डाव्या विचारवंतांचं नेमकं “इथे” चुकतं

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

१७ जूनच्या दैनिक सकाळ मध्ये सतीश बागल यांचा ‘ वानवा “उजव्या विचारवंतांची” ‘ हा लेख आला होता. त्यावर मी दिलेली प्रतिक्रिया आजच्या (दिनांक २३ जून) सकाळमध्ये आलेली आहे. ती सर्वासाठी शेअर करीत आहे.

उजव्या विचारवंतांची वानवा: एक वेगळे निदान

उजव्या विचारवंतांची वानवा हा सतीश बागल यांचा लेख निरीक्षण म्हणून रास्त असला तरी त्यात काही संकल्पनांचा घोटाळा झालेला आहे. तो काढायला हवा. ‘डावे/उजवे’ चे मूळ सार असे होते की समतेसाठी स्वातंत्र्य सोडायला तयार असणारे ते डावे आणि स्वातंत्र्यासाठी समता सोडायला तयार असणारे ते उजवे. किंवा लोकशाही ही निव्वळ संख्याशाही न बनता तिच्यात गुणशाही (मेरीटोक्रसी) म्हणून खुली स्पर्धा टिकावी असे मानणे हे उजवेपणाचे योग्य लक्षण मानता येईल.

भारतात हिंदुत्ववाद्यांना, ज्यांत निष्पक्ष-इहवादी, हिंदूहितवादी आणि हिंदूधर्मवादी अशांची सरमिसळ झालेली आहे, उजवे म्हणण्याची प्रथा का पडली? याचे उत्तर डाव्या विचारातील काही दोषांमध्ये दडलेले आहे.

 

aggressive hindutwawadi leaders marathipizza

डावे हे समूहांना न्याय मागतात व्यक्तींना नव्हे. आख्खा समूह अन्यायग्रस्त ठरविण्याची त्यांना सवय आहे.

मूळ ‘आर्थिक अन्यायग्रस्त वर्ग’ ही वर्गीय कल्पना सोडून देऊन भारतातील डाव्यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, स्त्रिया आणि अल्पसंख्यक ही समूहांची यादी प्रसृत केली. त्यांच्या बाजूने पक्षपाती असयाचे असे ठरवून टाकले. एवढ्यावर न थांबता त्यांनी अल्पसंख्य्कांची बाजू घेणे म्हणजे इस्लाममधील दोषांविषयी मौन बाळगणे असा अर्थ लावला. जाती आघाडीवर पहाता संघ म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मण हे वर्गशत्रू अशीही समीकरणे त्यांनी रुजवली.

त्यात हिंदुत्ववाद्यांचा विजय होऊ लागताच डाव्यांचा एकमेव अजेंडा मोदीद्वेष हा बनला. दुसऱ्या बाजूने हिंदुत्ववाद्यांनाही इस्लाम हा विरोधी ध्रुव वाटायच्या ऐवजी डावे/पुरोगामी हा सतत कसेही करून आपल्याला झोडपणारा, म्हणून मुख्य शत्रू वाटायला लागला. असे होत होत हिंदुत्व म्हणजे उजवेपणा हे समीकरण रुळले आहे.

विसावे शतक हे समता या कल्पनेने झपाटलेले शतक होते. त्यामुळे विचारवंतही त्यातच अडकलेले राहिले. याउलट अस्मिताबाजी करणाऱ्या कोणालाही, (भाषक, जाती इत्यादीसुध्दा) सखोल विचार करण्याची गरजच नसते. कारण वेगळी समाजव्यवस्था कशी व्यवहार्य होईल हा गहन प्रश्न त्यांच्यापुढे नसतोच. अस्मिताबाजांत विचारवंताची वानवा असणारच.

खरी गोष्ट अशी आहे की ‘इहवादी, बिगर जमातवादी आणि चांगल्या अर्थाने उजवी’ अशी विचारसरणी पुढे न आल्याने तिची रिकामी जागा हिंदुत्ववादी पादाक्रांत करत चालले आहेत. खरी वानवा आहे ती चांगल्या उजव्या विचारसरणीचीच.

===

ही प्रतिक्रिया दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. सकाळ मधील जागेत न मावलेले मुद्दे सुध्दा शेअर करीत आहे.

पत्रकार आणि प्राध्यापक याना ‘डावे-पुरोगामी’ ठरावेसे का वाटते?

 

leftists rightists intellectuals marathipizza
globindian.wordpress.com

प्रस्थापितविरोध, मग तो रास्त असो वा नसो, पत्रकारांना कसेही करून दाखवावासा वाटतो. कारण एकतर पत्रकारितेचे कार्य चिकित्सा हे आहेच. पण चिकित्सा म्हणजे दोषारोप असेच काही नसते. पण हे भान सुटते. कारण सनसनाटीपणाला मागणी जास्त असते. चांगली बातमी ही बातमी म्हणून उठावदार नसते पण वाईट बातमी उठावदार असते.

सर्वच वाचकांना कोणावर तरी खापर फोडणे याची एक मानसिक गरज असते. डावेपणात पर्याय/उपाय द्यायची बात नसते. चांगले घडणे हे क्रांतीपूर्वी कसे अशक्यच आहे हा आग्रह असतो. ग्रस्तांची बाजू घेणे यात एक आपोआप नैतिकतेचे वलय मिळते तेही आकर्षक असते.

प्राध्यापक मंडळींचा अकेडेमिक्स नावाचा आखाडा असतो त्यात प्रत्यक्ष व्यवहाराचा संबंध कमी उरतो. आपण जितपत काम करतो त्यामानाने आपल्याला फारच जास्त मिळते असा गिल्टही प्राध्यापकांना जास्त असतो. त्याचे जणू प्रायश्चित्त, आपण डावी भूमिका घेतल्याने मिळून, आपण शुध्द होतो असेही त्यांना वाटते.

आणि –

त्यामुळे डावेपणा कृतीत नाही पण उक्तीत अधिमान्यता मिळवून बसतो.

अकेडेमिक्स या आखाड्यात एकमेकांना धरून रहायचे दडपणही जास्त असते. प्रत्यक्ष राजकारणातील डाव्यांना व्यवहार्यतेचे भान थोडेसे तरी राखावे लागते पण प्राध्यापकांना जनतेला सामोरे जावेच लागत नाही.

तिसरा एक घटक असा की कोणत्याही सुधारणेमुळे ज्यांना पुढे लाभ होईल असे लोक स्वतःलाही अज्ञात असतात. उलट सुधारणेमुळे ज्यांचे हितभाग दुखावले जाऊ शकतात अश्या लोकांना त्याची जाणीव असते शिवाय ते संघटीत आणि मुखर/बोलके असतात.

यातूनही सुधारणाविरोध हा आपोआप जास्त प्रसिद्धी मिळवून देणारा असतो.

‘विचारवंत’ म्हणवून घेणाऱ्यात डावे/पुरोगामी सतत प्रबळ राहिले यामागे वरील कारणे देखील आहेत.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?