' ‘त्या रात्री ट्रकमध्ये लपून आम्ही काश्मीर सोडलं’ अभिनेत्रीचा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग – InMarathi

‘त्या रात्री ट्रकमध्ये लपून आम्ही काश्मीर सोडलं’ अभिनेत्रीचा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चित्रपटांकडे आपण बहुतेकदा मनोरंजनाचा एक मुख्य स्रोत म्हणून बघतो, पण कलाकृतींचं कार्य केवळ मनोरंजनापुरतंच सीमित नाही हे आपण जाणतो. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडचे आणि प्रादेशिक सिनेमेदेखील रोमँटिसिझमचा वापरून वापरून शिळा झालेला ढाचा सोडून वास्तवदर्शी चित्रपटांकडे वळू लागलेत ही सुखनैव बाब आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून  हा विषय लोकांसमोर आणल्याबद्दल दिग्दर्शक विवेकी अग्निहोत्री यांच्यावर सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव होतोय. आपल्याच देशातल्या एका समाजाच्या वाट्याला आलेलं क्लेशदायक आयुष्य नुसतं पडद्यावर पाहतानाही चित्रपटगृहात अनेकांचे डोळे पाणावत आहेत.

चित्रपटाला एकीकडे लोकांचं भरभरून कौतुक मिळत असताना दुसरीकडे मात्र हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचं आणि रातोरात त्यांना आपल्याच राज्यातून पळून जावं लागण्याचं भीषण वास्तव या चित्रपटाद्वारे आपल्यासमोर आलं.

 

the kashmir files 1

 

काही सेलिब्रिटीजनी जरी या चित्रपटाविषयी मौन पाळलेलं असलं तरी काहींनी मात्र या चित्रपटाद्वारे एक महत्त्वाचा विषय लोकांसमोर आणल्याबद्दल दिग्दर्शकाचं अभिनंदन केलं आहे, पण स्वतः काश्मिरी पंडित असलेली, श्रीनगरमध्ये जन्म झालेली बॉलिवूड अभिनेत्री जेव्हा या चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिच्याकडे आपण केवळ सेलिब्रिटी म्हणून न पाहता एक सामान्य माणूस म्हणून बघू लागतो आणि तिचा अनुभव वाचताना आपल्या मनात गहिवर दाटून आल्याशिवाय राहत नाही.

बॉलिवूड अभिनेत्री संदीपा धर हिने ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहिल्यावर सोशल मीडियावर आपल्या आत दीर्घकाळ दाबून ठेवलेल्या वेदनेला वाट मोकळी करून दिली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री संदीपा धर खूप भावूक झाली आणि तिने यासंदर्भात इंस्टाग्रामवर एक काही फोटोज शेअर करत त्यासोबत एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.

संदीपाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून जवळपास ३० वर्षांपूर्वी आपलं कुटुंब किती यातनांमधून गेलं आणि आपल्या कुटुंबालाही काश्मीरमधून पळून जावं लागलं होतं हे सांगितलं आहे. हा चित्रपट पाहिल्यावर आपल्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती हे तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे आणि हे दाहक वास्तव मोठ्या पडद्यावर दाखवल्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि चित्रपटातले कलाकार, विशेषतः अनुपम खेर यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

 

sandeepa dhar im

 

या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये संदीपा ने आपल्या वडिलोपार्जित घराचा फोटो शेअर करत १९९० मध्ये ही घटना घडली तेव्हा इतर काश्मिरी पंडितांप्रमाणे आपलं कुटुंबही त्या रात्री काश्मीरमधून पळून गेलं होतं याचं सविस्तर वर्णन केलं आहे.

संदीपाने लिहिलंय, “ज्या दिवशी त्या लोकांनी काश्मिरी पंडितांनी आपल्या बायकांना मागे सोडून काश्मीर सोडून जावं अशी घोषणा केली, त्याच दिवशी माझ्या कुटुंबीयांनी लगेचच ट्रकमध्ये बसून काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्या धाकट्या चुलत बहिणीला तिच्या सुरक्षिततेचा विचार करून सीटच्या खाली माझ्या बाबांच्या पायांमागे लपवलं गेलं. अर्ध्या रात्रीत गुपचूप आम्ही तिथून पळून गेलो!”

या चित्रपटामुळे आपल्या जुन्या जखमा कशा ताज्या झाल्या हे तिने सांगितलंय. पुढे तिने लिहिलंय, “काश्मीर फाईल्समध्ये जेव्हा मी तोच अस्वस्थ करणारा प्रसंग पाहिला तेव्हा मी मुळापासून हादरले. कारण, ही माझ्याच आयुष्याची गोष्ट आहे! माझ्या आजीने तिच्या घराकडे, तिच्या भूमीकडे, तिच्या काश्मीर कडे परतण्याची वाट बघत बघत आपले प्राण गमावले.

या चित्रपटाने मला अंतर्बाह्य हेलावून टाकलं आहे. माझ्या आईवडीलांची याहूनही वाईट अवस्था झाली आहे. हा चित्रपट पाहून ती जुनी वेदना पुन्हा जगल्यामुळे माझे कुटुंबीय ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर’मधून जात आहेत. ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली जायला फार जास्त काळ लागला आणि लक्षात ठेवा, हा केवळ एक चित्रपट आहे. आम्हाला अद्याप न्याय मिळालेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandeepa Dhar (@iamsandeepadhar)

संदीपाने अखेरीस चित्रपटाचं, चित्रपटात काम केलेल्या कलाकारांचं आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं कौतुक केलं आहे. “जगाला हे सत्य दाखवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर यांच्या उत्तम नेतृत्त्वाखाली काम केलेल्या सगळ्या अभिनेते-अभिनेत्रींना सलाम!”, संदीपाने लिहिलंय. काश्मीरमधल्या आपल्या घराचे काही जुने फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.

‘अभय’ सारखे वेब शोज आणि ‘दबंग २’ आणि ‘हिरोपंती’ या चित्रपटांमधल्या आपल्या अभिनयासाठी संदीपा धर ही अभिनेत्री ओळखली जाते.

 

sandeepa dhar im

 

या चित्रपटाच्या निमित्ताने जे या भयानक परिस्थितीतून प्रत्यक्षात गेलेत असे लोक पुढे येऊन आपले अनुभव सांगत आहेत. आता तर बॉलिवूडमधली एक अभिनेत्रीसुद्धा या भीषण घटनेचा भाग होती ही गोष्ट आपल्या समोर आलीये.

आपल्या हिंदू बंधू-भगिनींवर या घटनेने खोलवर केलेल्या जखमा पूर्णतः बऱ्या होऊ शकल्या नाहीत तरी या चित्रपटाद्वारे त्यांच्यावर झालेला घोर अन्याय आता किमान लोकांसमोर आला आहे आणि आपण सगळेच त्यांच्या दुःखात सहभागी आहोत ही बाब त्यांना थोडंतरी समाधान, शांती देवो!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?