' “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं” त्याकाळी पसरलेल्या या अफवेमागचं सत्य जाणून घ्या! – InMarathi

“कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं” त्याकाळी पसरलेल्या या अफवेमागचं सत्य जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुरकुरे म्हणजे बालगोपाळांपासून ते तरुणाईपर्यंत अगदी सगळ्यांना आवडणारा पदार्थ! जुन्या पिढीतील सगळ्याच मंडळींना कुरकुरे आवडत नसले, तरी तरुण आणि लहानग्यांप्रमाणे मिटक्या मारत कुरकुरे खाणारी वृद्ध मंडळी सुद्धा पाहायला मिळतात.

‘चटपटीत आणि मसालेदार असल्यामुळे सहज आवडावा असा एक पदार्थ’, असं कुरकुरेचं वर्णन केलं, तरी ते चुकीचं ठरणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असं हे कुरकुरे हे नाव ऐकलं, की काही गोष्टी अगदी सहज आठवतात. त्याची ती रंगेबिरंगी पाकिटं, वाकडातिकडा आकार, उत्तम आणि आकर्षक जाहिराती हे सगळं तर अनेकांच्या मनात घर करून आहे.

 

kurkure IM

 

याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब अगदी सहज आठवते, ती म्हणजे ‘कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं’ असं कानावर पडणारं वाक्य!

अर्थातच, ही एक अफवा होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण या अफवादेमागचं सत्य नेमकं काय आहे, ते ठाऊक आहे का? चला जाणून घेऊया.

प्लास्टिक असंच जळतं…

कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं, या मताला दुजोरा देणारे पुरावे सुद्धा अनेकांकडे तयार असायचे. या सगळ्या पुराव्यांमध्ये अगदी हमखास पाहायला मिळणारा एक पुरावा तुम्ही सुद्धा नक्कीच पाहिला असेल. अहो काय म्हणून काय विचारताय, कुरकुरे जळतानाचा व्हिडिओ तुम्ही निदान एकदा तरी पाहिला असेल.

हा व्हिडिओ दाखवून, “बघा यात प्लास्टिक आहे, म्हणूनच कुरकुरे हे अशा पद्धतीने जळतं.” असं सांगणारी मंडळी तुम्हाला नक्कीच भेटली असतील.

 

kurkure burning IM

 

आता तर व्हॉट्सऍप, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून, हे असे व्हिडिओ व्हायरल करणं अधिक सोपं झालंय. त्यामुळे अजूनही कुरकुरे प्लास्टिकसारखे जळत असल्याचे व्हिडिओ पाहायला मिळतात.

प्रथमदर्शनी दिसताना, जळत असलेलं कुरकुरे प्लास्टिकप्रमाणे जळताना दिसतं. मात्र त्यात प्लास्टिक आहे, म्हणून असं घडतं हा मात्र एक गैरसमज आहे. कारण जे जळताना दिसतं ते प्लास्टिक नसतं.

प्लास्टिकप्रमाणे जळणारं आहे तरी काय?

कुरकुरे बनवताना भरपूर स्टार्चयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. तांदूळ, मका, बेसन अशा पदार्थांपासून बनवले जाणारे कुरकुरे जळताना प्लास्टिकसारखे जळणं साहजिक म्हणायला हवं.

या पदार्थांव्यतिरिक्त वनस्पती तेलाचा सुद्धा वापर कुरकुरे बनवताना केला जातो. या सगळ्यांचा एकत्रित परिपाक, म्हणजे कुरकुरे जळताना येणारा काळा रंग! घरात नेहमी बनवले जाणारे पापड, कुरडया यादेखील स्टार्चयुक्त पदार्थांपासूनच बनवण्यात येतात.

 

kurkure 2 IM

असे पदार्थ सुद्धा जळताना काळे होताना दिसू शकतात. मात्र हे पदार्थ आपण घरच्या घरी बनवतो, त्यांच्या शुद्धतेवर आपल्याला पूर्ण विश्वास असतो. म्हणूनच आपण असा कुठलाही प्रयोग करून पाहत नाही.

स्टार्चने पुरेपूर भरलेले हे पदार्थ जळताना सुद्धा प्लास्टिक किंवा कुरकुरेप्रमाणेच अधिक काळे होऊन जळतील. कारण सत्य पडताळायचं झालं, तर प्लास्टिकसारखा काळा रंग मागे राहणं, हा त्या पदार्थांमधील स्टार्च आणि मसालेदार घटकांचा परिणाम असतो.

कुरकुरे नक्की बनतं कसं?

सगळे पदार्थ आधी पाण्यात एकत्र केले जातात. त्यांचं योग्य मिश्रण करून ते वेगाने एका सपाट पृष्ठभागाकडे ढकलले जातात. जाळीसारखा अडथळा पार करून पलीकडे जाणारं हे मिश्रण कुरकुरेचा वाकडातिकडा आकार धारण करतं. त्यानंतर योग्य त्या आकारात कापून त्याचे छोटे तुकडे तयार केले जातात.

हे तुकडे मसालेदार व्हावेत, आणि चविष्ट, स्वादिष्ट रूप धारण करून पॅक करता यावेत यासाठी अस्सल भारतीय मसाल्यांचा पुरेपूर वापर केला जातो.

 

kurkure juhi IM

 

या मसाल्यांमध्ये, मिरची पावडर, लवंग, लसूण पावडर, दालचिनी, हळद, कोथिंबीर, मिरपूड, टोमॅटो, सिट्रिक ऍसिड अशा पदार्थांचा समावेश होतो. थोडक्यात काय, तर या सगळ्यात प्लास्टिकचा समावेश कुठेही नसतो.

कुरकुरे बनवताना प्लास्टिकचा वापर होतो, हा गैरसमज आता नक्कीच दूर झाला असेल नाही का? असं असूनही, ‘कुरकुरे प्लास्टिकप्रमाणे का जळतात?’ असा प्रश्न जर यापुढे तुम्हाला कुणी विचारला, तर त्याला योग्य उत्तर देणं आता तुम्हाला शक्य आहे, नाही का?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?