' ‘अल्लाह ओ अकबर’च्या घोषणा झाल्या आणि….’ काश्मीरमधला एक थरारक अनुभव – InMarathi

‘अल्लाह ओ अकबर’च्या घोषणा झाल्या आणि….’ काश्मीरमधला एक थरारक अनुभव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. या चित्रपटातून काश्मीरी पंडितांचं भीषण वास्तव आपल्या समोर आलंय. इतकी भयंकर घटना आपल्या देशात घडली आणि आपल्याला याविषयी काहीच माहिती नव्हतं अशी भावना जो तो व्यक्त करतोय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्याच हिंदू बांधवांना इतक्या मोठ्या संहाराला सामोरं जावं लागलं आणि आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही अशी हळहळ सगळ्यांना वाटतेय.

या चित्रपटावर वाद सुरू असतानाही या चित्रपटाला मिळणारा लोकांचा उदंड प्रतिसाद अजिबात कमी न होता दिवसेंदिवस वाढतोच आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काश्मिरी पंडितांचा विषय नव्याने चर्चेत आला आहे.

 

the kashmir files featured IM

 

१९ जानेवारी १९९० ला कमीत कमी ३ लाख काश्मिरी पंडितांना रातोरात आपल्याच घरातून बाहेर काढलं गेलं. दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये हल्ला केल्यानंतर आणि काही संघटनांनी काश्मिरी पंडितांना धमकावल्यानंतर त्यांच्यावर आपल्याच राज्यातून पळून जावं लागण्याची वेळ आली. त्यांना विस्थापित व्हावं लागलं.

एका रात्रीत हा अख्खा समाजच उद्ध्वस्त झाला होता. १९ जानेवारीच्या आधी बरेच दिवस तिथे भयाचं आणि धोकादायक वातावरण होतं. काही काश्मिरी पंडितांना लक्ष केलं जात होतं आणि मारलं जात होतं.

या सामुहिक पलायनाला इतकी वर्षं लोटल्यानंतरही आजही दुर्दैवाने काही कुटुंबं जम्मू आणि दिल्लीत निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत आहेत. काश्मिरी पंडितांना आजही त्यांच्याच राज्यात निर्वासित म्हणून राहावं लागतंय हे भारत सरकारचं अपयश आहे असेही दावे केले गेले आहेत.

त्या रात्रभर मशिदींमधून ३ घोषणा सातत्याने दिल्या जात होत्या. “जर तुम्हाला काश्मीर मध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला ‘अल्ला हो अकबर’ म्हणावं लागेल.”, “इथे काय चालेल? शरिआचा कायदा”, “आम्हाला पाकिस्तान हवंय, त्याबरोबरीने हिंदू स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांशिवाय हव्या आहेत.” अशा त्या भयंकर घोषणा होत्या.

 

kashmiri pandit inmarathi 5

 

‘द काश्मीर फाईल्स’मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय विस्तृतपणे दाखवला आहे. पण कुठलीही घटना जेव्हा घडते तेव्हा ती घटना घडायच्या बराच काळ आधी तिची पाळंमुळं रुजलेली असतात.

ही घटना घडण्याच्या ५ वर्षं आधीपासूनच काश्मीरमध्ये भयाचं वातावरण होतं. या वर्षांमध्ये काश्मीरी हिंदूंचं सर्वतोपरी नुकसान झालं. त्यांची घरं, मंदिरं त्यांच्या डोळ्यांदेखत बेचिराख केली गेली, त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले गेले. अनेकांचे बळी गेले.

अशाच एका चित्तथरारक घटनेचा वेध काश्मिरी लेखक रत्तन लालशांत यांनी आपल्या ‘अ लॉन्ग ड्रीम ऑफ होम (द परसेक्युशन, एग्झोडस अँड एक्साईल ऑफ काश्मिरी पंडित्स)” या पुस्तकातून घेतला आहे.

हे पुस्तक डिसेंबर २०१५ मध्ये प्रकाशित झालं असून ‘द गार्डन ऑफ सॉलीट्युड’ आणि ‘अ फिस्टफुल ऑफ अर्थ अँड अदर स्टोरीज’चे लेखक सिद्धार्थ गिगू आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आणि वेबझीन्सवर ज्यांचं लेखन छापून आलंय ते स्तंभलेखक वरद शर्मा यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे.

‘ब्लूम्सबरी इंडिया’ने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात वेगवेगळे किस्से आहेत. मात्र १९ जानेवारी १९९० ची घटना घडण्यापूर्वी काश्मीरमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक प्रसंगाचं वर्णन लेखकाने या पुस्तकात केलंय. त्या प्रसंगाविषयी आपण जाणून घेऊ.

