' आर्मीत जायचं म्हणून रोज कामावरून घरी १० किमी धावत जाणाऱ्या व्हायरल तरुणाची गोष्ट! – InMarathi

आर्मीत जायचं म्हणून रोज कामावरून घरी १० किमी धावत जाणाऱ्या व्हायरल तरुणाची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विल स्मिथच्या ‘पर्स्युट ऑफ हॅपिनेस’ चित्रपटातला ‘यु गॉट अ ड्रीम, यु गॉट्टा प्रोटेक्ट इट’ हा डायलॉग आठवतोय? सगळं काही संपलंय असं वाटत असतानाच नव्या उमेदीने पुन्हा उभं राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नासाठी संघर्ष करणाऱ्या विल स्मिथच्या पात्राने अनेकांच्या मनात स्फुरण जागवलं होतं.

 

persuit of happyness IM

 

असे चित्रपट, अशा कलाकृती आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहत असल्या तरी आपल्यातले अनेक जण मात्र स्वप्न बघायला घाबरतात किंवा ते पाहिलं तरी काही काळाने त्यावर पाणी सोडून पुन्हा एक सरधोपट आयुष्य जगणंच स्वीकारतात.

आपल्यातल्या अनेकांना आवश्यक्तेपेक्षा जास्त गोष्टी मिळूनदेखील बऱ्याचदा तक्रारींचा सूर लावायची सवय असते. पण अचानक जेव्हा  दिवसरात्र आपल्या स्वप्नाचा अखंड ध्यास घेतलेली आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी एखादी व्यक्ती आपल्याला दिसते तेव्हा केवळ थक्क व्हायला होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कामावरून घरापर्यंत तब्बल १० किलोमीटर अंतर रोज धावत जाणाऱ्या प्रदीप मेहरा या १९ वर्षाच्या तरुणाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकूळ घालतोय. हा तरुण रोज इतकं का पळतो यामागचं कारण कळल्यावर तुम्ही चकीत व्हाल.

सध्या फार कठीण परिस्थितीतून जात असताना आपलं आर्मीत जायचं स्वप्न या पठ्ठ्याला पूर्ण करायचंय आणि जीवाची बाजी लावून तो दरदिवस आपल्या स्वप्नपूर्तीच्या थोडं अधिक जवळ जातोय. काय आहे प्रदीपची गोष्ट? जाणून घेऊ.

मूळच्या उत्तराखंडच्या अलमोर शहराचा नागरिक असलेला प्रदीप मेहरा हा १९ वर्षांचा युवक उत्तर प्रदेशच्या नोएडा इथे राहतो. नोएडातल्या सेक्टर १६ मधल्या एका मॅकडॉनल्ड्समध्ये तो नोकरी करतो. नोकरी, घर आणि आपलं आर्मीत जाण्याचं स्वप्न अशी तारेवरची कसरत त्याला रोज करावी लागते.

 

pramod mehra IM

 

दिवसभरात आपल्याला पळण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून हा तरुण आपलं आर्मीत जायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच्या परिश्रमांचा भाग म्हणून आपलं रोजचं काम संपवल्यावर रोज रात्री नेमाने नोएडाच्या रस्त्यावरून बरोलातील त्याच्या घरापर्यंत तब्बल १० किलोमीटर अंतर धावत जातो.

फिल्ममेकर आणि पत्रकार असलेले विनोद कापरी नोएडाच्या सेक्टर १६ च्या रस्त्यावरून रात्री १२ च्या सुमारास कार चालवत असताना त्यांनी प्रदीपला रस्त्यावर धावताना पाहिलं. तो बराच घामाघूम झाला होता. त्यांनी आपल्या कारचा वेग कमी करत प्रदीपला लिफ्ट हवीये का असं विचारलं.

त्यांनी वारंवार लिफ्ट ऑफर केल्यानंतरही प्रदीपने विनम्रपणे गाडीत बसायला नकार दिला तेव्हा प्रदीपविषयी त्यांचं कुतूहल चाळवलं आणि त्याच्याविषयी त्यांना अधिक जाणून घ्यावंसं वाटलं.

