' ४१ व्या वर्षी क्रिकेटविश्वात पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेची सध्या का चर्चा होतीये? – InMarathi

४१ व्या वर्षी क्रिकेटविश्वात पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेची सध्या का चर्चा होतीये?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तरुण असताना श्रेयस तळपदेने साकारलेला इकबाल आठवतोय? नसरुद्दीन शहा यांच्यासह काम करताना एका प्रतिभावान आणि होतकरू क्रिकेटरची त्याने साकारलेली भूमिका, त्याच्या उत्तम भूमिकांपैकी एक मानली जाते.

इकबाल सिनेमात मूकबधिर क्रिकेटरची भूमिका साकारणारा श्रेयस पुन्हा एकदा अशाच एका कामासाठी क्रिकेटच्या मैदानावर उतरतोय. यावेळी तो साकारणार असलेली भूमिका आहे, प्रवीण तांबे याची, आणि चित्रपटाचं नाव आहे ‘कौन प्रवीण तांबे?’

 

kaun pravin tambe IM

 

प्रवीण तांबे या मराठमोळ्या गोलंदाजाची भूमिका श्रेयस साकारणार आहे. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १ एप्रिलला रिलीज होणार असलेला हा सिनेमा ज्या माणसाच्या आयुष्यावर बेतलेला आहे, तो प्रवीण तांबे नेमका आहे तरी कोण?

आयपीएलच्या चाहत्यांना हे नाव नक्कीच ठाऊक असेल. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करत आपल्या खास लेगस्पिनच्या जोरावर त्याने निराळी छाप सोडली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

वय वर्ष ४१, म्हणजेच साधारणपणे बॅट म्यान करण्याचं किंवा चेंडू बाजूला ठेवण्याचं वय; मात्र वयाच्या चाळीशीत तांबेने पदार्पण केलं आणि उत्तम क्रिकेट खेळून दाखवलं.

चाळीशीत इतका उत्साह दाखवणाऱ्या तांबेचा आयपीएलव्यतिरिक्त इतर प्रवास नेमका कसा आहे, हे मात्र आपल्यापैकी फारसं कुणाला माहित नसणार. चला मग आज जाणून घेऊया.

 

pravin tambe IM

प्रवीण तांबेच्या आयुष्यावर आधारित बायोपिक

क्रिकेटर प्रवीण तांबे याचा पडद्यामागचा प्रवास उलगडणारा हा सिनेमा म्हणजे त्याचा बायोपिक आहे. जयप्रद देसाई यांचं दिग्दर्शन आणि किरण यज्ञोपवीत यांचं लिखाण यांनी हा चित्रपट साकारलेला आहे.

१ एप्रिलपासून पाहता येणार असलेला हा सिनेमा, तांबेचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची जिद्दी वृत्ती आणि त्याचा संघर्ष यावर करण्यात आलेलं भाष्य असेल.

विडिओ व्हायरल झाला आणि…

वयाच्या ४८ व्या वर्षी प्रवीण तांबे किती फिट आहे आणि वयाच्या चाळीशीत तो आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत पदार्पण कसं करू शकला याचा उत्तम पुरावा असणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

 

pravin tambe 2 IM

 

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळणाऱ्या तांबेने हवेत उडी मारत एक सुंदर झेल टिपला आहे. पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभा असलेला खेळाडू असा फिटनेस आणि अश्या उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन करत असेल, तर मग चर्चा तर होणारच!

तांबेच्या आयुष्याचं सोनं घडवणारा प्रवास…

जिथे लोकांच्या नसानसात क्रिकेट भिनलेलं आहे, अशा मायानगरी मुंबईत १९७१ सालच्या ऑक्टोबर महिन्यात प्रवीण जन्माला आला. आज लेगस्पिनर म्हणून त्याने नाव कमावलं असलं, तरी लहान वयात क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या प्रवीणला त्यावेळी मात्र वेगवान गोलंदाज व्हायचं होतं.

नियतीने मात्र वेगळाच ‘टर्न’ त्याच्या आयुष्यात वाढून ठेवला होता. अजय कदम या कप्तानाच्या सल्ल्यानंतर तांबेने लेगस्पिन गोलंदाजी सुरु केली. अनेक वर्ष संघर्ष करावा लागलेल्या प्रवीणच्या आयुष्यात एक आशेचा किरण निर्माण झाला होता, तो २००० साली!

रणजी संघाच्या संभाव्य यादीत त्याचं नाव होतं. मुंबईच्या रणजी संघात अंतिम यादीत मात्र त्याला मुसंडी मारता आली नाही. संघर्षाचा प्रवास सुरूच राहिला. मात्र तो थांबला नाही. त्याने त्याची घोडदौड पुढे सुरु ठेवली. जिद्द आणि महत्त्वाकांक्षा याच्या जोरावर स्वप्न पूर्ण करायचा चंगच त्याने बांधला होता.

पधारो म्हारे देस…

त्याची मेहनत, चिकाटी आणि जिद्द याला अखेर यश आलं. हे घडण्यासाठी २०१३ हे साल मात्र उजाडावं लागलं. राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाने त्याचं टॅलेंट ओळखलं आणि आपल्या संघात त्याला संधी दिली.

 

pravin tambe 4 IM

 

वयाच्या चाळीशीत आयपीएल पदार्पण करणारा प्रवीण हा भारताचा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला. राहुल द्रविडच्या कर्णधारपदाच्या छत्रछायेत त्याने उत्तम कामगिरी करत अनेकांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढलं.

वयाप्रमाणेच त्याच्या उत्तम कामगिरीची चर्चा होऊ लागली. प्रवीण तांबे हे नाव क्रिकेट चाहत्यांच्या चर्चेत अगदी सहजपणे घेतलं जाऊ लागलं. ‘एज इज जस्ट या नंबर’ या उक्तीनुसार तंतोतंत खरा उतरणारा प्रवीण तांबे अनेकांचा लाडका झाला.

आयपीएल बंदी आणि नव्या वाटेवर प्रवास…

२०१३-१४ या वर्षांमध्ये चर्चेत असलेला प्रवीण तांबे त्यानंतर काहीसा विस्मरणात जाऊ लागला. त्यानंतरच्या काळात त्याच्या कारकिर्दीला आणखी एक मोठा धक्का बसला. अबूधाबीमधील टी-१० लीग खेळणं त्याला फारच महागात पडलं. कोलकत्ता नाईट रायडर्सचा भाग असूनही, त्याला आयपीएलमध्ये खेळण्यावर बंदी घालण्यात आली.

 

ipl trophy 2021 inmarathi

 

आयपीएलमधून अदृश्य झालेला प्रवीण तांबे लोकांच्या चर्चेतून आणि आठवणीतून सुद्द्धा दूर जाऊ लागला. मात्र ‘या स्पर्धेत बंदी घातली म्हणून इतर स्पर्धांमध्ये खेळायचं नाही का?’ असा विचार करत त्याने जगभरातील इतर टी-२० लिग्समध्ये खेळण्यास सुरुवात केली.

याचाच एक भाग म्हणून तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये दिसला संघर्षमय कहाणी असणाऱ्या मराठमोळ्या प्रवीण तांबेवर आधारित चित्रपट येऊ घातलाय आणि श्रेयस तळपदे हा मराठमोळा अभिनेता त्यात काम करतोय, ही अभिमानाची बाब नक्कीच म्हणता येईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?