' जेव्हा आनंद दिघेंनी दिग्दर्शक विजु मानेंच्या आईला जगण्याचे बळ दिले – InMarathi

जेव्हा आनंद दिघेंनी दिग्दर्शक विजु मानेंच्या आईला जगण्याचे बळ दिले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

निवडणुका जवळ आल्या की जनतेच्या कल्याणाची जबाबदारी आपली आहे, आपण गरजूंचा उद्धार करू अशी नाना आश्वासनं राजकीय नेते देतात. पण बऱ्याचदा निवडणूका झाल्या की नेत्यांच्या मनातलं त्या आश्वासनांचं गांभीर्य ओसरल्याचं दिसतं.

 

rally im

 

नेतेमंडळी कामं करतात पण ज्या पोटतिडकीने ती करायला हवीत त्या पोटतिडकीने मात्र नाही हा आपल्यातल्या बहुतेकांचा अनुभव असेल. पण या सगळ्याला काही मोजके अपवादही असतात. आजही अशा नेतेमंडळींची त्यांनी केलेल्या लोककल्याणासाठी आपण आदराने आठवण काढतो.

कुठलाही मराठी माणूस या यादीत अग्रक्रमाने नाव घेईल ते बाळासाहेबांचं. शिवसेनेला ज्या उंचीवर बाळासाहेबांनी नेऊन ठेवलं त्या प्रकारचं कर्तृत्त्व दाखवणं शिवसेनेच्या पुढच्या काळातल्या अनेक कार्यकर्त्यांना शक्य न झाल्याचं आपण पाहतो. पण बाळासाहेबांनंतर जर शिवनेतेत त्यांच्याइतका दरारा, दबदबा असणारा कुठला नेता असेल तर ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे!

 

anand dighe 2 inmarathi

 

लोकांसाठी झटणारे म्हणून आनंद दिघे हे अतिशय लोकप्रिय होते. ठाणे जिल्ह्यात, ठाणे शहरात, मुंबईच्या काही भागांमध्ये शिवसेनेचा विस्तार करण्यात, शिवसेनेला मोठं करण्यात त्यांनी फार महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

टेंभीनाक्याजवळच्या त्यांच्या ‘आनंदाश्रम’ या कार्यालयात अनेक लोक त्यांची मदत मागण्यासाठी यायचे. बाकी कुठे न्याय मिळो न मिळो पण आनंद दिघे आपल्याला नक्की न्याय मिळवून देतील असा त्यांना दृढ विश्वास होता. मराठीतल्या आजच्या घडीच्या एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आईलादेखील आनंदजींनी कधीकाळी न्याय मिळवून दिला होता. चला तर मग जाणून घेऊया या घटनेविषयी.

 

anand dighe shivsena inmarathi

 

साधारण १९८९च्या आसपास हा किस्सा घडला होता. पतीचं आकस्मिक निधन झाल्यामुळे आपल्या लहान मुलाचं संगोपन करता यावं यासाठी एका महिलेला ठाण्याच्या ‘शिवाजी नगर’ भागामध्ये पिठाची गिरणी सुरू करायची होती. स्थानिक प्रशासनाकडे यासंदर्भात अनेकदा खेटे घालूनही या महिलेला ही गिरणी सुरू करायला परवानगी मिळाली नाही.

शेवटी कुणीतरी त्यांना तुम्ही आनंद दिघे साहेबांकडे जा, त्यांची तुम्हाला नक्की मदत मिळेल असं सुचवलं. ती महिला आनंद दिघे साहेबांना भेटायला गेल्यावर नेहमीप्रमाणेच भेटायला आणलेल्या अनेकांच्या समस्या ऐकल्यावर त्यांनी या महिलेला पाहिलं आणि “ताई तुमची काय समस्या आहे? तुम्ही कशासाठी इथे आलात?”, असं विचारलं.

 

anand dighe im

 

”आपण अनेकदा विनवण्या करून, महिनोन्महिने जोडे झिजवूनही आपल्याला पिठाची गिरणी सुरू करायला स्थानिक प्रशासन परवानगी देत नाहीये. आपल्याला एक लहान मुलगा आहे आणि त्याचं पालनपोषण करायला आपल्याला काम केलंच पाहिजे. आपल्यावर झालेला हा अन्याय लक्षात घेतला जाऊन आपल्याला इथे न्याय मिळेल या आशेने मी इथे आले आहे” असं ती महिला साहेबांना म्हणाली.

