' निवडणुकीच्या रिंगणात दोन पुरुषांना धोबीपछाड करणारी ‘पॅड वुमन’ – InMarathi

निवडणुकीच्या रिंगणात दोन पुरुषांना धोबीपछाड करणारी ‘पॅड वुमन’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

निवडणूका जवळ आल्या, की जनतेला खोटी आश्वासनं द्यायची आणि नंतर त्या सगळ्यांवर पाणी फिरवायचं असंच चित्र आपल्याला बऱ्याचदा राजकारण्यांच्या बाबतीत दिसतं, पण समाजाचा विकास करण्याची खरोखर कळकळ असणारी व्यक्ती जेव्हा या राजकारणाच्या दलदलीत उतरते आणि सत्तेत येते तेव्हा खऱ्या अर्थाने जनतेला कुठेतरी आशेचा किरण दिसतो.

अमृतसर इस्टच्या निवडणुकीच्या बाबतीत यंदा अशीच एक समाधानकारक गोष्ट घडलीये. यंदाच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपल्याला चुरशीची लढत पहायला मिळाली. अमृतसर ईस्टच्या निवडणूक निकालाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अमृतसर ईस्टच्या सीटसाठी अटीतटीचा सामना रंगला होता. या सीटवर कोण निवडून येईल याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अमृतसर ईस्ट मतदारसंघाच्या या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचा बहुरंगी सामना पाहायला मिळाला असला तरी आमनेसामने असलेल्या काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू आणि शिरोमणी अकाली दल कडून उभे असलेले बिक्रम सिंग मजिठिया या दोघांपैकी नेमकं कोण जिंकणार अशा चर्चांना उधाण आलं होतं.

ही दोन्ही तशी मोठीच नावं. मात्र असं असूनही आम आदमी पार्टीच्या उमेदवार जीवन ज्योत कौर यांनी निवडणुकीच्या रिंगणात या दोघांनाही धोबीपछाड करत बाजी मारली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू आणि बिक्रम सिंग मजिठिया या दोघांचाही अमृतसर ईस्टची कुठलीही विधानसभा निवडणूक न हरल्याचा रेकॉर्ड आहे. यावर्षी मात्र हे दोघेही ही निवडणूक हरले आहेत.

 

aap im

 

आम आदमी पार्टीच्या उमेदवार जीवन ज्योत कौर या ३९,६७९ मतं मिळवून या निवडणुकीत विजयी ठरल्या आहेत. तब्बल १८ वर्षांनी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची लढत अकाली दलचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांच्याबरोबरीनेच आम आदमी पार्टीच्या उमेदवार जीवनज्योत कौर यांच्याशीही होती.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी ही लढत जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावली होती, पण जीवनज्योत कौर यांच्या अनपेक्षित विजयाने सगळ्यांनाच थक्क केलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना ३२,९२९ मतं मिळालेली असून जीवनज्योत कौर यांच्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर मजिठिया हे २५, १८८ मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

यंदा अमृतसर ईस्टच्या सीटकरता एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. बीजेपीकडून या सीटसाठी जगमोहन सिंह राजू हे उमेदवार उभे होते. या लढतीत त्यांना ७२८६ मतं मिळाली. ते तामिळनाडू केडरचे आयएएस ऑफिसर होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी व्हीआरएस घेऊन राजकारणात प्रवेश केला.

या विजयामुळे प्रकाशझोतात आलेल्या जीवनज्योत कौर या खरंतर नवज्योत सिंग सिद्धू आणि बिक्रम सिंग मजिठिया यांच्याइतका प्रसिद्ध चेहरा नक्कीच नाहीत. आपल्याला त्यांच्याविषयी काही माहिती असण्याची शक्यता तशी फार कमी आहे.

 

aap im 1

 

‘आप’ पार्टीच्या जीवनज्योत कौर या एक समाजसेविका आहेत. त्या ‘पॅडवुमन ऑफ पंजाब’ या टोपणनावाने ओळखल्या जातात. मूलभूत हक्कांपासून वंचित राहिलेल्या महिलांच्या मनात प्लास्टिक सॅनिटरी पॅड्स वापरल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करणे आणि त्यासंदर्भात त्यांना शिक्षण देणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय्य आहे.

‘पंजाब किंग्ज’च्या आयपीएल संघाच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवरच्या पोस्टमधून आपल्याला ही सगळी माहिती मिळते. या पोस्टमधील माहितीनुसार, त्या स्विस मधील एका कंपनीशी संलग्न आहेत जी कंपनी पुनर्वापर करता येतील असे सॅनिटरी पॅड्स ग्रामीण भागांतील महिलांना मोफत पुरवते.

या कंपनीच्या सहकार्याने त्या ‘इकोशी मेन्स्ट्रुअल हेल्थ प्रोग्रॅम’ या प्रकल्पासाठीही काम करत आहेत. मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनात अभूतपूर्व बदलाला चालना देणे आणि त्यायोगे स्वच्छ आणि अधिक निरोगी वातावरण निर्माण करणे हे या प्रकल्पाचं धेय्य आहे.

या प्रकल्पाअंतर्गत पंजाबी शाळा, झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागांमध्ये इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप केलं जातं. त्या ‘श्री हेमकुंट एजुकेशन सोसायटी’ या संस्थेच्या संस्थापक असून त्यांनी या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं आहे.

 

aap im 2

 

ही एक विना नफा, राजकीय नसलेली आणि ऐच्छिक सेवा पुरवणारी संस्था आहे. समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे, ही संस्था समाजतल्या गरीब आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करत आहे. गरजू मुलांना शिक्षण देत आहे.

ही संस्था साक्षरता आणि शिक्षण, आरोग्य, झोपडपट्टी पुनर्वसन, व्यावसायिक शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रांत आणि यासारख्या आणखी बऱ्याच सामाजिक प्रश्नांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करत आलेली आहे.

शिरोमणी अकाली दल, काँग्रेस, आम आदमी पार्टी, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स या पार्ट्यांनी पंजाबच्या निवडणुकीत लढत दिली. मात्र आम आदमी पार्टी या लढतीत सगळ्यांना पुरून उरेल याची अरविंद केजरीवाल यांना खात्री होती.

१० मार्चला ‘आप’चा प्रचंड विजय झाल्यानतर त्यांचे हे सगळे अंदाज खरे ठरले आहेत. अलीकडच्या ट्रेंडनुसार ‘आप’ची तब्बल ८९ सीट्सवर आघाडी असून काँग्रेस, अकाली दल आणि बीजेपी या पक्षांचे उमेदवार अनुक्रमे १४, ९ आणि ४ जागांवर निवडून आले आहेत.

 

aap im 3

 

निवडणुकीत कोण निवडून येणार याची उत्सुकता आपल्याला असतेच, पण जेव्हा एखादी समाजसेविका सत्तेत येते तेव्हा तिच्या ध्येय्याला पुरेपूर वाव मिळायची शक्यता निर्माण होते. कौर यांना आपल्या सत्तेत असण्याचा पुरेपूर उपयोग व्हावा आणि त्यांनी यापुढेही जनतेसाठी अशीच कल्याणकारी कामं करावीत ही अपेक्षा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?