' गोष्ट अपार भक्तमहिमेची, जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या दरबारात हनुमानालाच नाकारला प्रवेश

गोष्ट अपार भक्तमहिमेची, जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या दरबारात हनुमानालाच नाकारला प्रवेश

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कितीही वर्ष उलटली आणि काळ कितीही बदलला तरी रामायण आणि महाभारत या दोन्ही कलाकृतींविषयी आपल्याला वाटणारं आकर्षण कधीच कमी होणार नाही. आपल्याला याविषयीच्या वेगवेगळ्या आख्यायिका कधी अशा पुस्तकांच्या माध्यमातून, कधी इंटरनेटवरून तर कधी कुणीतरी त्या आपल्याला सहज गप्पांच्या ओघात सांगतं तेव्हा कळतात.

मारुतीचं म्हणजेच हनुमानाचं रामायणात फार महत्त्वाचं स्थान आहे. हनुमानाला महादेवाचा अवतार मानलं जातं. हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव कसं पडलं याची गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली असते.

हनुमान प्रभू रामचंद्रांचा खूप मोठा भक्त होता. पण असं असूनही प्रभू रामचंद्रांच्या दरबाराबाहेर ‘हनुमानाला प्रवेश निषिद्ध’ अशी पाटी लिहिली गेली होती. नेमकं काय कारण होतं अशी पाटी लिहिली जाण्यामागे?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हनुमान कायम रामाच्या पायांजवळ बसायचे. सगळे रामाला दुरूनच वंदन करायचे. मग एक दिवस सगळ्यांनी भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मणाला सांगितलं, की कधीतरी हनुमंताने श्री रामचंद्रांच्या चरणांपासून बाजूला व्हावं. कायमच ते रामाच्या पायांशी बसलेले असतात. दुसऱ्यांनाही ती संधी मिळावी. हनुमानाच्या अपार भावामुळे ते रामाचे पाय सोडत नसतील, पण लोकांना मात्र त्यांची भीती वाटून त्यांना रामाच्या चरणांपाशी पोहोचताच येत नाही.

यावर “मी काहीच बोलू शकत नाही.”, असं भरताने हसून म्हटलं. लक्ष्मण म्हणाला, “प्रकरण गंभीर आहे खरं. पण रामाला काही सांगण्याची माझ्यात हिंमत नाही. तुम्ही जानकी मातेला हे सांगा.” मग सगळे जण मिळून जानकी मातेकडे गेले.

 

ramayan inmarathi

 

“उद्या हनुमान दरबाराच्या बाहेर राहतील आणि आम्ही बाकीचे भक्त रामाच्या चरणांपाशी राहू.”, असा आदेश सोडायला त्यांनी जानकी मातेला सांगितलं. जानकी माता त्यावर “ठीक आहे”, असं म्हणाल्या. पण लोकांना हनुमानाचा महिमा वाढवायचा आहे हे त्यांनी मनोमन जाणलं.

दुसऱ्या दिवशी जानकी मातेच्या आज्ञेवरून “हनुमानाचा प्रवेश निषिद्ध’ अशी दरबाराबाहेर सूचना लिहिली गेली. हनुमान बाहेरच बसले. सगळे दरबारात पोहोचले. श्री रामाने हनुमान कुठे आहेत असं विचारलं. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, “क्षमा असावी प्रभू. पण आज हनुमानाला प्रवेश निषिद्ध केला आहे.”

जानकी माता म्हणाल्या, की हे सगळे लोक म्हणाले, एक दिवस तरी हनुमंताला बाहेर राहू द्या म्हणून मी अशी आज्ञा दिली आहे. हे ऐकून प्रभू रामचंद्रांचे डोळे पाणावले. ते म्हणाले, “ज्याच्यामुळे दीनांना माझ्या दरबारात प्रवेश मिळतो त्याचाच प्रवेश निषिद्ध केला गेलाय? हनुमानाला ताबडतोब बोलवा.”

जानकी माता त्यावर म्हणाली, “ठीक आहे. जशी आपली आज्ञा. पण हनुमान तुमच्या पायांजवळ बसतात त्यामुळे इतरांना तुमच्या पायांजवळ पोहोचता येत नाही.” प्रभू म्हणाले, “हे काय म्हणतेस? ज्यांच्यामुळेच लोक माझ्या चरणांपाशी पोहोचतात त्यांच्यावर त्यांच्यामुळे लोक माझ्या चरणांपाशी पोहोचू शकत नाहीत असा आरोप केला गेलाय? बरं. हनुमान माझ्या पायांपासून दूर राहतील. पण हनुमानाकरता बाकी सेवा आहेत.”

 

ramayan im

 

हनुमानाला बोलावलं गेलं. मातेने बाहेर काढलं, मात्र प्रभूंनी आत घेतलं म्हणून हनुमानाच्या डोळ्यांत पाणी आलं. श्रीरामांनी हनुमानाला सांगितलं, “तुझ्याकरता एक सेवा आहे. मला जांभई येईल तेव्हा टिचकी वाजव.” हनुमान त्यावर “बरं” असं म्हणाले. मग हनुमान केवळ श्रीरामांच्या मुखाकडे पाहत जांभई आली रे आली, की टिचकी वाजवायची अशा तयारीत बसले.

