' चर्चा युक्रेनची, पण या रिअल हिरोमुळे घडलेलं सर्वात मोठं एअरलिफ्ट विसरून चालणार नाही – InMarathi

चर्चा युक्रेनची, पण या रिअल हिरोमुळे घडलेलं सर्वात मोठं एअरलिफ्ट विसरून चालणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

युक्रेन-रशियातील तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीत पुष्कळ भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. या सगळ्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आपल्या देशात सुरक्षित परत आणता यावे यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. याच धर्तीवर, भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ या नावाने युक्रेन रेस्क्यू मिशन सुरू केले आहे.

 

studnets im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आतापर्यंत हजारो भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना एअर इंडियाची पाच विमानं भारतात सुखरूप परत घेऊन आली आहेत. पुढील ३ दिवसांत २६ विमानं पाठवण्यात येणार आहेत. पण १९९० साली सद्दाम हुसेनच्या हुकुमावरून इराकने जेव्हा कुवेतवर आक्रमण केलं होतं त्यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने भारतीय नागरिक कुवेतमध्ये अडकले होते.

काही वर्षांपूर्वी आलेला अक्षय कुमारचा ‘एअरलिफ्ट’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. त्यात अक्षय कुमारने साकारलेलं रणजित कट्याल हे पात्रं एका खऱ्याखुऱ्या उद्योजकाच्या आयुष्यवर बेतलेलं आहे ज्याने १९९० साली इराकने कुवेतवर हल्ला केला होता त्यावेळी तिथे अडकलेल्या तब्बल १,७०,००० भारतीयांना व्यवस्थित नियोजन करून आणि अनेकांसोबतच्या संघटनात्मक प्रयत्नांनी स्वदेशात परत आणले होते. या भारतीय उद्योजकाचं नाव माथुनी मॅथ्यूज. ‘टोयोटा सनी’ या नावाने ते विशेषत: ओळखले जायचे.

 

airlift im

 

माथुनी मॅथ्यूज यांच्या बरोबरीने ज्यांनी ज्यांनी भारतीयांना परत आणायच्या या अवघड कामगिरीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्या सगळ्यांच्या प्रयत्नांचं चित्रण ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात केलं गेलं होतं. त्यावेळी भारतीयांना स्वदेशात परत आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या माथुनी मॅथ्यूज यांनी कशाप्रकारे भारतीयांना परत आणलं होतं हे थोडक्यात जाणून घेऊ.

त्यावेळी केलं गेलेलं भारतीयांचं स्थलांतर हे जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं स्थलांतर समजलं जातं. १९९० साली सप्टेंबरच्या पहिल्या आठ्वड्यापासून या कामगिरीला सुरुवात झाल्यानंतर ५९ दिवसांत एकूण ४८८ एअर इंडिया फ्लाईट्सद्वारे कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणलं गेलं होतं.

 

mathunny im

 

केरळमधील पथनमथिट्टा येथील कुंबनाद इथल्या मूळच्या राहणाऱ्या मॅथ्यूज यांनी १९५६ साली वयाच्या २०व्या वर्षी कुवेतमध्ये राहायला सुरुवात केली. जहाजामार्गे ते कुवेतला गेले होते. त्यावेळी सुएझ कालव्याच्या संकटामुळे मिडल ईस्टची पुरती वाट लागली होती. कुवेतला गेल्यानंतर मॅथ्यूज अर्थात टोयोटा सनी यांनी ‘अल – सयर ग्रुप’च्या मालकीच्या असलेल्या टोयोटा एजन्सीबरोबर काम करायला सुरुवात केली. १९८९ साली ते ‘एमडी’ च्या पदावर असताना निवृत्त झाले.

या वर्षांमध्ये त्यांनी बरीच मित्रमंडळी आणि हितचिंतक जोडले. कुवेतमधल्या भारतीय शाळेचे ते चेअरमन झाले आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये ते उच्च पदांवर राहिले. ज्या ‘इंडियन आर्टस् सर्कल’ने भारतीयांना एकत्र आणलं त्याच्या संस्थापकांपैकी ते एक होते. त्यांनी त्यांच्या बऱ्याच नातेवाईकांना आणि त्यांच्या गावातल्या आणि केरळच्या बाकी भागांतील इतर कुटुंबियांना कुवेत मध्ये राहायला येऊन एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

सनी यांचे पुत्र जेम्स यापूर्वी ‘द हिंदू’ शी बोलताना म्हणाले होते की, “जेव्हा युद्ध झालं तेव्हा याच कारणामुळे भारतीयांना वाचवायची जबाबदारी आपली आहे असं माझ्या वडिलांना वाटलं आणि त्यांनी सगळा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला.” हा हल्ला झाला त्यावेळी जेम्स अवघ्या २५ वर्षांचे होते.

