' युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी एकेकाळी ‘पॅडिंगटन बेअर’ला दिला होता आवाज… – InMarathi

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी एकेकाळी ‘पॅडिंगटन बेअर’ला दिला होता आवाज…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘झपाटलेला’ मधलं ‘तात्या विंचू’ हे पात्रं आठवतंय? बाहुल्यासारखा दिसणारा पण भयानक असणारा तात्याविंचू बोलायचा ते फार मजेशीर वाटायचं पण तो आवाज मात्र एका माणसाने दिलेला होता. त्यावेळी ऍनिमेटेड चित्रपटांची इतकी चलती नव्हती. महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय बोलक्या बाहुल्यांचे कलाकार रामदास पाध्येही तुम्हाला आठवत असतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या दोन्ही उदाहरणांमधला सामान धागा हा की एखादा माणूस एका प्रत्यक्षातल्या निर्जीव वस्तूला आपला आवाज देऊन ती सजीव असल्याचा आभास माणसांच्या मनात तात्पुरता का होईना निर्माण करतो आणि माणसांना काही काळाकरता समोर चाललेल्या करामती पाहत जागच्या जागी खिळवून ठेवतो. या बोलक्या बाहुल्यांना आवाज देणाऱ्या कलाकारांनी महाराष्ट्राला आजवर खूप रिझवलं. ऍनिमेटेड चित्रपटांमध्येही त्यातल्या पात्रांना माणसांनीच आवाज दिलेला असतो.

 

ramdas im

 

सध्याच्या घडीला संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलंय ते रशिया-युक्रेन मध्ये निर्माण झालेल्या अतिशय तणावपूर्ण परिस्थितीकडे आणि या सगळ्याचे जगावर काय परिणाम होतील याकडे. पण युक्रेनचे राष्ट्रपती ‘वोलोदीमीर झेलेन्स्की’ सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेत.

झेलेन्स्की राष्ट्रपती होण्यापूर्वी ते कोण होते हे तुम्हाला माहीत आहे का? झेलेन्स्की यांनी पूर्वी ‘पॅडिंगटन’ चित्रपटाच्या युक्रेनियन व्हर्जनच्या ‘पॅडिंगटन बेअर’ला आवाज दिला असल्याची रंजक माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. यासंदर्भातल्या ट्विट-रिट्विटचा खेळ इंटरनेटवर सध्या चांगलाच रंगल्याचं दिसतंय.

 

zel im

 

आपल्यातल्या बहुतेकांना हे माहित नसेल की युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमीर झेलेन्स्की हे ‘मॅरिंस्काय पॅलेस’चे रहिवासी होण्यापूर्वी अभिनेते आणि विनोदी अभिनेते होते. ते बऱ्याच टीव्ही कार्यक्रमांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिसले होते. २०१५ साली आलेल्या ‘स्लुगा नरोडा’ (लोकांचा सेवक) या सिरीजमध्ये त्यांनी युक्रेनच्या राष्ट्रपतींची भूमिकादेखील साकारली होती.

झेलेन्स्की यांनी कमावलेल्या राजकीय यशाव्यतिरिक्त त्यांनी ज्या बाकी कामगिऱ्या केल्या आहेत त्यात २००६ सालच्या युक्रेनियन व्हर्जनच्या ‘डान्सिंग विथ द स्टार्स’ मधल्या त्यांच्या विजयाचा उल्लेख करावाच लागेल. गेल्या आठवड्यात मायकेल आयडोव्ह या ट्विटर युजरने झेलेन्स्की यांनी ‘पॅडिंगटन’ चित्रपटाच्या युक्रेनियन व्हर्जनच्या ‘पॅडिंगटन बिअर’ला आवाज दिला असल्याचा दावा करत एक खास मुद्दा जगासमोर आणला आहे. २०१४ साली आलेला ‘पॅडिंगटन’ हा त्यावेळी अतिशय गाजलेला ऍनिमेटेड चित्रपट.