लेखकाने पुस्तकात वर्णन केलेली ही घटना १९८९च्या ऑगस्टमध्ये घडली होती. लेखक लालशांत अनंतनागवरून श्रीनगरला परत येत होते. इंदिरा नगरला बस मधून उतरण्याऐवजी लालशांत यांनी लालचौकला शॉपिंग करायला जायचं ठरवलं.

बस स्टॉपपाशी पोहोचली तसं लेखकाने अचानक काही मुलांच्या गॅंगला ‘अल्ला हो अकबर’ अशा घोषणा देताना पाहिलं. त्या मुलांनी ड्रायव्हरला आणि बस मधल्या प्रवाशांना “खाली उतरा”. सगळेजण बसमधून उतरले आणि काही कळायच्या न कळायच्या आत रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला धावू लागले.

 

kashmiri pandit inmarathi 6

 

अवघ्या काही मिनिटांच्या अवधीत त्या बसने पेट घेतला. स्फोटाच्या बधिर करणाऱ्या आवाजामुळे आणि बस जळतेय हे पाहून लालचौकमधले बरेचजण तिथे जमा झाले. जोरजोराने घोषणा चालल्या होत्या आणि ‘अल्ला हो अकबर,अल्ला हो अकबर’चा सतत जप चालला होता.

हा सगळा प्रकार सुरू असताना  तिथून पळ काढण्यात लेखकाला यश आलं. एकही पोलीस त्यांच्या दृष्टीस पडत नव्हता. सगळी बस जळून खाक झाली आणि पोलादाचा ढीग जमलाय हे पाहून तिथल्या बघ्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली.

आपण वेळेत तिथून आपली सुटका करून घेऊ शकलो याचं लालशांत यांना हायसं वाटलं. अशा घटना जेव्हा जेव्हा घडायच्या तेव्हा काश्मिरी पंडितांनी त्यावेळी त्या परिसरात असणं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं असायचं असं लेखक नमूद करतात.

त्यावेळच्या काश्मीरमधल्या परिस्थितीची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. किती अस्थिर आणि वेदनामय जगणं वाट्याला आलं होतं काश्मिरी हिंदूच्या!

 

kashmiri pandits 2 IM

 

लेखकाने त्यांच्या पुस्तकात लिहिलेला हा प्रसंग वाचून अंगावर अक्षरशः शहारे येतात. त्यावेळच्या काश्मिरी हिंदूंच्या दुर्दैवाचं, त्यांच्या हतबलतेचं यथार्थ चित्रण अशा कलाकृतींमधून केलं गेलंय आणि आपण आज ते जाणून घेऊ शकतोय यासाठी अशा कलाकृती निर्माण करणाऱ्यांचे आभारच मानायला हवेत.

मात्र अशा प्रकारच्या हिंसेची घटना बघण्याची लेखकाची ही पहिलीच वेळ नव्हती. आणखी एका प्रसंगी, लेखक एक महत्त्वाचे लेखक हरी कृष्ण कौल यांना एका दुपारी श्रीनगरच्या रेसिडेन्सी रोडवरच्या शक्ती रेस्टॉरंटमध्ये भेटले होते.

काहीतरी खाण्यासाठी त्यांनी ऑर्डर दिली होती आणि आपली ऑर्डर यायची ते दोघे वाट बघत होते. अचानक ती जागा हलायला लागली आणि सिलिंगचा एक भाग खाली कोसळला. ते दोघे एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसले होते. तिथे सगळीकडे धूर पसरला होता. सगळे लोक ओरडायला लागले आणि घाईघाईने बाहेर पडले. त्याच धुरात आपल्याला आपला मित्रही दिसेनासा झाला असं लेखक लालशांत लिहितात.

या पुस्तकाव्यतिरिक्त लेखक लालशांत यांची आणखीही काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आहेत या. आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर छप्पर आहे, आपल्या सगळ्या मूलभूत आणि इतरही आवश्यक गरजा पूर्ण होत आहेत, मात्र आपल्याच देशातल्या काही भागांमधले लोक भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वतंत्र, सुरक्षित नव्हते, कित्येकांचे या सगळ्यात नाहक बळी गेले आणि जे मागे उरले त्यांचीही या सगळ्या अमानुष प्रसंगांतून सुटका झालीच नाही ही गोष्ट मनाला चटका लावते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

====

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?