 

world war 2 IM

 

जेम्स पुढे म्हणाले, “हा हल्ला होऊन पहिले ३ आठवडे झाले तसं माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की तिथे अडकलेल्या भारतीयांना पुरेशी मदत मिळत नाहीये. मग ते मला, थॉमस चॅन्डी यांना आणि हरभजन वेदी या बिझनेसमनना आपल्यासोबत घेऊन बगदादला गेले. त्यांचे इंजिनियरिंग कंपनीसोबत चांगले संबंध होते आणि काही मजुरांना ते जॉर्डनला पाठवत होते. वडिलांनी मला त्यांच्यासोबत परत मुंबईला जायला सांगितलं.” वृत्तपत्रांमधील माहितीनुसार, सनी यांनी या सगळ्यातून सुरक्षितपणे अंग काढणं नाकारलं आणि भारतीयांना मदत करायला आणि पाठिंबा द्यायला ते थांबले.

सनी यांची त्यानंतर बगदादमध्ये इराकच्या भारतीय अँबेसेडरसोबत मिटिंग झाली आणि मग ते कुवेतला परतले. मूलभूत सुविधा उपलब्द्ध आहेत मात्र अन्न, पाणी आणि बाकी काही गरजांचा तुटवडा आहे हे परतल्यावर त्यांच्या लक्षात आलं. हे पाहिल्यावर त्यांनी शाळांमध्ये आणि मोठ्या आवारांमध्ये मजुरांच्या आणि बाकीच्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. कुवेतमधली भारतीय शाळा ‘सलमिया’ इथे पहिला कॅम्प उभारला गेला जिथे बरेच भारतीय राहिले. त्यानंतर एक समिती स्थापन केली गेली ज्या समितीने सगळी जबाबदारी उचलली.

 

airlift man im

युक्रेनच्या धगधगत्या युद्धभुमीत ‘माणुसकी’ म्हणजे काय हे दाखवणारा भारतीय

‘बॉम्ब काळ बनून आला आणि…’ नविन शेखराप्पाची ही अखेरची झुंज थरकाप उडवणारी आहे

या सगळ्या दरम्यान सनी हे भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जॉर्डनच्या सीमा भारतीयांसाठी आणि बाकी निर्वासितांसाठी कधी खुल्या होतील याची चौकशी करत होते. एकदा ते निश्चित झाल्यावर सगळ्या भारतीयांना जॉर्डनला हलवण्याची योजना आखली गेली. त्या दरम्यान एक जहाज बसरा (इराक) मध्ये आलं आणि काही भारतीयांना जहाजात बसवून दुबईला पाठवलं गेलं आणि नंतर पुढे भारतात पाठवलं गेलं.

 

water im

 

बगदादला गेले असताना सनी परराष्ट्र मंत्री ‘आय. के. गुजराल’ यांना भेटले होते. त्यानंतर काही काळातच नव्या दिल्लीने भारतीयांना भारतात सुरक्षित परतता यावे यासाठी सद्दामसोबत वाटाघाटी गेल्या होत्या. आय. के. गुजराल जेव्हा कुवेतमध्ये आले होते तेव्हा ते आपल्यासोबत काही माणसांना परत घेऊन गेले.

जेम्स यांच्या मते त्यांचे वडील वाहनांच्या व्यवसायात होते त्यामुळे त्यांनी इराकी वाहतूकदार, भारतीय अधिकारी आणि युएन सोबत सगळ्या भारतीयांना बसेसद्वारे बगदादमार्गे जॉर्डनची राजधानी असलेल्या अम्मन येथे हलवण्याची आणि त्यानंतर निर्वासितांच्या कॅम्प्समध्ये नेण्याची योजना आखली.

एका बसमध्ये ६० जण अशा सुमारे २०० बसेस आणि प्रत्येक बसच्या १,२०० किलोमीटरच्या दहा फेऱ्या अशा सगळ्या गणिताचं ते अतिशय भलंमोठं काम होतं.” समितीने लोकांना कुठून उचलायचं, लोकांची कशा प्रकरे विभागणी करायची, सगळं चालवणाऱ्या ऑपरेटर्सना पगार देणे (यात समितीने गरजूंनाही समाविष्ट केलं होतं), सुरक्षेसाठी ताफ्याची व्यवस्था करणे, पासपोर्ट्सवर शिक्के मारणे अशा सगळ्या समस्या एका वेळी व्यवस्थित हाताळल्या.

जॉर्डनमध्ये कॅम्प्स उभारले जावेत म्हणून युएनशी शेवटचं टाय अप केलं गेलं आणि एअर इंडियाने विमानांची व्यवस्था करेपर्यंत लोकांना या कॅम्प्स मध्ये ठेवलं गेलं. त्यानंतर सनी आणि त्यांची टीम जहाजामार्गे दुबईला आली आणि विमानाने कुवेतला गेली.

नवी दिल्लीतील अधिकारी वर्ग, एअर इंडियाचे वैमानिक, समितीचे सदस्य आणि भारत सरकार या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा यात महत्वाचा वाटा होता.

 

airlift 1 im

 

‘एअरलिफ्ट’ चित्रपटातून ही इतकी जटिल कामगिरी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवली गेली होती. माथुनी मॅथ्यूज म्हणजेच टोयोटा सनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचललेली इतकी मोठी जोखीम आणि अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे स्वदेशी पोहोचवणं या सगळ्याचं आताच्या अवघड परिस्थितीत स्मरण करणं आताचीही परिस्थिती निवळून युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिक भारतात सुखरूप परततील असं आशादायी चित्र आपल्या मनात निर्माण करतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?