' ‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’, शाळेने भरवली वादग्रस्त स्पर्धा आणि मग…. – InMarathi

‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’, शाळेने भरवली वादग्रस्त स्पर्धा आणि मग….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी होऊन काहीच दिवस झालेत. गांधीजींचं स्मरण केलं, की त्यांचा खून केलेली नथुराम गोडसे ही व्यक्ती आठवतेच.

 

gandhiji 2 IM

 

नथुरामची भूमिका करणारे अमोल कोल्हेदेखील मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हा वाद जरा कुठे थंड होतो न होतो तोच आता एक नवाच वाद पेटलाय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गुजरातमधल्या एका शाळेत भरवण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयांपैकी एक विषय ‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’ असा होता. स्पर्धेत भाषण करायला या वादग्रस्त विषयाला मान्यता दिलेल्या गुजरातच्या ‘युवा विकास अधिकारी’ निताबेन गवळी यांना या प्रकारामुळे निलंबित करण्यात आलं आहे.

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातल्या ‘कुसुम विद्यालय’ या स्वखर्चावर चालणाऱ्या शाळेत ही वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात आली होती. गुजरात सरकारच्या ‘युवा सेवा आणि सांस्कृतिक उपक्रम’ विभागाअंतर्गत जिल्हा पातळीवर ज्या ‘बाल प्रतिभा शोध स्पर्धेचं’ आयोजन केलं गेलं होतं त्या अंतर्गत वेगवगेळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

ही वक्तृत्त्व स्पर्धा त्यातलीच एक. १४ फेब्रुवारीला सोमवारी जिल्ह्यातल्या २५ वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी शाळांमधल्या ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांनी ‘बाल प्रतिभा शोध स्पर्धेतल्या’ वक्तृत्त्व, दोहा छंद सोपाई, लोकसंगीत, लोककथा, निबंध स्पर्धा, पात्रांच्या भूमिका साकारणे, कोरल संगीत, भजनं, लोकनृत्य, हस्तकला या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

 

school im

 

बक्षिस समारंभही त्याच दिवशी पार पडला होता. शाळेच्या अधिकाऱ्यांनी मात्र असं म्हटलंय, की त्यांनी केवळ शाळेचं आवार या कार्यक्रमाचं होस्टिंग करायला उधारीवर दिलं होतं. शाळेतल्या कुठल्याही विद्यार्थ्याने स्पर्धेत भाग घेतलेला नव्हता.

शाळेचे विश्वस्त विवेक देसाई म्हणाले, “या कार्यक्रमात शाळेचा एकही विद्यार्थी किंवा शिक्षक सहभागी झाले नव्हते. स्पर्धेकरिता आमच्या वर्गांची व्यवस्था केली जावी असं पत्रक आम्हाला ‘जिल्हा युवा विकास कार्यालया’कडून आलं होतं.”

मात्र, ‘वाइब्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार कुसुम विद्यालयातल्या एका विद्यार्थ्याने वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्याला बक्षीसही मिळालं होतं. पण तो विद्यार्थी वेगळ्या विषयावर बोलला होता. ‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’ या विषयाव्यतिरिक्त ‘मला पक्षी व्हायचंय आणि आकाशात उडायचंय’ आणि ‘मी शास्त्रज्ञ होईन आणि अमेरिकेत जाणार नाही’ हे त्या वक्तृत्त्व स्पर्धेतले आणखी दोन विषय होते.

 

Nathuram Godse InMararthi

 

या वादग्रस्त स्पर्धेची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरलेली असताना जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी मात्र आपल्याला याविषयी काहीच माहीत नव्हतं असं म्हटलंय.

जिल्हा शिक्षण अधिकारी बी. डी. बरैया म्हणाले, “या कार्यक्रमाची योजना आणि अंमलबजावणी जिल्हा युवा विकास कार्यालयातर्फे करण्यात आली होती. आम्हाला याविषयी काहीच माहिती नव्हती. वलसाडच्या तिथल रोडवरच्या कुसुम महाविद्यालयात १४ फेब्रुवारीला वेगवगेळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे असं पत्रक युवा विकास कार्यालयाने ८ फेब्रुवारीला जिल्ह्यातल्या सगळ्या २५ सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये फिरवलं होतं. या सोहळ्याचे परीक्षकसुद्धा युवा विकास कार्यालयानेच नेमलेले होते.”

‘वाइब्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार या वक्तृत्त्व स्पर्धेचा आणि त्यातल्या या वादग्रस्त विषयाचा सगळीकडून निषेध केला जातोय. या सोहळ्याच्या आयोजकांनी स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याला ट्रॉफी परत करायला सांगितली. त्यावर तो विद्यार्थी अश्रूभरल्या डोळ्यांनी म्हणाला, “मी याकरता खूप मेहनत घेतली होती. माझ्या शिक्षकांना विश्वासात घेतलं होतं. हे अन्यायकारक आहे.”

‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’ या विषयावर भाषण केलेल्या या मुलाला त्याच्या वक्तृत्त्वातल्या स्पष्टतेसाठी, विषयातल्या ज्ञानासाठी, विषयावरील दमदार युक्तिवादासाठी हे पारितोषिक देण्यात आलं होतं.

 

nathuram godse im

 

वलसाड जिल्हाधिकारी क्षिप्रा अग्रे यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं, “आम्ही महिला अधिकारी नीताबेन गवळी यांना गांधीनगरच्या सांस्कृतिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश मिळाल्यावर लगेचच निलंबित केलं आहे. या घटनेचा तपास करायला अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे.”

वरिष्ठ काँग्रेस नेते अर्जून मोधवाडिया यांनी या घटनेचा निषेध करत ट्विट केलंय, “वलसाडमध्ये वक्तृत्त्व स्पर्धेच्या नावाखाली गोडसे हे महापुरुष होते असं विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा आणि त्यायोगे त्यांच्या मनात गांधीजींविषयी तिरस्कार उत्पन्न करण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आहे.”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?