 

podi im

 

झेलेन्स्की यांनी ‘पॅडिंगटन २’मधल्या पॅडिंगटन बेअरलादेखील आवाज दिला होता. युक्रेन-रशिया युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही इतकी लक्षवेधी गोष्ट सर्वत्र पसरली नसती तरच नवल होतं. ‘द ब्लॅक लिस्ट’ या वेबसाईटचे संस्थापक फ्रँकलिन लिओनार्ड यांच्यापर्यंत हे ट्विट पोहोचलं. त्यांनी हे ट्विट रिट्विट करत झेलेन्स्की हे खरंच पॅडिंगटनचा युक्रेनियन आवाज होते का याची खात्री द्यावी अशी मागणी केली.

ही माहिती इतकी वाऱ्यासारखी पसरली की ती थेट ब्रिटिश अभिनेते ह्युग बोनेविले यांच्यापर्यंत पोहोचली. ह्युग बोनेविले यांनी ‘पॅडिंगटन’ या चित्रपटात पॅडिंगटनचे सावत्र वडील हेन्री ब्राऊन हे पात्रं साकारलं होतं आणि ‘स्टुडिओ कॅनल’ने या फिल्मची निर्मिती केली होती. त्यानंतर काही मिनिटांतच लिओनार्ड यांनी झेलेन्स्की हे खरोखरच ‘पॅडिंगटन बेअर’चा युक्रेनियन आवाज होते याची खात्री झाल्याचं ट्विट केलं.

 

huge im

 

लिओनार्ड यांच्या आधीच्या ट्विटवर आलेल्या एका रिप्लाय मध्ये चित्रपटाच्या युक्रेनियन व्हर्जनच्या डीव्हीडीचं कव्हर टाकलं गेलं होतं ज्यात आवाजाच्या श्रेय नामावलीत झेलेन्स्की यांच्या नावाचा उल्लेख केला गेला होता. त्यावरूनच लिओनार्ड यांनी पॅडिंगटन बेअर ला झेलेन्स्की यांनीच आवाज दिल्याची खात्री झाल्याचं ट्विट केलं असावं असा अंदाज आहे. त्यानंतर काहीच वेळात ह्युग बोनेविले यांनी झेलेन्स्की हे युक्रेनियन पॅडिंगटनसाठी पॅडिंगटनच्या ओळी म्हणत असल्याची क्लिप ट्विटद्वारे शेअर करत या गोष्टीची खात्री दिली आहे.

ही क्लिप शेअर करताना ट्विटमध्ये ह्युग बोनेविले यांनी लिहिलंय, “युक्रेनियन व्हर्जनच्या पॅडिंगटन बेअरला कुणी आवाज दिला होता हे आजवर मला माहीत नव्हतं. माझ्यापुरतं बोलायचं तर, राष्ट्रपती झेलेन्स्की यांना धन्यवाद.”

 

bear im

 

‘द हॉलिवूड रिपोर्टर’ने समोर आणलेल्या वृत्तानुसार, ‘स्टुडिओ कॅनल’, ‘पॅडिंगटन’ आणि ‘पॅडिंगटन २’च्या निर्मात्यानेदेखील झेलेन्स्की यांनी खरोखरच युक्रेनियन व्हर्जनच्या ‘पेरुवियन बेअर’ला आवाज दिला असल्याची खात्री दिली आहे.

आधीपासून लोकप्रिय असलेल्या अभिनेते-अभिनेत्र्यांनी राजकारणात प्रवेश केल्याची आणि नंतर फारशी चुणूक न दाखवू शकल्याची उदाहरणं अनेक आहेत. पण युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या बाबतीत हे अगदीच उलट असल्याचं म्हणावं लागेल. आजच्या घडीला ते इतक्या जबाबदारीच्या पदावर असताना यापूर्वी त्यांनी कलाक्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला होता ही गोष्ट आजवर गुलदस्त्यातच होती. युक्रेन देशासाठी आता इतका कसोटीचा काळ सुरू असताना त्यांचे राष्ट्र्पती झेलेन्स्की यांच्याबाबत कळलेली ही माहिती त्यातल्या त्यात चेहऱ्यावर हसू आणणारी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?