेही दैद्यकशास्त्रात वाखाणण्याजोगी प्रगती झालेली असली आणि कर्करोगासारखे आजारही आता पूर्णतः बरे होऊ शकत असले तरी पूर्वीच्या काळाच्या मानाने आताच्या काळात आपल्याला सरासरी मृत्यूच्या वयात घट झाल्याची पहायला मिळते.

हल्ली ५५-६० वयाचा माणूस गेल्याचं कळलं तरी आपल्याला फारसं आश्चर्य वाटेनासं झालंय. तरुणांच्या अकाली मृत्यूची उदाहरणंही हल्ली बरीच दिसतात. शंभरी पार केलेली एखाद दुसरीच व्यक्ती आपल्या ओळखीत असली तर असते किंवा नसतेही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘बदललेली आणि चुकीची जीवनशैली’ हे सरासरी मृत्यूच्या वयात घट होण्याचं मुख्य कारण असू शकतं. पूर्वीचे लोक अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगायचे, सकस आहार घ्यायचे, पण आजच्या काळातली जीवघेणी स्पर्धा, प्रत्येकाच्याच मनावर असलेला प्रचंड ताण, उशीरा झोपणे, झोप अपुरी होणे, पोषक आहाराचं सेवन करण्याच्या बाबतीतली वाढती हेळसांड, इंटरनेटपासून मादक पदार्थांचं अनेकांना असणारं व्यसन अशी अनेक कारणं यामागे असू शकतात.

एकीकडे असं नकारात्मक चित्र असताना दुसरीकडे मात्र फिटनेसविषयी, आहाराविषयी लोकांमध्ये जागरूकताही वाढताना दिसतेय. दिवसेंदिवस व्यायामाचं, योगाचं महत्त्व वाढून त्याचा सर्वत्र प्रसार होतोय. आपल्याला चकित करेल असं एक वृत्त इतक्यातच समोर आलंय.

१२५ वर्षांपेक्षाही जास्त वय असलेल्या स्वामी शिवानंद यांना नुकतंच भारतीय जीवनपद्धती आणि त्यांच्या योगक्षेत्रातील विशेष योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. ‘योग आणि शाकाहार घेणारे’ हे स्वामी नेमके आहेत तरी कोण? ते कसं जीवन जगतात? जाणून घेऊ.

 

swami im

 

१२५ वर्षांपेक्षाही जास्त वय असलेल्या स्वामी शिवानंद यांना २१ मार्चला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या प्रसंगी स्वामींनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर नेसलं होतं. अनवाणी पायांनी राष्ट्रपती भवनात आलेले स्वामी त्या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांसाठीच आकर्षणाचा विषय ठरले. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आपल्या आसनावरून उठून उत्साहात स्वामींचं स्वागत केलं.

पद्मश्री पुरस्कारासाठी आपलं नाव पुकारलं गेल्यांनतर या स्वामींनी अशी एक कृती केली ज्यामुळे ते सध्या सगळीकडे चर्चेत आहेत. पुरस्कार घ्यायला जाण्याआधी ते पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या जवळ गेले आणि या इतक्या वृद्ध स्वामींनी आपल्या गुडघ्यांवर बसून मोदींना नमस्कार केला.

आपल्याप्रती असलेला स्वामी शिवानंद यांचा हा भाव पाहून मोदींनाही रहावलं नाही आणि तेही आपल्या खुर्चीवरून उठले आणि स्वामींच्या समोर जाऊन झुकले. या क्षणाचा व्हिडियो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडियोत आपल्याला पुढे दिसतं की मोदींना नमस्कार केल्यानंतर स्वामींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही अशाच प्रकारे गुडघ्यावर बसून नमस्कार केला.

 

swami im 1

 

स्वामींना आपल्यासमोर झुकलेलं पाहून राष्ट्रपती पुढे आले आणि त्यांनी वाकून स्वामींना उठवलं. हा व्हिडियो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत असून लोक त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

एका आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडियो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, “१२६ वर्षीय योग गुरू स्वामी शिवानंद यांना पद्मश्रीने सन्मानित करण्याची घोषणा. योगाकरता आपलं आयुष्य समर्पित करणारे स्वामी शिवानंद आपल्या विनम्र व्यक्तिमत्त्वामुळे सगळ्यांसाठी प्रेरणास्रोत आहेत. योगाचं मूळ जिथे आहे तिथले आम्ही आहोत याबद्दल आम्हाला अभिमान आहे.”

जन्म आणि बालपण :

स्वामी शिवानंद यांचा जन्म भारताचं विभाजन होण्यापूर्वीच्या काळात बंगाल मधील सिल्ह्ट जिल्ह्यात झाला होता. स्वामी शिवानंद यांच्या पासपोर्टवरील माहितीनुसार त्यांचा जन्म ८ ऑगस्ट, १८९६ रोजी झाला होता.

