' भारतात चौथ्या लाटेची तीव्रता कितपत असू शकते? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या – InMarathi

भारतात चौथ्या लाटेची तीव्रता कितपत असू शकते? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०२० च्या सुरुवातीला जेव्हा कोव्हीड भारतात आला तेव्हा हा आजार किती काळ असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. खरं सांगायचं तर , सुरुवातीला आपल्याला कोव्हीडचं गांभीर्यही पुरेसं लक्षात आलं नव्हतं. मग दर दिवसाला रुग्णांचा वाढता आकडा दिसू लागला आणि आपण सगळेच कोव्हीडमुळे चिंताग्रस्त झालो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पहिल्या लाटेने मनात निर्माण केलेली भीती दुसऱ्या लाटेच्या वेळेस आणखी मोठी झाली आणि हळूहळू आपल्याच नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, ओळखीच्यांना किंवा अगदी स्वतःलाही कोरोना झाला तरी त्याचं आधीइतकं आश्चर्य वाटेनासं झालं. समोर जी परिस्थिती येईल त्याला सामोरं जाण्याखेरीज आपल्याकडे पर्याय उरला नाही. कित्येकांनी या काळात आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं.

कुठलीही आपत्ती पूर्वकल्पना देऊन येत नाही आणि येते तेव्हा सगळं चित्रच बदलून टाकते याचा अनुभव आपण सगळेच गेली दोन वर्षं घेत आहोत.

 

corona india

 

भारतात आतापर्यंत कोरोनाच्या ३ लाटा येऊन गेल्या आहेत. आता कुठे जरा परिस्थिती शांत होतेय आणि सगळं हळूहळू पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे असं वाटत असतानाच चीनमध्ये अचानक कोरोनाच्या केसेस प्रचंड वाढत असल्याचं बातम्यांमधून दिसू लागलं आणि पुन्हा एकदा आपलं धाबं दणाणलं. भारतात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते का? आली तर त्याची तीव्रता कितपत असू शकते? असे प्रश्न आपल्याला पडायला एव्हाना सुरुवात झाली आहे. तर जाणून घेऊया यासंदर्भात तज्ञांचं मत.

Omicron BA.2 या व्हेरियंटमुळे युरोप आणि आशियासकट जगभरातल्या अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा अचानकपणे कोरोनाच्या केसेसची लाट आलेली दिसतेय. चीनसकट बऱ्याच देशांमध्ये आऊटब्रेक झाल्यापासून सर्वाधिक केसेसची एका दिवसाची लाट आल्याच्या बातम्या इतक्यातच समोर आल्या आहेत. २०२२च्या जानेवारीच्या शेवटच्या दिवसांनंतर पहिल्यांदाच आठवड्या-आठवड्याला वाढणाऱ्या कोरोना केसेसची नोंद जगभरात झाली आहे.

 

disney face masks corona inmarathi 3
newyorkmagzine.com

डब्ल्यूएचओने १५ मार्च ला केलेल्या महामारीविषयक साप्ताहिक अपडेटनुसार जगभरातल्या कोरोनाच्या केसमध्ये ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता चौथी लाट येणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या डेल्टा या धोकादायक व्हेरियंट मुळे दुसरी लाट उसळली होती.

 

omicron inmarathi1

 

कानपूरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या गणित आणि स्टॅटेस्टिक्स विभागाच्या एका अभ्यासानुसार, या वर्षी जूनमध्ये कोव्हीडची चौथी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अभ्यासाचं आधी पुनरावलोकन झालेलं नसलं तरी त्यात असं म्हटलंय की या लाटेमुळे भारतातल्या आरोग्यविषयक पायभूत सुविधांवर कुठलाही ताण येणार नाही आणि ही लाट आधीच्या लाटांपेक्षा कमी धोकादायक असेल.

एक ख्यातनाम भारतीय विषाणूशास्त्रज्ञ आणि वेल्लोरच्या ‘ख्रिश्चन मेडिकल कॉलेज’चे माजी प्रोफेसर डॉ. टी. जॅकॉब जॉन यांनी शनिवारी सांगितलं की, “दुसऱ्या कुठल्या व्हेरियंटचा उद्रेक झाला नाही तर कोव्हीड-१९ ची चौथी लाट येण्याच्या शक्यता कमी आहेत. जॉन म्हणाले की, “कोव्हीड-१९ च्या चौथ्या लाटेचा अंदाज बांधण्याचं कुठलंही शास्त्रीय अथवा महामारीविषयक कारण नाही. पण हे होणारच नाही असा अंदाज कुणीही बांधू शकत नाही.

