' काश्मीर फाईल्सबद्दल अविनाश धर्माधिकारी सरांचं मत विचारात पाडणारं आहे

काश्मीर फाईल्सबद्दल अविनाश धर्माधिकारी सरांचं मत विचारात पाडणारं आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अविनाश धर्माधिकारी 

===

मी ‘काश्मीर फाईल्स’ पाहिला. तुम्हीही तो पहायला हवा. सर्व भारतीयांनी तो लक्षपूर्वक पाहिला पाहिजे. देश म्हणून उशीरा जाग येण्यासाठी आपण प्रसिद्ध आहोत. परंतु इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणं – It is never too late. उशिरा का होईना जागं होण्यासाठी, पहिलं पाऊल म्हणून ‘काश्मीर फाईल्स’ सर्व भारतीयांनी पाहिला पाहिजे.

मनात थोडी शंका आणि रोखलेला श्वास घेऊन मी चित्रपटगृहात प्रवेश केला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हा मूळचा डाव्या-कम्युनिस्ट विचारांचा. या विचारांचा फोलपणा लक्षात आल्यानंतर तो बदलत गेला आणि ‘राष्ट्रवादी’ बनला. Budhha in a Traffic Jam हा विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट डावे विचारवंत, प्राध्यापक, पत्रकार, लेखक – एकूण मिळून Communist Ecosystem चा शिक्षण क्षेत्रावरचा प्रभाव, त्यातून नक्षलवाद या डाव्या अतिरेकी चळवळीला होणारा मनुष्यपुरवठा, Urban Naxalism चं, नेमकं, अंगावर येणारं चित्रण करतो.

 

vivek agnihotri im 1

 

अभ्यास-पुराव्यांवर आधारित त्याचा ‘ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपटदेखील आपण पाहायला हवा. जानेवारी १९६६ मध्ये ‘ताश्कंद’ला भारत-पाकिस्तान शिखर परिषद झाली. ताश्कंद करारावर सही झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १० जानेवारी १९६६ ला भारताचे कर्तबगार पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांचा तिथंच मृत्यू झाला. हृदयविकारानं त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. परंतु तेव्हापासूनच्या वाचनानंतर त्यांचा मृत्यू हृदयविकारानं झाला यावर माझाही विश्वास नाही. उपलब्ध कागद-पुराव्यांवरून ही सगळी कहाणी विवेक अग्निहोत्रीनं मांडली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे सगळं माहित असूनही ‘काश्मीर फाईल्स’ बघताना काळजी वाटत होती कारण विषय अतिशय संवेदनशील आहे. स्वतंत्र भारतात घडलेल्या भयानक आणि प्रक्षोभक घटनांवर आधारित आहे. ही दाहकता दाखवताना हा चित्रपट ‘प्रचारकी’ असेल का आणि दुर्दैवानं तो तसा असेल तर कलाकृती म्हणून त्याची किंमत कमी होईल का अशी (आता उगीचच वाटणारी) शंका माझ्या मनात होती.

 

the kashmir files 1

 

पहिल्याच फ्रेमला चित्रपट सुरू होतो. विषयाची पकड घेत त्याची तीव्रता वाढत जाते. सगळ्यात दाहक आणि शंभर टक्के सत्य घटनेनं त्या चित्रपटाचा शेवट होतो. मुद्दा दुय्यम असला तरी ‘कलाकृती’म्हणून देखील हा चित्रपट असामान्य आहे. विवेक अग्निहोत्रीचे आधीचे चित्रपट पाहताना कुठं सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग जास्त चांगलं करता आलं असतं, असं वाटत राहतं. मात्र ‘काश्मीर फाईल’ मधून विवेक अग्निहोत्रीमधल्या एका दिग्दर्शकांनं वेगळी ऊंची गाठली आहे.

सर्वच कलाकारांचा अभिनय असामान्य आहे. ‘हम देखेंगे’ या डाव्या चळवळीत वापरल्या जाणाऱ्या गाण्याचा प्रभावी वापर या सगळ्यासहित हा चित्रपट असामान्य आहे. चालू वर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातून हा चित्रपट जायला हवा. बातमी आणि मनोरंजन या क्षेत्रात भारत आणि जगभर पसरलेल्या भारतविरोधी शक्तींनी हा चित्रपट ‘कान खोल के’ पहायला हवा. अमेरिकेतलं न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, ब्रिटनमधलं गेल्या दीडशे वर्षांपासून निघणारं इकॉनॉमिस्ट हे साप्ताहिक, बीबीसी (मी त्याला बुलशिट ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणतो) यांनी हा चित्रपट नीट पाहायला हवा.