स्वामींचं बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेलं. त्यांचे पालक त्यांना केवळ भात जेवायला घालू शकायचे. प्रचंड आर्थिक चणचणीमुळे स्वामी ४ वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पश्चिम बंगालमधल्या नबद्वीप इथल्या बाबा ओंकारानंद गोस्वामी यांच्या आश्रमात दान केलं.

ओंकारानंद गोस्वामी हेच स्वामींचे गुरू झाले. स्वामी शिवानंद ६ वर्षांचे असताना त्यांचे आईवडील वारले. गुरु ओंकारानंद गोस्वामींनीच त्यांचं संगोपन केलं आणि त्यांना व्यावहारिक आणि अध्यात्मिक शिक्षण दिलं.

योगक्षेत्रातील उन्नती :

 

swami im 2

 

त्यांच्या शिस्तबद्ध आणि आणि रोज सकाळी योगा करण्याच्या सवयीचा अंतर्भाव असलेल्या सुनियमित जीवनशैलीमुळे ते लवकरच योगक्षेत्रातलं देशातलं असामान्य आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ठरले. स्वामी शिवानंद हे काशीचे असल्याचं समजतं. तिथल्या दुर्गाकुंड इथे असलेला शिवानंद आश्रम ते चालवतात.

आपल्या प्रदीर्घ जीवनकाळात स्वामी शिवानंद यांना योग आणि धर्म या विषयांमध्ये विशेष रुची होती. स्वामींनी आपलं आयुष्य समाजकल्याणासाठी समर्पित केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, योगासारख्या पद्धती लोकांनी आत्मसात केल्या तर ते निरोगी आणि दीर्घ काळ जीवन जगू शकतात.

शिष्यांच्या निमंत्रणावरून ते इंग्लंड, ग्रीस, फ्रांस, स्पेन, ऑस्ट्रिया, इटली, हंगेरी, रूस, पोलंड, आयर्लंड, नेदरलँड, स्वित्झर्लंड, जर्मनी, बल्गेरिया, युके सोबतच ५० हून अधिक देश फिरले आहेत.

आहार आणि रोजचं रुटीन :

१२६व्या वर्षीही स्वामी शिवानंद कुठल्याही व्याधींशिवाय एखाद्या किशोरवयीन मुलाइतकेच तंदुरुस्त आणि निरोगी आहेत. आजही ते पहाटे ३ वाजता उठतात. स्वामींचं आयुष्य एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुनियमित जीवनशैलीबरोबरीनेच इतरही काही कारणांमुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

त्यांच्या शिस्तबद्ध योगा रुटीनबरोबरीनेच त्यांच्या आहारविषयक सवयींचीही आपण नोंद घ्यायला हवी. यातल्या बऱ्याच गोष्टी आपण सहज फॉलो करू शकू इतक्या सोप्या नाहीत, पण हेच त्यांच्या निरोगी आणि तणावमुक्त आयुष्याचं रहस्य आहे.

 

swami im 3

 

स्वामी शिवानंद तेल आणि मसाले नसलेलं साधं जेवण जेवतात. ते उकडलेली डाळ (मसूर डाळ) आणि भात खाणं पसंत करतात. ते दूध आणि फळांपासून दूर राहणं पसंत करतात कारण त्यांना हे फॅन्सी अन्नपदार्थ वाटतात.

२०१६ साली ‘एएफपी’शी बोलताना ते म्हणाले होते, “मी एक साधं आणि शिस्तबद्ध आयुष्य जगतो. मी तेल किंवा मसाले नसलेलं, हिरव्या मिरच्या घातलेली उकडलेली डाळ (मसूर डाळ) आणि भात असं अतिशय साधं जेवण जेवतो.”

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. एकूण १२८ लोकांना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यातल्या ४ जणांना पद्म विभूषण पुरस्कारांनी, १७ जणांना पद्म भूषण पुरस्कारांनी तर १०७ जणांना पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

आपली व्यस्त जीवनशैली टाळता येणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळे हे स्वीकारूनच आपल्याला आपल्या जीवनशैलीत आणि आहारात जितके चांगले बदल करता येणं शक्य आहे तितके बदल प्रयत्नपूर्वक करायचे आहेत.

स्वामींइतकं शिस्तबद्ध आणि सुनियमित आयुष्य जगणं जरी आपल्याला शक्य झालं नाही तरी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण आधीपेक्षा अधिक गांभीर्याने आपल्या आरोग्याचा आणि आहारविषयक सवयींचा विचार नक्कीच करू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?