 

corona patient inmarathi

संभाव्यता खूप कमी आहे असं मी म्हणू शकतो. पण याविषयी जागरूक राहणं आणि खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे.” त्यांनी पुढे म्हटलं की, “चीन आणि जगभरातल्या बाकीच्या भागांमध्ये काय घडतंय याविषयी आपण काळजी करण्याची गरज नाही. दोन्हीचे संदर्भ अत्यंत वेगळे आहेत. चीनची ‘झिरो कोव्हीड पॉलिसी’ होती. त्यांनी आक्रमकपणे कोव्हीडच्या चाचण्या केल्या आणि लोकांना क्वारंटाईन केलं आणि हा आऊटब्रेक बराच काळ दाबून ठेवला आणि त्यामुळे आता ओमिक्रोनला आवरणं तिथे अशक्य झालंय.

 

corona habits inmarathi

 

हाँग काँग, न्यूझीलंड, चीन, तैवान अशा सगळीकडे ओमिक्रोन पसरतोय. व्हायरसेस आणि त्यांच्या आनुवंशिक क्रमाकडे पाहत राहण्याची, नवे कुठले व्हेरियंट्स दिसत आहेत का, त्यातले कुठले व्हेरियंट्स स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या परिसरांमध्ये ओमिक्रोनला मागे टाकत आहेत का हे पाहण्याची आपल्याला आवश्यक्ता नाही.”

‘आयआयटी कानपूर’ मॉडेलने चौथ्या लाटेविषयी बांधलेल्या अंदाजासंदर्भात बोलताना लाटांचा अंदाज गणिती मॉडेलिंगवरून बांधता येऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “लोकांच्या मनात कशी आणि कुठल्या हेतूंकरता भीती निर्माण करण्याची आवश्यक्ता आहे ते मला कळत नाही. त्यामुळे गणिती मॉडेलिंगवरून लाटेचा अंदाज बांधण्यावर माझा विश्वास नाही.

जर सगळे घटक त्यात अंतर्भूत होत असतील तरच गणिती मॉडेलिंग चांगलं आहे.” पण त्याच वेळी अत्यंत अनपेक्षितपणे व्हायरस पसरतो या बाबीची नोंद घेत चौथी लाट येऊच शकत नाही असंही निश्चितपणे म्हणता येऊ शकत नाही असं ते म्हणाले.

 

corona 2.0 featured inmarathi

 

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोव्हीडबाबतीत योग्य त्या प्रकारे वागलं जावं यासाठी असलेल्या ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-व्हॅक्सिनेशन अँड अधेरन्स’ या पाच पक्षीय धोरणावर लक्ष केंद्रित करणं किती महत्त्वाचं आहे यावर भर देत अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पत्रं लिहिलं आहे.

राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आक्रमकपणे आणि टिकाऊ स्वरूपात जीनोम क्रमवारी करण्यावर, निरीक्षणात वाढ करण्यावर आणि कोव्हीड-१९ च्या परिस्थितीविषयी एकूणच सावधानता बाळगण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि कोव्हीडबाबतीत योग्य त्या प्रकारे वागलं जावं यासाठी असलेलं ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-व्हॅक्सिनेशन अँड अधेरन्स’ हे धोरण व्यवस्थित अवलंबलं जाणं किती महत्त्वाचं आहे यावर भर दिला पाहिजे.

सुरुवातीच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आणि संसर्गाचा प्रसार होण्यावर आळा यावा यासाठी नव्या आपत्कालीन केसेसच्या समूहावर देखरेख ठेवणे, ILI आणि SARI च्या केसेसचा ट्रॅक ठेवणे हे सतत सुरू ठेवलं जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये NITI आयोग सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी स्पष्ट केलंय की, आपल्या लोकसंख्येपैकी बहुतांश लोकांचं नैसर्गिकरित्या आणि कोव्हीडचे दोन्ही डोसेस घेऊन लसीकरण झाल्यामुळे आणखी एका संभाव्य लाटेसाठी भारत तयार आहे.

 

covid vaccine inmarathi

 

राज्याच्या एजन्सीजनी कोव्हीडसंदर्भात जागरूकता वाढवावी आणि कोव्हीडच्या काळासाठी योग्य असलेल्या मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी आणि सोहळ्यांमध्ये पुरेसं शारीरिक अंतर राखणे आणि हातांची आणि श्वसनाशी निगडीत व्यवस्थित स्वच्छता राखणे या प्रोटोकॉल्सचं पालन केलं जावं असं सांगण्यात आलं आहे.

कोरोनाचा आणखी कुठला नवा व्हेरियंट येईल आणि केसेस पुन्हा वाढल्या तर या शक्यतेची आता आपल्याला भीती वाटेनाशी झाली आहे. या अस्थैर्यालाही आपण सरसावलो आहोत. आपली भीती पळून जाते तेव्हा शत्रूही आपसूक मागे हटतो. तसंच कोरोनाच्याही बाबतीत व्हावं. कोरोनामुळे आपल्यातल्या बहुतेकांची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यासाठी आपल्याला अजून बराच काळ झुंज द्यावी लागणार आहे. मात्र कोरोनाला आता घाबरत नाही हे पाहून कोरोनाचं हे संकट एकदाचं पूर्णपणे संपावं हीच प्रार्थना.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?