' समीक्षकांची कंपूशाही, बड्या कलाकारांची नौटंकी की जातीयवाद: ‘झुंड’ खरंच यशस्वी होतोय? – InMarathi

समीक्षकांची कंपूशाही, बड्या कलाकारांची नौटंकी की जातीयवाद: ‘झुंड’ खरंच यशस्वी होतोय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

चित्रपटाची स्वतंत्र अशी विचारधारा किंवा पॉलिटिकल विचारसारणी नसते असं ज्यांना वाटतं त्यांच्या सद्सविवेक बुद्धीची मला कीव येते. सिनेमा हा आपल्या समाजाला आरसा दाखवायचं काम करत असतो त्यामुळे कोणत्याही सिनेमाची एक विशिष्ट अशी विचारधारा असते, त्यामुळे सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन एवढंच मानून चालायचं नाही!

आजच्या जमान्यात तर नाहीच नाही, कारण आजचा प्रेक्षक हा सजग आहे, खुलेआम व्यक्त होणारा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे politically charged आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सध्या सोशल मीडियावर नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. नागराज मंजुळे स्टाईल सिनेमा म्हंटल्यावर त्यात एका विशिष्ट समाजाचं चित्रण असणार हे आता लोकांनाही कळून चुकलं आहे, त्यामुळे त्याबाबत नवल काहीच नाही, पण मंजुळेचा हा सिनेमा फार वेगळ्याच गोष्टींसाठी चर्चिला जातोय!

 

jhund IM

 

सिनेमाची ज्याप्रकारे हवा करण्यात आली होती, त्यामानाने सिनेमाला फारच थंड प्रतिसाद मिळाला आहे. खुद्द अमिताभ बच्चन सिनेमात असूनसुद्धा म्हणावी तशी सुरुवात सिनेमाची न झाल्याने सध्या एक वेगळंच चित्र बॉक्स ऑफिसवर बघायला मिळत आहे.

लोकं पावनखिंड आणि चक्क बॅटमॅनसारख्या सिनेमासाठी गर्दी करत आहेत. खरंतर हे असं होण्यामागे एकच कारण आहे की बहुतेक लोकांना सिनेमा रुचलेला नाहीये, मग त्यामागे कोणतंही कारण असेल, त्यातला पॉलिटिकल स्टँड असेल किंवा कथानकातल्या त्रुटी असतील, पण सैराटप्रमाणे लोकांच्या मनावर गारुड करण्यात यंदा नागराज पुरताच फसला आहे, आणि हे सिनेमाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय!

ही झाली सिनेमाची आणि लोकांची बाजू, पण सध्या एक वर्ग असादेखील आहे जो भरभरून या सिनेमाचं कौतुक करतोय, लिहितोय अगदी हा सिनेमा ऑस्करला जावा अशी मागणी करतोय, त्यात काही समीक्षक मंडळीसुद्धा आहेत!

प्रत्येक सिनेमाच्या प्रीमियरला ढसाढसा रडणारा आमीर खान झुंड पाहूनसुद्धा रडला याचा तर संपूर्ण मीडियाने चावून चोथा केला, साऊथचा स्टार धनुष ज्याने आजवर कधी मराठी सिनेमाविषयी अवाक्षरदेखील काढलेलं आपण पाहिलं नाही तो या सिनेमाविषयी भरभरून बोलत होता.

 

jhund aamir khan IM

 

बाकी फिल्म इंडस्ट्रीतले एका विचारधारेचे दिग्दर्शक तर सिनेमा पाहून इतके हैराण झाले की त्यांचे ते व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर फिरत आहे. एवढं होऊनसुद्धा सिनेमाची कमाई ही जेमतेम ७ करोड इतकी झाली आहे.

एकंदर सिनेमाचं गणित बघता झुंड तसा अपेक्षेपेक्षा फारच कमी चालला आहे. ही झाली आर्थिक गणितं, पण मग तरी या अशा सिनेमाविषयी इंडस्ट्रीतले लोकं एवढं का भरभरून बोलत आहे?

यामागे मंजुळेच्या सिनेमातला प्रस्थापितांवरचा राग आहे का? तर याचं उत्तर काही अंशी हो ही असंच आहे. समाजात माजलेली दुफळी आणि जातीयवाद हा नागराजच्या प्रत्येक सिनेमातून झळकत असतो.

आजवर जे शोषित पीडित आहेत त्यांची बाजूसुद्धा आपण ऐकावी आणि आपण जे सांगतोय हे लोकांपर्यंत पोहोचावं हा नागराजचा हेतु असतो, पण सैराटनंतर याच गोष्टीची ढाल बनवून प्रत्येक सिनेमातून असं स्टेटमेंट करणाऱ्या नागराज मंजुळेला मात्र सिनेमात मुख्य भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचीच निवड का करावीशी वाटली याबद्दल त्याने काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही.