पण मजा अशी झाली की प्रभू रामचंद्र कधी इकडे बघायचे, तर कधी तिकडे. हनुमानाला तर रामच्या मुखाकडे बघत राहणं भाग होतं. मग रामाचं तोंड जिथून दिसेल तिथे ते उडी मारायचे. ते सतत रामाच्या मुखाकडे बघत असल्यामुळे कोण कुठे बसलंय याकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं.

ते अशाने लोकांच्या डोक्यावर पडत राहिले. दरबाऱ्यांना हनुमान भगवंताच्या चरणांपाशी होते तेच बरं होतं असं वाटू लागलं. लोकांना शांतपणे बसणं अवघड होऊन गेलं आणि श्रीराम जांभई देतील तेव्हा त्यांचं तोंड उघडेल आणि हनुमानाने टिचकी वाजवली, की बंद होईल असा एक नियमच होऊन गेला. पण त्यामुळे दरबाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.

दिवसभर असं सुरू असताना सगळ्यांनी जानकी मातेला “आता काय करायचं?” असं विचारलं. “आता केलंय ते भोगा. आज नाही झालं तर उद्या परिवर्तन होईल.”, असं जानकी माता त्यावर म्हणाल्या. हनुमान दिवसभर टिचकी वाजवत राहिले. दरबाराची वेळ संपली आणि भगवंत भवनाच्या दिशेने चालू लागले.

हनुमान त्यांच्या मागे मागे जाऊ लागले. “तू कुठे चालला आहेस?”, असं जानकी मातेने हनुमानाला विचारल्यावर हनुमान म्हणाले, “दरबारातच जांभई येईल असं थोडीच आहे. सेवाच अशी आहे. जिथे भगवंत असतील तिथेच मी असेन.” जानकी माता त्यावर हसली आणि सीतामाईने त्यांना “उद्या सकाळी ये.”, असं सांगितलं.

माईची आज्ञा आहे त्यामुळे परतावं लागेलच, पण प्रभू रामचंद्रांना रात्रीही जांभई येऊ शकते. आता कसं करावं बुवा? असा विचार करत ते भवनाच्या छतावर बसले आणि जांभई जेव्हा यायची तेव्हा येऊदे, आपण रात्रभर टिचकी वाजवू असा त्यांनी निश्चय केला.

 

hanuman inmarathi

 

हनुमान रात्रभर टिचकी वाजवत राहिले. सकाळी ब्राह्ममुहूर्ताला प्रभू रामचंद्रांना जाग आली तेव्हा त्यांनी जांभई दिली. नियम असा होता, की जांभई दिल्यावर हनुमान टिचकी वाजवतील आणि टिचकी थांबेल तेव्हा तोंड बंद होईल, पण हनुमान तर सतत टिचकी वाजवत होते. श्रीरामांचं तोंड उघडंच राहीलं.

आता जानकी माता घाबरल्या. श्रीराम बोलू शकले तर काही सांगू शकतील. पण तोंडच उघडं असेल तर ते बोलणार तरी कसे? सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली. काय करावं हे कुणालाच कळेनासं झालं. तेव्हा गुरुजींना बोलावलं गेलं. गुरुजी आले आणि त्यांनी श्रीरामांची ही अवस्था पाहिली.

“हे तर मोठं संकट आहे.” असं वसिष्ठ ऋषी म्हणाले. मग ते म्हणाले, “सगळे जण दिसत आहेत. पण हनुमान कुठे आहेत? त्यांना बोलवा.” नगरभर हनुमानाची शोधाशोध सुरू झाली पण हनुमान तर छतावर बसले होते. तिथे कोण बघायला जाणार?

हनुमान कुठेच दिसत नव्हते म्हणून सगळेजण थकून गेलेले असतानाच त्यांना भवनाच्या कोपऱ्यातून शेपूट लटकत असलेली दिसली. सगळ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. हनुमानाला त्यांनी “खाली या” अशी प्रार्थना केली. हनुमान टिचकी वाजवत खाली आले. भगवंताचं उघड पडलेलं तोंड बघून हनुमानाने टिचकी वाजवायची थांबवल्यावर त्यांचं तोंड बंद झालं आणि सगळ्यांना आनंद झाला.

वसिष्ठ ऋषी म्हणाले, “हनुमाना, तू धन्य आहेस! आज आम्हाला कळलं. एक अवघड कार्य सुकर झालं. भगवंताला वश करणं अशक्य आहे. सारी सृष्टी भगवंताच्या वशात आहे. पण हनुमाना, धन्य आहे तुझी! कारण, भगवंताला वश करणं तुला चुटकीसरशी शक्य आहे.”

 

hanuman inmarathi

 

‘ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साईड’ अशी इंग्रजीत म्हण आहे. त्यानुसार आपल्याला कायम दुसऱ्याला जे मिळतंय ते आपल्याला मिळालंय त्यापेक्षा अधिक उत्तम आहे असं वाटत असतं. हा नैसर्गिक मानवी स्वभाव आहे. खरं बघायला गेलं तर जो तो आपापल्या जागी बरोबर असतो.

ही गोष्ट पुराणकाळातली असली आणि ती किती खरी, किती खोटी आहे हे आपल्याला ठाऊक नसलं तरी अमुक गोष्ट समोरच्याला मिळतेय, मला का नाही असा मत्सर आपल्या मनात निर्माण झाला तर आपण शांतपणे हा विचार मनातून काढून टाकावा हा बोध आपण या गोष्टीतून नक्की घेऊ शकतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?