१९८० मध्ये काश्मिरच्या खोऱ्यात इस्लामिक दहशतवाद सुरू झाला आणि वाढू लागला. पाकिस्तान आणि त्याची गुप्तहेर संघटना आयएसआय यांनी या दहशतवादी शक्तींना खतपाणी घातलं, हे स्वयंस्पष्ट सत्य आहे. १९८४ ते १९८९ या काळात राजीव गांधी पंतप्रधान असताना हा दहशतवाद क्रमाक्रमानं वाढत गेला. मिळत असलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडं केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं.

 

rajiv gandhi inmarathi

 

१९ जानेवारी १९९० ही तारीख तर भारतीयांनी जन्मात विसरू नये! (जेव्हा पाकव्याप्त काश्मीरसहित काश्मीरचं भारताशी खऱ्या अर्थानं एकत्रीकरण होईल, काश्मिरी पंडितांचं मूळ जागी सन्मान आणि सुरक्षापूर्वक पुनर्वसन होईल तेव्हा ही तारीख विसरली तर चालेल.) या तारखेच्या काही काळ आधी काश्मिरी पंडितांना धमक्या दिल्या जात होत्या – इस्लामचा स्वीकार करा, नसेल तर इथून निघून जा किंवा मरा. खोऱ्यातल्या अनेक मशिदींमधून जाहीरपणे हे सांगितलं जात होतं.

आधीपासूनच सामूहिक हत्या, बलात्कार असे प्रकार घडत होते. परंतु या सर्वांची चरमसीमा गाठली ती १९ जानेवारी १९९० या दिवशी. या तारखेच्या ४८ तास आधी काश्मिरी पंडितांना वरीलपैकी एक पर्याय निवडायला सांगितलं गेलं. घरं पेटवण्यात आली, मंदिरं उध्वस्त झाली. सामूहिक खून, बलात्कार, सक्तीची धर्मांतरं झाली. जीव वाचवण्यासाठी अनेक काश्मिरी पंडितांना आपली घरं सोडून अंगावरच्या कपड्यानिशी पळून जावं लागलं. ते भारतातच निर्वासित बनले.

 

kashmiri pandits 2 IM

 

महाराष्ट्र शासनात तेव्हा मी आयएएस अधिकारी म्हणून काम करत होतो. कार्यकर्ता, भारताचा नागरिक या नात्यानं घडणाऱ्या घडामोडी पाहत होतो. मला आजही लक्षात आहे की त्या तारखेला अशा घटना घडत असताना काही भारतीय प्रसारमाध्यमे आणि काही पत्रकार मांडणी करत होते की काश्मीर खोऱ्यात अल्पसंख्याक असलेले काश्मिरी पंडित श्रीमंत आहेत.

तिथले उद्योगधंदे त्यांच्या हातात आहेत. त्यांनी गरीब मुस्लिमांवर केलेल्या अत्याचाराची प्रतिक्रिया म्हणून हे सगळं घडत आहे! अजूनही युट्युबवर याच्या क्लिप्स आहेत. गेली ३२ वर्षे देशाला ‘जणू काही घडलंच नाही’ असं दाखवण्यात आलं आहे.

आपल्या देशातला डाव्या विचारांचा बालेकिल्ला जेएनयू. तिथं काश्मिरी दहशतवाद्यांची बाजू घेतली जाते, तिथले प्राध्यापक हेच विद्यार्थ्यांना शिकवतात, ‘भारत तेरे टुकडे हजार’ अशा घोषणा त्या विद्यापीठात दिल्या जातात. संसदेवर हल्ला केल्यानं ज्या अफजल गुरूला फाशी देण्यात आली त्या तारखेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेएनयूमध्ये त्याचं ‘बलिदान वर्ष’ साजरं केलं जातं. ‘अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’ अशा घोषणा दिल्या जातात.

भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातल्या एका घटकावर डाव्या विचारांचं प्रभुत्व आहे. हा डावा विचार ‘राष्ट्रवादा’ला विरोध करतो. अनेकदा हा विचार देशद्रोह्यांची बाजू घेतो. हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या एका भागावरही डाव्या विचारांचं, दाऊद गॅंगचं प्रभुत्व आहे. काश्मीर प्रश्न मांडणारा चित्रपट बॉलीवूडमध्ये मिळणं जवळपास अवघड आहे.

 

jnu inmarathi 2
DNA

या उलट भारतीय सैन्य काश्मिरी जनतेवर अत्याचार करतं असा प्रचार JNU मधले तथाकथित विद्यार्थी नेते करतात. आपल्या देशातली डाव्या पुरोगामित्वाची हीच व्याख्या आहे. या सर्वांना विवेक अग्निहोत्री आणि काश्मीर फाईल्सनं झणझणीत अंजन घातलं आहे.

चित्रपटातली प्रत्येक फ्रेम घडलेल्या प्रत्येक घटनेवर पुराव्यानिशी भाष्य करणारी करते. तिथं अतिरेक नाही. उलट जे घडलं ते दाखवताना दिग्दर्शकानं संयमच बाळगला आहे. ‘इस्लामिक दहशतवाद’ मात्र सुस्पष्टपणे मांडला आहे. १९९० हे स्वातंत्र्याचं ४३ वं वर्ष. प्रजासत्ताक गणराज्य निर्माण झाल्यापासून ४० वं वर्ष. परंतु तरीही काश्मीरी पंडितांचं संरक्षण आपली राज्यघटना, लोकशाही, घटनात्मक यंत्रणा करू शकली नाही.

आजही काश्मिरी पंडित आपल्याच देशात निर्वासित आहेत. वेळेत जाग आली नाही तर याचा धोका संपूर्ण देशाला आहे हे कळण्यासाठी कोणत्याही प्रकारची धर्मांधता असण्याची आवश्यकता नाही. राज्यघटना आणि लोकशाहीच्या चौकटीत, भयानक आक्रमक, हिंसक असलेला ‘इस्लामिक दहशतवाद’ मोडून काढला पाहिजे. या दहशतवादाला डाव्या विचारांच्या एका फार मोठा घटकाचा पाठिंबा आहे. शिक्षणपद्धती, पाठ्यपुस्तके यांच्याद्वारेसुद्धा हा पाठिंबा आहे.

 

kashmiri pandit inmarathi 5

 

आयएएस होण्यापूर्वी एक कार्यकर्ता म्हणून वेळोवेळी मी काश्मीर खोऱ्यात गेलो आहे. त्यावर लेखनही केलं आहे. आयएएस झाल्यानंतर सैन्यासोबतचं माझं प्रशिक्षण पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवर झालं आहे. चाणक्य मंडल परिवारमधून शिक्षण घेतलेले अनेक अधिकारी काश्मीरमध्ये आपली जबाबदारी पार पाडत आहेत. निर्वासित काश्मिरी पंडितांच्या तंबूंना (पुढं तिथं इमारती निर्माण झाल्या) भेट देण्याचं दुर्दैवही माझ्या वाट्याला आला आहे. जम्मूपासून १२ किलोमीटरवर ‘जगती’ इथं काश्मीर खोऱ्यातल्या पंडितांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं.

कलम ३७० आणि ३५ अ रद्द झालं. पाऊल म्हणून ते मोठं होतं. परंतु त्यामुळं सगळे प्रश्न संपले नाहीत. इस्लामिक दहशतवाद काश्‍मीरसहित भारताच्या विविध भागात आजही आहे. त्याला पाकिस्तानचा पाठिंबा, सहकार्य, फंडिंग अजूनही आहे. त्यांचे ‘स्लीपर सेल्स’ अजूनही देशाच्या प्रतीक्षेत आहेत.

 

kashmir after article 370 inmarathi

 

भयानक रक्तपाताच्या या योजनेवर मात करायची असेल तर ‘भारतीय नागरिक’ या नात्यानं सर्वांनी जागं व्हायला हवं, एकसंध व्हायला हवं. लोकशाही आणि राज्यघटना बळकट करायला हवी, हा ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा मला कळणारा संदेश आहे. असामान्य, अंगावर येणारी, जागृत कलाकृती म्हणून का होईना, भारतीय नागरिक या नात्यानं आपण सर्वांनी ‘काश्मीर फाईल्स’ पाहिला पाहिजे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?