त्यांनी जेव्हा त्याला अशा प्रकारे मध्यरात्री धावण्यामागचं कारण विचारलं तेव्हा प्रदीपने त्यांना आपल्याला आर्मीत जायचंय असं सांगितलं. आपण रोज सकाळी ८ वाजता उठतो आणि कामावर जाण्यापूर्वी जेवण बनवतो. दिवसभर आपल्याला पळण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून आपण कामावरून घरापर्यंत पळत येतो.

 

pradip mehra IM

 

बरोलातल्या आपल्या घरी आपला धाकटा भाऊ आणि आई असते. आई सध्या आजारी असून तिला रुग्णालयात दाखल केलंय अशी माहिती प्रदीपने विनोद कापरी यांना दिली.

कापरी यांनी या तरुणाचा व्हिडियो शूट करून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडियो शेअर करत कापरी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. जेव्हा कापरी यांनी या युवकाला तुझा हा व्हिडियो व्हायरल होईल असं सांगितलं तेव्हा तो हसून म्हणाला, “जरूर. मी काहीच वाईट करत नाहीये.”

कापरी यांनी म्हटल्याप्रमाणे हा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रदीपचा हा व्हिडियो पाहून सेलिब्रिटीजपासून लहान मुलांपर्यंत सगळेच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे चेअरपर्सन असलेल्या आनंद महिंद्रा यांनीदेखील ट्विटरवर या तरुणाला ‘आत्मनिर्भर’ म्हणत त्याचं कौतुक केलंय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, “हे खरोखरच प्रेरणादायी आहे. पण तुम्हाला माझं #MondayMotivation काय आहे माहितीये? या तरुणाचं प्रचंड स्वावलंबी असणं आणि आपल्याला ऑफर केली गेलेली राईड नाकारणं. त्याला मदतीची गरज नाही. तो आत्मनिर्भर आहे!”

आनंद महिंद्रा हे नेहमीच काहीतरी हटके करणाऱ्या आणि अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरणाऱ्या व्यक्तींची दखल घेतात.

 

anand mahendra IM

 

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगलाही या तरुणाचं कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. “चॅम्पियन्स असेच बनतात. मग ते खेळपट्टीवर असो की ते आपल्या आयुष्यात जे काही करत असतील तिथे.. हा तरुण जिंकेल. हे शेअर केल्याबद्दल तुला धन्यवाद विनोद.”, असं ट्विट हरभजन सिंगने केलंय.

विनोद यांनी आपल्या ट्विटच्या सुरुवातीला ‘बावनकशी सोनं’ असं लिहिलंय. हरभजनने आपल्या ट्विटच्या शेवटी विनोद यांनी वापरलेल्या या विशेषणाला दुजोरा दिलाय.

इतकं धावून घरी गेल्यानंतर प्रदीप पुन्हा रात्रीचं जेवण बनवतो. कापरी यांनी जेव्हा त्याला डिनरसाठी येशील का म्हणून विचारणा केला तेव्हा तो त्यांना म्हणाला, “माझा भाऊ काय खाईल?” आपला भाऊ नाईट शिफ्ट करतो आणि त्याला घरी परतायला खूप उशीर होतो असं प्रदीपने पुढे सांगितलं.

कापरी आणि इतर सेलिब्रिटीजपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनाच या तरुणाने अचंबित केलं आहे. २० मार्चला कापरी यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर पोस्ट केलेल्या या व्हिडियोला ४ मिलियन्सपेक्षा यास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांना या व्हिडियोतून प्रेरणा मिळाली आहे.

 

vinod kapri IM

 

आपलं स्वप्न सत्यात उतरवलेल्या मोठमोठया व्यक्तींनी नशिबावर अजिबात भरवसा न ठेवता आपल्या क्षमतेवर पूर्णतः विश्वास ठेवला आणि प्रत्येकाने हेच करावं असं कायम सांगितलं.

प्रदीपचा हा ध्यास आणि त्याची मेहनत पाहता तो आर्मीत जाईल यात शंकाच नाही. प्रदीपचं हे उदाहरण स्वप्न पाहिलेल्या आणि ते सत्यात उतरवण्याची धमक असलेल्या प्रत्येकासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?