 

nagraj im

 

बघायला गेलं तर नागराजला या सगळ्या चर्चेने काहीही फरक पडत नाही, त्याला जे बनवायचं आहे तेच तो बनवणार, पण झुंडच्या निमित्ताने फिल्म इंडस्ट्रीतली ‘झुंडशाही’ उघडकीस आली!

एकीकडे एक वर्ग सिनेमाला शिव्या घालत होता, तर एक वर्ग नागराज फॅन्समधून ‘नागराज भक्त’ कॅटेगरीमध्ये जाऊन पोचला होता, एक गट नागराजच्या सिनेमामागचा प्रोपगंडा उघड करत होता, तर एक गट नागराज हा कसा एक ग्रेट दिग्दर्शक आहे आणि त्याच्या सिनेमातून तो कसा समाजाला एक वेगळा आकार देत आहे? असं स्पष्ट करण्यात व्यस्त आहे!

या दोन्ही गोष्टीचा फायदा सिनेमाला होताना मात्र दिसत नाहीये, नाहीतर अमिताभ बच्चन एवढं मोठ नाव सिनेमाशी जोडलेलं असतानासुद्धा एवढा थंड रिस्पॉन्स सिनेमाला मिळाला नसता!

एकंदरच सध्या सोशल मीडियावरचे हौशी क्रिटीक आणि राईचा पर्वत करणारे दुटप्पी कलाकार यांच्या वाढवून चढवून दिलेल्या प्रतिक्रियेमुळे प्रेक्षकांचा गोंधळ नक्कीच वाढला आहे आणि यामुळेच झुंडला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये.

jhund movie IM

 

एकंदरीत आपल्या इंडस्ट्रीमध्ये क्रिटीक लोकं ज्या सिनेमाला उचलून धरतात तो सिनेमा हमखास चालतोच, भले त्याच्यामागची त्यांची आयडियोलॉजी किंवा सिनेमाची फीलॉसोफी काहीही असेल, पण सध्या मात्र तसं होताना दिसत नाहीये!

‘झुंड’ला क्रिटीक लोकांनी, इंडस्ट्रीतल्या “तु मेरी खुजा मै तेरी खुजाता हूं” या पठडीत काम करणाऱ्या कित्येक कलाकारांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय तरी सिनेमाच्या कमाईतले आकडे काही वाढताना दिसत नाहीयेत!

मराठीतल्या कलाकारांनी झुंडबद्दल प्रतिक्रिया दिली नाही म्हणून देखील त्यांना टार्गेट केलं जाऊ लागलं, पण नंतर जितेंद्र जोशी, सुबोध भावे अशा कलाकारांनी भरभरून कौतुक करूनही सिनेमाची चर्चा फक्त सोशल मीडियावरच होताना दिसत आहे.

 

jhund jitendra joshi IM

 

खरंतर या सगळ्याला काही अंशी ही इंडस्ट्रीच जबाबदार आहे, झुंडमध्ये मांडलेल्या मुद्द्याला पॉलिटिकलआणि जातीयवादाचा अॅंगल देऊन सिनेमा सुपरहीट होईल असा काही लोकांचा समज होता पण यावेळेस मात्र नेमकं उलट चित्र दिसत आहे.

अमिताभ बच्चनसारखा महानायक आणि तब्बल १२०० ते १३०० स्क्रीन्स मिळूनसुद्धा झुंड अजूनही कमाईमध्ये स्ट्रगल करतानाच दिसतोय. खरंतर एक सिनेमा किंवा कलाकृति म्हणून आपण या सगळ्या आकड्यांकडे दुर्लक्ष जरी केलं तरी नागराजचा हा फॉर्म्युला आता लोकांनाही समजायला लागला आहे!

नागराज एक दिग्दर्शक म्हणून उत्तमच आहे पण जेव्हा एक दिग्दर्शक कायम एकाच चौकटीतल्या कथा लोकांसमोर आणतो तेव्हा एका काळानंतर लोकांनाही त्याचा कंटाळा यायला लागतो!

 

nagraj manjule 3 IM

 

प्रत्येक वेळेस सिनेमातून एखादं स्टेटमेंट जाणीवपूर्वक करणं आणि अनाहूतपणे त्याचा उपयोग सिनेमात करणं यातला फरकही लोकांना चांगला ध्यानात यायला लागलाय!

त्यामुळे नागराज मंजुळे किंवा इतर कोणत्याही दिग्दर्शकाने ही बाब नक्कीच लक्षात घेतली पाहिजे, कारण सिनेमा क्रिटीक किंवा बड्या बड्या कलाकारांच्या कौतुकामुळे नव्हे तर प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे मोठा होतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?