नवऱ्याचं अकाली निधन झालेलं असताना आणि पदरी लहानगा मुलगा असतानाही या महिलेला गिरणी सुरू करण्यासाठी मदत मिळाली नाही, इतका त्रास सहन करावा लागला हे पाहून आनंद दिघे संतापले. त्यांनी त्या भागातल्या आपल्या पक्षाच्या नगरसेवकाला बोलावून घेतलं आणि “तुम्ही या ताईंना ओळखता का?”, असं विचारलं. ती महिला परवानगी मिळवण्यासाठी त्या नगरसेवकाकडे अनेकदा गेली होती त्यामुळे त्याला या महिलेची लगेचच ओळख पटली. “त्या आमच्याच गल्लीत समोरच राहतात आणि त्यांच्याकडे कोंबड्या, बदक आहेत म्हणून आम्ही त्यांना कोंबडी-बदकवाल्या मावशी म्हणतो.” असं तो नगरसेवक म्हणाला.

त्यावर दिघेसाहेबांनी त्यांना “मग यांचं काम आहे हे तुम्हाला माहीत नाही का?” असा सवाल केला. एकूण आविर्भावावरून साहेब चिडलेले आहेत हे नगरसेवकाच्या लक्षात आलं आणि त्याने घाबरत घाबरत त्यांचं आपल्याकडे काहीतरी काम होतं असं म्हटलं.

दिघे साहेबांनी त्या नगरसेवकाला जवळ बोलावलं आणि त्यांचं तुझ्याकडे काम होतं हे तुला माहीत होतं ना असं म्हणत त्या नगरसेवकाच्या कानशिलात सणसणीत लगावली. अचानक हे काय झालं हे न कळून तो नगरसेवक हडबडला आणि त्या महिलेलाही हा प्रकार पाहून काहीशी भीती वाटली. दिघे साहेबांनी नंतर त्या नगरसेवकाची चांगलीच शाळा घेतली. “तुमच्या लेखी हे काम छोटं असेल पण या महिलेच्या दृष्टीने ते मोठं आहे. जी गोष्ट तुमच्या पातळीवर व्हायला हवी होती त्यासाठी या महिलेला माझ्याकडे का यावं लागलं? तुम्ही बसून काय करता? या महिलेला न्याय देण्याचं काम तुम्ही करायला हवं. या कामासाठी या महिलेला थेट टेंभीनाका गाठावा लागतोय याची तुम्हाला शरम वाटायला हवी.”, असं ते म्हणाले.

 

anand dighe 1 im

 

त्या नगरसेवकाची मान शरमेने खाली गेली आणि त्या महिलेला साहेबांनी आपल्याला समजून घेतलं याचं हायसं वाटलं. आजच्या काळात जिथे आपल्या नेत्यांचा हलगर्जीपणा, त्यांची अवैध, चुकीची कृत्य त्यांचे वरिष्ठ दाबण्याचा, पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात तिथे दिघे साहेबांनी योग्य न्यायनिवाडा करून नगरसेवकाला खडे बोल सुनावणं ही बाब सच्चा नेत्याचं लक्षण म्हटली पाहिजे.

नवरात्रीच्या आधीच्या काही दिवसांत ही सगळी घटना घडली. महिलेला त्यानंतर सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही गिरणी सुरू करता आली.

या किश्श्यातला एक रंजक भाग खरंतर याच्या पुढेच आहे. त्या महिलेचा जो लहानगा मुलगा तिच्यासोबत होता तो दुसरा तिसरा कुणी नसून चक्क आजच्या काळातला मराठी चित्रपटसृष्टीतला एक आघाडीचा दिग्दर्शक विजू माने होते. आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांचं, ‘स्ट्रगलर साला’ सारख्या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलेल्या विजू मानेंनी आपल्या कामातून मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इथवर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अतिशय संघर्षमय होता.

 

viju mane im

 

लहानपणी मनावर कोरला गेलेला हा प्रसंग विजू मानेंनी आयुष्यभर लक्षात ठेवला आणि समाजमाध्यमांतून ही आठवण शेअरही केली होती. त्यावेळी दिघेसाहेबांनी जर त्या महिलेला न्याय मिळवून दिला नसता तर आज कदाचित मराठी चित्रपटसृष्टी इतक्या चांगल्या दिग्दर्शकाला मुकली असती.

वरच्या उदाहरणातून नेत्याने कसं असावं याचा वस्तुपाठच साहेबांनी आताच्या आणि भावी काळातील अनेक नेत्यांना घालून दिला आहे. राजकारणाच्या दलदलीपासून दूर असलेल्या अशा नेत्यांकडे पाहून लोकांचं कल्याण करण्याची मनापासून इच्छा असलेल्या अनेकांचं राजकारणात उतरण्याचं नक्कीच धाडस होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?